रा. स्व. संघाच्या पुणे येथील शिवशक्ती संगमाच्या निमित्ताने सध्या चर्चा सुरु आहे. त्यातच स्वयंसेवकांना परत जाताना देण्यात येणाऱ्या शिदोरीची पण चर्चा आहे. वाहिन्यांवर चर्चा करणाऱ्या एका महाभागाने तर त्याचे सारे लक्ष यावरच केंद्रित केले होते. या विद्वानांना आणि सामान्य लोकांना देखील हे माहिती नाही की, हीच संघाची रीत आहे. अशी शिदोरी देणे केवळ `शिवशक्ती संगम'पुरते मर्यादित नाही आणि नव्यानेच सुरु झालेलेही नाही. संघाच्या प्रारंभापासूनच हे सुरु आहे. संघ शिक्षा वर्गातून वा शिबिरातून किंवा एकाहून अधिक दिवस चालणाऱ्या प्रदीर्घ बैठकातून; स्वयंसेवकांना हे नित्य परिचयाचे आहे. वर्ग, शिबीर, बैठक आटोपून परत जाताना स्वयंसेवकांचा प्रवासाचा पल्ला जिथे मोठा असेल तिथे हे नेहमीच पाहायला मिळते. बरे केवळ नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणीच नाही; तर दिल्ली असो की अहमदाबाद; बंगलोर असो की जयपूर; देशभरात जिथे कुठे कार्यक्रम होतात, त्या त्या ठिकाणचा हा अनुभव असतो. अन त्यातही सूक्ष्म विचार केलेला असतो. द्यायचे म्हणून दिले, करायचे म्हणून केले असा भाग नसतो. अगदी अलीकडचे मला ठाऊक नाही; पण काही वर्षांपूर्वीपर्यंत नागपुरातून तृतीय वर्ष करून परतणाऱ्या स्वयंसेवकांना पोळ्या-पुऱ्या भाजी, या शिदोरीसोबत गुळाचा मोठा खडाही दिला जात असे. भाजी खराब झाली, कमी पडली तर कोरड्या पोळीसोबत काही तरी असावे म्हणून. शिवाय काही जणांचा प्रवास तर दोन दिवस- तीन दिवस चालतो. त्यांची सोयही लक्षात घेतली जाते. मुळातच सगळ्यांचा विचार, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार, आस्थेने विचार, ही संघाची रीत आहे. ती संघाला, स्वयंसेवकांना माहीत आहेच. शिवशक्ती संगम सारख्या आयोजनातून समाजालाही त्याची माहिती होते.
- श्रीपाद कोठे
३ जानेवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा