मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

सुमारबुद्धी

बाहेर कोणीही आता आपल्याला फारसं गांभीर्याने घेत नाही हे लक्षात आल्याने बालबुद्धी कुमाराने गेल्या काही वर्षांपासून कुचकामाचे ठरलेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आक्रस्ताळा थयथयाट करत आपला राजकीय कंडू शमवून घेतला. बिचारा अजूनही गांधीजी आणि दाभोळकर यांच्याच हत्येबाबत बोलतोय, तरी लोक त्याच्यावर भडकतायत. खरे तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर, लालबहादूर शास्त्री यांच्या ह्त्येसाठीही मोदी आणि त्यांचे फासिस्त विचारच जबाबदार आहेत, याचे सज्जड पुरावे आणि युक्तिवाद त्याच्याकडे आहेत. त्याची याच विषयावर व्याख्यानमालाही होणार होती म्हणे. पण सोनियाने डोळे वटारल्याने त्याने ती रद्द केली अशी मराठी मुलखात चर्चा आहे.

आता अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा रा. स्व. संघाला गांधी हत्येच्या आरोपातून मुक्त केले असले आणि दस्तुरखुद्द या देशाच्या गृहमंत्र्याने संघावरील बंदी बिनशर्त उठविली असेल तरी काय झाले? त्याच्या मनाला ते पटले नाही म्हणजे ते चुकीचेच असले पाहिजे. आता भारताला काँग्रेसमुक्त करायचे म्हणजे कॉंग्रेसला घरी बसवायचे असेच लोकांना वाटत होते. सेवामुक्त झाल्यावर नाही का माणूस घरी बसत. तसेच. पण माणूस सेवामुक्त झाला की त्याने केलेले सगळे काम रद्द करायचे, त्याच्याकडून त्याला मिळालेल्या सगळ्या पैशाची वसुली करायची असे काही असते हे आज बरे झाले त्याने सांगितले. तो नाही का म्हणाला, देश काँग्रेसमुक्त करायचा म्हणजे पुन्हा पारतंत्र्यात न्यायचा म्हणून. बरे त्या म्हातार्या गांधीबाबालाही वयानुसार समजणे कमी झाले असावे. नाही तर स्वातंत्र्यासाठी लढा देणार्या गांधीबाबानेच काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला का दिला असता?


असो. आपण लहान माणसे. आपल्याला काय समजते? आपण कुठं बुकं वाचली आहेत? आपल्याला वाटते फाळणीच्या वेळी १० लाख हिंदू मारले गेले किंवा गोधरा स्थानकावर ५९ कारसेवक गाडीच्या डब्यात जिवंत जाळले गेले तेही चूकच असावे. आणि सर्वोच्च संस्थांनी संघाला निर्दोष मुक्त केले किंवा सीबीआयने आणि न्यायालयाने मोदींना निर्दोष ठरवले ते बरोबरच असावे. पण ते तसे नसते हे समजायला `कु(सु)मारबुद्धीच' आवश्यक आहे. आता एखाद्याच्या आईवडिलांनीच एखाद्याचे नाव कु(सु)मार ठेवले अन त्यामुळे त्याला ती कु(सु)मारबुद्धी प्राप्त झाली तर आपण का त्याचा दुस्वास करावा ना?

- श्रीपाद कोठे

५ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा