शब्द परिणाम करतात का? याचे उत्तर हो आहे. म्हणूनच शब्द नेमके असणं आवश्यक असतं. पण बरेचदा चुकीचे शब्द वापरल्याने प्रथम भ्रम, नंतर गोंधळ, नंतर परिणाम असे चक्र पाहायला मिळते. आज दोन शब्दांबाबत हे जाणवले.
आझादी आणि स्वातंत्र्य. दोन्ही वेगळे आहे. आझादी या शब्दात तोडणे, तुटणे, संकुचितपणा, मर्यादित होणे/ करणे; असा अर्थ आणि भाव आहे. स्वातंत्र्य या शब्दात विस्तार, विकास, व्यापकता यांची संधी; न तुटता विकासाचा मार्ग; हा अर्थ आणि भाव आहे. या शब्दांचा उपयोग, गोंधळ आणि परिणाम समोर आहेत.
दुसरी शब्दजोडी आहे खेळ आणि पंगा. एक हिंदी चित्रपट आला वा येतो आहे - पंगा. त्याच्या प्रोमोमध्ये कबड्डीचा खेळ आहे. चित्रपटासाठी या खेळाचा उपयोग केलेला आहे. प्रश्न येतो खेळ आणि पंगा एकच? दोन्हीत दोन पक्ष, दोन गट, चढाओढ, जय, पराजय आहेत. पण खेळातील हे सारे आणि 'पंगा'तील हे सारे एकच? उत्तर स्पष्ट आहे 'नाही'. पण दोन्ही समानार्थी म्हणून वापरले जातात किंवा मांडले जातात तेव्हा सगळे बिघडते. व्यक्तिगत, कौटुंबिक, मैत्री संबंधांपासून पुढे सगळीकडे खिलाडू वृत्तीचे गोडवे गात 'पंगा' स्थापित होताना आपण पाहतोच आहे.
- श्रीपाद कोठे
८ जानेवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा