हरवणं. एक विचित्र अशी गोष्ट. म्हणजे कसं पाहा- कप किंवा काचेची वस्तू फुटते, कधीकधी चोरी होते, अगदी माणसे सोडून जातात - कायमची किंवा कोणत्या तरी कारणाने; तेव्हा नुकसान होतं, वाईट वाटतं, दु:ख होतं, हळवेपण येतं, पुन्हा एकदा बळही येतं. पण एखादी वस्तू हरवते; म्हणजे चोरीला जात नाही, फुटत नाही, तर हरवते. एकदम गायब. नाहीच सापडत. म्हणजे ती असते तरीही नसते. तशीच माणसेही कधीकधी हरवतात. ती मरण पावलेली नसतात, भांडूनतंडून सोडून गेलेली नसतात. हरवतात, म्हणजे असूनही नसतात. या हरवण्यातील नुकसान, वाईट वाटणं, दु:ख, हळवेपण वेगळ्याच; आहे-नाही या प्रकारातलं.
पुष्कळदा वाटतं मी असाच हरवून जाणार आहे कधीतरी. म्हणजे, सिनेमात हरवतात अन सापडतात तसे नाही. कायमचाच. पण जाणार नाही, हरवणार... कसा असेन मी त्यावेळी, अन हे जग, इथली माणसे कशी असतील. सगळंच असून नसल्यासारखं...
- श्रीपाद कोठे
१५ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा