पंजाबच्या पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या चढाईत ७ जवान शहीद झाले. अशा घटना वेळोवेळी घडतात. त्यांची माहिती, वर्णन आणि दर्शन अस्वस्थ करणारे अन करुणा जागवणारे असते. अनेकदा या जवानांशी संबंधित व्यक्ती अत्यंत धीराची, अन मजबूत प्रतिक्रिया देतात. तसाच व्यवहारही पाहायला मिळतो. प्रसार माध्यमे अन सामान्य माणूस मात्र करुणेलाच उचलून धरतो. करुणा हे जीवनाचे अविभाज्य अन आवश्यक अंग आहेच. करुणाविहीन व्यक्ती माणूस या अभिधानालाच पात्र नसते. पण सगळ्याच घटकांप्रमाणे करुणा हाही एक घटक आहे. करुणेच्या भावनेत दृढता, स्थिरता, हिंमत, लढाऊपणा, कणखरता, वीरता, शौर्य, समर्पण वाहून जाऊ नये; याची काळजी घ्यायला हवी. झी मराठीवरील अंताक्षरीच्या एका पर्वात देशभक्ती गीतांचा एक भाग होता. त्यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हा मुद्दा मांडला होता. त्याग, बलिदान, शौर्य, समर्पण यांनी भावूक होणे ठीक आहे पण दुर्बलता उत्पन्न होऊ नये. त्याने शक्तीच जागृत व्हावी. यासाठी या भावनांना विचारांचे अन ध्येयमयतेचे अस्तर लावायला हवे. मात्र त्यावेळचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे मतप्रदर्शन सोडले तर यावर फार कोणी बोलत, लिहित नाहीत. आजकाल तर अगदी गाण्याच्या स्पर्धेतील लहानशा माघारीपासून सर्वत्र जणू दुबळे करण्याचाच सपाटा लागलेला दिसतो. अशा वेळी एक संस्कृत उक्ती आठवते. ही उक्ती नेमकी कुठली आहे माहीत नाही, पण शहिदांचा अत्युच्च सन्मान करणारी आहे.
द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमण्डल भेदिने
परिव्राट योगयुक्तश्च रणेचाभिमुखो हत:
(दोन प्रकारची माणसे सुखदु:ख मिश्रित हे सूर्यमंडल भेदून जातात- मुक्त होतात- एक योगयुक्त परिव्राजक आणि दुसरे रणांगणात शत्रूला तोंड देत शांत झालेले वीर योद्धे.)
वीरांचे असे जाणे वेदना देणारे असले तरीही त्याने पुरुषार्थ जागृतीच व्हावी, दुबळेपणा नाही. खरे तर करुणार्द्र शक्ती हीच जगाची सदैव गरज राहिली आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार ५ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा