नागपूरच्या शंकरनगर चौकात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून काही नवीन यंत्रणा बसवली असल्याचे आज वृत्तपत्रात वाचले. याने बेशिस्तीला आळा घातला जाईल असा कयास आहे. होईलही कदाचित तसे. पण तरीही असे वाटते की, आता थांबायला हवे. माणूस हा त्याच्या गुणदोषांसह माणूस आहे. त्याच्यातील पशुत्व आणि त्याच्यातील देवत्व या दोहोंच्या मध्ये ज्या असंख्य अवस्था आहेत त्या त्याच्या स्वत:च्या आहेत. पशुत्व आणि देवत्व या दोन्ही दिशांना त्याचे हेलकावे हा त्याचाच विकास आहे. तो घोर पशु झाला तरीही त्यातून पुन्हा देवत्वाकडे वाटचाल करेल किंवा देवत्वाला स्पर्श करूनही पुन्हा पशुत्वाकडे जाईल. तरीही ते ते त्याचे आहे आणि त्यातूनच पशुत्व, मानवत्व आणि देवत्व यापलीकडील चैतन्यपूर्ण मुक्तावस्था, ज्याला व्यावहारिक भाषेत समजूतदार, परिपक्व माणूस म्हणता येईल, आकार घेईल. परंतु त्याला अधिकाधिक यंत्र-तंत्र नियंत्रित करून त्याची समज, त्याची विचारशक्ती, चांगल्या वाईटाची त्याची जाण, व्यवहारातील विधिनिषेध हे सारे यंत्रवत करून त्याला रोबो करू नये. त्याने त्याचा निर्जीव रोबो, पर्यायाने दगड होऊन जाईल. मग तो कदाचित पशु राहणार नाही, पण माणूसही राहणार नाही आणि देवत्वाकडे जाण्याचा तर प्रश्नच उरणार नाही. त्याच्या विचाराची, व्यवहाराची किल्ली त्याची त्याच्याजवळ राहू द्या. ती त्याच्याजवळून काढून घेऊ नका. तुम्हाला आदर्श वाटणारा घाट तुम्ही कदाचित समाजाला देऊ शकणार नाही. पण त्याचा अट्टाहास सोडायला हवा. राहू द्या तो वेंधळा राहिला तर, राहू द्या तो माघारलेला राहिला तर, राहू द्या तो अविकसित राहिला तर; पण त्याला `तो' राहू द्या. त्याला `त्याच्या' स्थिती गतीने पुढे जाऊ द्या. सगळ्यांना एकच स्थितीगती देऊन त्याचं `तो'पण हिरावून घ्याल तर ते खूप चुकीचे आणि नुकसानदायक ठरेल. प्रत्येकाला त्याचा अवकाश देण्याएवढा समाज विस्कळीत असायलाच हवा. तो अति व्यवस्थित असला तर त्याचा उद्देशच संपून जाईल. समाजाची एक काल्पनिक चौकट बनवून त्यासाठी माणसाला resource समजून वागणे योग्य नाही. माणूस हा कोणत्याही गोष्टीचा resource नाही. तो स्वतंत्र, स्वयंभू, चैतन्यमय unit आहे. त्याच्या संपूर्ण वर्तुळातील `समाजाचा घटक' ही एक अवस्था आहे. त्या ठिकाणी त्याला जखडून ठेवू नये. आजच्या व्यवस्था अन यंत्रणा यांची वास्तविक सखोल चिकित्सा व्हायला हवी. त्याऐवजी या व्यवस्था अन यंत्रणा अधिकाधिक घट्ट करण्याकडे जगाचा प्रवास सुरु आहे. आपणही त्यात अहमहमीकेने सामील होत आहोत. सामाजिकता आणि वैयक्तिकता यांचा मेळ घालावा लागेलच. लंबक कोणत्याही एका दिशेला अधिक ताणला जाणे इष्ट नाहीच. पण सामाजिकतेच्या पूर्तीसाठी व्यक्तीचा पाठलाग करणे, त्याला यांत्रिकतेच्या रेषांमध्ये बांधून टाकणे अयोग्यच आहे. त्याच्या मनबुद्धीचं, भावनांचं, जाणीवांचं, विचारांचं यांत्रिक conditioning कोणत्याही स्थितीत समर्थनीय नाही ठरू शकत. मी काही तरी बरळतो आहे असे समजायचे असेल त्यांनी समजावे. मात्र महात्माजी, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळजी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, भगिनी निवेदिता अन अन्यही अनेकांनी त्यांच्या त्यांच्या संदर्भात यावर प्रकाश टाकला आहे, विवेचन केले आहे. या सगळ्यांना एका झटक्यात गतार्थ ठरवणे सोपे आहे. अगदी क्षणभराचे काम आहे. पण त्याने काहीही चांगले साध्य होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ.
सगळ्या हिंदुत्वनिष्ठांना, विशेषत: संघ स्वयंसेवकांना; संघबंधू म्हणून एक विनंती करावीशी वाटते. मोदी किंवा भाजपा यांची चर्चा करण्यापेक्षा मुलभूत गोष्टींचं अध्ययन, मांडणी, चर्चा यावर लक्ष केंद्रित करावं. ते अधिक उपयुक्त ठरेल. ही मुलभूत दृष्टी सोडून दिली तर आम्ही कदाचित विजयी होऊ, यशस्वी होऊ; पण त्याला अर्थ राहणार नाही. १२५ कोटींच्या आपल्या देशात आज ४०-५० कोटी लोक तर असे आहेतच ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. परंतु या वर्गात विचारांचा जो अभाव आहे आणि त्यातही सगळ्याच गोष्टींच्या मुलभूत जाणीवांचा जो अभाव आहे तो दूर होणे गरजेचे आहे. तसे झाले तर समस्या सुटणे तर सोपे होईलच, समस्या निर्मिती सुद्धा कमी होईल. अन्य सेवांबरोबरच ही `विचारसेवा' अतिशय आवश्यक आहे. कारण त्यातूनच आमच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, धडपडी नीट आकार घेतील. नाही तर नुसती `खटपटांची लटपट' सुरु राहील.
- श्रीपाद कोठे
५ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा