बाबासाहेब पुरंदरे प्रकरणाचे वादळ आले अन गेले. विरोध करणाऱ्यांनाही समाधान वाटले, आपण सामाजिक- ऐतिहासिक विषय लावून धरले याचे. अन सरकारला समाधान वाटले ठरल्याप्रमाणे पुरस्कार देण्याचे. बाबासाहेबांना पाठींबा देणाऱ्यांना समाधान वाटले विजयाचे. त्यावेळी बोलायचा एक मुद्दा बोललो नव्हतो. मुद्दाम. कारण त्या गदारोळात कोणी त्याकडे शांतपणे अन गांभीर्याने पाहिले नसते. तो मुद्दा म्हणजे, प्रमाणीकरणाचा. इतिहास म्हटला म्हणजे पुरावे, प्रमाण आले. बरे दिलेले पुरावे सबळ आहेत की कच्चे वगैरे प्रश्न आहेतच. सहज एक वाटलं, आजचा एखादा संदर्भ घेऊन याचा विचार करून पाहावा.
संदर्भ म्हणून लोकसभा आठवली. नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले. रोजच कामकाजात व्यत्यय येत होता. ललितगेट प्रकरण तापवले जात होते. अखेर एक दिवस चर्चा झाली. त्यात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे बोलत असताना भाजपच्या एका सदस्याने सोनिया गांधींच्या बहिणीचे नाव घेतले. त्यावरून कॉंग्रेसचे सदस्य संतापले. खडगे तर `यू शट अप' म्हणाले. सोनिया संतापल्या. सभापतींसमोर येऊन घोषणा देऊ लागल्या. सगळ्या जगाने हे live पाहिले.
शे-दोनशे-पाचशे वर्षांनी जेव्हा भारतीय संसदेच्या इतिहासाची चर्चा होईल तेव्हा काय होऊ शकेल? पुरावे तपासले जातील. सगळ्यात सबळ पुरावा- सभागृहातील नोंदी. दुय्यम पुरावा- इलेक्ट्रोनिक वा मुद्रित प्रसार माध्यमे. कच्चा पुरावा- लोकांमधील चर्चा, किंवदंती, दंतकथा. सभागृहातील नोंदींमध्ये तर काहीच राहणार नाही. कारण तो भाग काढून टाकावा असेच अध्यक्षांचे आदेश होते. रोज सभागृह तहकूब होताना तर केवळ `सभागृह अमुक वेळेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे,' एवढेच सांगितले आणि नोंदवले जाते. कारण नसतेच. मग पाचशे वर्षांनी चर्चा झडतील की, सभागृह तहकूब झाले कशावरून? सोनियांच्या बहिणीबद्दल टिप्पणी केली कशावरून? सोनियांनी घोषणा दिल्या कशावरून? यासाठी असलेले पुरावे दुय्यम, तिय्यम आहेत. त्यावर विश्वास ठेवता यात नाही. ते प्रमाण नाहीत. याचा अर्थ या गोष्टी झाल्याच नाहीत, असा होईल का? प्रमाणीकरण हे असे असते. खूप साऱ्या घटना आणि खूप सारे तपशील घेऊन चर्वितचर्वण करता येईल. मात्र त्याचा लघुत्तम साधारण विभाजक उर्फ लसावि उर्फ आशय उर्फ निष्कर्ष हाच काढावा लागेल की, प्रमाणीकरण असेच असते. प्रमाणीकरण आणि सत्यता या वेगवेगळ्या गोष्टी असतात.
प्रमाणीकरण ही मुळातच अपुरी, अयोग्य बाब आहे. ती ताणली जाते तेव्हा तर ती त्याज्यच ठरवायला हवी. सगळ्या प्रकारचे, पुन्हा म्हणतो- सगळ्या प्रकारचे प्रमाणीकरण; ही सामूहिक गुन्हेगारी आहे. विशिष्ट स्वार्थाच्या पूर्तीच्या प्रयत्नांचा तो भाग असतो. भेसळीचे वा शव विच्छेदनाचे अहवाल असोत की, गुणवत्तेसाठीची विविध प्रमाणपत्रे असोत. `नेसले'ला काय प्रमाणपत्र नव्हते का? किंवा सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रमाणीकरण असूनही त्यात घोटाळे होत नाहीत का? उलट गावचा सोनार अधिक प्रामाणिक होता.
वर्तमान गोष्टींच्या प्रमाणीकरणाची ही तऱ्हा असते तर इतिहासाबद्दल तर बोलायलाच नको. तरीही आपल्याला प्रमाणे हवी असतात. कशासाठी? आम्हाला फक्त भांडायला कारणे हवी असतात बहुतेक.
- श्रीपाद कोठे
२८ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा