- माझा देव श्रेष्ठ,
- माझा धर्म श्रेष्ठ,
- माझा वंश श्रेष्ठ,
- माझा पंथ श्रेष्ठ,
- माझा देश श्रेष्ठ,
- माझी भाषा श्रेष्ठ,
- माझे कुळ श्रेष्ठ,
- माझे गोत्र श्रेष्ठ,
- माझा पक्ष श्रेष्ठ,
- माझा इतिहास श्रेष्ठ,
- माझा पुत्र श्रेष्ठ,
- माझी पुत्री श्रेष्ठ,
- माझी कृती श्रेष्ठ,
- माझा मार्ग श्रेष्ठ,
- माझा विचार श्रेष्ठ,
माझं हे सगळं श्रेष्ठ असल्याने तुम्ही त्याचा स्वीकार करायला हवा. त्यानेच सगळ्यांचं कल्याण होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भल्यासाठीच माझं हे सारं सगळ्यांनी स्वीकारायला हवं. सगळ्यांच्या भल्यासाठीच सगळ्यांना हे स्वीकारायला भाग पाडणं माझं कर्तव्य आहे अन ते योग्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी संख्याबळ हवं, धनबळ हवं, सत्ताबळ हवं. त्यासाठी उद्योग हवा. सायास हवे. संघर्ष हवा. करा संघर्ष. जे करणार नाहीत त्यांना दूषणे द्या, नावे ठेवा, वाळीत टाका, संपवून टाका इत्यादी.
आज जगाची हीच स्थिती आहे. डब्यात फक्त शेंगदाणे आहेत. अन डब्यावर चिठ्ठ्या गुळ, रवा, साखर, तिखट, चहा, हळद वगैरे वगैरे वगैरे आहेत. समाजजीवनात आणि वैचारिक विश्वात सुद्धा डब्यात जिन्नस सारखाच, डब्यावर चिठ्ठी फक्त इस्लाम, ख्रिश्चन, साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, विज्ञानवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद इत्यादी इत्यादी इत्यादी. अलीकडे काही लोकांना याच जिन्नसावर हिंदू शब्दाची चिठ्ठी लावायला हवी असंही वाटायला लागलं आहे.
- श्रीपाद कोठे
१६ जानेवारी २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा