माणूस हे एक अजब रसायन आहे. आज सहजच एक मनात आलं- माणूस कसा जोखता येतो? सोपं आहे- तुम्ही त्याला काही तरी म्हणा. मग पाहा. हे बोलणं सहज, ओघात, सकारण, तर्कपुर्ण असेल तरीही त्याची प्रतिक्रिया कशी असते पाहा आणि लक्षात येईल कोण किती पाण्यात आहे ते. हा प्रयोग मुद्दाम सुद्धा करून पाहता येतो. पण त्यात विनाकारण संबंध बिघडण्याची शक्यता असते. ओघात होणाऱ्या बोलण्याने वास्तविक संबंध दुरावण्याचे कारण नाही, पण दुरावतात. कधी कधी तर अगदी गमतीशीर असतं सगळं. रोजच्या संबंधातले, कुटुंबातले, शेजारपाजारचे, कामाच्या ठिकाणचे; जेथे आपण एकमेकांना ओळखत असतो. अनेक घटना, स्वभाव, ताणतणाव, समस्या, current, undercurrent माहीत असतात. तरीही एखादा शब्द किंवा साधं एखाद्या विषयावर, प्रसंगावर वेगळं मत हे सुद्धा माणसांना दूर नेऊ शकतं. दुसरीकडे सोशल मिडीयावर सुद्धा, जिथे कोणाचा कोणाशी तसा संबंध नसतो तिथेही हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अगदी ओर्कुटच्या जमान्यापासून तर फेसबुकच्या आजच्या तारखेपर्यंत किंवा closed सोशल मिडिया असलेल्या, अतिशय छोट्याशा whatts app पर्यंत हे पाहायला, अनुभवायला मिळतं. नाहीच सहन होत काही. खरं तर सहन होणे हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा काही त्रास होतो तेव्हा सहन होण्याचा प्रश्न येतो. पण त्रास वगैरे काही नाही. बस तू अमुक बोलला किंवा तू वेगळं मत व्यक्त केलं, संपला खेळ. मग एखाद्याची चूक, एखाद्याची त्रुटी, एखाद्याचे अनवधान, एखाद्याचा स्वभाव यावर काही बोलाल... रामा, शिवा, गोविंदा... नाव नको. अशा अनुभवांवर खरं तर एखादा ग्रंथ लिहिता येईल. अनेकदा सोशल मीडियातून सुद्धा फार जवळचे संबंध तयार होतात. बहुतांश वेळा तसे होत नाहीत. मात्र दोन्ही बाबतीत अनुभव सारखाच असतो. एक अनुभव तर असा की- अगदी छोटी छोटी गोष्ट विचारणाऱ्या, सांगणाऱ्या व्यक्तीने संबंध तोडला. कारण काय? संयुक्त महाराष्ट्र याऐवजी मी विदर्भाच्या बाजूने मत व्यक्त केले. या व्यक्तीशी कधीही व्यक्तिगत संबंध आला नव्हता. अगदी फोनवर बोलणे दूरच, साधे नंबरदेखील एकमेकांकडे नव्हते. पण आपले अहं इतके टोकदार अन गोंजारलेले असतात की संबंध समाप्त. एका जगन्मान्य सामाजिक कार्यकर्त्याच्या असहिष्णुतेवर तर दोन-तीन वर्षांपूर्वी मोठा लेखच लिहिला होता. विशेष म्हणजे तो कार्यकर्ता गांधीवादी आहे. अन्य गांधीवादी, उदार, व्यक्तीस्वातंत्र्यवादी वगैरे लोकांचीही हीच गत. गंमत असते फार. बरं अशा वागण्याचे समर्थन करणारे आणि त्याचे सैद्धांतिक विश्लेषण करणारेही असतात. निव्वळ ढोंगीपणा. यात परंपरावादी आहेत, आधुनिक आहेत, हिंदुत्ववादी आहेत, समाजवादी आहेत, विज्ञानवादी आहेत, तरुण आहेत, म्हातारे आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, शिकलेले किंवा अशिक्षित आहेत. एखादाही noble विचार, एखादीही आदर्श समजली जाणारी गोष्ट आचरणात आणायला किती कठीण असते ते अशा वेळी कळतं. सगळे असे असतात असं नक्कीच नाही. छोट्याच काय मोठ्या मतभेदांचा, मोठ्या टीकेचा, मोठ्या छिद्रान्वेषणाचा परिणाम होऊ न देता व्यवहार करणारेही असतात. अन हा व्यवहार स्वार्थासाठी किंवा छद्मी नसतो. अगदी निर्मळ मनाने असतो. पण हे प्रमाण अत्यल्प म्हणावे असेच. असो. सगळेच त्या प्रभूचे अंश आहेत. कोणी स्वत:ला चिरत चिरत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. अन्य कोणी स्वत:ला झाकत झाकत, गोंजारत गोंजारत अधिकाधिक लहान, कोशबद्ध करण्यात मग्न असतो. `पिंडे पिंडे मतिर्भिन्ना...'
आज सहजच जाणवलं...
- श्रीपाद कोठे
३ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा