secularism ही कल्पनाच मुळात भुक्कड आहे. सत्ताकांक्षा हे त्याचे मूळ आहे. राजा श्रेष्ठ की उपासना पंथ श्रेष्ठ? सत्ता कोणाची चालावी? या वादातून secularism चा जन्म झाला. त्यातून धर्म (वास्तविक उपासना पंथ) व राज्यव्यवस्था वेगळे असा प्रवाह निर्माण झाला. भारतेतर उपासना पंथ हे वास्तविक उपासना पंथ कमी आणि ईश्वराच्या नावाने राजकारण करणारे गट अधिक आहेत. त्यांची तुलना भारतीय उपासना पंथांशी होऊ शकत नाही. भारतातील ईश्वर मानणारे किंवा ईश्वर न मानणारे पंथ संप्रदाय सुद्धा या ऐहिक अस्तित्वाला शेवटचे टोक मानत नाहीत. शिवाय सत्ताकांक्षा हे त्यांच्या तत्वात कुठेही बसत नाही. त्याग, संयम, अपरिग्रह इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि शिकवण आहे. अन येथील समाजाच्या अंगोपांगात ती एवढी भिनली आहे की, येथील उत्तुंग कर्तृत्वाचे राजेदेखील सत्ता ही स्वत:ची खाजगी जहागीर तर मानत नाहीतच, उलट त्याचा त्याग करून तपश्चर्येला निघून जातात. राजा रन्तिदेव असो, राजा जनक असो, सम्राट चंद्रगुप्त वा अशोक असो, छत्रपती शिवाजी असोत, हरिहर बुक्कराय असोत, की आणखीन अनेक. त्याग आणि तपश्चर्येचा आदर्श त्यांनी जगून दाखवला आहे. त्यामुळेच `धर्म' या सर्वव्यापी कल्पनेचे तर सोडाच, उपासना पंथ या अर्थानेही राज्य व धर्म वेगळे करण्याची चर्चा भारतात अनाठायी आहे. विश्वनिर्मात्याने सगळी अक्कल भारताबाहेरच वाटली आहे या भ्रामक समजातून बाहेर येणे गरजेचे आहे. हे न समजल्यामुळेच, राजकारण आणि धर्म वेगळे करण्याची चर्चा केली जाते. त्याच्या परिणामी दिवा अथवा समई पेटवणे, कार्यालयात देवादिकांचे फोटो लावणे, सरस्वती वंदना आदी गोष्टींवर वाद होतो. त्या बंद केल्या जातात. सत्ताकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे की हे? this or this? जीवनाकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे आणि हे. this and this. or आणि and यातील फरक नीट समजून घेतला तर भुक्कडपणातून सुटका होऊ शकते. मानवी जीवनासाठी (व्यक्तिगत आणि सामाजिक) राजकारण आणि धर्म दोन्हीची गरज होती, आहे, राहील. त्यामुळे दोहोत कुरघोडीची स्पर्धा आणि संघर्ष असणे, निर्माण करणे, कल्पिणे, समजणे; हे सगळेच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. दोन्हीपैकी एकही वरचढ नसून, परस्परपूरक आहेत. राजकारण आणि धर्म (उपासना पंथ या अर्थाने सुद्धा) दोन्हीने समन्वयाने, हातात हात घेऊन चालणे, हाच भारतीय आदर्श आणि सिद्धांत होऊ शकतो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३ सप्टेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा