रविवार, २३ जानेवारी, २०२२

सहली नव्हे जीवनच...

देवाच्या विग्रहावर शेंदूराचे थर चढवतो तसे व्यवस्थांवर व्यवस्थांचे थर चढवत गेल्याने काय होते??

आज एक बातमी वाचली. दिवाळीनंतर काढण्यात येणाऱ्या शाळांच्या सहली खूप, म्हणजे सुमारे अर्ध्याने कमी झाल्यात. मध्यंतरी एक-दोन दुर्घटना घडल्याने नवीन नियम करण्यात आले. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीपासून तर विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपशिलापर्यंत सादर करणे इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. अतिशय स्वाभाविक आहे की, सहली कमी होतील.

का करतो आपण असं? कोणाला पटो वा न पटो. मानवी जगण्यातलं तत्वज्ञान वजा करण्याने हे होतं आहे. मुळात तत्वज्ञान ही काही फार मोठी, क्लिष्ट वगैरे बाब नाही. माणसाने आणि माणसांनी विचार करणे ही सुरुवात आहे तर व्यवस्थित रूपातील तत्वज्ञान ही विचारांच्या प्रक्रियेची परिणती. पण मुळात विचार करणेच खुडून टाकल्याने हे होते.

साधी गोष्ट आहे - सहलीत दुर्घटना घडल्या. त्या का? त्याची बरीच कारणं असू शकतात. पण प्रशासन, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक आणि याच्याशी संबंध नसलेला समाजही व्यवस्था या एकाच गोष्टीवर सगळं ढकलून मोकळा होतो. कारण ते सगळ्यांना सोयीचे असते. कोणत्याही घटनेतील व्यवस्थेची भूमिका काही प्रमाणातच असते. त्याशिवाय पुष्कळ गोष्टी असतात. या ज्या पुष्कळ अन्य गोष्टी असतात त्या तुमच्या आमच्याकडून अनेक गोष्टींची मागणी करतात. आपल्या विचारीपणाची, आपल्या समजूतदारपणाची, आपल्या संयमाची, आपल्या शहाणपणाची, आपल्या common sense ची, आपल्या समन्वयाची... अशा बऱ्याच गोष्टींची. या साऱ्या गोष्टी तयार करता येत नाहीत. त्यासाठी फक्त प्रयत्न करता येतो. त्यात सवयी, वातावरण, मोकळा वेळ, soft skills अशा सगळ्या गोष्टी असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक गोष्टी त्यात सहभाग देत असतात. उदा. - एखादी घटना घडल्यावर प्रसार माध्यमांनी ती उचलून धरणे. आता घटना घडण्याचा, त्याच्या अनेक शक्यतांचा इत्यादी विचार न करता जेव्हा माध्यमे जाब विचारणे या एककलमी कार्यक्रमाने चालतात तेव्हा पुढची साखळी तयार होते. अशा अनेक साखळ्या एकमेकीत गुंततात आणि मग सारे व्यवस्थेवर ढकलणे आणि आपली सुटका करून घेणे असे सुरु होते. याने हाती तर काहीच लागत नाही अन सोबतच माणसाची माणूस होण्याची प्रक्रियाच खुंटते. दुर्दैवाने गेल्या दीड दोन शतकात आपण हेच करत आलो आहोत. माणूस जन्माला येतानाच माणूस म्हणून पूर्ण असतो. अन हे जग आणि जगातील वेगवेगळ्या व्यवस्था अनुकूल करणे एवढेच त्याचे काम आहे असा आपला समज झाला आहे. हा समज एवढा हाडीमासी खिळला आहे की, त्यातून बाहेर पडण्याची शक्तीच जणू आम्ही गमावली आहे. out of the box विचार केला पाहिजे वगैरे फक्त शब्द आहेत. त्याचा अर्थ आणि आशय माणसाला किती आकलन होतो? मग व्यवस्थांच्या शेंदूराचे थरावर थर चढवले जातात अन सहली बंद होत राहतात. एकूण जीवनच बंद होतं आहे. हा केवळ सहलींचा श्वास कोंडणं नाही, ही जीवनाचा श्वास कोंडण्याची प्रक्रिया आहे; हे कळेल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २४ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा