गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

लंबक

१) सहिष्णुता,

२) सर्वधर्म समभाव,

३) सगळ्यांचा आदर,

४) अल्पसंख्यकांचे हक्क,

कुठे गेले हे सगळे? जैन बांधवांसाठी चार दिवस मांस-मच्छी नाही खाल्ले तर कोणते आभाळ कोसळणार आहे? चार दिवस मांस खायला नाही मिळाले तर काय मरण ओढवणार आहे? खरे तर तसे झाल्यास चांगलेच होईल. पृथ्वीचा भार कमी होईल. एका कबुतराला वाचवण्यासाठी स्वत:चे मांस काढून देणाऱ्या शिबी राजाच्या या देशात चार दिवस मांसाहार करता येणार नाही यासाठी एवढा आक्रोश? शेजारच्या घरी एखादा मृत्यू झाल्यास त्या घरी चूलही पेटू न देता, सगळ्यांची जेवणे करण्याची जबाबदारी घेणारा समाज एवढा `स्व' केंद्रित व्हावा? स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थाने एवढा बरबटून जावा? बाकीच्यांचे काय व्हायचे ते होवो, आम्हाला हवे ते, हवे त्या वेळेला, हवे तसे झालेच पाहिजे !!! कोणते तत्वज्ञान आहे हे? अन यावर कोणीही काहीही बोलू नये? तथाकथित आधुनिक विचारांची अन तत्वांची वगैरे एवढी मानसिक गुलामी? निर्लज्जता या शब्दानेही मान टाकावी एवढी दयनीय अवस्था? या निर्लज्जांना हे ठासून सांगितलेच पाहिजे की, तुमचा बौद्धिक दहशतवाद चालणार नाही. कोणाला आम्ही हिटलर वाटलो तर वाटलो. तुम्ही जर अतिरेक करणार असाल तर लंबक जागेवर आणण्यासाठी आज ना उद्या दुसऱ्या टोकाला ताकद लावावी लागेलच.

बाय द वे- स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जिवंत प्राण्यांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्यांना माणसांच्या मृत्यूवर येताजाता गळे काढण्याचा अधिकार राहावा का? ही सृष्टी तुमच्या बापाची नाही. यच्चयावत जीवजंतु, वनस्पती, माणसे सगळ्यांची आहे.

- श्रीपाद कोठे

९ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा