स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतल्यावर लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखात, स्वामीजींची आद्य शंकराचार्य यांच्याशी तुलना केली होती. अद्वैत तत्वज्ञानाची ध्वजा उंच उभारणे आणि अखिल भारतीय दृष्टी तसेच संपूर्ण भारताला एक करण्याचे प्रयत्न; या दोन्ही संदर्भात टिळकांनी केलेली ही तुलना अतिशय सार्थ अशीच आहे. किंबहुना स्वामी विवेकानंद त्याहूनही खूप पुढे निघून गेलेले पाहायला मिळतात. स्वामीजींची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील. १) अखिल भारतीय दृष्टी, २) पूर्व आणि पश्चिम यांच्यातील सेतू आणि ३) हिंदू विचार आत्मसात करून अहिंदू पाश्चात्य लोकांना भारताच्या सेवेसाठी कामाला लावणे.
अखिल भारतीय दृष्टी असलेले महापुरुष स्वामीजींच्या आधीही आपल्या देशात होऊन गेले. पण त्यांची भौगोलिक, सामाजिक आणि वैचारिक व्याप्ती कमी होती. कोणाच्या दृष्टीपुढे पूर्ण भारत असला तरी त्यांच्या कामाची व्याप्ती कमी होती. स्वामीजींच्या नजरेपुढे आजच्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसह संपूर्ण भारत होता. या भारतातील सगळ्या जातीपाती होत्या, सगळे आर्थिक- सामाजिक- शैक्षणिक- गट होते, राजे महाराजांपासून दरिद्री भिकार्यांपर्यंत सगळे आबालवृद्ध स्त्री-पुरुष होते. यातील प्रत्येकासाठी त्यांनी विचार दिलेला आहे. यातील प्रत्येकाच्या कर्तव्यांची आणि अधिकारांची चर्चा त्यांनी केली आहे. भारत म्हणजे त्यांच्यापुढे भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य असे सारे होते. कुठलाही विषय, कुठलाही घटक, कुठलेही क्षेत्र त्यांच्या नजरेतून आणि स्पर्शातून सुटले नाही. जो भारत त्यांच्या नजरेपुढे होता तो त्यांनी पूर्ण फिरून पालथा घातला होता. ते जंगलात राहिले, खेडोपाडी झोपड्यातून राहिले आणि राजे महाराजांच्या महालातूनही राहिले. प्रत्यक्ष स्वामीजींच्या काळातही अनेक थोर पुरुष होते. पण त्यातील प्रत्येकाच्या काही मर्यादा होत्या. कोणी एखाद्या जातीसाठी काम करीत होते, तर कोणी एखाद्या समस्येसाठी, तर आणखी कोणी एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी. कोणी फक्त स्त्रियांसाठी तर कोणी मुलांसाठी. स्वामीजींची दृष्टी अनेक अर्थांनी व्यापक आणि सर्वसमावेशक होती. त्याला प्रत्यक्ष कार्याचीही जोड होती. भारताच्या ज्ञात इतिहासातील अशा प्रकारचे स्वामीजींचे पहिले व्यक्तीमत्व होय. भारतावरील प्रेमाचा इतका खणखणीत, स्पष्ट आणि ठाम उच्चार त्यांच्या पूर्वी झाला असेल का ही शंकाच आहे. इंग्रजांविरुद्ध लढल्या गेलेल्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्याला मिळालेल्या यशात, स्वामी विवेकानंद यांनी केलेले जागरण आणि प्रबोधन यांनी केलेल्या पूर्वतयारीचा मोठा व मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद यांनीच नव्हे तर जगदीशचंद्र बोस आणि जे.आर.डी. टाटा यांच्यापर्यंत सगळ्यांनी त्यांचे ऋण मान्य करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
या पृथ्वीच्या पाठीवर विविध मानववंश वेगवेगळ्या ठिकाणी उदयाला आले. त्यांनी आपापली वाटचाल केली. प्रत्येकाचा विकास आपापल्या पद्धतीने आपापल्या शक्तीनुसार झाला. त्यात भारताचा विकास वैशिष्ट्यपूर्ण होता. लौकिक बहिर्मुख जीवनाला अलौकिक अंतर्मुख आध्यात्मिकतेची दिलेली जोड हे भारताचे वैशिष्ट्य. अन्य जग, विशेषत: पाश्चात्य समाज लौकिक बहिर्मुखतेतच अडकून पडले. या दोहोंना जोडण्याचे कार्य स्वामीजींनी यशस्वीपणे केले. जणूकाही त्यासाठीच त्यांचा जन्म होता. आधुनिक वैज्ञानिक प्रगती सुरु झाल्यावर पाश्चात्यांच्या धर्मश्रद्धा आणि त्यांचा पाया धडाधड कोसळू लागला होता. अशा वेळी निर्माण झालेली रिक्तता भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. नेमके हेच कार्य स्वामीजींनी केले. भगिनी निवेदिता म्हणतात त्याप्रमाणे, `जिला सत्याचे भय नाही अशा धर्मश्रद्धेची पश्चिमेला गरज होती. स्वामीजींनी ती गरज पूर्ण केली.’ अशा प्रकारे जगभरातील विभिन्न मानव समुदायांना, हिंदू चिंतनाने प्रतिपादित केलेल्या जीवनलक्ष्याच्या दिशेने वळवण्याचे अतिप्रचंड महत्कार्य स्वामीजींनी पार पाडले आणि पूर्व आणि पश्चिमेचा संगम आणि समन्वय घडवून आणला. पूर्व आणि पश्चिम याआधी कधीच एकत्र आली नव्हती वा एकमेकांना अपरिचित होती असा याचा अर्थ नाही. स्वामीजींच्या पूर्वी झालेले पूर्व- पश्चिमेचे एकीकरण राजकीय आणि आर्थिक वर्चस्व गाजवण्याचा भाग होता. मात्र कोणीही कोणावर सत्ता गाजवणे, एकाने दुसर्याला मिटवून टाकणे यासारख्या क्षुद्र गोष्टी पूर्णपणे दूर सारून; विश्वकल्याणाच्या प्रबल ऊर्मीने कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी ती वाट दाखवून; त्यासाठी मान्यता मिळवण्याचे भगिरथ कार्य हे स्वामीजींचे दुसरे वैशिष्ट्य होय.
अहिंदू पाश्चात्य लोकांना हिंदू विचार आत्मसात करून भारताच्या सेवेत लावणारेही स्वामीजी पहिले महापुरुष होत. भगिनी निवेदिता तर सुपरिचित आहेतच. त्यांच्याशिवायही अनेक जण भारताच्या सेवेत लागून स्वत:ला धन्य समजत होते. अल्मोड्याला अद्वैत आश्रम प्रारंभ करणारे सेव्हियर दांपत्य, स्वामीजींच्या भाषणाची टिपणे घेणारे गुडविन, मठ आणि अन्य सेवाकार्यांसाठी पैसा देणारे विदेशी लोक, विदेशात त्या त्या ठिकाणी आश्रम स्थापन करण्यासाठी वेगवेगळी मदत करणारे लोक, स्वामीजी आणि त्यांच्या गुरुबंधूंना सुरुवातीच्या दिवसात निवारा देणारे लोक; अशा अनेकांचा उल्लेख करता येईल. भारतात महिलांना जाळून टाकण्यात येतं का? लहान मुलांना मगरीच्या तोंडात फेकून देण्यात येतं का? जगन्नाथाच्या रथाखाली ढकलून देऊन लोकांना चिरडून टाकण्यात येतं का? भारत हा भूताखेतांचा देश आहे का? असे नाना प्रश्न युरोप-अमेरिकेत स्वामीजींना विचारण्यात आले होते. भारताबद्दल लोकांच्या काय कल्पना होत्या हे यावरून लक्षात यावे. लोकांच्या मनातील अशा सार्या चित्रविचित्र कल्पना दूर करून त्यांना आपल्या देशाची माहिती करून देणे, भारताविषयी योग्य प्रतिमा निर्माण करणे, येथील विचारांशी-चिंतनाशी त्यांचा परिचय करून देणे, या विचारांची श्रेष्ठता पटवून देणे, वर्तमान युगातील त्याची उपयुक्तता आणि महत्व विशद करणे आणि अंती त्यानुसार व्यवहार करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे; एवढे सारे स्वामीजींनी केले. हे करताना मोठा संघर्षही त्यांना करावा लागला. निंदानालस्ती, अपप्रचार, गैरसमज असे सारे त्यांनी लीलया पेलून धरले. जगात त्यावेळी नव्यानेच प्रसारित होत असलेल्या इंग्रजी भाषेत हजारो वर्षांपूर्वीचे उपनिषदांचे तत्वज्ञान समजावून सांगणे किती जिकीरीचे काम आहे हे स्वत: स्वामीजींनीच नमूद करून ठेवले आहे. कधी ऐकलेसुद्धा नाहीत असे अनेक शब्द, परिभाषा, कल्पना पूर्णत: नवीन संस्कृतीतील आणि नवीन वातावरणातील लोकांना समजावणे किती कठीण काम असेल ! जगाच्या विचारविश्वात नवीन भाव संक्रमित करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठीच ईश्वराने त्यांना पाठवले असावे.
झोपलेल्या भारताला जागे करणे आणि जगाची उपेक्षा संपवून टाकून जगाच्या नकाशावर त्याला सन्मानाने प्रतिष्ठित करणे यामागे स्वामीजींची काय दृष्टी होती? काय हेतू होता? काय साधायचे होते त्यांना? पाश्चात्य दिग्विजय आटोपून भारतात परतल्यावर रामनद संस्थानातील ज्या पांबन येथे स्वामीजींनी पहिले पाऊल ठेवले तेथील अभिनंदनपत्रास उत्तर देताना स्वामीजींनी स्पष्ट शब्दात हा उद्देश कथन केला. ते म्हणाले, `विधीच्या संकेतानेच आपण हिंदू एका मोठ्या आणिबाणीच्या आणि जबाबदारीच्या अवस्थेत सापडलो आहोत. समस्त पाश्चिमात्य जाती आमच्याकडे आध्यात्मिक साहाय्यासाठी येत आहेत. भारतमातेच्या सर्व सुपुत्रांचे आता कर्तव्य आहे – समस्त जगाला मानवजीवनाच्या कोड्याचे सर्वोत्कृष्ट, समाधानकारक उत्तर देण्यासाठी स्वत:ला सर्वतोपरी पात्र करणे. सर्व जगाला धर्म शिकवणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे.’
शिकागोच्या सर्वधर्म परिषदेनंतर भारतातून अनेक अभिनंदनपत्रे स्वामीजींना पाठवण्यात आली. त्यातील मद्रासच्या अभिनंदनपत्राला त्यांनी पाठवलेले उत्तर `हिंदुधर्माचे पुनरुत्थान’ या शीर्षकाने प्रसिद्ध आहे. या प्रदीर्घ उत्तरात स्वामीजींनी त्यांच्या कार्याचा आणि भारताच्या जीवनहेतूचा एक विशाल पट रेखाटला आहे. भारताचा इतिहास, परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्ये, वर्तमान निराशाजनक स्थिती यांचा आढावा घेतल्यावर स्वामीजी लिहितात, `भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचे, नीतीमत्तेचे, आध्यात्मिकतेचे प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल काय? देवतुल्य साधुसंतांचे अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्याखेड्यातून, जंगलाजंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे. दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करीत असतात. फलावरून वृक्षाची पारख होते असे म्हणतात. अगदी खरे. भारतातील प्रत्येक आम्रवृक्षाखाली जा. झाडावरून खाली गळून पडलेल्या सडक्याकिडक्या, विजळलेल्या, अर्ध्याकच्च्या आंब्यांच्या टोपल्यावर टोपल्या भरून घ्या आणि त्यातील प्रत्येकावर खूप संशोधनात्मक पांडित्याने भरलेली पुस्तकांमागून पुस्तके खरडून टाका, तरीसुद्धा तुम्ही एकाही आम्रवृक्षाचे बरोबर वर्णन केल्यासारखे होणार नाही. आता परत जाऊन, जास्त नाही, फक्त एकच पूर्णपक्व, सरस, मधुर आम्रफल तोडून आणा. बस त्या एकाच फळाचे वर्णन कराल तरी त्या आम्रवृक्षाचे खरे गुण माहीत झाले असून त्याचे अगदी बरोबर वर्णन तुम्ही केले असे म्हणता येईल.’
`तद्वत या देवतुल्य महापुरुषांच्या जीवनातच आपल्याला खर्या हिंदुधर्माचे दर्शन घडत असते. जो हिंदूजातीचा वृक्ष शतकानुशतके पुष्ट होऊन वाढत आला आहे; हजारो वर्षे प्रचंड झंझावातांचे आघात सहन करूनही जो अक्षय यौवनाच्या अखंड ओजाने आजही गौरवाने उभा आहे, त्या जातिवृक्षाच्या खर्या रुपाची, बळकटीची व अंतर्गत जोमाची अटकळ या देवोपम व्यक्तींच्या जीवनावरून सहज करता येते. या भारताचा काय नाश होईल? तसे झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता लयास जाईल. नीतीचे सर्व महान आदर्श लयास जातील. धर्माविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल. आदर्शनिष्ठा पार निमावल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासितादेवी यांच्या जोडमूर्तीची. पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगिरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली ! छे छे, असे होणे कदापि शक्य नाही. सहनशक्ती कार्यशक्तीहून अनंतपट श्रेष्ठ आहे. प्रेमशक्ती घृणाशक्तीहून अनंतपट अधिक शक्तिमान आहे. हिंदुधर्माचे सांप्रतचे पुनरुत्थान केवळ देशभक्तीच्याच प्रवृत्तीचाच आविष्कार आहे असे ज्यांना वाटत असेल, त्यांच्या त्या भ्रामक समजुतींची कीवच करणे योग्य. येथे आपण या अपूर्व घटनेचे, हिंदुधर्माच्या या पुनरूत्थानाचे स्वरूप समजून घेण्याचा यत्न करू या.’
यानंतर अन्य पुष्कळ गोष्टींची चर्चा करून पत्राचा समारोप करताना स्वामीजी लिहितात, ``भविष्याच्या गर्भात काय दडून आहे हे मला दिसायला येत नाही आणि दिसावे असा माझा आग्रहही नाही. परंतु एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे. ते हे की, आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधातलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा.’
भारतीय पुनरुत्थानाच्या संदर्भात स्वामीजींच्या या विश्लेषणानंतर ११३ हून अधिक वर्षांचा काळ लोटून गेला आहे. हिंदू समाज, भारत, जग, विज्ञान-तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत, पुढे सरकल्या आहेत. त्यांच्या चांगल्या वाईट बाजूंची आणि परिणामांची चर्चाही होत असते. मात्र ते करत असताना जीवन व्यवहारातील मानवीयता आणि मूल्यभान या मुद्यांवर येऊन सारेजण थबकतात. भारताने जगाला हेच द्यावयाचे आहे, तोच त्याचा जीवनहेतू आहे, त्यासाठीच त्याचे पुनरुत्थान आहे; याची स्पष्ट जाणीव स्वामीजींनी दिली होती. श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या, हार-जीतीच्या खेळात सहभागी होऊन आपला झेंडा ऊंच फडकावणे एवढाच भारतीय पुनरुत्थानाचा आशय नाही. त्यांनी एका ठिकाणी तर इतक्या स्पष्टपणे म्हटले आहे की, आध्यात्म हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा सुद्धा भाग व्हायला हवा. विश्वकल्याणात भारताची विशिष्ट भूमिका आहे, ती भारताने पार पाडायला हवी; त्यासाठीच सशक्त आणि स्वाभिमानी व्हायला हवे. ताठ, ऊंच मानेने उभे राहायला हवे. भारतीय पुनरुत्थानाचा स्वामीजींना अभिप्रेत आशय हा होता.
- श्रीपाद कोठे
१३ जानेवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा