बोहरा धर्मगुरू डॉ. सय्यदाना यांच्या अंत्यदर्शनासाठी बोहरा समाजाचे लाखो लोक मुंबईत एकत्र आले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १८ लोक मरण पावले. समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे `मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे... अकस्मात तोही, पुढे जात आहे’ याचाच प्रत्यय जणू. अंत्यदर्शनासाठी जाताना त्या शोकसंतप्त लोकांच्या डोक्यात स्वत:च्या मृत्यूचा विचारही आला नसेल. वेगवेगळ्या निमित्ताने खूप मोठ्या संख्येने लोक जमतात तेव्हा चेंगराचेंगरीची शक्यता फार जास्त असते. त्यामुळेच गर्दी सुरळीतपणे पांगवणे हे पोलिसांपुढे नेहमीच मोठे आव्हान असते. काही वर्षांपूर्वी मांढरदेवीच्या यात्रेतही चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा बळी गेला होता. बिहारमधल्या छठपूजेच्या वेळी लाकडी कठडा तुटल्याने अफरातफरी आणि परिणामी चेंगराचेंगरी झाली होती. मक्कामदिना यात्रेत जगभरातील कोट्यवधी मुस्लिम जात असतात. तेथेही अनेकदा चेंगराचेंगरीने अनेक बळी घेतले आहेत.
१९९४ मधला एक प्रसंग आठवतो. नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. गोवारी नावाची एक जमात विदर्भात आहे. या गोवारी जमातीचा एक विशाल मोर्चा आपल्या मागण्या घेऊन विधिमंडळावर आला होता. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला तरी कोणी त्यांचे म्हणणे ऐकण्यास आले नाही. त्यामुळे त्या विशाल जनसमुहात कुठेतरी थोडीशी गडबड झाली. गडबड वाढू नये म्हणून पोलिसांनी ५० हजाराचा तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती गर्दी उधळली. अफरातफरी माजली, चेंगराचेंगरी झाली आणि थोड्याथोडक्या नव्हे; ११४ गोवारींना आपले प्राण गमवावे लागले. अजूनही आठवते- रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेलो होतो. तेथे मरण पावलेल्या गोवारी बांधवांची प्रेते आणली गेली होती. त्यांची ओळख, नोंदणी, मोजणी वगैरे सुरु होती. नुकती काही तासांपूर्वीच ती घटना झाली होती. आकडा नक्की कळलेला नव्हता. सहज रांगेत ठेवलेली प्रेते मोजू लागलो. एक, दोन, तीन, चार करत २०-२५ पर्यंत पोहोचलो असेन. त्यानंतर मोजूच शकलो नव्हतो.
अंत्यदर्शन असो की यात्रा की मोर्चा वा अन्य काही निमित्त. माणसे मोठ्या संख्येने एकत्र जमतात तेव्हा समान आस्था, श्रद्धा, मागणी घेऊन एकत्र आलेले असतात. आपसात मतभेद वा संघर्ष नसतो. पण घटना अशी घडते की समान भावनेने एकत्र आलेल्यांच्याच पायाखाली तुडवले जाऊन लोक मरण पावतात. तेही एका वेळी मोठ्या संख्येने. अशा प्रकारे मरण पावणार्या सगळ्यांचा मृत्युयोग इतका विलक्षण सारखा असावा?
- श्रीपाद कोठे
२१ जानेवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा