शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

आंधळेपणा

दिवसाची स्थिती वेगळी असते, रात्रीची वेगळी असते. बालकांची स्थिती वेगळी असते, वृद्धांची वेगळी असते. शाळा महाविद्यालयातील स्थिती वेगळी असते, चित्रपटगृहातील वेगळी असते. तशीच विकसित देशातील स्थिती वेगळी असते, अविकसित देशातील स्थिती वेगळी असते. भरपूर जमीन, कमी लोकसंख्या, भरपूर साधने, वेगळा विकासक्रम असलेले देश आणि कमी जमीन, मोठी लोकसंख्या, निराळा विकासक्रम असलेले देश यांची स्थिती वेगळी असते.

हे पुराण लावण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेला वाहन कायदा. मुळात पर्यावरण हा विषय गुंतागुंतीचा. त्यावर नीमहकीम तोडगे असू शकत नाहीत. एकीकडे उद्योगांपासून तर अनेक गोष्टींनी प्रदूषण वाढवायचे आणि पियुसी प्रमाणपत्र नसेल तर मोठा दंड करून प्रदूषण नियंत्रण करण्याचा देखावा करायचा हे योग्य नाही. आज सर्वत्र रस्ते, मेट्रो, रेल्वे, बांधकामे यासारखी कामे सुरू आहेत. त्यांनी प्रचंड प्रदूषण होते. त्याचा दंड कोण भरणार? त्याच्या परिणामांचे काय? दुसरीकडे चप्पल घेण्यासाठीही महिन्याच्या बजेटचा विचार करणाऱ्या सामान्य माणसाला वाहन कायद्याचा धाक दाखवायचा? कष्टाने आपला संसार उभा करणारी व्यक्ती कष्ट थोडे कमी व्हावे यासाठी गाडी घेते त्याला नियम आणि कायद्याच्या फेऱ्यात अडकवणार? बरं त्याच्या घरी दोन चार झाडे असली तर त्याला प्रदूषण कमी केल्याबद्दल काही पैसा देणार का? फटाके फोडून प्रदूषण करणारे आणि फटाके न फोडणारे यांना एकच न्याय लावायचा का? झाडांचा आणि मातीचा पत्ता नसणाऱ्या टोलेजंग सदनिकांमध्ये राहून, एसी आणि गाड्यांनी प्रदूषण वाढवणारे आणि बाकीचे यांना एकच न्याय का? हेल्मेट सारख्या बाबतीत व्यावहारिक विचार हवा की नको? इतके करून सगळे नियम पाळणाऱ्या कोणाला दुर्दैवाने जीव गमवावा लागला तर संबंधित अधिकारी, मंत्री राजीनामे देतील का?

या बाबतीत आणखीन एक कोन असू शकतो. आज भारताला जगाच्या बरोबरीत उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय आर्थिक विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे इत्यादी आहेच. तेव्हा त्यांनी तयार केलेले मापदंड, त्यांच्या अपेक्षा, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी; यानुसार चालणे, निर्णय घेणे, योजना, कायदे इत्यादी करण्याचा एक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव असू शकतो का? नक्कीच असू शकतो. परंतु असा दबाव झुगारून देण्यासाठी; याच्यात्याच्याकडे न पाहता स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पद्धतीने चालण्यासाठी लागणारी शक्ती- युक्ती- बुद्धी- यांचाही लेखाजोखा घ्यायला हवा. ते कठीण आहे हे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा