सरकारी कार्यालयांमधील पूजा वगैरे बंद करण्याचे राज्य सरकारने ठरवले असून लवकरच तसा निर्णय घेतला जाईल अशी बातमी वाचण्यात आली. काही whats app ग्रुप्समध्येही तसे मेसेज आले. स्वच्छ शब्दात ही विचारहीनता आहे. श्रद्धा बाळगलीच पाहिजे ही जशी दादागिरी आहे तसेच, श्रद्धा बाळगता येणार नाही हीही दादागिरीच आहे. आपण स्वीकारलेली व्यवस्था हीच मुळात दादागिरीचा खेळ आहे. त्यात विचाराला वगैरे स्थान नाहीच. म्हणूनच गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याच्या ३८ वर्षे आधी या व्यवस्थेला `हिंद स्वराज'मध्ये वेश्या म्हटलं होतं. या शब्दावर एका महिलेने आक्षेप घेतल्याने त्यांनी तिची माफी मागितली, पण माफी मागतानाही आपण आपल्या विचारांवर, भावनांवर आणि त्या शब्दावर ठाम आहोत हेही स्पष्ट केले. तो शब्द त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्येही कायम ठेवण्यात आला. यासोबतच त्यांनी या व्यवस्थेच्या मुळाशी असलेली `पाश्चात्य सभ्यता' या साऱ्याला कारणीभूत आहे आणि ती टाकून देईपर्यंत कोणतीही सार्थक व्यवस्था निर्माण करता येणार नाही असा इशाराही दिला होता.
आता मुद्दा धर्म आणि श्रद्धेचा. व्यक्ती आणि व्यक्तीची श्रद्धा या गोष्टी वेगळ्या करता येतात का? व्यक्ती ही जशी त्याच्या शरीरासकट असते तशीच मनासकट असते. भावनांसकट असते. ते वेगळे करता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न किंवा त्याची अपेक्षा अनाठायी अन भाबडी असते. आयएसआय असो, डोनाल्ड ट्रंपच्या स्वरूपातील पुनरुज्जीवनवाद असो, भारतातील धार्मिक प्रवाह असोत की जगभरातील असे असंख्य प्रवाह; या सगळ्या अनैसर्गिक, अयोग्य, स्वप्नाळू, अतार्किक विचारांचा आणि त्याला अनुसरून केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहेत. १६ व्या, १७ व्या शतकापासून सुरु झालेले हे विचारप्रवाह, त्यांनी तयार केलेल्या संकल्पना, त्याला अनुसरून विकास पावलेल्या व्यवस्था, रचना, पद्धती, शब्दावली हे सगळेच कुजून गेलेले आहे. हे अर्थकारण, समाजकारण, राजकारण, संस्कृती, धर्मकारण या सगळ्याला लागू आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाज, राज्य, जगणे, सुख, आनंद अशा असंख्य गोष्टींच्या मुळाशी जाण्याची खरं तर गरज आहे. असे मुळापर्यंत जाण्याची क्षमता नसणे आणि त्याला विविध कारणांनी नकार देणे सोयीचे आहेच, पण हिताचे नक्कीच नाही. माणूस म्हणजे काय? हे जग म्हणजे काय? आमच्या धडपडीचा अर्थ काय? हे सगळे मुलभूत प्रश्न आहेत.
आज प्रचलित असलेल्या विचारांच्या मर्यादा प्रत्यक्ष त्या त्या व्यक्तींनाही त्यावेळीच जाणवल्या होत्या. पण नावीन्याचा आणि काळाचा रेटा वरचढ ठरला. एकच उदाहरण पुरेसे आहे. `मला तुमचे विचार पटत नसले तरीही ते मांडण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन' हे वाक्य आजच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार आहे. हे ज्या व्होल्तेअरने म्हटले होतेच त्यानेच नंतर- `माणसाला मत नसते तर बरे झाले असते. कारण माणसाच्या मतांनी या पृथ्वीवर भूकंप आणि वादळे याहूनही अधिक हानी केली आहे,' असेही म्हटले होते. एक एक मुद्दा घेऊन त्याचा तपशीलवार विचार करावा लागेल. जे सगळे तथाकथित आधुनिक विचार आणि संकल्पना घेऊन आम्ही चालतो आहोत त्याने आपल्याला कुठे आणून ठेवले? ४-५ अणुबॉम्ब जगाचा संपूर्ण विनाश करू शकतील हे माहित असूनही एकेक देश डझनावारी किंवा शेकडो अणुबॉम्ब तयार करतो? का? म्हणजे अणुबॉम्ब जगाचा विनाश करू शकेल याचीही खात्री अथवा विश्वास राहिलेला नाही की काय?. चांगल्याचा तर नाहीच वाईटाचाही विश्वास राहिला नाही.
असंख्य विसंगती आणि अंतर्विरोध यांच्या समुद्रात आम्ही आज जगतो आहोत. कारण? कारण बाहेरच्या वातावरणाची जेवढी काळजी आम्ही घेतो त्याच्या छटाकभरसुद्धा काळजी आतल्या वातावरणाची घेत नाही. हे आतले वातावरण केवळ बोलून, लिहून, ऐकून तयार होत नाही. ते पूजा, कर्मकांड इत्यादींनी सुद्धा तयार होत नाही. अन तरीही बोलणे, लिहिणे, ऐकणे, पूजा, कर्मकांड यांचाही त्यात वाटा असतोच. प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्टीची गरज असेलच असे नाही. एखाद्याला यापैकी कोणत्याच गोष्टीची गरज नसेल, एखाद्याला काही गोष्टींची असेल, तर आणखी एखाद्याला सगळ्याच प्रयत्नांची गरज असेल. मानवी मन, त्याचं जगणं, त्याची सुखदु:ख, त्याचे विचार, भावना, त्याचं घडण आणि बिघडण, हे सगळंच कमालीचं व्यामिश्र आहे. गुंतागुंतीचं आहे. प्रत्येक लहानातली लहान, व्यक्त किंवा अव्यक्त बाब ही अनेक गोष्टींचा संकलित परिणाम असते. त्याबद्दल ठाम भूमिका घेणे हेच मुळात अयोग्य. आज मात्र आम्ही अशा ठाम भूमिका तयार करून सगळ्यांना त्यात कोंबण्याचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्यांनी आमच्या साच्यात बसले पाहिजे हा अट्टाहास करतो आहोत. हा अट्टाहास परंपरेचा असेल किंवा आधुनिकतेचा, धार्मिकतेचा असेल किंवा जडवादाचा, हा ईशवादाचा असेल किंवा इहवादाचा; हे सगळेच चुकीचे, गाढव आणि त्याज्य.
मग समाज किंवा व्यक्ती चालतील कसे? राहतील कसे? जगतील कसे?
हा आपणासारख्या विचारी लोकांसाठीचा प्रश्न आहे. प्रवाहात वाहतानाही, प्रवाहाबाहेर पडून, प्रवाह कसा बदलता येईल याचं उत्तर देणं हेच आपल्यासारख्या सुजाण लोकांचं काम आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २४ जानेवारी २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा