गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

विषमता हेच वैश्विक समतेचे लक्षण

गणितात दोन प्रकारचे अंक असतात. सम आणि विषम. विषम अंक तर बोलून चालून विषमच असतात. त्यांच्यात काहीही साम्य-समत्व असत नाही. पण सम अंकांमध्येही फक्त एकच साम्य असते. ते म्हणजे, सगळ्या सम अंकांना २ ने नि:शेष भाग जातो. त्यांच्यात अन्य कोणतीही समानता नसते. त्यांचं मूल्यही वेगवेगळं असतं. २ आणि १ कोटी यांचं मूल्य सारखं नाही. या सम संख्यांना इंग्रजीत even numbers म्हणतात. याचाच अर्थ सम = even. समत्व = evenness. एक समान लक्षण ही त्याची ओळख. दुर्दैवाने आमच्या येथे liberty, equality, fraternity यांचं भाषांतर स्वातंत्र्य, समता, बंधुता करण्यात आलं. तेच आज सुरु आहे. त्याचे परिणामही आम्ही अनुभवत आहोत.

भारतीय चिंतन परंपरा समत्व मानते. एवढेच नव्हे उचलून धरते. समत्व हे योगाचं लक्षण आहे. पण समता अन समानता या भिन्न गोष्टी आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीने समानतेचाच आदर्श ठेवला. त्यासाठी त्यांनी शब्दही योग्य वापरला- equality. आम्हीही तोंडाने समता म्हणत असलो तरीही मनातील भाव equality चाच असतो. बोलतानाही आम्ही तशीच भाषा वापरतो. `सगळे समान आहेत किंवा सगळे सारखे आहेत, असेच लिहितो, बोलतो. equality चा आदर्श मुळातच चूक आहे. समता हाच खरा आदर्श आहे. जगानेही तो ठेवायला हवा. पण प्रथम त्याचा आशय भारताकडून समजून घ्यायला हवा. समता याचा अर्थ evenness आहे याचा क्षणभर सुद्धा विसर पडता कामा नये.

मग प्रश्न येतो- सम (even) अंकांचे जसे एक लक्षण आहे; ते लक्षण सगळ्याच्या सगळ्या सम अंकांना निरपवादपणे लागू होते; तसे या विश्वातील, किमान मानवजातीतील समत्वाचे लक्षण कोणते? जे सगळ्या मानवांना अन पुढे जाऊन सगळ्या विश्वाला निरपवादपणे लागू होईल, असे लक्षण कोणते? ते लक्षण आहे- विषमता. वैश्विक समतेचे लक्षण आहे विषमता. मी कामातून गेलो आहे असे वाटेल. वाटू द्या. पण हीच गोष्ट सयुक्तिक आहे. जगातील यच्चयावत अणुरेणूंना अन त्यापासून बनलेल्या मोठ्यातील मोठ्या संघातांना निरपवादपणे लागू पडणारे हे लक्षण आहे. कितीही गमतीशीर वाटले, कितीही न पटणारे वाटले तरीही सर्वप्रथम हे सत्य स्वीकारावे लागेल. हे सत्य स्वीकारल्याशिवाय आम्हाला सार्थकतेकडे जाता येणार नाही.

आजवर सगळ्यांना समान मानून सगळ्यांसाठी सारखेपणा निर्माण करण्याचा उपद्व्याप आम्ही खूप केला. विषमता मिटवण्याचा प्रयत्न केला. अजूनही करतो आहोत. हाती मात्र विफलतेशिवाय काहीही लागत नाही. आमच्या संकल्पना, कल्पना, मापदंड, दृष्टी, शब्दावली हे सगळेच याने बाधित झाले आहेत. प्रत्येक कण वेगळा आहे. (स्वतंत्र नाही. स्वतंत्र असणे अन वेगळे असणे, यात फरक आहे. लाट आणि समुद्र वेगळे आहेत. स्वतंत्र नाहीत. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, स्वतंत्र नाही.) या प्रत्येक कणाची अन त्याच्या सगळ्या लहान मोठ्या संघातांची स्थिती-गती-नियती यांचा विचार आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम चुकीची भूमिका पुसून पाटी कोरी करावी लागेल. हे पहिले पाऊल राहील.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ७ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा