सुचित्रा सेन गेल्या. त्यांच्या नावापुढे काहीही लावले नाही तरीही लोकांना कळते की `आंधी’ या जगप्रसिद्ध हिंदी चित्रपटाची नायिका काळाच्या पडद्याआड गेली. `आंधी’ आणि एकूणच हिंदी चित्रपट विश्व यांच्याशी एकरूप झालेलं ते व्यक्तिमत्व होतं. सौंदर्य आणि अभिनय यांच्या अनोख्या मिश्रणाने त्यांना करोडो चाहते लाभले होते. त्या करोडोतील मीही एक. त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कानी आल्याबरोबर करोडो ओठांवर `तेरे बिना जिंदगी भी कोई; जिंदगी नही, जिंदगी नही’ आलं असेल आणि करोडो हृदयात एक कळ आली असेल. त्यांचा मृत्यू अनपेक्षितही नाही आणि अकालीही नाही. गेले अनेक दिवस त्यांच्या प्रकृतीचा चढउतार सुरु होता. वयही ८२ होते. माणसाच्या अखंड आणि अव्यभिचारी सोबत्याशी हस्तांदोलन करण्यासाठी या दोन गोष्टी अगदी योग्य !!! योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी व्हाव्यात अशी साधारण धारणा असते. मृत्यूही त्याला अपवाद का असावा? नव्हे तो अपवाद असूच नये. तो अपवाद ठरला आणि मर्यादेच्या अलीकडे आला तर मागे राहणार्याला जखमी वा अपंग करून जातो; तसेच मर्यादेच्या पलीकडे गेला तर जाणार्याला अनाथ वा उपेक्षित करून जातो. सुचित्रा सेन या त्या अर्थाने भाग्यवान ठरल्या.
गेली सुमारे ४० वर्षं त्या जगापासून दूर होत्या. त्याचं कारण जे काही सांगितलं जातं ते विचार करायला लावणारं आहे. ज्या सुंदर चेहर्याने आपल्याला प्रसिद्धी आणि लोकांचं प्रेम मिळवून दिलं, तोच चेहरा लोकांच्या मनात राहावा. वयाप्रमाणे अपरिहार्यपणे होणारा बदल लोकांपुढे नको. आपली प्रतिमा लोकांपुढे तशीच सुंदर राहायला हवी, अशी त्यांची इच्छा होती. कुठेतरी हे खटकून जातं. एक तर लोक असा स्वाभाविक बदल सहज स्वीकारतात. याचाच अर्थ त्या स्वत:च स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडल्या, त्यात गुंतल्या आणि गुरफटल्या. त्यामुळेच तिथेच थांबल्या आणि एका अर्थी संपल्या. मृत्यूला सामोरे जातानाही तोच विचार त्यांना सतावत होता का? कुणास ठाऊक. एखाद्या व्यक्तीचं, विशेषत: कलाकाराचं हे हळवेपण असू शकेल, पण त्यामुळे त्या एका अर्थी रोज कणाकणाने मृत्यू पावत नव्हत्या का? एकाच जीवनात हजारो जीवने जगणारी आणि एकाच जीवनात हजारो मरणे मरणारी; अशी दोन्ही प्रकारची माणसं पाहायला मिळतात. याशिवाय दुसरं काय म्हणणार? `आंधी’ आणि म्हणूनच त्याची नायिका असलेल्या सुचित्रा सेन यांची स्मृती दीर्घकाळ राहणार आहे यात मात्र काही शंका नाही.
- श्रीपाद कोठे
१७ जानेवारी २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा