आपल्या आजूबाजूला नीट नजर फिरवली तरी कितीतरी गोष्टी आपल्याला समृद्ध करून जातात. पुष्कळ वर्षांपासून सकाळी दूध द्यायला येणारा भैय्या त्यातलाच एक म्हणायला हवा. मधे ३-४ दिवस त्याचा मोठा मुलगा दूध द्यायला आला. तो एका औषध कंपनीत फिरता जॉब करतो. पहिल्या दिवशी तो आला तेव्हा त्याला सहज विचारलं- बाबूजी गाव गये है क्या? कारण कधी कधी असं होतं. भैय्या गावाला गेला तर त्याचा हा मुलगा येतो. तो मुलगा म्हणाला- नही. बाबूजी बिमार है. कल आपके यहां आये थे क्या? म्हटलं- हो. आले होते. तो सांगू लागला- काल दूध वाटता वाटताच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे मधूनच घरी परत आले. अन लगेच अंगं जड पडू लागलं. अर्धांगवायूचा झटका आला. लगेच दवाखान्यात नेलं. खूप थोडं damage झालं आहे. फक्त चेहऱ्याचा डावा भाग थोडासा. बोलताना त्रास होतो. ओठांवर लक्षात येतं. तेवढ्यावर निभावलं. डॉक्टर म्हणतात, यानंतर त्रास वाढणार नाही. पण दवाखान्यात ठेवलं आहे. चार दिवस मुलगा येत होता दूध द्यायला. त्याच्याकडे विचारपूस करत होतो. काल सकाळी परिचित खडा आवाज कानावर आला- `दूध'. जाऊन पाहतो तर भय्या. लहान मुलगा गाडीवर घेऊन आला होता. मला तर तोंडात बोटे घालायचीच बाकी होतं. तोच आवाज. तोच भय्या. तसंच उभं राहणं. मोठ्या मुलाने सांगितल्याप्रमाणे ओठांवर लक्षात येत होतं अन बोलताना थोडं वेगळं वाटत होतं. विचारपूस वगैरे झाली. छान वाटलं. आज सकाळीही तीच हाक- `दूध'. आज आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं. भांडं घेऊन बाहेर आलो अन दारात उभं राहताच पुन्हा एक धक्का. भय्या आज चक्क एकटेच आले होते. स्वत: गाडी चालवत. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर सर्वसाधारण व्यवहार कसा राहतो याची कल्पना करून मग भय्याचा विचार केला तर लाज वाटल्याशिवाय नाही राहत. किती छोटी छोटी बहाणेबाजी करत असतो आपण. की दुबळेच असतो. एक मात्र खरं- भगवान दत्तात्रेयांचं अनुकरण करतो म्हटलं तर पदोपदी गुरु भेटतात. भय्या एखाद्या गुरूपेक्षा काय कमी म्हणायचा?
- श्रीपाद कोठे
११ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा