सोमवार, १० जानेवारी, २०२२

आदरणीय दत्तप्रसाद दाभोळकर जी...

आदरणीय दत्तप्रसाद दाभोळकर जी,

लोकसत्ता दैनिकात काल प्रकाशित झालेला स्वामी विवेकानंद यांच्यावरील आपण लिहिलेला विवेकानंदांचा 'धर्म' हा लेख वाचला. हसावं की रडावं कळेना. लेखाचं शीर्षक आहे विवेकानंदांचा 'धर्म' पण संपूर्ण लेखात विवेकानंदांनी केलेले धर्माचे विश्लेषण, धर्म विषयाची मांडणी, धर्मचर्चा याचा मागमूसही नाही. आपल्यासारख्या विद्वान व्यक्तीने असं असंबद्ध शीर्षक द्यावं याचं आश्चर्य वाटतं.

शिवाय आपली भाषाही आक्षेपार्ह आहे. अनेक तपशीलही चुकीचे आहेत. अनेक विधाने कपोलकल्पित आहेत. मुख्य म्हणजे आपल्या मनातील स्वामीजींविषयीचा आकस त्यात ओतप्रोत भरलेला आहे. लेखाच्या सुरुवातीलाच आपण म्हणता की, विवेकानंदांनी त्रिखंडात हिंदू धर्माचा झेंडा फडकावला हे शतप्रतिशत खोटं आहे. माझ्या सभ्यतेमुळे या वाक्यासाठी मनात येणारे विशेषण मी थांबवून ठेवतो. आपण अभ्यासक वगैरे असल्याने आपल्याला हे ठाऊक असेलच की, ती सर्वधर्म परिषद एका जागतिक दर्जाच्या आयोजनातील एक भाग होता. धर्म या विषयासोबतच अन्यही अनेक विषयांच्या परिषदा तिथे होत्या आणि या विविध परिषदांसाठी जगभरातील अनेक विद्वान आणि कर्तृत्वसंपन्न लोक त्या ठिकाणी आले होते. त्या सगळ्यांमध्ये हिंदू धर्माचा झेंडा फडकवणे हे त्रिखंडात झेंडा फडकवणे होत नाही का?

खेड्यातील पहिलवानाने ओलिम्पिक कुस्ती खेळायला जावे, असे जे वर्णन तुम्ही केले आहे ते तुमची समज आणि वकुब दाखवणारे असल्याने आणि भारतीय माणूस ते नीट समजू शकत असल्याने त्यावर काही मत मांडून मी माझी लेखणी विटाळणार नाही.

विवेकानंदांनी आमंत्रण कसे मिळवले हा एक विलक्षण प्रकार आहे अशी संभावना आपण केली आहे पण काय विलक्षण प्रकार ते मात्र सांगितले नाही. असं लिहून वाचकांच्या मनात खालच्या स्तराचा संभ्रम निर्माण करायचा ही बदमाशी आहे. 'अमेरिकेतील सगळ्या विद्वानांची विद्वत्ता या संन्याशाच्या विद्वत्तेपुढे फिकी आहे,' हे प्रा. राईट यांचे ओळखपत्रात लिहिलेले मत आपण जाणीवपूर्वक नजरेआड करता.

शिकागो परिषदेबाबत लिहिताना आपण म्हणता की,  ११ सप्टेंबरचे पाच मिनिटांचे भाषण आपल्या पुढे येते. जणू काही स्वामीजींना तासभर बोलायला सांगितले होते आणि ते फक्त पाच मिनिटे बोलले असा भास आपण निर्माण करता. वस्तुस्थिती काय होती? पहिल्या दिवशी फक्त औपचारिक व विषयाचा परिचय देणारे संक्षिप्त वक्तव्य करायचे होते. नंतरच्या काळात विषयाची विस्तृत मांडणी करायची होती. स्वामीजींनी तेच केले होते.

शिवाय ते काय बोलले याचा वृत्तपत्रीय अहवाल दाखला म्हणून देण्यापेक्षा उपलब्ध भाषण वाचले असते आणि त्याचा दाखला दिला असता तर ते योग्य झाले असते. वृत्तपत्रातील बातमी कशी असते, किती त्रोटक असते, वार्ताहराला जे आणि जसे समजेल तशीच कशी असते; हे आपणासारख्याला ठाऊक नसावे का? तरीही आपण वृत्तपत्रीय बातमीचा हवाला देता, तेही एकाच वृत्तपत्राचा; हे फक्त मौजेचे असू शकते.

आपण एक बेधडक विधान करता की, हिंदू धर्माने विवेकानंदांना पूर्णपणे नाकारले होते. अन यासाठी तुम्ही हरिदास देसाई यांना पाठवलेल्या पत्राचा आधार घेतला आहे. हे पूर्ण पत्र हिंदू समाजाचा आळस, स्थितीशीलता, जडता यावर आहे. स्वामीजींनी या जडतेवर प्रहार केला आहे. त्याचा अर्थ हिंदूंनी त्यांना नाकारले होते असा कसा काढता येईल.

श्री. देसाई यांना लिहिलेल्या ज्या पत्राचा आपण उल्लेख केलेला आहे त्यात शंकराचार्य, हिंदू संघटना इत्यादी उल्लेख कुठेही नाही. त्यातील शब्द आहेत - 'मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असे अमेरिकन लोकांना स्पष्ट सांगण्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनी काही देखील प्रयत्न केलेला नाही.' आपण यात आपल्या पदरचे शब्द का घातले असावेत? शिवाय हिंदू समाजाच्या निष्क्रिय वृत्तीवरील नाराजीचा अर्थ हिंदू समाजाने त्यांना स्वीकारले नाही, असा कसा काढता येईल?

पुढे आपण लिहिता की, 'हिंदू धर्म असे वागत होता यात हिंदू धर्माची अजिबात चूक नाही'. कृपा करून याचा अर्थ समजावून सांगाल का? हिंदू धर्म म्हणजे काय एखादी व्यक्ती आहे की संस्था? मुळात तुम्हाला हिंदू धर्म, हिंदू समाज हे तरी समजतं का? हिंदू ही अशी संस्थाबद्ध व्यवस्था आहे का? ज्या संस्थाबद्ध व्यवस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा असं म्हणता येत नाही कारण त्यांचेही अनेक पंथ, उपपंथ, संस्था, प्रादेशिक गट असतात. एक चर्च दुसऱ्या चर्चशी सहमत असेलच असे नसते. देवबंद हे बरेलवीशी सहमत असेलच असे नसते. हिंदू ही तर आणखीनच विलक्षण गोष्ट आहे. अन तरीही अगदी चहाच्या टपरीवरील चर्चेतसुद्धा हास्यास्पद ठरेल असे विधान आपण करता ही गंमतच आहे.

जगभरात सगळीकडेच सगळ्याच लोकांना प्रस्थापित किंवा हितसंबंधी लोकांनी त्रास दिला आहे, हेटाळणी केली आहे किंवा दुर्लक्ष केले आहे. समाज हा मोठ्या प्रमाणात स्थितीप्रियच असतो. समाज नवीन गोष्टीला चटकन स्वीकारेलच, प्रतिसाद देईलच असे नाही. त्यात काही मोठेही नाही अन विशेषही नाही. पण स्वामीजींनी निष्क्रियतेवर केलेल्या टीकेचा आधार घेऊन हिंदू धर्म कसा वाईट आहे आणि ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून विवेकानंद यांच्यापर्यंत सगळ्यांना त्याने कसे छळले हे सांगून तुम्ही तुमचा कंडू मात्र शमवून घेतला आहे. त्यानंतर आपण कुणा पूज्यपाद यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. महोदय, पूज्यपाद हे पत्राच्या सुरुवातीला स्वामीजींनी लिहिलेले संबोधन आहे. पूज्यपाद ही कोणी व्यक्ती नाही. श्री. प्रमदादास मित्र यांना ते आदरार्थी संबोधन आहे. आपण किती intentional आहात हेच या छोट्या छोट्या गोष्टीतून दिसते.

आपण लिहिलेल्या दीर्घ लेखातील प्रत्येक तपशीलावर भाष्य करता येईल, पण तो माझ्या, तुमच्या आणि वाचकांच्या वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय ठरेल म्हणून तसे करत नाही. तुमच्या लेखाचे सार लक्षात घेऊन काही बाबी मांडतो. स्वामीजींनी हिंदू समाज, हिंदू धार्मिक परंपरा, रीतिरिवाज आदींवर कठोर प्रहार केले आहेत; असा तुमचा निष्कर्ष आहे. पण त्यात नवीन किंवा वेगळे काय सांगितले आपण. ते जगजाहीर आहे. पण त्याचा अर्थ त्यांचा हिंदू धर्माला विरोध होता किंवा त्यांच्या या भूमिकेमुळे हिंदूंनी त्यांना स्वीकारले नाही; ही तुमची मते मात्र वास्तव नाहीत. हिंदू समाजाने स्वामीजींना त्यावेळीही स्वीकारले होते आणि त्यानंतर तर ही स्वीकार्यता कितीतरी पटींनी वाढली आहे. त्यांनी अपेक्षित केलेल्या सुधारणा बाणवून, तसेच सांगितलेली त्याग आणि सेवेची मूल्ये स्वीकारून आणि पचवून हिंदू समाज आज कितीतरी अधिक शक्तिशाली झाला आहे. बेलूर मठासाठी कोणी पैसे दिले इत्यादी गौण प्रश्न आहेत. अन प्रतिवादच करायचा तर, वराहनगर मठापासून बेलूर पर्यंतचा दहाएक वर्षांचा प्रवास हिंदू लोकांच्याच पैशाने झालेला आहे. काहीतरी खुसपट काढणे म्हणजे विद्वत्ता नव्हे.

स्वामीजींच्या मृत्यूची नोंद असणे किंवा नसणे हाही असाच उथळ प्रकार. एखादा नाठाळ कारकून आपल्यालाही वेठीला धरतोच ना? मग स्वामीजींच्या मृत्यूची नोंद नसेल तर त्यासाठी त्यांच्यावर बहिष्कार यापेक्षा वेगळेही काही असू शकेलच ना? निष्कर्ष काढून मोकळे का होता? अन तुम्ही म्हणता तसे शूद्र म्हणून त्यांना त्यावेळी समजा स्वीकारले नसेल तरीही आज तोच हिंदू समाज त्यांना डोक्यावर घेतो हा त्यांचा, त्यांच्या विचारांचा, शिकवणुकीचा विजयच नाही का?

शिवाय स्वामीजींचा कोलंबो ते अलमोडा हा प्रवास, या प्रवासातील मानपत्रे, लोकमान्य टिळक वा रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या समकालीन दिग्गजांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार, जगदीशचंद्र बोस यांचे भगिनी निवेदिता यांच्याशी असलेले संबंध, निवेदितांच्या शाळेला लोकांनी केलेले सहकार्य, अमेरिका युरोपात तीन वर्षे केलेले पहिले वास्तव्य, तिथे सुरू केलेले कार्य, मिळवलेले शिष्य; अशा देश विदेशातील अनेक बाबी येथील किंवा तेथील लोकांनी त्यांना स्वीकारले नसते तर शक्य झाल्या असत्या का? बाकी विरोध, मतमतांतरे हा तर मानवी जीवनाचा भाग आहे. कोणाच्या जीवनात वा कार्यात तो नाही? स्वामीजींना सगळ्यांनी स्वीकारले होते आणि आहे. अन स्वीकारले नाही तरीही स्वयंप्रकाशी सूर्याप्रमाणे ते महान आहेतच. तुम्ही त्यांना खेड्यातील पहिलवान म्हटल्याने, त्यांनी जगाला दिलेली धोबीपछाड लपून राहू शकत नाही.

आपला

श्रीपाद कोठे

सोमवार, ११ जानेवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा