शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

सत्तेचं भूत

आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. दोन वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी होईल. आज त्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आहे. दीनदयाळजींनी सत्ता/ राजकारण हे समाजजीवनाचे एक अंग मानले. त्याला खूप जास्त महत्व देणे आणि समाजाचे अस्तित्व, समाजाचे सुखदु:ख, समाजाचे भलेबुरे यासाठी सत्तेला अमर्याद महत्व देणे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. या एका मुद्याचा सगळ्या व्यक्ती, संस्था, संघटना, सगळे पक्ष यांनी सखोल आणि गांभिर्याने विचार करायला हवा.

एक निरीक्षण फक्त या संदर्भात नोंदवावेसे वाटते- प्रभू रामचन्द्रांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत शेकडो, हजारो प्रजाहितरक्षक, विश्वकल्याणाची दृष्टी आणि प्रामाणिक तळमळ असणारे आणि अफाट कर्तृत्व असणारे राजे-महाराजे (शासक) भारतात आणि भारताबाहेर होऊन गेले. मात्र त्यातील कोणतीही राजवट वा व्यवस्था चिरकाल टिकली नाही. एवढेच नाही तर समाजाची सुखदु:ख वाढली किंवा कमी झाली नाहीत आणि समाजाची मानसिक, बौद्धिक, आत्मिक, सांस्कृतिक प्रगती वगैरे फारशी झाली नाही. आदिम समाज आजच्या सुस्थितीत आला याची कारणे सत्तेपेक्षा सत्तेच्या बाहेर अधिक आहेत. सत्तेचं/ राजकारणाचं भूत आपल्या मनातून आणि मानगुटीवरून उतरविण्याची नितांत गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा