सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

साधा माणूस

पत्रकारितेने आयुष्यात काही भाग्ययोग जुळवून आणले. त्यातील एक योग जुळून आला होता, १९९९ साली. सुमारे १६ वर्षांपूर्वी. डॉ. विजय भटकर यांची भेट, त्यांच्यासोबतचा प्रवास आणि त्यांच्याशी झालेली बातचीत. यावर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पद्मभूषण सन्मान जाहीर करण्यात आला. त्यावेळी त्या साऱ्या स्मृती ताज्या झाल्या. त्यांच्याशी झालेली बातचीत २४ जानेवारी १९९९ रोजी `परमची जन्मकथा...' या शीर्षकाने प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे, १३ एप्रिल २००१ रोजी त्यांचं मला जे दर्शन घडलं होतं त्यावर `साधा माणूस' या शीर्षकाने लिहिलं होतं. निमित्त होतं, त्यांना जाहीर झालेला `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार. संगणक आणि आंतरजाल वापरायला सुरुवात करण्याच्या कितीतरी आधीचे हे दोन लेख. मित्र मैत्रिणी आणि अन्य जिज्ञासू वाचकांसाठी.

साधा माणूस

सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे चंद्रपूरला अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कसा उपयोग करता येऊ शकेल, त्या ज्ञानाचे छोट्या छोट्या उद्योगांसाठी उपायोजन कसे करता येईल याचा विचार व्हावा, त्यावर चर्चा व्हावी हा या प्रदर्शनामागील उद्देश. प्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला येणार होते. एवढा मोठा शास्त्रज्ञ येणार, त्यांच्याशी गप्पा माराव्या, त्यांनी तयार केलेल्या परम महासंगणकाची कथा जाणून घ्यावी यासाठी त्यांना भेटायचे ठरवले. आधी वेळ घेतलेली नसल्याने ते भेटतील वा बोलतील याबद्दल मनात थोडीशी शंका होती. समारोप कार्यक्रमाला पोहोचायचे. त्यांच्याशी ओळख करून घ्यायची, मधल्या वेळात त्यांच्याशी बोलायचे व नागपूरला परतायचे असा कार्यक्रम ठरला होता. परंतु चंद्रपूरला जाताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने समारोपापूर्वी पोहोचता आले नाही. पोहोचलो तेव्हा समारोप कार्यक्रम आटोपला होता आणि डॉ. भटकर व अन्य मंडळी भोजनासाठी निघत होती. भोजन आटोपून ते लगेच मोटारीने नागपूरला जाणार होते. आता कसे करायचे हा प्रश्न होता. पण मनात म्हटले धीर सोडायचा नाही. परिषदेच्या कार्यकर्त्या मित्रांसह भोजनासाठी गेलो. तिथे सगळ्यांसह माझाही डॉ. भटकर यांना परिचय करून देण्यात आला. स्वप्नील त्यांना म्हणाला, `सर, यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. पेपरसाठी.' क्षणभरच त्यांनी विचार केला व लगेच म्हणाले, `भोजनानंतर मोटारीने नागपूरला जातोय. तुम्हीही चला. वाटेतच बोलू.' माझ्या आनंदाला व आश्चर्याला पारावार उरला नाही. आपल्याला डॉ. भटकर यांचा तीन-साडेतीन तास सहवास मिळणार व त्यांच्याशी बोलायला मिळणार याचा आनंद आणि इतक्या सहजपणे त्यांनी हो म्हटलं याचं आश्चर्य !

डॉ. भटकर मूळ विदर्भातल्याच मुर्तीजापूरचे. आपल्या त्या गावातून सुमारे पाचसहा तासांचा प्रवास करून ते चंद्रपूरला  आले होते. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम. त्यातच पंतप्रधानांपासून तर अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या नित्याच्या संपर्कात असलेला जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ ! पण आपलं मोठेपण, आपला थकवा यापैकी काहीही त्यांनी आड येऊ दिलं नाही. बरं, पत्रकारांशी भेटायला, बोलायला उत्सुक असणाऱ्या राजकारण्यांचीही त्यांची जातकुळी नव्हती. तरीही त्यांनी सहजपणे वेळ दिला हे माझ्यासाठी आश्चर्यच होतं. जेवणाचा बेतही अगदी साधा होता व एका हातात प्लेट घेऊन डॉ. भटकर सगळ्यांमध्ये सहज मिसळून गेले होते. गप्पागोष्टी करीत होते. जेवण झाले. निघायची वेळ झाली. ते पाठीमागे आले व पाठीवर थाप मारून म्हणाले, `चला.' अगदी सहज, वऱ्हाडी व्यवहार.

चंद्रपूरहून नागपूरचा प्रवास सुरु झाला. प्रथम थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आपलं बालपण, शिक्षण, अभ्यास एके अभ्यास, त्याव्यतिरिक्त फारसं काहीही न करणं; हे सारं बोलणं झालं आणि म्हणाले, विचारा काय विचारायचं ते. म्हटलं, तुमच्या कर्तृत्वाची कहाणी ऐकायचीय. आणि सुरु झाली परम महासंगणकाच्या जन्माची कहाणी. सुमारे दीड दोन तास ते सारे काही तपशीलवार सांगत होते. मधून मधून फक्त पूरक असे काही प्रश्न. माझंही समाधान झालं. पाच मिनिटं शांततेत गेली. दोघांनाही समजलं की जे बोलायचं होतं ते तूर्त आटोपलं आहे. पुन्हा एकवार या मोठ्या माणसाच्या साधेपणाचा प्रत्यय आला. म्हणाले, `मी पडतो जरा. खूप प्रवास झालाय. थकलो आता. नागपूर यायला एखादा तास आहे. थोडा आराम करतो.' असे म्हणून गाडीतल्याच दोन उशा त्यांनी डोक्याशी व पाठीशी घेतल्या व चक्क झोपले, ते हॉटेल सेंटर पॉइन्ट येईपर्यंत. मारुतीतील तिघांची सीट. त्यावर कोपऱ्यात खिडकीशी मी बसलेला. पण त्यांना तेवढी जागाही पुरली. `भुकेला कोंडा नि निजेला धोंडा' म्हणतात ना तेच खरं.

चार तासांचा या शास्त्रज्ञाचा सहवास. त्यात सगळ्यात अधिक मनावर जर काही ठसलं असेल तर ते त्यांचं वैदर्भीय साधेपण. परंतु अजूनही काहीतरी उरलं होतं. याची मलाही जाणीव नव्हती व त्यांनाही.

सेंटर पॉइन्टच्या दारात गाडी थांबली. आम्ही खाली उतरलो. आम्ही म्हणजे मी, डॉ. भटकर व स्वप्नील. स्वप्नील रिसेप्शनवर गेला. मी त्यांच्यासोबत. खोली आधी बुक केलेली असूनही नेहमीप्रमाणेच काहीतरी घोळ झालेला होता. स्वप्नील परतला व म्हणाला, `पाच मिनिटं थांबावं लागेल.' डॉक्टर फक्त हसले. मला म्हणाले, `पाच म्हणजे पंधरा मिनिटं लागणार. कितीही मोठं नाव असो हॉटेलचं. असा घोळ नेहमीचाच. तुम्ही कशाला थांबताय. तुम्ही निघा. तुम्हाला उशीर होईल.' परंतु मला प्रशस्त वाटलं नाही. त्यामुळे तिथेच घुटमळलो. मग म्हणाले, `बरं जाऊ द्या. थोडे पाय मोकळे करू या.' आणि आम्ही तेथेच लाउंजमध्ये १५ मिनिटे शतपावली केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर १५ मिनिटे लागली. त्यांना खोलीपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद देऊन, सॉरी म्हणून व गुड नाईट करून परतलो. विदर्भाच्या मातीने मानवजातीला, विशेषत: भारताला दिलेल्या या थोर सुपुत्राच्या सहवासात आयुष्यातले चारपाच तास आनंदात गेले होते. ३ एप्रिल रोजी त्यांना `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त या विदर्भपुत्राचे अभिनंदन ! वैदर्भीय साधेपणा जपणाऱ्या डॉ. भटकर यांच्याकडून हिमालयाएवढ्या कर्तृत्वाची अपेक्षा आहे. `आपलं' माणूस म्हणून एवढा स्वार्थ बाळगायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

(लोकसत्ता, शुक्रवार- १३ एप्रिल २००१)

मोगरा

(जुनं लिखाण संगणकात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. कात्रणांच्या धारिका न जाणो खराब झाल्या तर. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा. हे काम जसजसे होईल, त्यातील खूप तात्कालिक वा प्रासंगिक नसलेले लिखाण मित्र मैत्रिणींसाठी, चोखंदळ वाचकांसाठी सादर करत जाईन.)

मोगरा

बहर संपला अन अंगणातल्या मोगऱ्याला कात्री लागली. पावसाचं पाणी पिउन तो पुन्हा डवरेल व पुढच्या चैत्राच्या सुरुवातीला पुन्हा बहरेल. लोभस व सुगंधी अशा या लहानशा मोगऱ्याचं नातं खूप लहानपणीच जुळलं. सकाळच्या शाळेसाठी उठताना कधीतरी आकाशवाणीच्या अर्चनातले सूर कानी पडत, `मोगरा फुलला, मोगरा फुलला; फुले वेचिता बहरू कळियासी आला'. ज्ञानेश्वरांच्या मोगऱ्याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता. आजही तो कळतो का हा प्रश्नच आहे. मोगऱ्याशी नातं मात्र त्यामुळे जुळलं आणि मग त्याला अनेक अंकुर फुटत गेले.

उन्हाळ्यात मोकळ्या गच्चीत उघड्यावर झोपताना वर चढलेला मोगरा आपल्या घमघमाटासह केव्हा अंगाई गाऊन पापण्या मिटायला लावी ते कळतही नसे.

एकदा मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला काय द्यावं असा विचार करता करता हाच मोगरा साहाय्याला धावला. छान टपोरी टपोरी सुगंधी फुलं ओंजळभर निवडून घेतली. तिच्या घरी गेलो. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं, हात पुढे कर. तिने तीर्थ प्रसादासाठी करावा तसा हात पुढे केला. म्हटलं असा नाही, छान खोल ओंजळ कर. तिने ओंजळ केली. मी आपली मोगऱ्याची ओंजळ तिच्या ओंजळीत रिती केली. `वाढदिवसाला मोगरा देऊन तू माझं आयुष्य सुगंधित केलंस,' ती म्हणाली. माझा मनमोगरा फुलून आला.

पंडित ओंकारनाथ ठाकूर हे भारतीय संगीत इतिहासातलं एक अजरामर नाव. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बडोद्याला जाण्याचा योग आला होता. तिथे या मोगऱ्याचं नातं आणखीन घट्ट झालं. दोन दिवसांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी फिरायला निघालो. सूरसागर तलावापासून गायकवाडांच्या राजवाड्याकडे जाताना उजव्या हाताला योगी अरविंद आश्रमाचं आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. योगी अरविंद प्राध्यापक म्हणून गायकवाडांकडे नोकरी करीत असताना या इमारतीत राहत होते. नंतर त्यांनी नोकरी सोडली. पण मुक्काम बरेच दिवस याच ठिकाणी होता. याच इमारतीत त्यांनी योगाचा अभ्यासही केला. त्याच ठिकाणी आता हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. फिरत फिरत या केंद्रात गेलो. इथे योगी अरविंद यांची नामसमाधी आहे. ती पाहण्यासाठी समाधी मंडपात गेलो. समोरील दृश्य बघून प्रसन्न वाटलं. मन अवाक झालं. शुभ्र संगमरवरी समाधीवर पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांची शेज होती. समाधीचा चौथरा मोगऱ्याच्या फुलांनी पूर्ण भरून गेला होता. वातावरणात अनोखा स्वर्गीय सुगंध दरवळत होता. सर्वत्र शांत, नि:स्तब्ध वातावरण होतं. त्या धवल पवित्रतेला मान झुकवून केंद्राचा परिसर पाहायला निघालो.

मुख्य इमारतीत खालच्या बाजूला ग्रंथालय, वाचनालय व त्याच्यावर ध्यानगृह आहे. ध्यानगृहात पोहोचलो. योगी अरविंदांच्या आश्रमाची एक विशेषता आहे. कोठेही जा, कोणत्याही ईश्वरी रुपाची प्रतिमा दिसणार नाही. त्या जागी दिसेल केवळ शालीने झाकलेल्या दोन चरणांची तसबीर. भगवंतांचे सुकुमार चरणकमल ! थोडा वेळ ध्यानगृहात बसलो. आणखीही काही जण होते. पण एका अनामिक ओढीने लक्ष वेधले. त्या चरणकमलांच्या तसबिरीपुढे बसलेल्या शुभ्रवसना एकाग्रचित्त युवतीने ! थोडावेळ बसून बाहेर पडलो. केंद्राच्या परिसरात इकडे तिकडे थोडा वेळ हिंडलो. आता निघायचं असा विचार करून निघण्यापूर्वी पुन्हा समाधीचं शीतल सुगंधित पावित्र्य तनामनात साठवून घ्यावं म्हणून पावलं तिकडे वळली. समाधी मंडपात पोहोचलो आणि काय आश्चर्य ! तीच ध्यानमंदिरातली शुभ्रवसना युवती तिथे उपस्थित होती. समाधीवर डोके टेकून निघणार तोच ती जवळ आली. औपचारिक चार वाक्यं बोलली आणि सुंदरसं हसून म्हणाली, `हात पुढे करा.' मी हात पुढे केला तर म्हणाली, `अंहं!' नंतर तिने ओंजळ करून दाखवली आणि म्हणाली- `अशी!' मी ओंजळ पुढे केली आणि तिनं समाधीवरची मोगऱ्याची टपोरी फुलं माझ्या ओंजळीत टाकली. मी अंतर्बाह्य शहारलो. काही दिवसांपूर्वी मी दिलेली मोगऱ्याची फुलं पाहून मैत्रीण म्हणाली होती- `तू माझं आयुष्य सुगंधित केलंस.' आज एक चक्र पूर्ण झालं होतं. त्या अनामिकेने माझ्या ओंजळीत मोगऱ्याची फुलं टाकली आणि मलाही म्हणावंसं वाटलं, `तू माझं आयुष्य सुगंधित केलंस.' पण मला हे म्हणताच आलं नाही. कारण फुलं ओंजळीत टाकल्याच्या दुसऱ्याच क्षणी ती बाहेर पडून चालायला लागली होती. मी अस्वस्थ झालो.

त्या अस्वस्थ मनस्थितीतच बाहेर पडलो. बाजूलाच उभ्या असलेल्या चौकीदाराशी औपचारिक दोन शब्द बोलावेत म्हणून त्याच्याजवळ गेलो. दोन चार वाक्यांची देवाणघेवाण झाल्यावर त्याने विचारले, `साहेब आपण त्या तरुणीला ओळखता?' म्हटलं, मुळीच नाही. आता त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, `ही मुलगी कधीही कोणाशी बोलत नाही. ती डॉक्टर आहे. गायकवाडांच्या रुग्णालयात नोकरी करते. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत. २५ हजार पगार आहे. संध्याकाळी ५-६ वाजता इथे येते. समाधीची शेज करते. ध्यान करते व आठ-नऊ वाजता निघून जाते. कोणाशीही काहीही न बोलता.' आता थक्क होण्याची पाळी माझी होती. पंचविशीच्या आसपासची ती सुंदर गुजराथी तरुणी. ती तरुण होती, सुंदर होती, हुशार होती, कर्तृत्ववान होती, तिच्याकडे पैसा होता. सारं काही होतं. तरीही रोजची सायंकाळ ती अरविंद आश्रमात घालवीत होती. एकटीनं. तिला घरी काही असह्य त्रास होता का? प्रेमभंग वगैरे झाला होता का? की, अदृष्टाच्या जन्मजात ओढीमुळेच ती मित्र मैत्रिणी, मौजमजा, कुटुंबीय, छंद सारं सोडून तिथे येत होती. कुणास ठाऊक? पण ती माझ्याशी का बोलली? तिनं माझ्या ओंजळीत मोगऱ्याची फुलं का टाकलीत? कधीतरी कुणाच्या तरी आयुष्यात फुलवलेले दोन सुगंधित क्षण परत करण्यासाठी तर परमेश्वराने ही लीला रचली नसेल? ती अनामिका अरविंद आश्रमात अजूनही येत असेल का? कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. माझं व मोगऱ्याचं नातं आता असं प्रश्नांकित झालं आहे. मोगऱ्यानी मला कधीही बांधलं नाही. पण त्याचा सुगंध या प्रश्नांना बाजूस सारून व्यापून राहिला आहे. अंगणात फुललेला मोगरा पाहिला, त्याचा सुवास दरवळला की माझाही मनमोगरा आताशा डवरून येतो.

- श्रीपाद कोठे

(शुक्रवार, २० जुलै २००१- लोकसत्ता)

रविवार, ३० जानेवारी, २०२२

गंमत २६ जानेवारीची

तीन चार दिवसांपासून एक गंमत सांगायची राहिली. वेगवेगळ्या निमित्ताने काही मागत फिरणारे, दानधर्म करा अशी साद घालणारे काही नवीन नाहीत. पण गणराज्य दिनाला एक जण दारावर आला. त्याने फाटक वाजवले. मी पाहायला गेलो तर त्याने काय म्हणावे- `आज २६ जानेवारी आहे. काही कृपा करा.' म्हणजे आता २६ जानेवारी दानपुण्य मिळवण्याचा एक सण झाला असे म्हणायला हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

३१ जानेवारी २०१५

सर्वकल्याणी अर्थकारण

उद्या अर्थसंकल्प. बरीच चर्चा झाली, आणखीन खूप होईल. त्यात खूप सारं तथ्य, खूप सारा उरबडवेपणा. खरंच सगळ्यांच्या कल्याणाची अर्थव्यवस्था, अर्थरचना हवी आहे आपल्याला? मी तसं समजतो. परंतु ती साध्य होईल असे वाटत नाही. अन त्यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट, भाजपा कोणीही जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार आहोत, असे मला वाटते. सर्वकल्याणी अर्थकारणासाठी सगळ्यात पहिली, मूळ गरज कोणती? संवेदनशील, चिंतनशील, प्रामाणिक समाज. आज तसे चित्र दिसत नाही. संवेदनशील असणारे चिंतनशील असतीलच असे नाही, चिंतनशील हे संवेदनशील असतीलच असे नाही, अन प्रामाणिकपणावर न बोललेलेच बरे. तरीही सगळ्यांच्या विचारासाठी-

सर्वकल्याणी अर्थकारणासाठी दोन गोष्टी आवश्यक...

१) विकेंद्रीकरण,

२) पैसा, मालकी, तंत्रज्ञान, साधने, उपभोग, उद्योग, आकार, वेग... या साऱ्याच गोष्टींना वरची मर्यादा (upper limit).

ही वरची मर्यादा जोवर येत नाही तोवर कशाचाही काहीही उपयोग नाही. अन ही वरची मर्यादा अर्थशास्त्राचा विषय नसून, मानव्यशास्त्राचा विषय आहे. आज सगळ्याच शास्त्रांची मृत्युघंटा वाजली आहे. अगदी विज्ञान आणि धर्म यांच्या शास्त्रांची सुद्धा. त्याला अर्थशास्त्र सुद्धा अपवाद नाही. सगळी शास्त्रे saturation ला पोहोचली आहेत आणि त्या त्या क्षेत्राचे प्रश्न सोडवून त्या त्या क्षेत्राला पूर्णता प्रदान करण्यात अपयशी ठरले आहेत, ठरत आहेत. सगळ्याच शास्त्रांचे समग्र जीवनाच्या संदर्भात एकीकरण आवश्यक आहे. अर्थकारण हेही त्यात आलेच. प्रत्यक्ष व्यवहारात याचा अर्थ काय होतो यासाठी केवळ एक उदाहरण विचारासाठी...

automobile हे एक महत्वाचे क्षेत्र आहे. रोज येणाऱ्या गाड्या, मोठाल्या गाड्या यांचा संबंध कशाशी आहे? तो ना विज्ञानाशी आहे, ना गरजांशी आहे, ना अर्थकारणाशी आहे. तो आहे मानवी मनातल्या `प्रतिष्ठा भावनेशी'. या प्रतिष्ठा भावनेवर उत्तर शोधायचे असेल तर ते विज्ञानातून मिळू शकत नाही, अन अर्थशास्त्रातून मिळू शकत नाही. मुख्य म्हणजे त्याला उत्तर शोधल्याशिवाय सर्वकल्याणी अर्थकारण अशक्य आहे. भारतासमोर आणि जगासमोर आज असलेल्या पेचप्रसंगाचे हे स्वरूप आहे.

त्यातून मार्ग काढायचा असेल तर संवेदनशील, चिंतनशील आणि किंमत चुकती करण्याएवढा प्रामाणिकपणा असलेला समाज आवश्यक. आज कोणताही रंग या तिन्ही कसोट्यांवर उतरत नाही. अन त्यासाठीही रंगहीन असलेला `समाज' नावाचा प्राणी जबाबदार आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ जानेवारी २०१८

जीवनाचा गोंद

शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणू नये इत्यादी भाषा आता सुरू झाली आहे. माणसांना परस्परांशी जोडणारं जे सिमेंट होतं, जोडणारा जो गोंद होता; तो जोडणारा घटक आपण सगळ्याच स्तरावर कसा काढून टाकत आहोत याचं हे ताजं उदाहरण आहे. परस्पर आदर, विश्वास, स्नेह, एकमेकांचा विचार हा तो घटक. हा निर्माण करण्याचे प्रयत्नही होतात पण त्यांना यश येत नाही कारण हा घटक निर्माण करता येत नाही. तो तयार व्हावा लागतो, विकसित व्हावा लागतो. तो कसा तयार होतो? आपले विचार, व्यवहार, भाषा, attitude, सह अनुभूती, संयम, समजुतदारी यातून परस्पर संबंधांचा गोंद तयार होतो. अन या साऱ्या गोष्टी तयार होतात आपल्या जीवनदृष्टीतून. जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी काय आहे, कशी आहे त्यावर सगळे अवलंबून असते. नीतीचा उगमसुद्धा या जीवनदृष्टीतूनच होतो. आज बाकी सगळे मोठ्या प्रमाणात होते पण जीवनदृष्टीबद्दल मात्र फार काही होताना दिसत नाही.

- श्रीपाद कोठे

३० जानेवारी २०२१

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

गांधीजींची पुन्हा हत्या नको...

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. शहीद दिन म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. गांधी हत्या, नाथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, त्या घटनेचा इतिहास, सत्य, अहिंसा, स्वच्छता; या विषयांची या निमित्ताने प्रसार माध्यमात चर्चा होते. ती स्वाभाविक आहे. परंतु गांधीजी हे अनेक पैलू असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यातील बोटावर मोजण्याएवढ्या पैलूंची चर्चा होते, बाकी अस्पर्शित राहतात. असाच एक पैलू म्हणजे इतिहास. अलीकडे भारताचा इतिहास, भारतीय समाजाची विविध क्षेत्रातील हजारो वर्षांची साधना, प्रगती या गोष्टींचीही चर्चा होऊ लागली आहे. त्याची टवाळीही होत असते. पण गांधीजींना याबद्दल काय वाटत होते? दोन उदाहरणे याबाबत उल्लेखनीय ठरावीत.

राष्ट्रीय शिक्षण देता यावे यासाठी गांधीजींनी १९२० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी अभ्यासक्रमाची तयारी करताना प्रश्न आला की, आजचा इतिहास तर इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे. तो चुकीचा आहे. मग काय करायचे? तेव्हा मगनलाल प्रभुदास देसाई या इतिहास शिक्षकाने दोन वर्षे संशोधन करून भारताचा २०० वर्षांचा इतिहास लिहिला. प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक त्यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या त्या पुस्तकाचे शीर्षक होते- `भारत मा अंग्रेजोने वेपारशाही' (भारतातील इंग्रजांची व्यापारशाही- जसे लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही तसे व्यापारशाही).

दुसरे उदाहरण आहे प्रो. धरमपाल यांचे. प्रो. धरमपाल हे अतिशय ज्येष्ठ गांधीवादी. अखेरच्या दिवसात त्यांचा निवास गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातच होता. गांधीजींच्या कार्यात ते त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ होते. १९३१ साली इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद झाली. त्यावेळी चर्चेच्या ओघात गांधीजी इंग्रजांना उद्देशून एकदा म्हणाले की, `आमची भारतीय शिक्षण पद्धती तुमच्यापेक्षा अधिक चांगली, व्यापक आणि श्रेष्ठ होती.' त्यावर इंग्रज तज्ञांनी त्यांना पुरावे मागितले. (अगदी आजचे आमचे तथाकथित विद्वान मागतात तसे.) गांधीजी म्हणाले- `माझ्याकडे पुरावे नाहीत. त्यामुळे मी तुमचे समाधान करू शकणार नाही. पण मी म्हणतो ते सत्य आहे.' या उत्तरावरून गांधीजींची मस्करी करण्यात आली, टर उडवण्यात आली. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींचे अनेक अनुयायी त्यांच्याकडे पुढील मार्गदर्शन घेण्यासाठी गेले. त्यात प्रो. धरमपाल हेही होते. ते गांधीजींना म्हणाले- `आता देश स्वतंत्र झाला आहे. आता मी काय करावे? माझ्यासाठी तुमची काय आज्ञा आहे?' त्या क्षणी गांधीजींच्या मनाच्या तळाशी रुतून बसलेला १९३१ सालचा त्यांचा उपहास वर आला आणि तो सारा प्रकार सांगून गांधीजी प्रो. धरमपाल यांना म्हणाले, तुम्ही प्राचीन भारतीय शिक्षण या विषयावर संशोधन करून माझ्या म्हणण्याची पुष्टी करता येते का पाहा.' त्यानंतर प्रो. धरमपाल यांनी त्या कामाला वाहून घेतले. सुमारे चार दशके त्यांनी अथक अभ्यास आणि संशोधन केले. त्यापैकी बहुतांश काळ ते विदेशात देखील होते. ब्रिटीश पार्लमेंटच्या ग्रंथालयात बसून, हजारो कागदपत्रांचे सखोल संशोधन करून त्यांनी प्राचीन भारतीय शिक्षणाचा इतिहास सिद्ध केला. The Beautiful Tree शीर्षकाने त्यांचे हे संशोधन पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेसोबतच भारतीय ज्ञानविज्ञान, भारतीय संशोधने, भारतीय समाजव्यवस्था, आणि हे सारे उद्ध्वस्त करण्याची कारस्थाने अन डावपेच या साऱ्याचेही वस्तुनिष्ठ संशोधनात्मक लेखन त्यांनी केले. अनेक खंडात त्यांचे हे संशोधन उपलब्ध आहे.

आज जेव्हा इतिहास पुनर्लेखनाचा विषय येतो, भारतातील प्राचीन ज्ञानविज्ञान, भारतातील प्राचीन संशोधने, प्राचीन भारतीय व्यवस्था यांचा विषय येतो तेव्हा तथाकथित विद्वान आणि अभ्यासक जी कोल्हेकुई करतात; त्या पार्श्वभूमीवर गांधीजींची त्या संदर्भातील भूमिका आणि दृष्टीकोन महत्वाचा ठरतो. गांधीजींच्या हत्येची चर्चा करतानाच त्यांच्या या पैलूकडे दुर्लक्ष केले, त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला तर ती त्यांची वैचारिक हत्याच ठरेल. एका नाथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, त्याने फक्त एक शरीर संपले. पण त्यांच्या वैचारिक हत्येचे परिणाम अधिक व्यापक आहेत. नाथुराम गोडसे अपराधी होताच. त्याला शिक्षाही मिळाली. पण वैचारिक हत्येचे पातक करणाऱ्यांचा अपराध मोजून त्यांनाही शिक्षा व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, ३० जानेवारी २०१५

युगपुरुषाला अभिवादन

अध्यात्म हा जीवनाचा प्राणस्वर झाल्याशिवाय ऐहिक जीवन सुद्धा सुखशांतीचे, समाधानाचे होऊ शकणार नाही; हे समजावण्यासाठी आयुष्यभर धडपडणाऱ्या महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन.

आजच्याच दिवशी एका वेड्या माणसाने भावनातिरेकाने गांधीजींना गोळ्या घातल्या. तो माणूस महाराष्ट्रीय ब्राम्हण होता, हिंदू महासभेशी संबंधित होता, हिंदुत्ववादी होता. त्यामुळे त्याच्या या कृत्याचे परिणाम ब्राम्हण, स्वा. सावरकर, रा. स्व. संघ, गोळवलकर गुरुजी आणि लाखो संघ स्वयंसेवक आणि हिंदुत्वनिष्ठांना भोगावे लागले. खूप सारी पडझड झाली. खूप काही तोडले, मोडले गेले. यासाठी गांधीजींच्या दुर्दैवी हत्येचा वापर करून घेण्याचे कुटील राजकारण जबाबदार होते. गांधीजींनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच्या घटनांशी त्यांचा संबंध राहीलच कसा? एवढेच नाही तर त्यांचे पुत्र देवीदास गांधी यांनी जाहीरपणे हरिजन वृत्तपत्रात लेख लिहून, वडिलांच्या हत्येसाठी कोणावरही सूड उगवला जाऊ नये, ही अपेक्षा व्यक्त केली होती.

परंतु राजकारणाचे बेभानपण आणि त्याचा आघात सोसणाऱ्या समूहाचे पोळलेपण; या दोन्ही बाबींचा झंझावात इतका तीव्र होता; की त्यात गांधीजी कुठेतरी उडून गेले. कुटील राजकारणाचा बळी ठरलेल्या समूहाने स्वाभाविकपणे परंतु अयोग्य रीतीने गांधीजींना त्यासाठी जबाबदार ठरवून खलनायक केले. परिणामी ज्या हिंदुत्वासाठी हा समूह उभा होता, त्या हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कर्ता; आणि त्या हिंदुत्वाला कडवे आव्हान देणाऱ्या साम्यवादाचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक चोख प्रतिकार करणारा गांधी; त्याच समूहाला सलू लागला.

याच धुमश्चक्रीत पूर्णपणे दुसऱ्या ध्रुवावर उभ्या असणाऱ्या गांधींचे साम्यवादी, समाजवादी आणि स्वार्थवादी समूहांनी अपहरण केले. अन कुटील राजकारणाने पोळलेल्या समूहाने फारसा विचार न करता गांधी त्यांच्या ओटीत टाकला. वास्तविक ज्या साम्राज्यवादी सत्तांनी आणि त्यावेळी जगाचा तारणहार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या साम्यवादी शक्तींनीच भारताला भारत म्हणून उभे करण्याची ताकत असलेल्या दुबळ्या गांधींचा ग्रास केला नसेल कशावरून? मात्र या शक्यतेचा उच्चार सुद्धा केला गेला नाही आणि भारताचे दोन तुकडे झाल्याच्या स्वाभाविक दु:खातिरेकाने भारताचे भवितव्य गढूळ केले.

मातृभूमीचे तुकडे होणे क्लेशदायी होतेच. जगातले आजवरचे सगळ्यात मोठे मानवी स्थलांतर हे तर त्याहून भयानक होते. कोणीही हतबुद्ध व्हावे अशाच त्या सगळ्या घटना होत्या. परंतु मानव्याचा आधार आणि प्राण हतबुद्धता नसून सारासार विचार आणि विवेक हा असतो. दुर्दैवाने हा विचार आणि विवेक कमी झाला होता. मातृभूमीचे विभाजन वेदनादायी होते हे मान्य करूनही, देशभक्ती म्हणजे जमिनीचे भांडण नसते, हे नमूद करणे आवश्यक आहे. देशभक्ती ही त्याहून अधिक काहीतरी असते. शिवाय या विभाजनाचे शांतपणे विश्लेषण करणे त्यावेळी अपेक्षित नव्हते तरी आज ते करणे प्रस्तुत ठरते.

हे विश्लेषण करताना एक प्रश्न कठोरपणे स्वतःलाच विचारायला हवा, की असे पहिल्यांदाच घडले का? ज्यावेळी भारताने अफगाणिस्तान ते पेशावरपर्यंतचा भूभाग गमावला, त्यावेळी गांधी होते तरी का? किंवा अगदी कालपर्यंत भारत म्हणून ओळखला जाणारा श्रीलंका गमावण्यात गांधी कुठे होते? महायुद्धापेक्षा अधिक देशबांधव गमावल्याचे दु:ख अपार असणारच, पण कुरुक्षेत्रावर १८ दिवसात १४-१५ अक्षौहिणी देशबांधव, धर्मबांधव गमावले तेव्हा तर गांधी हे नावही कदाचित अस्तित्वात नसेल.

हे गांधींचा पक्ष मांडणाऱ्या वकिलाचे युक्तिवाद नाहीत. त्यांनाही त्याची गरज नाही. असलाच तर हा; मानवाचा, मानवतेचा, हिंदुत्वाचा, भारताचा, जीवनाच्या प्रवाहाचा आणि जीवनाच्या समग्रतेचा आस्थापूर्वक वेध घेण्याचा प्रयत्न आहे. कधीतरी जुन्याचा सार आणि असार असा लेखाजोखा मांडून, जीवनाचा प्रवाह निरामय करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची गरज उत्पन्न होत असते. आज ती मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेली आहे. इहवाद, भोगवाद, जडवाद, साम्यवाद, सत्तावाद, साम्राज्यवाद इत्यादी वादांनी भारतासह समस्त जगाला वेठीला धरले असताना; दु:ख परिघाच्या बाहेर पडून; जगावर कल्याणमंत्राचे अभिसिंचन करण्याची अपेक्षा ज्यांच्याकडून करता येऊ शकते आणि त्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे; त्यांनी ती भूमिका पार पाडताना त्या प्रयत्नांचे बळ वाढवू शकणाऱ्या गांधीजींना अभिवादन करणे सयुक्तिक ठरेल.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ३० जानेवारी २०२१

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

स्वरसहवास

`स्वरसहवास'मध्ये अलीकडे बरीच अस्वस्थता होती. अन आज तर तिचा अक्षरश: स्फोट झाला. नेमही हातात हात घेऊन बागडणारे गंधार आणि पंचम उदास असल्याने आज एकमेकांकडे पाहतही नव्हते. किंवा निषाद आणि षड्जाची रोजची दंगामस्ती दूरच, साधे तोंडही उघडले जात नव्हते. काहीतरी खास नक्कीच होते. आजचा दिवसच तसा होता. `रागरागिणी सहवास' सोबत `स्वरसहवास'ची आज महत्वाची बैठक होती. आमच्याशी वागताना दुजाभाव अन भेदभाव केला जातो, असा `स्वरसहवास'च्या रहिवाशांचा `रागरागिणी सहवास'च्या रहिवाशांवर आरोप होता. जसे ते श्री. मालकौंस. काय समजतात स्वत:ला कोणास ठावूक? आमच्या रिषभ आणि पंचमशी कधीच बोलत नाहीत. कधी त्यांची विचारपूस नाही. त्यांना जवळ सुद्धा येऊ देत नाहीत म्हणजे काय? हा अन्याय आहे सरळसरळ. किंवा ते श्री. मेघ. कधी म्हणजे कधीही आमच्या गंधार आणि धैवताला त्यांच्या दारापुढून देखील जाऊ देत नाहीत. इतका तिरस्कार बरा आहे का? घेतलं एखादे वेळी जवळ. दिला थोडा खाऊ. निदान विचारलं एका शब्दाने- कारे बाबा कसा आहेस? बरा आहेस ना? पण नाही. हा अपमान आहे, अन्याय आहे, दुस्वास आहे. अन अपमान सहन करणे यासारखे पाप नाही. या प्रश्नाचीच तड लावायची आहे. त्या न्यायाधीश महोदयांनी तर हात वर केलेत. म्हणाले- तुमचे तुम्ही पाहा. त्यामुळे आज समोरासमोर बसून सोक्षमोक्ष लावायचा आहे. म्हणूनच `स्वरसहवास'मध्ये तणाव आहे. काय होईल कसे होईल याच चिंतेत सगळे चूर आहेत. `रागरागिणी सहवास'च्या रहिवाशांनी नाही मानलं तर त्यांना जबरदस्तीने मानायला लावायचे हा `स्वरसहवास'च्या रहिवाशांचा निर्धारच आहे. सरळ बोलणे ऐकले तर ठीक. नाही तर रागरागिण्यांच्या घराघरात घुसण्याची अन तेही जमू न शकल्यास त्यांच्यावर चक्क बहिष्कार टाकण्याची तयारी `स्वरसहवास'च्या रहिवाशांनी चालवली आहे.

- श्रीपाद कोठे

२९ जानेवारी २०१६

प्रश्न

दूध चांगले की दही चांगले?

दूध उपयोगी की दही उपयोगी?

दुधाचं दही होतं, दह्याचं दूध का होत नाही?

दुधापासूनच दही बनतं, मग दही दूधात मिसळून का नाही ठेवत?

दही हे दुधाचंच रुपांतर- मग दह्याचा चहा आणि दुधाचं श्रीखंड का नाही करत.

- श्रीपाद कोठे

२९ जानेवारी २०१६

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्वातंत्र्याचा परीघ

जीवन आणि जीवनयापन यावर संकट येत नाही तोवर कोणाच्याही स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली अन्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे अयोग्यच ठरते. सध्या कोणती एक ब्रिगेड शनीशिंगणापूर मंदिर प्रवेशासंबंधी जे करते आहे ते म्हणूनच सर्वथैव अयोग्य आहे. महिलांना भेटायचे की नाही हा शनिदेवाचा अधिकार नाही का? कोणीतरी शनिदेवाचे प्रतिनिधी म्हणून न्यायालयात यासाठी दाद मागावी. (अन मी हे थट्टेने म्हणत नाही.) शनीचे दर्शन हा कोणाच्याही जीवन वा जीवनयापनावर गदा आणणारा मुद्दा नाही. त्यामुळे त्याला सध्या आलेले रूप निखालस चुकीचे आहे.

या ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत जे राजकारण खेळले तेही दुर्लक्षित करण्यासारखे नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी केवळ पदरात पाडून घेतली नाही तर त्यांनी आपल्यासोबत सपत्नीक त्या चौथऱ्यावर यावे अशी मागणी केली आहे. जर उद्या या ब्रिगेडला चौथऱ्यावर जाण्याची परवानगी मिळालीच तरीही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे म्हणून काही स्वातंत्र्य आहे की नाही? कदाचित त्यांना ब्रिगेडची भूमिका मान्य नसेल तर? (पंकजा मुंडे यांनी ही भूमिका मान्य नसल्याचे स्पष्टच म्हटले आहे, हे लक्षात घ्यावे.) कदाचित भूमिका मान्य असूनही अशा राजकारणात किंवा आंदोलनात्मक इत्यादी समाजकारणात त्यांना पडायचे नसेल तर? अन अशा एखाद्या कारणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जाण्यास नकार दिला तर? तर पुन्हा हा `ब्राम्हणी'पणा असल्याच्या बोंबा ठोकल्या जाणार नाहीत कशावरून? एकूणच `पुरोगामी' लोकांच्या चाळ्यांचा इतिहास पाहता असे वाटणे अनाठायी नाही.

यावर गांभीर्याने विचार करू इच्छीणार्यांनी प्रथम आपल्या देशातील पंथनिर्मितीचा नीट विचार करावा.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१६

माणसाची गंमत

माणसाची मोठी गंमत असते.

त्याला स्वातंत्र्य हवे असते, स्वातंत्र्य द्यायचे मात्र नसते.

त्याच्याजवळ सगळ्यांसाठी आपलेपणा असतो, पण ते त्याच्या परिघात (विचाराच्या, व्यवहाराच्या इत्यादी) आले तरच.

चांगले काय, योग्य काय, वादग्रस्त काय- जे त्याला चांगलं, योग्य, वादग्रस्त वाटतं ते.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१६

इमारत

जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनीवर घाव घालावे लागतातच. पण एकदा जुनी इमारत धराशायी झाल्यावर घाव घालणे सोडून द्यावे लागते अन नवीन बांधणे सुरु करावे लागते. फुले, शाहू, आंबेडकर, राजाराममोहन रॉय यांनी जुनी इमारत पाडली. आताही कोणी तेच काम करीत असेल तर ते हास्यास्पद ठरेल. समाज कोणाच्याही चालवल्याने चालत नाही. थांबवल्याने थांबत नाही. त्याचे नियंत्रण कालप्रवाह करीत असतो. कालानुरूप काय आवश्यक आहे त्याला, त्या कौशल्याने हातभार लावणे एवढेच आपले कर्तव्य असते. हां, उभे काय करायचे आहे याचे भान सुटून उपयोगाचे नाही. घर उभे करताना खूप देखणे मंदिर किंवा आकर्षक हॉटेल उभे करूनही उपयोग नसतो. घर उभे करायचे असल्यास घर, मंदिर उभारायचे असल्यास मंदिर, हॉटेल उभारायचे असल्यास हॉटेल, इस्पितळ उभारायचे असल्यास इस्पितळ; असेच हवे. अवधान सगळ्यात महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१६

दक्षिणायन

दक्षिणायनच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती एकाने आज मला पाठवली. गेले काही दिवस त्याची चर्चा सुरूच आहे. गांधीजी, डॉ. आंबेडकर, मार्क्स यांचे वैचारिक एकीकरण करीत वर्तमानाच्या संदर्भात दक्षिणायन चळवळ आहे हे बोललं जातं. याला हरकत असण्याचं कारण नाही. चांगली बाब आहे. परस्परविरोधी विचारांचा मेळ घालण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. परंतु त्या माहितीत `संविधान, लोकशाही याविषयीच्या प्रामाणिक व्यक्तींची चळवळ' असा काहीसा शब्दप्रयोग होता. गंमत वाटली. लोकशाहीशी बांधिलकी असणाऱ्या चळवळीने प्रामाणिक अन अप्रामाणिक अशी विभागणी करून टाकावी हे दुर्दैव नाही? कोण आणि कसं ठरवणार प्रामाणिक आणि अप्रामाणिक? कोणत्याही व्यक्ती, विचार, संस्था, आंदोलन याबद्दल खुलं असणाऱ्यांना प्रामाणिक म्हणायचं की; कोण प्रामाणिक हे ठरवून टाकून बाकीच्या अप्रामाणिक लोकांना दारे बंद करणाऱ्यांना `प्रामाणिक लोकशाहीवादी' म्हणायचं? मला हा अंतर्विरोध वाटतो. अन वैचारिक स्वागतशीलता याविषयीच बोलायचं तर रा.स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणाले होते- `मार्क्सने वेदांताचा अभ्यास केला असता तर तो अधिक समावेशक विचार मांडू शकला असता.' अन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्यावेळी एकात्म मानववाद प्रतिपादन केला तेव्हा, मुंबईतील २२ एप्रिल १९६५ च्या पहिल्याच भाषणात, आजपासून ५३ वर्षांपूर्वी; गांधीजींचा किती आवर्जून आणि आदराने उल्लेख केला ते पाहण्यासारखे आहे. त्या भाषणाचा पहिलाच परिच्छेद असा-

`अंग्रेजों के शासनकाल में देश में जितने भी आन्दोलन चले और देश की जितनी भी राजनीती थी, उन सब का एक ही लक्ष्य था कि अंग्रेजों को हटाकर स्वराज्य प्राप्त करें. स्वराज्य के बाद हमारा क्या रूप होगा? हम किस दिशा में आगे बढ़ेंगे? इसका बहुत कुछ विचार नहीं हुआ था. बहुत कुछ शब्द का प्रयोग मैने इसलिए किया कि बिलकुल विचार नहीं हुआ यह कहना ठीक नहीं होगा. ऐसे लोग थे जिन्होंने उस समय भी बहुत सी बातों पर विचार किया था. स्वयं गांधीजी ने `हिन्द स्वराज' लिख कर स्वराज्य आने के बाद भारत का चित्र क्या होगा इस पर अपने विचार रखे थे. उसके पहले लोकमान्य तिलक ने भी `गीतारहस्य' लिखकर सम्पूर्ण आन्दोलन के पीछे की तात्विक भूमिका क्या होगी इसका विवेचन किया था. साथ ही उस समय विश्व में जो भिन्न भिन्न विचार चल रहे थे, उनकी तुलनात्मक आलोचना की थी. इसके अतिरिक्त समय समय पर कांग्रेस या दुसरे राजनीतिक दलों ने जो प्रस्ताव स्वीकार किये उनमे भी ये विचार आये थे. किन्तु इन सबका जितना गंभीर अध्ययन होना चाहिए था, उतना उस समय तक नहीं हुआ था. क्योंकि प्रमुख विषय था अंग्रेजों को निकालना. किन्तु आश्चर्य यह है कि देश की स्वतंत्रता के बाद भी इस पर पर्याप्त गंभीरता से विचार नहीं किया गया.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रवाद की सही कल्पना - २२ एप्रिल १९६५)

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१८

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

हे तर चूक, पण हेही चूकच

फ्रान्सच्या `शार्ली हेब्डो' साप्ताहिकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू उचलून धरली, तर कोणी इस्लामिक कट्टरवादाचा समाचार घेतला. कोणी तर तिसऱ्या महायुद्धापर्यंत जाऊन पोहोचले. या अतिरेकी हल्ल्यानंतर साप्ताहिकाने पुन्हा एकदा इस्लामला मंजूर नसलेले मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र मुखपृष्ठावर छापून `हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. त्यांना इस्लामी जगतातून पुन्हा धमक्याही मिळाल्या. भारतातही यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच अनाकलनीय होत्या. त्यांच्या दृष्टीने एखादी गोष्ट योग्य वा अयोग्य ठरण्याची एकच कसोटी असते. ती म्हणजे, मुसलमानांची बाजू घेणे. बाकी साऱ्या गोष्टी, सारे तर्क त्यानुसार बेतले जातात. या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांच्या व्यतिरिक्त आणखीन दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एक होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी आणि दुसरी होती, भारताने भोगलेल्या मुस्लिम अतिरेकापोटी उमटलेली. `पहा,  मुस्लिम कट्टरता जगभरात थैमान घालीत आहे आणि तो जगाला असलेला धोका आहे. भारत गेली अनेक शतके त्याच्याशी झुंज देत आहे. आता वेळ येउन ठेपली आहे की, सगळ्या जगाने मिळून तो निपटून काढायला हवा-' अशा आशयाची. जगातील किंवा भारतातील या सगळ्याच प्रतिक्रिया उथळ म्हणाव्या लागतील. मुस्लिम कट्टरता हे वास्तव आहे. त्यात दुमत होण्याचे कारण नाही. `भारतीय सेक्युलर' सोडले तर कोणाचे त्या बाबतीत दुमत होणारही नाही. अगदी इस्लामिक देशांचे सुद्धा. आज पाकिस्तान जी भाषा बोलतो आहे, ती याचेच निदर्शक म्हणावी लागेल. त्यामुळे मुस्लिम कट्टरता नीट हाताळायला हवी, समूळ नष्ट करायला हवी आणि त्यासाठी संपूर्ण जगाने प्रयत्न करायला हवे यात वादच नाही. मात्र  `शार्ली हेब्डो'च्या मार्गाने तसे करणे योग्यही नाही आणि फलदायीही नाही. या घडामोडींच्या अनुषंगाने दोन बाबींचा सखोल विचार करायला हवा. एक म्हणजे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे आणि किती असावे? दुसरे म्हणजे, इच्छित परिवर्तन कसे घडवावे?

एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करायला हवी की, `शार्ली हेब्डो'ने जे काही केले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर त्याने मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र छापणे ही कृती तर उघड चिथावणीखोर आहेच, पण त्याचे मूळ असलेले व्यंगचित्र हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. केवळ एखाद्याला एखादी गोष्ट वाटते म्हणून ती व्यक्त केलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हा अगोचरपणा झाला. माणसाच्या मनात अनेक गोष्टी येत जात असतात. त्यात प्राकृत, संस्कृत, विकृत असे सगळे प्रकार असतात. आपल्या मनातील प्रत्येकच वांती कुठेही अन कशीही बाहेर काढायची, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे का? अन तसे म्हणायचेच असेल तर `पिके'वर किंवा `एम. एफ. हुसेन'वर आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या कारणांनी `पिके' चित्रपट वा हुसेनच्या चित्रांवर आक्षेप घेणे योग्य आहे त्याच न्यायाने पैगंबर साहेबांच्या व्यंगचित्रावरील आक्षेप योग्य आहे. अशा व्यंगचित्रावर मुस्लिमांनी का नाराज होऊ नये? मुळात सगळ्या जगाने प्रतिमा पूजन टाकून द्यावे हा इस्लामचा दुराग्रह जसा आणि जितका अयोग्य आहे तितकाच, इस्लामला मूर्तीपूजा मान्य नसतानाही आम्ही त्यांची मान्यता मोडीत काढून त्यांना डिवचू; ही मानसिकताही अयोग्य आहे. आपण हिंदूंनी विशेषत: हे लक्षात घ्यायला हवे. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति' ही जर आपली जीवनश्रद्धा असेल तर पैगंबर साहेबांचे चित्र काढण्याचा आचरट आग्रह चुकीचा आहे असेच म्हणावे लागेल. पैगंबर साहेबांचे चित्र काढल्याने काय मोठेसे होणार आहे? किंवा ते नाही काढले तर जगाचे काय नुकसान होणार आहे? आम्ही जर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत राहिलो तर आमचे वैशिष्ट्य आणि महानता गमावून बसू. नव्हे आम्हीही त्यांच्याच पंगतीत जाऊन बसू. हिंदूंनी शक्तिशाली व्हायला हवे याचा जो काही आशय आहे त्यात आपली वैशिष्ट्ये आणि महानता न गमावता योग्य गोष्टींसाठी आग्रही होणे हा महत्वाचा पैलू आहे. मात्र आग्रह आणि अतिरेक यातील सीमारेषा निश्चित करण्याचा विवेक करण्याएवढी परिपक्वता आपल्यात असायला हवी. मुसलमान समाजातील बुरखा सारख्या अनिष्ट प्रथा, जगभरातील मुस्लिम आक्रमणे आणि आक्रस्ताळेपणा यांचा इतिहास, दारूल हरब आणि दारूल इस्लाम या किंवा यासारख्या त्यांच्या मूळ तत्वज्ञानातील संकल्पना; यासारख्या विषयांवर चकार शब्द न काढणे हा नक्कीच दुबळेपणा आहे. तो त्यागायलाच हवा. मुसलमान समाजातील तात्विक आणि व्यावहारिक परिवर्तन, त्याचे त्या समाजावरील आणि अन्य समाजांवरील परिणाम, मुसलमान समाजाचा अन्य समाजांशी संबंध, त्यांच्यातील सलोखा, शांततापूर्ण सुखदायी सहअस्तित्व; यांची व्यापक चर्चा व्हायला हवीच. योग्य त्या मंचावर, योग्य त्या भाषेत, योग्य त्या व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही. किंबहुना तोच योग्य परिवर्तनाचा राजमार्ग आहे. हे करताना अन्य लोक दुबळे आहेत, आपल्या अतिरेकाला ते घाबरतात, आक्रस्ताळेपणा करून आपण वाटेल ते करू शकतो, असा मुसलमान समाजाचा ग्रह होणार नाही; तसेच पूर्वीच झालेला अशा प्रकारचा ग्रह कायम टिकणार नाही; असे अन्य समाजाचे, विशेषत: हिंदू समाजाचे वर्तन असायलाच हवे. त्यासाठी जे काही करणे आवश्यक ते करायलाच हवे. मात्र हे करताना परिवर्तनाची व्याप्ती आणि सगळ्यांबद्दल समादराची भावना यांचे भान राखले जायला हवे. पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र काढणे आणि त्याचे समर्थन करणे हा तो मार्ग नाही आणि `तुम्हाला काहीही वाटो आम्ही असेच करीत राहणार' हा  `शार्ली हेब्डो'चा आचरटपणा तर निषेधार्हच आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण मानवजातीला तंत्रविहिनतेकडे नेण्याचा आणि विनोदाच्या नावाखाली मानवी जीवनाला गांभीर्यहीन बनवण्याचा जो उपद्व्याप सध्या जगभर सुरु आहे तो नीट समजून घेणे गरजेचे आहे. यामुळेच भारतातील `पिके'चे आणि फ्रान्समधील  `शार्ली हेब्डो'च्या कृतीचे समर्थन होऊ लागते. साहित्य, पत्रकारिता, चित्रपट, नाटके, वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, भ्रमणध्वनी, आंतरजाल; असा खूप सारा पसारा मानवजातीने २१ व्या शतकापर्यंत पसरून ठेवलेला आहे. परंतु ही सारी माध्यमे आहेत. त्यांचा उपयोग कशासाठी करायचा, किती करायचा, कुठे करायचा, का करायचा, किंवा हे सगळे का करायचे नाही याची साधकबाधक चर्चा मात्र होत नाही. त्यानुसार वर्तन ही तर दूरची गोष्ट राहिली. प्रत्येक साधन प्रत्येक गोष्टीसाठी योग्य असतेच असे नाही. त्या प्रत्येक साधनाच्या मर्यादा असतात. या मर्यादा जशा शारीरिक असतात तशाच मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, वर्तनशैलीला अनुसरून; अशा अनेक प्रकारच्या असतात. म्हणूनच त्या साधनांचा अमर्याद, बेछूट उपयोग अयोग्य आणि त्याज्य ठरतो. परंतु या सगळ्याचा गांभीर्याने विचार न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गायिले जातात. कोणतेही स्वातंत्र्य व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितरक्षणाने मर्यादित होत असते, नव्हे व्हायला हवे. स्वातंत्र्य हे मूळ तत्व नसून व्यक्तीचा आणि समाजाचा विकास आणि त्यांचे हितरक्षण ही मूळ बाब आहे. त्यासाठी आवश्यक आणि पोषक असेच स्वातंत्र्य असायला हवे. हे सत्य स्वीकारताना अर्ध्याकच्च्या मनाने, पण परंतु करीत, स्वीकारणे कुचकामाचे ठरेल. स्पष्ट व रोखठोक विचार करायला हवा. नाहीतर स्वातंत्र्याच्या नावाने तंत्रविहिनतेकडे सुरु असलेला प्रवास कपाळमोक्ष घडवल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीला विनोदी फोडणी देण्याचाही प्रकार प्रघात होऊ पाहतो आहे. take it easy - अशी एक संस्कृतीच रुजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माणसावरील दबावाचे आणि त्याच्या तणावाचे इतके भयंकर स्तोम माजवले जात आहे की, गांभीर्य नावाची काही गोष्ट आहे आणि ती आवश्यक आणि अपरिहार्य आहे याचाच विसर पडावा. जो उठेल तो, ज्यावर वाटेल त्यावर, जे वाटेल तसे बरळत सुटतो; वाटेल तशी टीकाटिप्पणी करत सुटतो, वाटेल तशी प्रतिक्रिया देत राहतो आणि कळस म्हणजे वाटेल तसे हिडीस कलारूप देत राहतो. खरे तर विनोद हा विषय गांभीर्याने घेण्याचा आहे हे भानच सुटले आहे. विनोदाचे जीवनात एक स्थान आहे. पण त्याची एक मर्यादाही आहे. चार घटका विरंगुळा आणि भावनांचे विरेचन एवढेच त्याचे क्षेत्र आहे. पण फक्त चार घटकाच, उरलेल्या घटीकांचे काय? त्याचे गांभीर्य राहायला आणि राखायला हवे की नाही? दुसरे म्हणजे- माणूस त्याला वाट्टेल तसा, वाट्टेल त्या मृगजळामागे धावत सुटणार, त्याविषयी काहीही ऐकून घेण्याची त्याची तयारी नसणार आणि वरून त्याच्यावरील दाब आणि त्याचा ताण यांचे बहाणे करून take it easy चे तत्वज्ञान बनवणार. ही सरळ सरळ विकृत मानसिकता आहे. विनोदाने आजवर जग घडवलेले नाही. जगात जे काही चांगले, आनंददायी, सुखपूर्ण, सुखपोशक, आधार देणारे, घडवले आणि निर्मिले गेले आहे; ते ते अतिशय गांभीर्याने घडलेले वा घडवलेले आहे, हे विसरता कामा नये. नेते असोत वा वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते असोत वा तत्वज्ञानी, कारखानदार असोत वा सैनिक; यांच्यावर विनोद वगैरे झाले असतील, पण हे कोणीही विनोदाच्या वगैरे भानगडीत पडले नाहीत. कोणासोबत हसणे आणि कोणाला हसणे यातील फरक समजायला अगोदर गांभीर्य समजावे लागते. जीवनातील हास्य नाकारणारे गांभीर्य सुतकी असतेच, पण जीवनातील गांभीर्य नाकारणारे हास्य पोरकट असते; हे त्याहून खरे आहे. एक वेळ एखादी व्यक्ती गंभीर राहत असेल, आपल्याशी बोलत नसेल ते चालू शकते, पण आपल्याला कुणी हसले तर चालेल काय? स्मितहास्याची प्रसन्नता आणि दात विचकण्याचा निलाजरेपणा यातील फरक पुसून टाकणे श्रेयस्कर ठरेल का? म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, विनोद काय, व्यंगचित्र काय; सगळ्याची जाण आणि समज वाढायला हवी आणि त्याला अनुसरूनच कायदे-नियम असायला हवेत. आज त्याची वानवा आहे. म्हणूनच `पिके'तील थिल्लरपणा चूक आणि `शार्ली हेब्डो'चे व्यंगचित्रही चूकच.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २७ जानेवारी २०१५

यात्रा अनुभव

नागपूरच्या टेकडी गणेशाची यात्रा असते दरवर्षी पौषातल्या संकष्टी चतुर्थीला. त्यानुसार आजही ती होती. तिथे दर्शनाला जाऊन आलेले एक भक्त सांगत होते तिथल्या व्यवस्थेबद्दल. ते म्हणाले- व्यवस्था एकदम छान होती. कुठेही गडबड, गोंधळ, धक्काबुक्की नाही इत्यादी. पुढे म्हणाले- तिथे सूचना दिल्या नात होत्या ध्वनीवर्धकावरून की, `श्रीगणेशाला नमस्कार करताना कृपया डोळे बंद करू नये.' अर्थात ही सुरक्षेसाठी सावधगिरीची सूचना असणार. त्यात चूक वा गैर काहीही नाही. पण नमनच (न-मन, मन नसलेली/ मनाचा लय झालेली स्थिती) करायचे नाही तर मंदिरात जाण्याचा उपयोग काय? वर्तमान जीवन कळत वा नकळत माणसाला भक्तीपासून, आध्यात्मापासून, ज्ञानापासून दूर घेऊन जात आहे. आध्यात्मिक जडवाद आणि परिणामी वाट्यास येणारी अनर्थमालिका यांचा विचार आणि जीवनाच्या संदर्भात त्याचे उपायोजन चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१६

अशोकचक्र

काल तिरंगा राष्ट्रध्वज पाहताना एक विचार मनात चमकून गेला- अरे, या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी असलेलं अशोकचक्र आपण विसरलो की काय? कोण होता सम्राट अशोक? कलिंगच्या लढाईत लाखो लोकांना यमसदनी पाठवून आपल्या पूर्वजांना न जमलेला कलिंग देश (आजचा ओरिसा) जिंकण्याचा आणि विशाल भारतीय साम्राज्य निर्माण करण्याचा पराक्रम केलेला महान चक्रवर्ती सम्राट. पण या भीषण नरसंहारानंतर व्यथित होऊन त्याने आपला मार्गच बदलून टाकला. अन बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्याने शांतीचा संदेश प्रसारित केला. मनात आले, याची ही दोन रूपे. लाखो लोकांच्या संहारासाठी त्याच्यावर रोष धरता आला असता. पण शेकडो वर्षे भारताने आणि १९५० रोजी स्वीकारलेल्या घटनेच्या निर्मात्यांनी तसे केले नाही. उलट त्याने दिलेला शांतीचा संदेश उचलून धरला. त्यासाठी त्याची आठवण ठेवली. अन चक्क राष्ट्रध्वजात त्याच्या चक्राला स्थानही दिले. मुळातच चक्र ही खूप मार्मिक बाब आहे भारतीय मानसात. हे विश्वच चक्रीय आहे असं इथलं तत्वज्ञान सांगतं. आपल्या प्रत्ययाला येणाऱ्या सगळ्या बाबी या विकासाच्या अवस्था असतात. सम्राट अशोकाच्या बाबतीत तेच तत्व पाळण्यात आलं आहे. `ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ' विचारू नये ही लोकोक्तीसुद्धा काहीशी याच अंगाने जाणारी.

आज मात्र... जाऊ द्या ते उल्लेख. किमान दहा बाबी या क्षणी डोक्यात आहेत, ज्यात जुन्या गोष्टींचा निष्कारण काथ्याकूट काढला जात असतो. त्यातील एखादाही उल्लेख वादंग माजवायला पुरेसा आहे. पुढे जाणे, पुढे पाहणे, पुढे चालणे आम्ही विसरूनच गेलो आहोत की काय? `झाले गेले गंगेला मिळाले' असा विचार करून, `तू नाही तुझ्या बापाने पाणी गढूळ केलं असेल' अशी पंचतंत्रातील कोल्हेकुई न करता; तारतम्य ठेवून, आवश्यक तेवढेच मागे रेंगाळून पुढे चालणे; हा मला अशोकचक्राचा संदेश वाटला. नकोशा, अडचणीच्या गोष्टी असतातच- व्यक्तीजीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात; सर्वत्र. त्यांचा चोथा किती चिवडायचा असतो? आम्ही अशोकचक्रही आवर्जून लक्षात ठेवायला हवं.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २७ जानेवारी २०१६

एक आठवण

हे फोटो पाहताना भूतकाळ आठवला. बहुतेक १९७९ किंवा १९८०. नागपूरचा रक्षाबंधन उत्सव चिटणीस पार्क मैदानावर होता. त्यावेळी आणिबाणीनंतर काही राज्यांमध्ये जनता पार्टीची सरकारे होती. मध्यप्रदेशात सुद्धा जनता पार्टीचे सरकार होते. त्या सरकारातील कारागृह मंत्री पवन दिवाण त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस उपस्थित होते. कार्यक्रम सुरु झाला. वैयक्तिक गीत झालं. पवन दिवाण यांचं भाषण सुरु झालं आणि पाचच मिनिटात श्रावणधारा बरसू लागल्या. श्री. दिवाण यांनी मागे वळून पाहिलं. बाळासाहेबांनी हातानेच थांबू नका अशी खुण केली. जवळपास अर्धा तास त्यांचं भाषण झालं. नंतर स्व. बाळासाहेब पाउण तास बोललेत. त्यांच्या बौद्धिकाच्या शेवटाला पाउस उघडला. प्रार्थनेसाठी उत्तिष्ठ आज्ञा झाली तेव्हा अनेकांना चिखलातून उठवण्यासाठी हात द्यावे लागले होते. प्रार्थना वगैरे आटोपली. पण ध्वज ओला होऊन ध्वजस्तंभाला चिकटून बसला होता. मग दोऱ्या सोडून ध्वजस्तंभ उतरवला आणि ध्वज काढला होता. विकीर नंतर सगळे हाहाहुहू करत होते.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१७

सत्तेच्या दावणीला

आजकाल भीती का खरी होते आहे ठाऊक नाही. आज रामदेव बाबांनी आणि खडगे यांनीही संतांना भारतरत्न का नाही असा सवाल उपस्थित केला. अन भगवाधारी लोकांना भारतरत्न का नाही ही चर्चा सुरू झाली. It must be fought tooth and nail. धर्म, आध्यात्म राजनीतीच्या कितीतरी वर आहे, असायला हवे. सगळ्या गोष्टी सत्तेच्या दावणीला बांधणे, सत्तेचे प्रशस्तीपत्र सर्वोच्च मानणे, तसं वाटणे, त्याची इच्छा सुद्धा होणे किंवा रणनीती म्हणून सुद्धा तसा विचार करणे; समर्थनीय तर नाहीच घातक, अयोग्य अन चुकीचे आहे. राजकारण, सत्ता ज्याला हात लावते त्याचा विनाश अवश्य होणार. दोन्हीत अंतर ठेवणे आणि प्रयत्नपूर्वक, व्रतस्थपणे, आग्रहिपणे धर्म, आध्यात्म जपणे; त्याचे सर्वोच्च स्थान जपणे हेच भारताचे नुसते वैशिष्ट्य नाही, ते त्याच्या अमरत्वाचे कारण आहे अन तोच त्याचा जीवनहेतु सुद्धा. भगव्याने सत्तेची स्वप्नात सुद्धा अभिलाषा बाळगणे या राष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ठरेल. विवेकानंद वा दयानंद सरस्वती यांना भारतरत्न का नाही ही चर्चा अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची कोणाचीही इच्छा वा मागणी कोणत्याही स्थितीत समर्थनीय नाही.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१९

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

गणराज्य दिनानिमित्त दोन इच्छा -

१) भारत हा जगातल्या दोनेकशे देशांमधील एक असा न राहता, जगाला दिशा आणि दृष्टी देणारा द्रष्टा होवो.

२) शौर्याचा सांस्कृतिक उत्सव असलेला गणराज्य दिवस, हळूहळू सांस्कृतिक शौर्याचा उत्सव होवो.

- श्रीपाद कोठे

२६ जानेवारी २०२१

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

आदेश

राम, कृष्ण, गणपती, दुर्गा यांचे फोटो सरकारी आस्थापनातून काढण्यात यावेत.

फारच छान.

आता, गांधीजी, नेहरू, गांधी परिवार, आंबेडकर, फुले, सुभाषबाबू, मोदी, फडणीस; आणखीन कोण कोण असतील सगळ्यांचे फोटो काढण्याचे आदेश द्यायला वेळ लावू नये.

श्रद्धा ही व्यक्तिगत बाब आहे. देवाबद्दल असो वा महापुरुषांबद्दल.

- श्रीपाद कोठे

२५ जानेवारी २०१७

अभिव्यक्ती

१) ज्यांना पोर्न पाहायचे त्यांना त्याची मोकळीक हवी.

२) ज्यांना अंगभर कपडे घालायचे नाहीत त्यांना त्याची मोकळीक हवी.

३) ज्यांना गायीचे मांस खायचे आहे त्यांना त्याची मोकळीक हवी.

४) ज्यांना धर्म, परंपरा, देव, महापुरुष आदींचा अपमान आणि टिंगलटवाळी करायची त्यांना त्याची मोकळीक हवी.

५) ज्यांना असा अपमान करून पैसा कमवायचा त्यांना त्याची मोकळीक हवी.

६) ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खोटेपणा करायचा आहे त्यांना त्याची मोकळीक हवी.

७) हे जग आपल्या टवाळकीसाठीच तयार झालं आहे असं वाटणाऱ्या विनोदवीरांना त्याची मोकळीक हवी.

पण, ज्यांना देवादिकांची चित्रे लावायची आहेत, पूजा इत्यादी करायचे आहे....

त्यांना मात्र त्याची मोकळीक अजिबात असता कामा नये...

`पुरोगामी, इहवादी, जडवादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी तालिबान्यांचा विजय असो... विजय असो...'

- श्रीपाद कोठे

२५ जानेवारी २०१७

दळभद्री युग

माझा संगणक गेली तीन चार महिने नादुरुस्त होता. अखेरीस सुरू झाला. मध्यंतरी बीएसएनएल फोन बंद केला. कारण त्याचा उपयोग नव्हता. शिवाय फोनवरील नेट संगणकाला जोडण्याचे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तेच वापरू हा विचार. इथवर ठीक. आज संगणक सुरू करून नेट जोडल्यावर -

- नवीन वापरकर्ता असल्याने लॉगिन व्हायला नकार. (का बाबा? तुझं काय जातं, मी या डिव्हाईस वरून लॉगिन करीन नाही तर त्या. तुला काय करायचं? मला माझ्या सुरक्षेची अजिबात चिंता नाही. माझे अब्जावधी रुपये कोणी चोरले किंवा मला मारून टाकलं तरी माझी हरकत नाही. पण माझ्या भल्यासाठी म्हणून तू मलाच वेठीला का धरतोस? शिवाय देशाची सुरक्षा वगैरे आहेतच. कोणीतरी एखादा किंवा मूठभर काही करतील म्हणून तुम्ही त्रास भोगला पाहिजे. तुम्हाला काहीही किंमत नाही. तुम्हाला काहीही अर्थ नाही. तुम्ही सज्जन असून उपयोग नाही. तुम्ही फक्त कठपुतली. जगायचं असेल तर गुलाम होऊन जगा नाही तर मरा. या युगाची ऐसीतैसी.)

- संगणक बंद पडणे हा माझा दोष आहे का?

- service provider बदलणे हा गुन्हा आहे का?

- फोनवर चालणारं नेट संगणकावर का विनात्रास चालू नये?

- कोणाच्या बा चं काय जातं?

बरं कसंबसं काही सुरू केलं आणि गेली १०-१२ वर्ष लिहिण्यासाठी जे google transliteration वापरीत होतो ते download करायचा प्रयत्न केला. ते दाद द्यायला तयार नाही. अति विद्वान, महान, सर्वज्ञ गुगल ला हजारदा transliteration सांगूनही ते आपलं translation कडे नेऊन सोडत होतं. आता गुगल ची अक्कल संपली की काही कायदे बियदे भानगड आहे ठाऊक नाही. बरं पैसे हवे असतील तर ते सांगावं. तेही नाही. अन हे म्हणे user friendly.

- तंत्रज्ञान कधी वापरायचं, कसं वापरायचं, हे ठरवण्याचा; ब्रेक घेऊन पुन्हा वापरण्याचा पर्याय हवा की नको. हे करताना सुरक्षितता किंवा बदल यांचा जाच होऊ नये एवढी अपेक्षा सुद्धा अनाठायी असू शकते का?

- एक मात्र खरं की आपण एका दळभद्री युगात जगतो आहोत. एक तर 'चालतच' म्हणून दात विचकत पुढे जायचं किंवा अडचणींवर मात वगैरे करण्याची षंढ तत्त्वज्ञाने पाजळायची. हजार पर्याय समोर ठेवले जातील पण बाबा रे - मला तुझ्या त्या हजारो पर्यायात आपला वेळ वाया नाही घालवायचा. मला माझ्या मर्जीने साधं सोपं जगता यायला हवं. त्यासाठी काही सांग नाही तर *** जा.

- श्रीपाद कोठे

२५ जानेवारी २०२०

रविवार, २३ जानेवारी, २०२२

अराजक

मी काही आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता, समर्थक, हितचिंतक व मतदार नाही. मुळात आम आदमी पार्टीची स्थापना चुकीची, अयोग्य, अनावश्यक आहे. आपल्या देशाला अधिक राजकीय पक्षांची गरज नाही. असलेली बजबजपुरीच कमी व्हायला हवी. त्यामुळेच आम आदमी पार्टी लोकसभेत जावी असे काही मला वाटत नाही. तरीही...

तरीही काही प्रश्न मनात येतात-

१) त्या विदेशी मुलींनी तक्रार करताच गुन्हा नोंदवून fir दाखल करण्यात आला. आणि चौकशीआधीच त्या निरपराध आहेत हे गृहीत धरून सगळ्यांनी गदारोळ सुरु केला. परंतु तेथील रहिवासी १०-२० वेळा पोलिस ठाण्यात गेले, त्यांनी तक्रार केली. मात्र त्याची दखलही घेण्यात आली नाही. का? स्थानिक लोक म्हणतात त्याप्रमाणे त्या विदेशी मुली खरेच अवैध कामे करीत असतील तर ते चूक नाही का? त्यातही तेथे जर अमली पदार्थांचा व्यापार वा अमली पदार्थांचे व्यवहार चालू असतील तर ते; मंत्री काय म्हणाले यापेक्षाही अधिक समाज व देश विरोधी आणि अधिक गंभीर स्वरूपाचे नाही का?

२) पोलिस कर्तव्यात कुचराई करतात हे देशव्यापी सत्य नाही का? आपल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही अशा तक्रारी केलेल्या नाहीत का? विरोधी पक्षांचा अनुभव वेगळा आहे का? पोलिस आपले काम व्यवस्थित करीत नसतील तर त्यांची तक्रार करावी, त्यांच्या व्यवस्थेत बदल घडवून आणावा वगैरे युक्तिवाद, तर्क आणि सल्ला बालिश नाही का? सध्याची इंग्रजांनी दिलेली पोलिस व्यवस्था कुचकामी असून केराच्या टोपलीत टाकून द्यावी आणि नवीन पोलिस रचना निर्माण करावी अशी चर्चा अनेक स्तरांवर किती दिवसांपासून सुरु आहे? काय झाले त्याने? चर्चा, नियम, तक्रारी वगैरेचा आपला अनुभव खरेच त्याची तरफदारी करावी असा आहे का? आपण किती बालिश आणि बावळट असावे?

याचा अर्थ अराजक असावे असा नाही. पण आम आदमी पार्टीच्या विरोधासाठी कायदा आणि मानवतेच्या नावाखाली दुसरे अराजक माजवावे हेही योग्य नाही ना?

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०१५

'फतेह का फतवा'

'फतेह का फतवा' असा एक कार्यक्रम झी न्यूजवर रविवारी पाहिला. विषय होता- मुस्लिम समाजातील फतवा. तारेक फतेह स्वत: मुस्लिम. त्यात सहभागी पाच जण देखील मुस्लिम. त्यातील दोन महिला. कार्यक्रमाचं स्वरूप मुस्लिम समाजावर मुस्लिमांनी केलेली चर्चा असंच होतं. त्यात चर्चेच्या ओघात एकाने भलताच दावा केला. त्याच्या हातात एक पुस्तक होते आणि त्या आधारे तो दावा करीत होता. दावा असा की, हिंदूंची जी मंदिरे औरंगजेबाने पाडली; त्यासाठी हिंदू पुजाऱ्यांनीच पत्रे लिहून त्याला आमंत्रण दिले होते. या मंदिरांमध्ये व्यभिचार आणि बलात्कार चालत. ते थांबावे म्हणून पुजाऱ्यांनी ही विनंती औरंगजेबाला केली होती. पुढे काय वाढून ठेवले आहे याची यावरून कल्पना यावी. याचे काही अर्थ ध्वनित होतात-

१. मंदिरे पाडण्यासाठी हिंदूच जबाबदार आहेत.

२. हिंदू मंदिरे ही वासनांधांचे अड्डे होते.

३. औरंगजेबाने केले ते योग्यच होते.

४. महिलांनी हिंदू समाज व धर्माचे स्वरूप ओळखावे.

५. हिंदूंनी मुसलमानांच्या ताब्यातील मंदिरांची मागणी करणे चुकीचे आहे.

६. अशा प्रकारची पुस्तके वगैरे छापून कपोलकल्पित गोष्टींना अधिकृतता मिळवून देणे.

तारेक फतेह विरुद्ध पाच असा हा सामना होता. त्यांनी वारंवार एक प्रश्न केला- औरंगजेबाला तुम्ही आपला हिरो मानता का? पाचपैकी एकानेही उत्तर दिले नाही.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०१७

एक संवाद

स्थळ- रस्त्याच्या कडेला झाडाखाली.

पात्र- अचानक भेटलेल्या दोन मैत्रिणी.

वातावरण- एक मुलगा व मुलगी आणि एक स्त्री व पुरुष, शेजारच्या झाडाखाली असलेल्या टपरीवर चहा-नाश्ता करीत आहेत.

मैत्रिणींमध्ये त्याची चर्चा.

पहिली- लोक ना मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष बोलताना, खाता-पिताना दिसले की लगेच अर्थाचे अनर्थ काढायला लागतात.

दुसरी- हो ना गं. जग इतकं पुढे गेलंय पण समाजाची मानसिकता काही बदलत नाही.

चार क्षण शांतता.

पहिली व दुसरी - हाहाहा हाहाहा

दोन क्षण शांतता. एकमेकींकडे पाहत पुन्हा,

पहिली व दुसरी - हाहाहा हाहाहा

पहिली- परवा आपण दोघींनी आपल्या दोघांना त्या दोघींशी बोलताना पाहिलं तेव्हा...

दुसरी- केवढ महाभारत झालं... दोघंही बिचारे...

पहिली- काहीच बोलू शकले नाहीत.

पहिली व दुसरी - हाहाहा हाहाहा

पहिली व दुसरी - चालतंच आहे. चल भेटू.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०१७

पूजाबंदीच्या निमित्ताने...

सरकारी कार्यालयांमधील पूजा वगैरे बंद करण्याचे राज्य सरकारने ठरवले असून लवकरच तसा निर्णय घेतला जाईल अशी बातमी वाचण्यात आली. काही whats app ग्रुप्समध्येही तसे मेसेज आले. स्वच्छ शब्दात ही विचारहीनता आहे. श्रद्धा बाळगलीच पाहिजे ही जशी दादागिरी आहे तसेच, श्रद्धा बाळगता येणार नाही हीही दादागिरीच आहे. आपण स्वीकारलेली व्यवस्था हीच मुळात दादागिरीचा खेळ आहे. त्यात विचाराला वगैरे स्थान नाहीच. म्हणूनच गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याच्या ३८ वर्षे आधी या व्यवस्थेला `हिंद स्वराज'मध्ये वेश्या म्हटलं होतं. या शब्दावर एका महिलेने आक्षेप घेतल्याने त्यांनी तिची माफी मागितली, पण माफी मागतानाही आपण आपल्या विचारांवर, भावनांवर आणि त्या शब्दावर ठाम आहोत हेही स्पष्ट केले. तो शब्द त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्येही कायम ठेवण्यात आला. यासोबतच त्यांनी या व्यवस्थेच्या मुळाशी असलेली `पाश्चात्य सभ्यता' या साऱ्याला कारणीभूत आहे आणि ती टाकून देईपर्यंत कोणतीही सार्थक व्यवस्था निर्माण करता येणार नाही असा इशाराही दिला होता.

आता मुद्दा धर्म आणि श्रद्धेचा. व्यक्ती आणि व्यक्तीची श्रद्धा या गोष्टी वेगळ्या करता येतात का? व्यक्ती ही जशी त्याच्या शरीरासकट असते तशीच मनासकट असते. भावनांसकट असते. ते वेगळे करता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न किंवा त्याची अपेक्षा अनाठायी अन भाबडी असते. आयएसआय असो, डोनाल्ड ट्रंपच्या स्वरूपातील पुनरुज्जीवनवाद असो, भारतातील धार्मिक प्रवाह असोत की जगभरातील असे असंख्य प्रवाह; या सगळ्या अनैसर्गिक, अयोग्य, स्वप्नाळू, अतार्किक विचारांचा आणि त्याला अनुसरून केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहेत. १६ व्या, १७ व्या शतकापासून सुरु झालेले हे विचारप्रवाह, त्यांनी तयार केलेल्या संकल्पना, त्याला अनुसरून विकास पावलेल्या व्यवस्था, रचना, पद्धती, शब्दावली हे सगळेच कुजून गेलेले आहे. हे अर्थकारण, समाजकारण, राजकारण, संस्कृती, धर्मकारण या सगळ्याला लागू आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाज, राज्य, जगणे, सुख, आनंद अशा असंख्य गोष्टींच्या मुळाशी जाण्याची खरं तर गरज आहे. असे मुळापर्यंत जाण्याची क्षमता नसणे आणि त्याला विविध कारणांनी नकार देणे सोयीचे आहेच, पण हिताचे नक्कीच नाही. माणूस म्हणजे काय? हे जग म्हणजे काय? आमच्या धडपडीचा अर्थ काय? हे सगळे मुलभूत प्रश्न आहेत.

आज प्रचलित असलेल्या विचारांच्या मर्यादा प्रत्यक्ष त्या त्या व्यक्तींनाही त्यावेळीच जाणवल्या होत्या. पण नावीन्याचा आणि काळाचा रेटा वरचढ ठरला. एकच उदाहरण पुरेसे आहे. `मला तुमचे विचार पटत नसले तरीही ते मांडण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन' हे वाक्य आजच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार आहे. हे ज्या व्होल्तेअरने म्हटले होतेच त्यानेच नंतर- `माणसाला मत नसते तर बरे झाले असते. कारण माणसाच्या मतांनी या पृथ्वीवर भूकंप आणि वादळे याहूनही अधिक हानी केली आहे,' असेही म्हटले होते. एक एक मुद्दा घेऊन त्याचा तपशीलवार विचार करावा लागेल. जे सगळे तथाकथित आधुनिक विचार आणि संकल्पना घेऊन आम्ही चालतो आहोत त्याने आपल्याला कुठे आणून ठेवले? ४-५ अणुबॉम्ब जगाचा संपूर्ण विनाश करू शकतील हे माहित असूनही एकेक देश डझनावारी किंवा शेकडो अणुबॉम्ब तयार करतो? का? म्हणजे अणुबॉम्ब जगाचा विनाश करू शकेल याचीही खात्री अथवा विश्वास राहिलेला नाही की काय?. चांगल्याचा तर नाहीच वाईटाचाही विश्वास राहिला नाही.

असंख्य विसंगती आणि अंतर्विरोध यांच्या समुद्रात आम्ही आज जगतो आहोत. कारण? कारण बाहेरच्या वातावरणाची जेवढी काळजी आम्ही घेतो त्याच्या छटाकभरसुद्धा काळजी आतल्या वातावरणाची घेत नाही. हे आतले वातावरण केवळ बोलून, लिहून, ऐकून तयार होत नाही. ते पूजा, कर्मकांड इत्यादींनी सुद्धा तयार होत नाही. अन तरीही बोलणे, लिहिणे, ऐकणे, पूजा, कर्मकांड यांचाही त्यात वाटा असतोच. प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्टीची गरज असेलच असे नाही. एखाद्याला यापैकी कोणत्याच गोष्टीची गरज नसेल, एखाद्याला काही गोष्टींची असेल, तर आणखी एखाद्याला सगळ्याच प्रयत्नांची गरज असेल. मानवी मन, त्याचं जगणं, त्याची सुखदु:ख, त्याचे विचार, भावना, त्याचं घडण आणि बिघडण, हे सगळंच कमालीचं व्यामिश्र आहे. गुंतागुंतीचं आहे. प्रत्येक लहानातली लहान, व्यक्त किंवा अव्यक्त बाब ही अनेक गोष्टींचा संकलित परिणाम असते. त्याबद्दल ठाम भूमिका घेणे हेच मुळात अयोग्य. आज मात्र आम्ही अशा ठाम भूमिका तयार करून सगळ्यांना त्यात कोंबण्याचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्यांनी आमच्या साच्यात बसले पाहिजे हा अट्टाहास करतो आहोत. हा अट्टाहास परंपरेचा असेल किंवा आधुनिकतेचा, धार्मिकतेचा असेल किंवा जडवादाचा, हा ईशवादाचा असेल किंवा इहवादाचा; हे सगळेच चुकीचे, गाढव आणि त्याज्य.

मग समाज किंवा व्यक्ती चालतील कसे? राहतील कसे? जगतील कसे?

हा आपणासारख्या विचारी लोकांसाठीचा प्रश्न आहे. प्रवाहात वाहतानाही, प्रवाहाबाहेर पडून, प्रवाह कसा बदलता येईल याचं उत्तर देणं हेच आपल्यासारख्या सुजाण लोकांचं काम आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २४ जानेवारी २०१९

सहली नव्हे जीवनच...

देवाच्या विग्रहावर शेंदूराचे थर चढवतो तसे व्यवस्थांवर व्यवस्थांचे थर चढवत गेल्याने काय होते??

आज एक बातमी वाचली. दिवाळीनंतर काढण्यात येणाऱ्या शाळांच्या सहली खूप, म्हणजे सुमारे अर्ध्याने कमी झाल्यात. मध्यंतरी एक-दोन दुर्घटना घडल्याने नवीन नियम करण्यात आले. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीपासून तर विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपशिलापर्यंत सादर करणे इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. अतिशय स्वाभाविक आहे की, सहली कमी होतील.

का करतो आपण असं? कोणाला पटो वा न पटो. मानवी जगण्यातलं तत्वज्ञान वजा करण्याने हे होतं आहे. मुळात तत्वज्ञान ही काही फार मोठी, क्लिष्ट वगैरे बाब नाही. माणसाने आणि माणसांनी विचार करणे ही सुरुवात आहे तर व्यवस्थित रूपातील तत्वज्ञान ही विचारांच्या प्रक्रियेची परिणती. पण मुळात विचार करणेच खुडून टाकल्याने हे होते.

साधी गोष्ट आहे - सहलीत दुर्घटना घडल्या. त्या का? त्याची बरीच कारणं असू शकतात. पण प्रशासन, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक आणि याच्याशी संबंध नसलेला समाजही व्यवस्था या एकाच गोष्टीवर सगळं ढकलून मोकळा होतो. कारण ते सगळ्यांना सोयीचे असते. कोणत्याही घटनेतील व्यवस्थेची भूमिका काही प्रमाणातच असते. त्याशिवाय पुष्कळ गोष्टी असतात. या ज्या पुष्कळ अन्य गोष्टी असतात त्या तुमच्या आमच्याकडून अनेक गोष्टींची मागणी करतात. आपल्या विचारीपणाची, आपल्या समजूतदारपणाची, आपल्या संयमाची, आपल्या शहाणपणाची, आपल्या common sense ची, आपल्या समन्वयाची... अशा बऱ्याच गोष्टींची. या साऱ्या गोष्टी तयार करता येत नाहीत. त्यासाठी फक्त प्रयत्न करता येतो. त्यात सवयी, वातावरण, मोकळा वेळ, soft skills अशा सगळ्या गोष्टी असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक गोष्टी त्यात सहभाग देत असतात. उदा. - एखादी घटना घडल्यावर प्रसार माध्यमांनी ती उचलून धरणे. आता घटना घडण्याचा, त्याच्या अनेक शक्यतांचा इत्यादी विचार न करता जेव्हा माध्यमे जाब विचारणे या एककलमी कार्यक्रमाने चालतात तेव्हा पुढची साखळी तयार होते. अशा अनेक साखळ्या एकमेकीत गुंततात आणि मग सारे व्यवस्थेवर ढकलणे आणि आपली सुटका करून घेणे असे सुरु होते. याने हाती तर काहीच लागत नाही अन सोबतच माणसाची माणूस होण्याची प्रक्रियाच खुंटते. दुर्दैवाने गेल्या दीड दोन शतकात आपण हेच करत आलो आहोत. माणूस जन्माला येतानाच माणूस म्हणून पूर्ण असतो. अन हे जग आणि जगातील वेगवेगळ्या व्यवस्था अनुकूल करणे एवढेच त्याचे काम आहे असा आपला समज झाला आहे. हा समज एवढा हाडीमासी खिळला आहे की, त्यातून बाहेर पडण्याची शक्तीच जणू आम्ही गमावली आहे. out of the box विचार केला पाहिजे वगैरे फक्त शब्द आहेत. त्याचा अर्थ आणि आशय माणसाला किती आकलन होतो? मग व्यवस्थांच्या शेंदूराचे थरावर थर चढवले जातात अन सहली बंद होत राहतात. एकूण जीवनच बंद होतं आहे. हा केवळ सहलींचा श्वास कोंडणं नाही, ही जीवनाचा श्वास कोंडण्याची प्रक्रिया आहे; हे कळेल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २४ जानेवारी २०१९

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

आंगण - आंदण

'हे विश्वाचे आंगण

आम्हा दिले आहे आंदण'

'चाफा बोलेना' गाण्यातील एक ओळ. किती खोल आणि अर्थपूर्ण. हे विश्वाचे आंगण आम्हाला आंदण दिले आहे. आंदण पालकांनी द्यायचं असतं. हे विश्वाचं आंगण आम्हाला कोणी दिलं? कोणी ईश्वर म्हणेल, कोणी प्रभू, कोणी आणखीन काही. कोणी म्हणेल, माहीत नाही बुवा. उत्तर काहीही असलं तरी एक सत्य नाकारता येत नाही की, हे विश्वाचं आंगण आमचं नाही. आम्ही फक्त विश्वस्त आहोत, देखभाल करणारे आहोत. मालक नाही.

एकदा हे सत्य मान्य केलं की त्याची अनुभूती होण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अन मग सगळं आकलन आणि दृष्टी बदलून जाते. मग शेतीवाडी, घर, भूखंड आपले असूनही आपले नसतात. देश आदी गोष्टींचंही तसंच. असं होणं हा एक जीवनसोहोळा असतो. एवढंच नाही तर 'चांगल्या जगाचं' स्वप्न अधिकाधिक पूर्ण होण्याचा, निकोप मानवी संबंधांचा आधारही या आंदणाची अनुभूती हाच असू शकतो.

जग असं मानत नाही. भारताचा मात्र हा हजारो वर्षे जुना विचार आहे. भारताला भारत करण्याचा, भारतीय माणसाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न याच आधारावर झाला. हे जगाला सांगणे, शिकवणे, भारतासहित जगभर रुजवणे; हेच भारताचे प्रयोजन देखील आहे. हां, तो प्रथम आपल्या विश्वासाचा आणि अनुभूतीचा भाग, आमच्या अस्तित्वाचा घटक मात्र व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २२ जानेवारी २०२०

ढोंगी अर्णव

- भाजपची बाजू घेतो म्हणून हिंदुत्ववाद्यांचा blue eyed boy अर्णव, मुंबईच्या night life वर बोलताना, त्याला विरोध करणाऱ्यांना मध्ययुगीन वगैरे म्हणतो आणि संस्कृतीरक्षक वगैरे शेलकी भाषा वापरतो; तेव्हा त्याचा एकूण वकुब काय हे लक्षात येते. इतकंच नाही तर हिंदुत्वाच्या नावाने तयार झालेल्या फौजेचा ढोंगीपणा देखील त्यातून स्पष्ट होतो.

- रोजगार वाढवण्यासाठी मुंबईतील night life ची बाजू घेणाऱ्यांनी; शेती, नालेसफाई, नर्सिंग, तलाव आणि विहिरी खोदणे; यासारखी असंख्य कामे करावीत किंवा मरून जावं.

- श्रीपाद कोठे

२२ जानेवारी २०२०

फौजा

आरक्षण, शेतकरी कायदे, राम मंदिर, बायडेन प्रशासनातील भारतीय वंशाचे लोक; इत्यादी विषयात जेवढं रक्त आटवलं जातं; त्याच्या एक दशांश तरी रक्त; माणसांनी माणूस व्हावं, माणसांनी जबाबदार व्हावं, माणसांनी नागरिकत्वाच्या भावनेने वागावं, माणसांनी विचारी व्हावं, माणसांनी एकांगी होऊ नये; यासाठी आटवलं जातं का? किती राजकीय पक्ष, किती सामाजिक/ धार्मिक/ सांस्कृतिक/ आर्थिक संस्था आणि संघटना; त्यासाठी प्रयत्न करतात. किती पक्ष आणि संस्था लोकांना कठोर शब्दात याची जाणीव करून देण्याचं धैर्य दाखवतात? की गाढवा डुकरांच्या फौजा गोळा करणे आणि टिकवणे हेच सगळ्यांचं कार्य झालेलं आहे?

- श्रीपाद कोठे

२२ जानेवारी २०२१

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

मरे एक त्याचा...

बोहरा धर्मगुरू डॉ. सय्यदाना यांच्या अंत्यदर्शनासाठी बोहरा समाजाचे लाखो लोक मुंबईत एकत्र आले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १८ लोक मरण पावले. समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे `मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे... अकस्मात तोही, पुढे जात आहे’ याचाच प्रत्यय जणू. अंत्यदर्शनासाठी जाताना त्या शोकसंतप्त लोकांच्या डोक्यात स्वत:च्या मृत्यूचा विचारही आला नसेल. वेगवेगळ्या निमित्ताने खूप मोठ्या संख्येने लोक जमतात तेव्हा चेंगराचेंगरीची शक्यता फार जास्त असते. त्यामुळेच गर्दी सुरळीतपणे पांगवणे हे पोलिसांपुढे नेहमीच मोठे आव्हान असते. काही वर्षांपूर्वी मांढरदेवीच्या यात्रेतही चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा बळी गेला होता. बिहारमधल्या छठपूजेच्या वेळी लाकडी कठडा तुटल्याने अफरातफरी आणि परिणामी चेंगराचेंगरी झाली होती. मक्कामदिना यात्रेत जगभरातील कोट्यवधी मुस्लिम जात असतात. तेथेही अनेकदा चेंगराचेंगरीने अनेक बळी घेतले आहेत.

१९९४ मधला एक प्रसंग आठवतो. नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. गोवारी नावाची एक जमात विदर्भात आहे. या गोवारी जमातीचा एक विशाल मोर्चा आपल्या मागण्या घेऊन विधिमंडळावर आला होता. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला तरी कोणी त्यांचे म्हणणे ऐकण्यास आले नाही. त्यामुळे त्या विशाल जनसमुहात कुठेतरी थोडीशी गडबड झाली. गडबड वाढू नये म्हणून पोलिसांनी ५० हजाराचा तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती गर्दी उधळली. अफरातफरी माजली, चेंगराचेंगरी झाली आणि थोड्याथोडक्या नव्हे; ११४ गोवारींना आपले प्राण गमवावे लागले. अजूनही आठवते- रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेलो होतो. तेथे मरण पावलेल्या गोवारी बांधवांची प्रेते आणली गेली होती. त्यांची ओळख, नोंदणी, मोजणी वगैरे सुरु होती. नुकती काही तासांपूर्वीच ती घटना झाली होती. आकडा नक्की कळलेला नव्हता. सहज रांगेत ठेवलेली प्रेते मोजू लागलो. एक, दोन, तीन, चार करत २०-२५ पर्यंत पोहोचलो असेन. त्यानंतर मोजूच शकलो नव्हतो.

अंत्यदर्शन असो की यात्रा की मोर्चा वा अन्य काही निमित्त. माणसे मोठ्या संख्येने एकत्र जमतात तेव्हा समान आस्था, श्रद्धा, मागणी घेऊन एकत्र आलेले असतात. आपसात मतभेद वा संघर्ष नसतो. पण घटना अशी घडते की समान भावनेने एकत्र आलेल्यांच्याच पायाखाली तुडवले जाऊन लोक मरण पावतात. तेही एका वेळी मोठ्या संख्येने. अशा प्रकारे मरण पावणार्या सगळ्यांचा मृत्युयोग इतका विलक्षण सारखा असावा?

- श्रीपाद कोठे

२१ जानेवारी २०१४

भाजप

भारतीय जनता पार्टी हा आज संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष झाला आहे. ही त्याची फार मोठी विशेषता म्हणता येत नसली तरीही एक विशेषता निश्चित म्हणता येईल. भारतीय जनता पार्टी हा अनेक अर्थांनी वेगळा राजकीय पक्ष आहे. राजकीय आकांक्षा नसलेल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून त्याचा १९५१ साली जन्म झाला. त्यानंतरच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत काही काळ संपूर्ण लोप पावून आणि नंतर दुसरे नाव, दुसरा झेंडा घेऊन भाजपने वाटचाल केली आहे. हेही एक आगळेपण म्हणावे लागेल. स्वत:चे अस्तित्व पूर्ण संपवून टाकून पुन्हा उभा राहणारा आणि अस्तित्व संपवण्यापूर्वीच्या मूळ प्रवाहाशी अशा रीतीने पुन्हा जोडून घेणारा की, कोणालाही हे दोन वेगळे पक्ष आहेत असे वाटूही नये. लोपलेल्या प्रवाहाशी सांधा जोडून पुन्हा तो प्रवाह एकसंध आणि सशक्तपणे वाहता करणे हे स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि श्री. लालकृष्ण अडवाणी यांचे कर्तृत्व आणि कौशल्य म्हटले पाहिजे. अर्थात पक्षाचे लहान मोठे सगळे कार्यकर्ते आणि नेते, तसेच रा. स्व. संघाची पक्षाच्या पाठीशी उभी असलेली शक्ती यांनाही नाकारून चालणार नाही. पक्षाच्या या विलय आणि पुनर्जीवनाच्या मुळाशी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण, संवर्धन हे कारण होते. व्यक्तिगत राजकीय आकांक्षा यापाठी नव्हती हे भाजपच्या वाटचालीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या देशाची गरज ओळखून, परिस्थितीची हाक ओळखून पक्षाचा विलय करणे आणि आपल्या समर्पणाला दुबळेपणा समजून त्यावर राजकीय पोळी शेकून घेण्याचा कावेबाजपणा लक्षात घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात करणे; हे राजकीय पक्षांच्या इतिहासात पाहायला न मिळणारे अनोखे उदाहरण म्हणता येईल. १९५१ साली शून्यातून सुरु झालेला हा प्रवास आज संपूर्ण देशाचा पक्ष, केंद्रात सत्तेवर असणारा पक्ष, बहुतांश राज्यात सत्तेवर असणारा पक्ष आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष येथवर पोहोचला आहे. भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही नावांवर अधिकार सांगणाऱ्या अन लोकांनी हा अधिकार मान्य केलेल्या भाजपची ही वाटचाल; संघटनात्मक, राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा विविध अंगांनी समजून घेण्याची, तपासण्याची, अभ्यासण्याची गरज आहे. त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, त्याची शक्तिस्थाने आणि दुर्बल स्थाने, त्याच्यापुढील अडचणी आणि आव्हाने, मर्यादा; यांचीही साधकबाधक चर्चा पक्ष म्हणून आणि देश म्हणूनही गरजेची आहे.

भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर वर्षभराच्या आतच झालेल्या लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे तीन खासदार निवडून आले. त्यानंतर विजयाची ही कमान वाढतच राहिली आणि १९६७ च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत खासदारांची संख्या ३५ पर्यंत पोहोचली. १९७१ च्या पाचव्या लोकसभेत मात्र ही संख्या लक्षणीय घटली. चवथ्या आणि पाचव्या लोकसभेच्या दरम्यान दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या. काँग्रेस पक्षात फूट पडून श्रीमती इंदिरा गांधी सर्वेसर्वा होणे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची निर्घृण हत्या. या दोन्ही घटनांनी भारतीय जनसंघ आणि भारतीय राजकारण या दोहोत लक्षणीय बदल झाले. आणीबाणीने भारतीय जनसंघाचा बळी घेतला आणि जनता पार्टीतील सत्तेच्या साठमारीने भारतीय जनता पार्टीचा उदय झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या जैविक नात्याचा तो ठाम उच्चार होता. मात्र पक्षाने `गांधीवादी समाजवाद’ स्वीकारल्याने पक्षाविरुद्ध देशभर विपरीत प्रतिक्रिया उमटली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सिद्ध केलेल्या `एकात्म मानववादाला’ भाजपने सोडचिठ्ठी दिली अशी सर्वत्र चर्चा झाली. संघाच्या नात्यावरून जनता पार्टी सोडून जनसंघाच्या लोकांनी भाजप स्थापन केला तरीही, वैचारिक दृष्टीने संघ विचारांशी फारकत घेतली असे चित्र निर्माण झाले. त्यावर बराच खल होऊन भाजपने पुन्हा एकदा `एकात्म मानववाद’ स्वीकारला. दरम्यान, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येने सारीच समीकरणे बदलली. त्या घटनेने कॉंग्रेसला अभूतपूर्व बहुमत मिळवून दिले. भाजपची लोकसभेतील खासदार संख्या दोनवर घसरली. काही महिन्यांच्या भारतीय जनसंघाने पहिली लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी खासदारांची संख्या तीन होती. १९८४ मध्ये ही संख्या त्याहूनही खाली गेली. मात्र शहाबानो प्रकरण, राम जन्मभूमी आंदोलन, लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा, बोफोर्स प्रकरण, यासारख्या घटनांनी भाजपला राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. त्यानंतर स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात प्रथम १३ दिवस, नंतर तेरा महिने आणि त्यानंतर संपूर्ण कालावधीची सरकारेही केंद्रात सत्तारूढ झाली. आज देशाच्या सगळ्या भागात अस्तित्व असलेल्या भाजपचे सुमारे साडेतीनशे खासदार आणि विविध राज्य विधानसभांमध्ये शेकडो आमदार आहेत. देशाचे पंतप्रधान, दीड डझन राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदांवर भाजपचे नेतृत्व केलेल्या व्यक्तीच विराजमान आहेत. शून्यातून इथवर पक्षाची राजकीय शक्ती वाढलेली आहे. आज भाजपशिवाय भारतीय राजकारणाचा विचार करताच येत नाही ही स्थिती आहे.

आणीबाणीनंतर देशाच्या राजकारणात एक मोठा बदल असा झाला की, देशभरातील युवा नेतृत्व मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रीय झालं. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अनेक युवक आणीबाणीविरुद्ध केलेल्या संघर्षातून राजकारणात दाखल झाले. स्वाभाविकच देशभरात राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या. व्यक्तिगत, प्रादेशिक, भाषिक राजकारण आकार घेऊ लागले. आपली राजकीय शक्ती कमी होत असल्याची आणि इंग्रजांविरुद्ध केलेल्या संघर्षाचे आपले पुण्य क्षय होत असल्याची जाणीव कॉंग्रेसला झाली. त्या धास्तावलेपणातून कॉंग्रेसने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. व्यक्तिगत, प्रादेशिक, भाषिक राजकीय आकांक्षांनी छोट्या छोट्या समूहांना, छोट्या छोट्या विषयांना हाती घेऊन राजकीय शक्ती संपादन केली. ही संख्या वाढू लागली. परंतु या साऱ्यांची दृष्टी लहान आणि स्वार्थी होती. यातील कोणत्याही व्यक्ती वा पक्षाकडे अखिल भारतीय दृष्टी नव्हती. देशाच्या दीर्घकालीन कल्याणाची तळमळ नव्हती. स्वत:चे आणि गटाचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी राजकारण करण्यातच या गटांना स्वारस्य होते. दुसरीकडे रा. स्व. संघाच्या दूरगामी राष्ट्र उभारणीची प्रेरणा घेऊन आणि अखिल भारतीय दृष्टी घेऊन चालणारा भाजप होता. राजकारणात संख्याबळाला महत्व असतेच. भाजपलाही आपली संख्यात्मक वाढ करणे क्रमप्राप्त होते. यातून देवाणघेवाण आणि तडजोडीचे राजकारण पुढे आले. निवडणूक जिंकणे याला प्राधान्य मिळाले. विविध विषयांवर निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भूमिका घेण्याची सुरुवात झाली. राजकीय आकांक्षा बाळगणाऱ्या आणि थोडीबहुत शक्ती असणाऱ्या गटांना आणि व्यक्तींना सामावून घेताना कसरत होऊ लागली. राजकीय आखाड्यातील अन्य प्रतिस्पर्धी लक्षात घेऊन प्रचार, पैसा, प्रतिमा, प्रदर्शन, आश्वासने हे सारे सुरु झाले. संख्याबळ तसेच शक्ती वाढवण्यासाठी आणि राजकीय आखाड्यातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागल्या. याचे दोन परिणाम झाले. एक तर - कार्यकर्ता आधारित पक्ष; ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ पक्ष; आदर्शांचा आग्रह धरणारा पक्ष; उक्ती आणि कृती एकच असणारा पक्ष; नैतिकता जपणारा पक्ष; हे चित्र बदलायला सुरुवात झाली. दुसरा परिणाम म्हणजे – कार्यकर्ता बदलू लागला. साधेपणा, अध्ययनशीलता, व्यसनांपासून दूर राहण्याचा आग्रह, वरिष्ठांच्या पुढेपुढे न करणे, सामान्य माणसाशी जिवंत संबंध, कष्ट, समाजाबद्दल आत्मीयता, पक्षनिष्ठा, उपक्रमशीलता; अशा गोष्टी हळूहळू मागे पडू लागल्या. आधी याकडे डोळेझाक, मग थोडी अपरिहार्यता आणि नंतर सवय; असा बदल घडून आला. यातून पक्षाची वीण आणि पीळ उसवत गेली. भाजपचा काँग्रेस झाला असे उघड बोलले जाऊ लागले.

निवडणूक जिंकण्याचे विविध उपाय, पद्धती गेल्या काही वर्षात भाजपने आत्मसात केल्या आहेत. त्याला भाजपचा वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्नही पक्ष करतो आहे. `One booth, ten youth’ ही घोषणा आणि तसा प्रयत्न हे योग्यच आहे. परंतु हे दहा युवक कार्यकर्ते म्हणायचे का? निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडून त्याचा लाभ पक्षाला मिळावा यासाठी हा प्रयत्न योग्यच आहे पण या युवकांना कार्यकर्ता निश्चितच म्हणता येणार नाही. व्यक्तीजीवनातील आणि समाजजीवनातील राजकारणाचा प्रभाव आणि राजकारणाची भूमिका लक्षात घेऊन राजकीय पक्षांशी जवळीक ठेवणारे असंख्य लोक आज समाजात आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या फार मोठ्या राजकीय आकांक्षा असतीलच असे नाही, पण त्याच्या मनात काही ना काही हिशेब नक्कीच असतात. त्यांचा पक्षासाठी उपयोग करून घेणे हे चांगले व्यवस्थापन म्हणता येईल, पण त्यांना कार्यकर्ता म्हणणे ही स्वत:चीच फसगत करून घेणे आहे. निष्ठा, विचार, ध्येय, वृत्ती, व्यवहार हे कार्यकर्त्याला साजेसे असतात का हा महत्वाचा मुद्दा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला ऐतिहासिक आणि वैचारिक संबंध पक्षाला कार्यकर्ता आधारित पक्ष ठरवण्यास पुरेसे नाही. संघ भाजपला कमीअधिक मदत करत असेल वा नसेल; मुद्दा हा की पक्षाला म्हणजेच सर्वोच्च नेतृत्वापासून अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत; संघविचार, संघव्यवहार, संघभाव याबद्दल आस्था असणारे आणि तशा जगण्याचा आग्रह ठेवणारे; यांचे प्रमाण किती आहे हा. संघाच्या शाखेत, उत्सवात, गणवेशात, बैठकीला गेले की आपली बांधिलकी पूर्ण झाली आणि मग बांधिलकीचा तो धनादेश वठवायला आपण मोकळे; असा विचार करण्याचे प्रमाण अधिक असेल तर ते पक्ष म्हणून आणि देश म्हणूनही विपरीत ठरेल. सत्ता काय, आज आहे उद्या नाही; हे म्हणणे ठीक आहे. परंतु आमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे आम्हाला अन्य कशाची फिकीर करण्याचे कारण नाही; असा व्यवहार असेल तर त्याचे समर्थन करता येत नाही. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवला तरीही ग्राम पंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडून येणाऱ्या पक्ष प्रतिनिधींच्या व्यवहाराची खात्री देता येईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. खासदारांचे पगार, भत्ते वाढवणे ही सामान्य प्रक्रिया असू शकेल; पण ते नाकारण्याची हिंमत भाजपचे किती खासदार दाखवू शकतात? स्व. नानाजी देशमुख यांनी ही हिंमत दाखवून उदाहरण घालून दिले होते, हे फक्त सांगण्यापुरतेच राहते. विषय फक्त पैसा हा नाही, सामान्य जनतेत संदेश देण्याचा आहे. शेकडो खासदार आणि हजारो आमदार असताना, दृष्ट लागावे असे किंवा आव्हान देता येणार नाही असे, पुरेसे लोकसभा वा विधानसभा मतदारसंघ का निर्माण करता आले नाहीत? पुरेशा संख्येतील अशा मतदारसंघांनीच पक्षाचा प्रचार केला असता. त्यासाठी पंतप्रधांना जास्त कष्ट देण्याची गरज पडली नसती. पण तसे झाले नाही. त्या त्या लोकप्रतिनिधीची कळकळ, दृष्टी, निर्णयक्षमता, धडाडी; यासोबतच कायदे-नियम आणि पक्षाची कार्यपद्धती हे सगळेच तपासण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाची शक्ती, स्वीकार्यता आणि प्रतिनिधित्व निर्विवादपणे वाढले आहे. परंतु त्या प्रमाणात विश्वासार्हता वाढली आहे का? आगामी २०१९ च्या निवडणुकीत काय होईल हा भविष्याच्या गर्भातील प्रश्न आहे पण आज जी सर्वेक्षणे होत आहेत ती पूर्ण विश्वास दाखवणारी का नाहीत याचा विचार व्हायला हवा. सर्वेक्षण करणाऱ्या संस्था किंवा माध्यमे एवढे म्हणून चालणार नाही. दुसरा विचारच येऊ शकणार नाही, पण परंतु होणार नाही; असं वातावरण, असा विश्वास दुर्दैवाने पक्षाला जागवता आलेला नाही. समाजाचा पुरेसा विश्वास आणि पक्षांतर्गत परस्पर विश्वास या दोन्हीचा अधिक गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे. नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विश्वासाची कमतरता सगळ्याच स्तरांवर जाणवते हे वास्तव आहे. यासाठी जो आणि जसा संवाद हवा तो नाही. कोणालाही मोकळेपणाने, दबावाशिवाय आपले विचार, आपल्या भावना बोलता यायला हव्या. मुख्य म्हणजे बोलले गेलेले तेवढ्याच आस्थेने, गांभीर्याने ऐकले जायला हवे. औपचारिक, अनौपचारिक असा दोन्ही प्रकारचा संवाद हवा. स्वसमर्थन, फ्लेक्सप्रसिद्धी हे टाळले जायला हवे. प्रतिमा निर्माण हे कधीकधी फायद्याचे असले तरीही त्यावर अवलंबून राहणे किंवा त्याच्या आहारी जाणे किंवा त्याहून अधिक सशक्त पर्यायांची गरज न वाटणे; हा धोक्याचा कंदील आहे. पक्षाने गेल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची प्रतिमा निर्मितीसाठी मदत घेतली. ते बोलून चालून व्यावसायिक. कधी इकडे, कधी तिकडे. पक्ष, धोरणे, समाज यांच्याशी त्यांची बांधिलकी नसते. कधी अवास्तव, कधी अतिव्याप्त अशी भाषा, अशा कल्पना यांचा वापर करण्यात त्यांना अडचण वाटत नाही. मात्र दीर्घ कालावधीत पक्षाला हे हानिकारक ठरते. प्रतिमा निर्माणाचा विवेकी वापर करावाच पण मनामनातला विश्वास, मनामनातील आपुलकी, व्यक्तीव्यक्तीचा जैविक आत्मीय संबंध; हीच पक्षाची ताकद असायला हवी. यात पक्ष कमी पडतो.

पक्षाची प्रस्तुती हाही महत्वाचा विषय आहे. अन मोठाही. कोणताही लहान वा मोठा कार्यक्रम, बैठकी कशा होतात; त्यावर खर्च किती केला जातो; तिथली भाषा, वातावरण कसे असते; खाण्यापिण्याला किती महत्व दिले जाते, त्यावर किती खर्च होतो; पैशाचे प्रदर्शन, पैशाची उधळपट्टी होते का; हे सगळे समाज पाहत असतो. माध्यमांमधील पक्षाची प्रस्तुती हाही विषय असतो. प्रकाशवाणीवरील चर्चांमध्ये मोठ्याने, आक्रमक, आक्रस्ताळे बोलूनच म्हणणे सिद्ध करता येते असे नाही. उलट पुष्कळदा ते नकोसे वाटते. कधीकधी तर उत्तरे दिली नाहीत तरी चालू शकतं. लोक समजूतदार असतात, विचार करत असतात. आवश्यक आणि पुरेशा बोलण्यासोबतच मौनसुद्धा प्रभावी ठरू शकते. समाज माध्यमात होणाऱ्या चर्चा, घडवून आणल्या जाणाऱ्या चर्चा, केला जाणारा प्रचार; वापरली जाणारी चित्रे, व्यंगचित्रे, ग्राफिक्स टोकदार असायला हरकत नाही पण असभ्य आणि अनावश्यक आक्रस्ताळे नकोत. विरोधकांशी आपण राजकीय लढाई खेळतो आहोत, ही काही दोन शत्रूंची लढाई नाही; हे भान असले पाहिजे. समाजाला संतुलित गोष्टी पटतात आणि आवडतात. एवढेच नाही तर असंतुलित वागण्याबोलण्याने समाजाच्या सवयी, समाजाची मानसिकता, समाजाची विचारशक्ती यावर विपरीत परिणाम होऊन समाजाचे कायमस्वरूपी नुकसान होते. भाजपने राजकीय लढाई जिंकायला हवी असे वाटणाऱ्या लोकांनाही या लढाईत समाजाचे नुकसान मात्र अपेक्षितही नाही आणि पटणारेही नाही.

भारतीय जनता पक्ष हा आता सत्तारूढ पक्ष झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच कच्छ आंदोलन, काश्मीर आंदोलन, शेतकरी आंदोलने यांची गरज उरलेली नाही. अशी आंदोलने करणे अपेक्षित नाही अन योग्यही नाही. आता पक्षाच्या आंदोलन क्षमतेचा नव्हे प्रशासकीय क्षमतेचा कस लागणार आहे. यात दोन घटक असतात. एक राजकीय नेतृत्वाची प्रशासकीय क्षमता आणि कौशल्य; अन दुसरा घटक प्रत्यक्ष प्रशासन व्यवस्था, प्रशासन रचना, प्रशासन पद्धती आणि प्रशासनात काम करणारी माणसे. यातील राजकीय नेतृत्वाची क्षमता आणि कौशल्य विकसित करणे हे पक्षाच्या हाती असू शकते. पक्षाने ते आताहून अधिक जाणीवपूर्वक आणि अधिक प्रमाणात करायला हवे. प्रशासन व्यवस्था, प्रशासन रचना, प्रशासन पद्धती प्रभावी, कालानुरूप आणि समाजोन्मुखी करणे पक्षाच्या हाती नसले तरीही पक्षाची त्यात भूमिका राहू शकते. प्रशासनाचे सर्वांगीण अध्ययन आणि सहकार्य मिळवणे या महत्वाच्या बाबी. यात पक्ष कमी पडतो असे म्हणावे लागेल. अन प्रशासनात काम करणारी माणसे हा पूर्णत: पक्षाच्या परिघाबाहेरील विषय आहे. प्रशासनासोबतच भाजपसाठी अतिशय महत्वाचा विषय म्हणजे, भविष्याची दृष्टी. भाजपचे वेगळेपण हे केवळ पक्षाचे नाव, पक्षाचा झेंडा किंवा वेगळ्या पद्धतीने राज्यशकट हाकारणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. ते वेगळेपण भारताविषयीची धारणा आणि त्यानुसार देश आणि समाज उभा करण्यात योगदान देण्याची दृष्टी यात आहे. या संदर्भात पक्ष खूपच मागे आहे असे वाटते. भारत, भारताची संस्कृती, भारताची वैशिष्ट्ये, भारताचा मूळ भावात्मक विचार, एकात्म मानववाद, अशा अनेक पैलूंबाबत विचार होताना दिसत नाही. मंथन होताना दिसत नाही. याबद्दल फार आस्था असल्याचे जाणवत नाही. भारतीय जीवन दृष्टीच्या तात्त्विक, वैचारिक, व्यावहारिक, धोरणात्मक बाबींचा विचार पक्षाच्या स्तरावर होणे; त्याविषयी नेते, कार्यकर्ते यांचं वारंवार प्रबोधन आणि मंथन होणे, पक्षाच्या माध्यमातून समाजात या विषयांची व्यापक चर्चा होणे; या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आहे का याचा आढावा घ्यायला हवा. सत्ता मिळवणे, ती राबवणे एवढेच भाजपकडून अपेक्षित नाही. त्याहून अधिक काही अपेक्षित आहे. आजवर त्याचा गांभीर्याने विचार झाल्याचे दिसत नाही. देवाणघेवाण, जोडतोड, लोकरंजन, लोकानुनय, सत्तासंतुलन या वर्तमानातून पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे हे भाजपपुढील आव्हान आहे. भाजपला असे वाटते का हा एक वेगळा प्रश्न आहे. समाजातील विचारी, कर्तृत्ववान, अभ्यासू, समर्पित व्यक्तींशी संपर्क; त्यांना केवळ पक्षाचे न बनवता त्यांचे अनुभव, चिंतन आणि ज्ञान यांचा देशासाठी उपयोग कसा करता येईल याचा विचार; पक्षाने त्यांना वा त्यांनी पक्षाला नियंत्रित करण्याऐवजी निर्भेळ, निर्मळ आदानप्रदानाची प्रक्रिया तयार करणे आणि त्यासाठी वातावरण तयार करणे; या गोष्टींकडेही लक्ष देणे भारताचा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपकडून व्हायला हवे. राजकारण आणि सत्ता ही मिरवण्याची किंवा गाजवण्याची गोष्ट नाही, हे केवळ बोलून उपयोगाचे नाही. ही भावना तिच्या सर्व अंगांनी आणि सर्व अर्थांनी पक्षात झिरपणे, रुजणे; पक्षाच्या ध्येयातच नव्हे धोरणात आणि व्यवहारात प्रतिबिंबित होणे यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२१ जानेवारी २०१९

(साप्ताहिक विवेकच्या विशेष ग्रंथात प्रकाशित लेख.)

संपत्ती संचय

दाव्होसला सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

- भारतातील १ टक्का लोकांकडे देशाच्या अर्थ संकल्पाएवढी संपत्ती आहे. ही देशातील ७० टक्के लोकांच्या एकूण संपत्तीच्या चार पट आहे.

- जागतिक स्तरावर हे प्रमाण ६० टक्के लोकांच्या संपत्तीच्या प्रमाणात आहे.

- ई कॉमर्स कंपन्यांमुळे देशात सुमारे १० लाख रोजगार कमी झाले. या कंपन्यांनी निर्माण केलेल्या रोजगाराच्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे. (शिवाय निर्माण झालेले नवीन रोजगार नवीन कौशल्य असलेल्या नवीन लोकांसाठी आहेत. त्यामुळे रोजगार गमावलेल्या जुन्यांना त्यात वाव किती हा वेगळा प्रश्न. आकड्यांना त्यामुळेच फारसा अर्थ नाही.)

*****************

निष्कर्ष -

- संपत्तीचा संचय आणि संपत्तीचे केंद्रीकरण यांचा विचार होणे ही तातडीची गरज. या गोष्टींचा आज उल्लेख सुद्धा कोणी करीत नाही. सगळे देश, तज्ञ, राजकारणी, व्यवस्था फक्त संपत्ती निर्मितीचा विचार करतात. हे चूक आहे. (शरीरात रक्त वाढणे हे पुरेशा प्रमाणापर्यंतच आवश्यक असते. त्यानंतर ते फिरत राहणे एवढेच हवे. अधिक रक्ताची गरज नसते.)

- पाकिस्तान भिकारी झाला याचा हर्षोल्लास करणाऱ्यांनी आपली खरेदीची पद्धत बदलण्याचा विचार केला तरी तीही देशभक्तीच ठरेल. अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला हीच देशभक्ती कारणीभूत ठरेल.

- श्रीपाद कोठे

२१ जानेवारी २०२०

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

प्रेम, जीवन, मृत्यू

सुनंदा पुष्कर यांचा आकस्मिक आणि अनैसर्गिक मृत्यू सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सुनंदा या देशाच्या एका मंत्र्याची पत्नी असल्याने ती चर्चा आणखीनच चविष्ट वाटते आणि आपल्या शत्रू देशाच्या एका महिला पत्रकाराचेही नाव त्या प्रकरणात आल्याने ही चविष्ट चर्चा खमंग झाली आहे. त्याच्या राजकीय आणि जागतिक बाजू ज्या असतील त्या असोत, पण त्याची मानवीय बाजूही आहे. ही मानवीय बाजू आहे प्रेमाची. सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांचा प्रेमविवाह झाला होता. तोही वयाच्या पन्नाशीत आणि हा दुसरा विवाह. म्हणजेच आकर्षण, अल्लड प्रेम वगैरे नाही. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील जे काही ताणतणाव वगैरे असतील तो काही सार्वजनिक विषय होऊ शकत नाही, होऊ नये. पण या दुसर्या विवाहाने त्यांचं व्यक्तिगत जीवन नक्कीच सुरळीत झालं असावं. म्हणजेच प्रेमाने त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. दुर्दैव म्हणजे हे प्रेमच त्यांच्या मृत्यूचे कारणही ठरले. सुनंदा यांनी आरोप केल्याप्रमाणे त्यांचे पती शशी थरूर आणि पाकिस्तानी महिला पत्रकार यांचे प्रेम संबंध असोत वा नसोत, पण सुनंदा यांनी त्याबाबत एवढ अस्वस्थ होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं पतीवरील प्रेम. आपल्या पतीचं मन दुसर्या महिलेसाठी धडकू नये ही स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे. यालाच स्वामित्व म्हणतात. प्रेम हे अशा प्रकारे स्वामित्व गाजवीत असते. दुसरी शक्यता आहे की हा त्यांचा केवळ संशय असावा. पण संशयी होणं हीसुद्धा आत्यंतिक प्रेमाचीच एक प्रतिक्रिया नाही का? याचाच अर्थ- शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार यांचे प्रेमसंबंध असतील तरीही किंवा नसतील तरीही; सुनंदा यांची त्यावरील प्रतिक्रिया ही त्यांच्या मनातील प्रेमाचेच द्योतक आहे. प्रेमातील हे स्वामित्व वा संशय हा जातपात, धर्मपंथ, वय, लिंग, भाषा, देश, आर्थिक वा सामाजिक पुढारलेपण किंवा मागासलेपण काहीही पाहत नाही. संबंधित माणसाची मूळ वृत्ती, वातावरण आणि परिपक्वता यानुसार स्वामित्व वा संशय यांचे परिणाम वेगवेगळे राहू शकतात एवढेच. काय गंमत आहे नाही- एकच प्रेमाची भावना विश्वास आणि समर्पण यांना धरून येते तेव्हा जीवनाला अर्थ देते आणि तीच प्रेमाची भावना स्वामित्व आणि संशयाचा हात धरते तेव्हा यमराजाशी हातमिळवणी करते. जीवन देणारं प्रेमच मृत्यूही देऊन जातं.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१४

डॉ. अरुण टिकेकर

डॉ. अरुण टिकेकर गेल्याची बातमी वाचली. मी काही थोडीबहुत पत्रकारिता केली असेल त्याचं श्रेय ज्या मोजक्या लोकांना द्यावं लागेल त्यात डॉक्टर आहेत आणि या मोजक्या लोकांमध्येही त्यांचं पारडं जड आहे. १९९२ साली लोकसत्तेने नागपुरात पाऊल ठेवले. मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांनी नागपूर विदर्भात येण्याची सुरुवात तेव्हापासून झाली. लोकसत्ताचा प्रयत्न पहिलाच. त्यावेळी माझी मुलाखत डॉक्टर टिकेकर यांनीच घेतली होती. त्या मुलाखतीतील एक प्रश्न अन त्याचे उत्तर आजही आठवते. डॉक्टरांनी विचारले- काय वाचता? अन आजवर वाचलेल्यातील काय आवडले? क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर दिले- मला हिटलर आवडला अन दि. वि. गोखले यांनी लिहिलेलं त्याचं चरित्र आणि वि. ग. कानेटकर यांनी लिहिलेली `नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही पुस्तके आवडली. हिटलर आवडतो असे जरा वेगळे उत्तर दिले (अर्थात मनापासून) तरीही त्यांनी मला लोकसत्तेत घेतले.

त्यानंतर लोकसत्तेचे मुख्य संपादक आणि एक जेमतेम तीन-चार वर्षे वृत्तपत्रात घालवलेला मुलगा यांचा जसा संबंध असावा तसाच आमचा संबंध होता. नियमित कामाव्यतिरिक्त लिखाण मी त्यावेळीही करीत असे. ते छापूनही येत असे. कधी फक्त विदर्भ आवृत्तीत तर कधी सगळ्या आवृत्त्यांना. कधी कधी चक्क लोकसत्तेच्या संपादकीय पानावरदेखील. २०-२२ वर्षांपूर्वी तिशी ओलांडायच्याही आधी आपला लेख (अन आपले नावही) लोकसत्ताच्या संपादकीय पानावर छापून येण्याचे कौतुक अन आनंद तर होताच. त्या आनंदाचे श्रेयही त्यांचेच. प्रसंगपरत्वे त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे, आपले काम आणि लिखाण याकडे लक्ष आहे याची जाणीवही होत होती. त्यानंतरचा इतिहास फार मोठा आहे. अन त्याचे हे स्थानही नव्हे.

मधली खूप वर्षे त्यांच्याशी संबंध आलेला नव्हता. गेल्या वर्षी विदर्भ साहित्य संघाच्या एका व्याख्यानासाठी नागपुरात आले असताना डॉक्टरांची भेट झाली. आवर्जून व्याख्यानाला गेलो होतो. डॉक्टर विद्वान होते, विचारवंत होते अन उत्तम वक्ताही होते. व्याख्यान छानच झाले. नंतर भेटलो. भेट झाली. माझ्यातील रूपबदलामुळे ओळखले नाही. मात्र नाव सांगताच एकदम मोकळेपणाने बोलले. आस्थेने चौकशी केली. त्यांच्याबद्दल विचारपूस केली तेव्हा म्हणाले- घरी नव्वदी पार केलेली आई आहे. तिच्यासाठी घरीच असतो. बाहेर जाणे बहुतेक शून्यच. अन्यही गप्पागोष्टी झाल्या. त्यांच्या वयोवृद्ध आई आहेत वा कालपरत्वे त्यांनीही निरोप घेतला माहीत नाही. आज डॉक्टरांचीच बातमी वाचली. त्यांच्यासारखा विचक्षण विचारयोगी म्हणता यावा असे संपादक आज नाहीत. अशांना आज कुठे जागाही नाही अन थाराही नाही. आजच्या विचारशून्यतेच्या वातावरणात त्यांचे जाणे जाणवणारे नक्कीच आहे.

डॉक्टर अरुण टिकेकर यांना माझी श्रद्धांजली.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१६

छटा राजकारणाच्या

१. राजकारण करणे,

२. राजकारणात रस असणे,

३. राजकारणाचे हिशेब,

४. राजकारणाचा अभ्यास करणे/ असणे,

५. राजकारणाचा संदर्भ देणे/ संदर्भ म्हणून राजकीय घटना आदींचा उपयोग,

६. राजकारणाशी सहेतुक संबंध,

७. राजकारणाच्या चिंध्या फाडणे

या सगळ्या वेगवेगळ्या बाबी आहेत. पुष्कळदा याची समज नसल्याचेच दिसते.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१७

`प्रश्न' की गहराई

हमारे पुराने मित्र अजयजी पांडे, इन्होने जी.जी. बायरन का एक वाक्य उनके चित्र के साथ पोस्ट किया है. वह है- `जो लोग सवाल नहीं उठाते वह पाखंडी है, जो सवाल नही कर सकते वह मुर्ख है, जिनके जहन में सवाल उभरता ही नही वह गुलाम है.' अजयजी, लिखने के लिए एक विषय देने के लिए धन्यवाद. मै जो लिखूं, शायद आपको पसंद आए ना आए. कुबूल करना.

बायरन के इस वाक्य में सवाल न करनेवालों पर जो कटाक्ष है उससे तो मै पूर्ण रूप से असहमत हूँ. किन्तु हां, सवाल करने चाहिए इसमें तो दो राय बिल्कुल नही है. कुछ वर्ष पूर्व इसी आशय की एक कविता मैंने लिखी भी थी. सवाल उभरना, सवाल करना ये बहुत गहिरी चीजे है. बहुत ही गहरी. किन्तु आज वह बचकानी और सतही हो गयी है. सवाल यह है की सवाल क्या है? है क्या सवाल? क्या चलते फिरते मन में जो तरंग उठ जाये, बस वही सवाल है? मुझे लगता है गहराई से सोचना पड़ेगा. हमारे उपनिषदों में एक उपनिषद है उसका नाम ही है- प्रश्नोपनिषद. कुल छ: प्रश्न उसमे है और उनकी चर्चा. उसमे जाने की यहां आवश्यकता नहीं. किन्तु उस उपनिषद के प्रारंभ में ऋषीवर शिष्यों से जो कहते है वह बहुत महत्वपूर्ण है. वे कहते है- हे शिष्य, सालभर मेरे साथ रहो. अध्ययन, स्वाध्याय करो. बाद में प्रश्न पूछो. अगर मेरे पास उत्तर हो, तो मै दूंगा. देखो कितनी गहराई है? पहिली बात तो स्वयं प्रश्नों के उत्तर खोजने का प्रयास प्रथम करो. उसके लिए स्वाध्याय करो. अध्ययन करों, निरिक्षण करों आदि. तात्पर्य- प्रश्न पूछने के लिए भी कुछ आधार हो, तय्यारी हो स्वयं की. कोई भी व्यक्ति इस प्रकार की तय्यारी तभी करता है जब मन में ज्ञान की प्रमाणिक जिज्ञासा हो. केवल मन में कुछ बाते उभरी और किसी को तंग करने के लिए, निचा दिखाने के लिए, प्रश्नार्थक वाक्य की रचना मात्र प्रश्न नही होते. आजकल बच्चों के प्रश्नों की भी बहुत चर्चा होती है. क्या उनकी और उनके उसी समय के समाधान की आवश्यकता भी होती है? क्या कई बार उनका समाधान असंभव नही होता? योग्य समय आने तक क्या प्रश्नों को भी नही धैर्य रखना चाहिए?

आजकल तो प्रश्नों का बहुत प्रचलन है. टीवी चर्चाएँ तो मानो सवालों की खदानें होती है. कोई भी विषय उठा लो- राजनीती, अर्थनीति, संस्कृति, कला, साहित्य, जीवन, जीवनदर्शन, वैश्विक बातें... क्या सवालों का यह स्वरूप हमे किसी भी सार्थकता तक पहुंचा सकता है? हमे उत्तर चाहिए, सार्थकता चाहिए या बौद्धिक खुजली मात्र की दृष्टी से हम सवालों की ओर देखते है? वही हाल सोशल मिडिया का भी है. हम चाहते क्या है? फिर और भी एक प्रश्न उभरता है की हमारी भावना क्या है? प्रश्न करते समय स्वयं ने स्वयं को यह सवाल पूछना चाहिए या नहीं? कई सवाल क्षमता और योग्यता की भी demand करते है. मेरे मन में डोनाल्ड ट्रंप या मोदीजी के संबंध में कुछ सवाल जरुर हो सकते है. प्रामाणिक भी हो सकते है. किन्तु मै वह पूछने का अधिकारी नही हूँ. अगर पूछने है ही तो योग्य रीती से पूछने चाहिए. किन्तु हम उनसे पूछने के सवाल अपने अगलबगल में पूछते है और उत्तर चाहते है. क्या यह ठीक है और संभव भी? दूसरी बात यह भी की, क्या हम सवाल पूछने के अधिकार के साथ ही उत्तर देने या ना देने की सामनेवाले व्यक्ति की स्वतंत्रता मानते है? ऋषीवर ने जो एक बात गहरी कही वह यहां महत्व रखती है. मेरे पास उत्तर हो तो दूंगा. लेकिन हम अर्थ निकालते है की, सामने वाला व्यक्ति अगर उत्तर नही दे सकता या उत्तर नही देने का चयन करता है; तो वह झूठा है, निचा है, गलत है... आदि आदि. हमे प्रश्न का उत्तर खोजने की बजाय और बातों में ही रूचि होती है. क्या इन्हें प्रश्न/ सवाल कहा जाना चाहिए?

मुझे लगता है प्रश्न और उनकी मौलिकता पर गहरा चिन्तन आज प्रासंगिक हो गया है.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१७

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

रोहित वेमुला आणि विवेकानंद

रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या सध्या गाजते आहे. त्यावरून सुरु असलेले राजकारण तर घाणेरडे आहे. समाजातील उपेक्षित वर्गाला चांगले जीवन मिळावे यासाठी सुरु झालेल्या शे-दीडशे वर्षातील चळवळींनी राजकारणाच्या वळचणीला जाऊन आपले सत्व आणि स्वत्व गमावले आहे. दलित चळवळीचेही तसेच झाले आहे. दुर्दैवाने विविध कारणांनी कोणी याबद्दल नीट विचार करायला तयार नाही. समाज, देश आणि राष्ट्र यांच्या दृष्टीने हे घातक आहे. रोज अनेक आत्महत्या होतात. नापिकी, कर्ज, आजार, प्रेम, ताणतणाव अशा अनेक गोष्टी. त्यातील एकाही घटनेचे समर्थन करता येणार नाही. पण आत्महत्या ही काही rarest of rare अशी बाब नाही. पण एखादी आत्महत्या राजकारणाच्या तावडीत सापडली की तशी होऊ शकते. रोहित वेमुला याच्या घटनेचेही तसे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्हे तसेच ते असावे अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळेच त्या संदर्भात काही लिहिले बोलले तर आकाशपाताळ एक केले जाऊ शकेल. तरीही त्याच्याशी संबंधित अशा एका मुद्यावर मत व्यक्त करावेसे वाटते.

रोहित वेमुला याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी व्यक्त केलेली मते सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. ती अतिशय चुकीची अन अपरिपक्व अशी आहेत. एवढेच नव्हे तर स्वामीजींबद्दल वापरलेली भाषाही योग्य नाही. चार-पाच दिवसांपूर्वी एका व्यक्तीने अशाच प्रकारची पोस्ट टाकली होती. एवढेच नव्हे तर त्यावर लोकांनी तशाच असभ्य अन पोरकट प्रतिक्रिया दिल्या होत्या. एकाने तर स्वामीजी ignorant (अज्ञानी- त्याच्या मनातील भाव मूर्ख) असल्याचे म्हटले होते. यावरून शंका येते की, तथाकथित पुरोगामी लोकांनी आता स्वामी विवेकानंद यांना टार्गेट करण्याचे ठरवलेले आहे.

ही शंका बळकट करणारी एक घटना काल रात्री अनुभवली. संघ परिवारातील एका संघटनेच्या एका हिंदी भाषी कार्यकर्तीचा काल रात्री फोन आला. तिला एक मराठी लेख हिंदीत भाषांतरित करून द्यायचा होता. लेख स्व. गोविंद पानसरे यांच्याबाबतीत होता. तिला जी काही अडचण होती त्याबद्दल बोलणे झाल्यावर मी म्हटले- स्व. पानसरे यांच्यावरील लेख एक हिंदुत्ववादी कार्यकर्ती भाषांतरित करून देते हीही एक गंमतच. त्यावर ती म्हणाली- हो गंमत तर खरी. पण मला (म्हणजे तिला) या लोकांबद्दल आदर आहे. कारण या लोकांनी जनतेच्या भल्याचीच काळजी केली. त्यावर मी म्हणालो- हे ठीक आहे. अन हा ज्याच्या त्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे. घडलेल्या घटना योग्य तर नाहीतच. अगदी जे लोक मारले गेलेत त्यांच्याबद्दल मनात राग असेल तरीही `काळ सोकावतो' ही भीती तर आहेच. त्यामुळे अट्टल गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती सोडली तर कोणालाही या घटना चुकीच्याच वाटतात. त्यात मीही आहे. पण त्यामुळे या डाव्या अथवा कथित पुरोगामी व्यक्ती वा कामांबद्दल फार भारावून जावे असे काही नाही. मग त्या कार्यकर्तीला काही तपशील, घटना, प्रसंग सांगितले. तेव्हा ती म्हणाली- बापरे, असे आहे?

एवढे पाल्हाळ सांगण्याचा हेतू हाच की, सामान्य माणूस वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात अडकून आपली विचारशक्ती गमावून बसत असतो. गेली अनेक दशके हाच बुद्धीभ्रमाचा खेळ सुरु आहे. असंख्य उदाहरणे देता येतील. शास्त्रीय संगीतावर चर्चा करताना- `या संगीताने पोट भरते का?' असा प्रश्न उपस्थित करून बुद्धिभ्रम करणे हाच या मंडळींचा खेळ असतो. आता त्यांनी त्यासाठी विवेकानंद निवडले असल्याची शंका घ्यायला जागा आहे.

अर्थात यात नवीन काहीही नाही. स्वामीजी हयात असताना, एवढेच काय त्यांचे शिकागो भाषण झाल्यावर काहीच महिन्यात; त्यांची वाढती लोकप्रियता अन त्यांनी उभे केलेले वैचारिक आव्हान पाहून त्यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अन विषारी प्रचार खुद्द अमेरिकेत सुरु झाला होता. भारतातही त्याची री ओढणारे होते. मात्र त्या साऱ्याला स्वामीजी पुरून उरले होते. एवढेच नव्हे तर त्यानंतर तब्बल अडीच वर्षे त्याच अमेरिकेत अन युरोपात हिंदुत्वाच्या कामाची भक्कम पायाभरणी करून आले होते. आज तर पाणी खूप वाहून गेले आहे. स्वामीजी वा त्यांचे विचार यांना देण्यात आलेली वा दिली जाणारी वा दिली जाऊ शकतील; अशी कोणतीही गंभीर आव्हाने उरलेली नाहीत. त्या विचारांची चर्चा, छाननी, विश्लेषण पुरेसे झाले आहे अन पुढेही काळानुरूप होत राहील. पण या विचारांमुळे ज्यांचा ज्यांचा पाया हादरतो, ज्यांचे ज्यांचे स्वार्थ प्रश्नांकित होतात ते असले पोरकट अन असभ्य प्रकार करीत राहणार. त्यापासून सावध तर राहायला हवेच, पण त्याला चोख उत्तर देण्यासाठी अन सकारात्मक प्रतिपादनासाठी स्वामीजींचा अधिकाधिक अभ्यास करायला हवा. नुसते `अरे'ला `कारे' पुरेसे ठरणार नाही.

खूप वर्षांपूर्वी एक मराठी नाटक पहिले होते. नाव आता आठवत नाही. मानवी जीवनाचे वाढते व्यापारीकरण हा विषय होता. त्यात एक कंपनी आपला खप वाढावा यासाठी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न कसा करते हे दाखवले होते. अन ही भांडणे व्हावी यासाठी स्वत: ती कंपनीच कारस्थान रचित असते. रोहित वेमुला याच्या आत्महत्येमागेही असे कारस्थान असू शकेल का? सगळ्या अंगांनी विचार तर व्हायलाच हवा ना?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १९ जानेवारी २०१६

संशोधने

सर्वेक्षणे, अभ्यास, संशोधने यांची सध्या खूप चलती आहे. उदा. - कर्करोग. याचे जे अभ्यास होतात त्यांचे म्हणणे की, तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग होतो. तंबाखू न खाणाऱ्यांनाही कर्करोग होतो. त्याचे काय? किंवा तंबाखू खाणाऱ्या लोकांपैकी अर्ध्याहून कमी लोकांना कर्करोग होतो. बहुसंख्य लोकांना होत नाही. त्यामुळे या अभ्यासाचा निष्कर्ष फार तर एवढा काढता येईल की, तंबाखू खाणाऱ्या लोकांपैकी अमुक प्रमाणात लोकांना कर्करोग होतो. खरे तर हेही अंदाज बांधणे झाले. समजा तंबाखू खाणाऱ्या हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. अन त्यावरून अंदाज बांधण्यात आला. पण या हजार लोकांच्या बाहेरील तंबाखू खाणारे लोक जे आहेत त्यांच्या बाबतीत हा अभ्यास मुळीच लागू होऊ शकणार नाही, असेही होऊ शकेल. पण दावा काय करण्यात येतो? तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो. अन हा दावा अभ्यास, सर्वेक्षण वगैरेच्या आधारे - म्हणजेच कथित वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे- करण्यात येतो. त्यामुळे त्यावर सगळेच मुग गिळून बसणार. नुकतीच केंद्र सरकारने लाखोळी डाळीवरील बंदी उठवली. या लाखोळी डाळीवरील बंदीचा इतिहाससुद्धा असाच भोंगळ संशोधनाचा आहे. मुळातच तथाकथित वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास, संशोधने इत्यादींचाच मुळातून विचार करायला हवा. अन हा प्रकार फक्त तंबाखू, डाळ, आरोग्य याबाबतच विचार करण्यासारखा आहे असे नाही. तर सामाजिक घडामोडी, समाजशास्त्रे, राजकारण, शिक्षण, अर्थकारण, इतिहास, निवडणुका अशा या विश्वाशी संबंधित सगळ्याच बाबींचा साधकबाधक विचार करायला हवा; संशोधने, सर्वेक्षणे, अभ्यास, वैज्ञानिकता यांच्या संदर्भात. भ्रमात वा बौद्धिक दहशतीत राहणे चांगले नाही.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१६

विवेकानंद जयंतीचे चिंतन

आज पौष कृष्ण सप्तमी. स्वामी विवेकानंद यांचा तिथीनुसार जन्मदिन.

स्वामीजींना कोटी कोटी प्रणाम.

या क्षणी तीन गोष्टी विशेषत्वाने जाणवतात.

१) स्वामीजींनी कधीही महापुरुषांचे अनुकरण करा, त्यांचे विचार अमलात आणा, त्याविना तरणोपाय नाही; इत्यादी सांगितलं नाही. त्यांनी महापुरुषांचे अनुकरण करायला नव्हे, तर महापुरुष व्हायला आवाहन केलं. याला अगदी ते स्वत: आणि त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांचाही त्यांनी अपवाद केला नाही. त्यांचे हे आवाहन सत्याच्या साक्षात्कारावर आधारलेले होते. म्हणूनच महापुरुष होण्याचे त्यांचे आवाहन, सुविचारप्रसूत भंपक चांगुलपणा आणि स्वार्थप्रसूत छद्मीपणा यांच्यातून वाट काढत, सत्यदर्शनाचा मार्ग अधिक प्रशस्त आणि प्रकाशित करते. त्यामुळेच त्यांना जर-तर, पण-परंतु करावे लागत नाही. ते स्वच्छपणे सांगतात- या विश्वात अनेक सापेक्ष सत्य आहेत. निरपेक्ष सत्य मात्र एकमेव आहे. दोन्हीची गल्लत करू नका. या विश्वाचा भोवरा, त्याचे एकसंध स्वरूप आणि तरीही त्यातील खालची पायरी अन वरची पायरी, त्यातील डावे नि उजवे, त्यातील सकस नि हिणकस हे सगळं स्वच्छपणे आणि स्पष्टपणे समजावून ते महापुरुष होण्याचं आवाहन करतात. आहोत तिथेच, आहोत तसेच राहा अन बाह्य गोष्टींचे आधार शोधत राहा हे त्यांना मान्य नाही. बाह्य आणि आंतरिक अशा दोन्हीचं व्यवस्थापन करून वर वर चढा आणि सर्वव्यापी सर्वोच्चता प्राप्त करून घ्या हाच त्यांचा संदेश आहे. राजयोगावरील व्याख्यानातील यासंबंधीचे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात- `प्रत्येक जीव अव्यक्त ब्रम्ह होय. ते स्वरूप प्राप्त करून घेणे हाच जीवनाचा अर्थ. ज्ञान, भक्ती, योग, कर्म यापैकी एकाचा, अनेकांचा वा सगळ्यांचा उपयोग करून ते स्वरूप प्राप्त करून घ्या आणि दुविधापूर्ण स्थितीतून मुक्त व्हा.' खरा माणूस होण्यासाठी सुद्धा हे `माणूस'पणाच्या पलीकडील स्थितीचे अनुसंधानच मदत करेल. त्याविना माणूस होण्याचे प्रयत्न सुद्धा विफल होतील.

२) स्वामीजींचे भारतप्रेम. भारत हा त्यांचा श्वास होता. पण भारत म्हणजे काय हेही त्यांनी सिद्धहस्तपणे सांगितले. भारताला भारत म्हणून समजून घ्या हे त्यांचे आवाहन. भारतबाह्य सत्ता, संपत्ती आणि अन्य मापदंड लावून भारताचे मुल्यांकन करू नका. त्यांनी तयार केलेल्या संदर्भ चौकटीत भारताला कोंबू नका आणि त्यांनी दिलेल्या फुटपट्ट्या वापरून भारताला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. त्याची originality आणि अपूर्वता ओळखा. त्यावर प्रेम करा. भारताचे खरे स्वरूप हा तुमचा श्वास होऊ द्या. हा त्यांचा दुसरा महत्वाचा संदेश.

३) हिंदुत्वाला आक्रमक करणे, हा तर त्यांच्या जीविताचा हेतूच होता. त्यांनी स्वत: तो अनेकदा स्पष्ट केलेला आहे. हां, पण `हिंदुत्वाला' आक्रमक करणे. हिंदुत्वाला इस्लामत्व किंवा ख्रिश्चनत्व असे स्वरूप देणे नव्हे. हिंदुत्व हे अगदी मूळ, शुद्ध, कसदार, सुवर्णासारखं लखलखित हिंदुत्व. त्याला फक्त आक्रमक करणे.

स्वामीजींच्या जन्मतिथीचे शुभचिंतन.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१७

दंडशक्ती, प्रेरक शक्ती

१) सर्वोच्च न्यायालयातील वाद,

२) न्या. लोया मृत्यू प्रकरण,

३) `पद्मावत'चा गोंधळ,

४) उत्तर प्रदेशात सहावीतील मुलीने पहिलीतील मुलाच्या हत्येचा केलेला प्रयत्न,

किंवा असे अनेक प्रश्न आणि वाद...

`कायद्याचे राज्य' हा आदर्श ठेवल्याने उद्भवतात, वाढतात, चिघळतात. `नीतिमान समाज' आणि त्याकडे लक्ष देण्यासाठी कायदा; या आदर्शांऐवजी `नीतिमान समाज' याला तिलांजली देऊन `कायद्याचे राज्य' आणि `कायद्याने चालणारा समाज' हा आदर्श मानल्याने ही स्थिती आली आहे. माणूस अथवा माणसे कायदा करतात. तो कसा केला जातो, कसा वापरला जातो, कसा वाकवला जातो इत्यादी सगळ्यांना ठाऊक आहे, ठाऊक असते. त्यामुळेच कायदा ही प्रेरक शक्ती होऊच शकत नाही. ती दंडशक्ती आहे. आज प्रेरक शक्तीला मोडीत काढून दंडशक्तीच्या भरवशावर समाज चालवण्याचे जे खेळ सुरु आहेत ते अपुरे आणि घातक आहेत. त्यातून साध्य काहीही होणार नाही. नैतिकता आणि धोरण या दोन्ही अर्थांनी नीतिमान समाज ही जोवर प्राधान्याची बाब होत नाही तोवर गोंधळाला अंत नाही. दुर्दैवाने ज्यांनी बोलायला हवे तेही यावर बोलत नाहीत. तेही हतबुद्ध आणि हतप्रभ झालेले दिसतात.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१८

भूमिका

एक खुलासा-

माझ्या पोस्ट वाचताना अनेकदा वाचकांचा गोंधळ आणि गैरसमज होतो असं अनुभवाला येतं. त्यासाठी.

माझ्या लिखाणातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक इत्यादी उल्लेख हे उदाहरण अथवा संदर्भ म्हणून असतात. त्या विश्लेषणातून, विवेचनातून, मांडणीतून; मला प्रतीत होणारं मुलभूत सत्य; मूळ बाब मांडणे हा त्याचा उद्देश असतो. कोणी व्यक्ती, व्यवस्था, पक्ष, सत्ता, फायदे-तोटे; या साऱ्यात व्यक्तिश: मला तर काही देणेघेणे नसतेच; पण संबंधितांचे काय होते, होईल, व्हावे यातही मला रस नसतो. आपली नजर जाईल तेथवर आणि आपल्या भावना विचार जातील तेथवर; भूत, वर्तमान आणि भविष्य; यांच्या संदर्भात जीवन विषयक चिंतन सगळ्यांपुढे विचारार्थ ठेवणे; हा त्या लिखाणाचा गाभा असतो. (अर्थात वैचारिक लिखाणाचा). वाचताना, प्रतिक्रिया देताना (अर्थात वाचलेच तर) हे लक्षात ठेवावे, ही प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१८

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

`एक टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती

आधुनिकता अथवा आधुनिक विचारांचा हा परिणामही आहे अन पराभवही. सगळ्यांना सगळं काही देण्याच्या तोंडाच्या वाफा कितीही दवडल्या तरीही साध्य शून्य. सगळ्यांना सगळं काही देण्याचा `खोटा ढोंगीपणा' करत अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न म्हणजे आधुनिकता. पैसा, रोजगार, शिक्षण यांची सार्वत्रिकता आधुनिकतेने संपवली आहे. जुन्या समाजरचनेने अन्याय केला, पैसा, रोजगार, शिक्षण यापासून वंचित ठेवले याचा जेवढा कंठशोष केला जातो तो फुकाचा आहे. ती-ती कामे करणाऱ्या समाजगटाला पैसा, रोजगार, शिक्षण याची शाश्वती होती. आजच्यासारखी परवड नव्हती. हां, तीन गोष्टी होत्या ज्यांचा विचार व्हायला हवा होता. केलाही जात होता. १) व्यवस्थेतील परिवर्तनाचा अभाव. कोणाला बदल करायचा असेल तर त्यासाठी वाव नसणे. २) श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भाव. ३) अन्याय आणि अत्याचार. मात्र या बाबींचा शांतपणे विचार न करता सगळ्या त्रासासाठी जुन्या व्यवस्थेला बोल लावून जाणीवपूर्वक ती नासवण्याचेच उद्योग करण्यात आले. त्याच्या मुळाशी असलेला सर्वकल्याणी भाव आणि `माणूस' नावाच्या प्राण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास यांची अवहेलना करण्यात आली. यालाच महात्मा गांधीजी म्हणाले होते- dont throw baby with bathwater. या साऱ्याचा समग्र साधकबाधक विचार ज्यांच्याकडून अपेक्षित आहे ते सगळे (सगळ्या व्यक्ती आणि सगळे गट) फक्त आणि फक्त politically correct काय आहे याचाच विचार आणि उच्चार करतात.

याच विषयाशी संबंधित एक बिंदू. त्यावर पुन्हा केव्हा तरी लिहेन. बिंदू हा की, वेद, उपनिषदे, पुराणे किंवा ब्रम्हज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचू दिलं नाही यावर मोठा आक्षेप होता आणि आहे. तो रास्तही आहे. पण आज हे सगळं भांडार खुलं झालं असताना ते ग्रहण करण्याची जिज्ञासा आणि लालसा किती आहे?

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०१७

कथित विद्वानाची असभ्यता

काही तथाकथित विद्वान आहेत. त्यांनी माझ्यापासून दूर राहिलेलेच बरे. मी कोणालाही माझ्या पोस्ट वाचायला बोलावत नाही. likes and shares किंवा friend list ची संख्या यांची मला गरजही नाही अन त्यात मला रसही नाही. माझं लिखाण सगळ्यांसाठी खुलं आहे. ते मान्य व्हायलाच हवं असं नाही. त्यावर वेगळं मत मांडायलाही हरकत नाही. पण ते तर्कशुद्ध, योग्य भावना यांच्यासह. खुटीउपाडपणा किंवा निरर्थक तिरकसपणा, अथवा तू-तू मी-मी, चूक-बरोबर सिद्ध करणे किंवा यापलीकडीलही मनाची अन वृत्तीची क्षुद्रता अन हलकटपणा यांना माझ्याकडे जागा नाही. तरीही असे काही लोक येतात अन घाण करतातच. त्यांनी बाजूला व्हावे. स्वत:चा गचाळगांडूपणा आणि डुक्करछाप असभ्यता स्वत:जवळ ठेवावी. या क्षणी एवढंच पुरेसं समजतो. जास्त झालं तर नावेही जाहीर करीन. सांगूनही दूर राहणे जमत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही दूर राहू शकत नाही म्हणून माझ्या भिंतीवर तंगड्या वर करू नका. अन चुलीत जा.

(कृपया मला भाषा, सभ्यता वगैरे कोणीही शिकवू नये. या लोकांना मी माझ्याच पद्धतीने हाताळणार.)

**********

आज जो प्रकार झाला त्याबाबत मी लिहिले आहेच. मनोज काळे नावाच्या माणसाने त्यानंतर माझ्या फोटोसह त्याच्या भिंतीवर जी वटवट केली, ती पोस्ट एका मैत्रिणीने फेसबुककडे रिपोर्ट केली आहे. तिने आग्रह केला आहे आणि तो मलाही योग्य वाटतो की, ज्या ज्या मित्र मैत्रिणींना हा प्रकार अयोग्य वाटत असेल त्यांनी तो फेसबुककडे रिपोर्ट करावा. शक्य असल्यास आणि योग्य वाटल्यास तसे केल्याची सूचना मला मेसेज करावी. म्हणजे पुढे काही करावे लागल्यास सोयीचे होईल. अर्थात फेसबुकला याचा रिपोर्ट करायचा अथवा नाही हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.

धन्यवाद.

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०१७

गमतीदार निरीक्षण-

एक गमतीदार निरीक्षण-

चांगली कामं, जसे सेवा, मदत, शोध, संशोधन, achievements हे सगळं व्यक्तिगत असतं.

आणि

वाईट गोष्टी, जसे चोऱ्या, बलात्कार, खून, दरोडे, भ्रष्टाचार इत्यादी सगळ्या समाजाचे. एकदम चर्चा समाज खूप बिघडत चालला आहे इत्यादी.

तरी नशीब ९९ टक्के किंवा त्याहून अधिक लोक रात्री सुखेनैव झोपू शकतात.

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०२०

नियती

तामिळनाडू, चंदिगढ

कबड्डीचा अंतिम सामना. दोन्ही संघ बरोबरीत. ३९-३९. शेवटली सर्व्हिस. चंदिगढची. वेळ संपली. नियमानुसार सर्व्हिस संपेपर्यंत खेळ चालणार. तामिळनाडूने गडी पकडला, बाद केला. तामिळनाडू ४०-३९ अशी जिंकली. रोमांच इतका, वातावरण इतकं चार्ज झालेलं... तामिळनाडूचे अतिरीक्त खेळाडू अन प्रशिक्षक जल्लोष करत मैदानावर आले. अन...

यालाच म्हणतात नियती.

शेवटली, खेळ संपल्याची शिट्टी वाजण्यापूर्वी मैदानावर आल्याने तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. नाणेफेक झाली. चंदिगढला golden raid मिळाली. चंदिगढच्या खेळाडूने तामिळनाडूचा गडी बाद केला. चंदिगढ एका गड्याने विजयी.

रडणारी चंदिगढ चमू नाचायला लागली.

नाचणारी तामिळनाडू चमू रडायला लागली.

!!!!!

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०२०

रविवार, १६ जानेवारी, २०२२

सुचित्रा सेन

सुचित्रा सेन गेल्या. त्यांच्या नावापुढे काहीही लावले नाही तरीही लोकांना कळते की `आंधी’ या जगप्रसिद्ध हिंदी चित्रपटाची नायिका काळाच्या पडद्याआड गेली. `आंधी’ आणि एकूणच हिंदी चित्रपट विश्व यांच्याशी एकरूप झालेलं ते व्यक्तिमत्व होतं. सौंदर्य आणि अभिनय यांच्या अनोख्या मिश्रणाने त्यांना करोडो चाहते लाभले होते. त्या करोडोतील मीही एक. त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कानी आल्याबरोबर करोडो ओठांवर `तेरे बिना जिंदगी भी कोई; जिंदगी नही, जिंदगी नही’ आलं असेल आणि करोडो हृदयात एक कळ आली असेल. त्यांचा मृत्यू अनपेक्षितही नाही आणि अकालीही नाही. गेले अनेक दिवस त्यांच्या प्रकृतीचा चढउतार सुरु होता. वयही ८२ होते. माणसाच्या अखंड आणि अव्यभिचारी सोबत्याशी हस्तांदोलन करण्यासाठी या दोन गोष्टी अगदी योग्य !!! योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी व्हाव्यात अशी साधारण धारणा असते. मृत्यूही त्याला अपवाद का असावा? नव्हे तो अपवाद असूच नये. तो अपवाद ठरला आणि मर्यादेच्या अलीकडे आला तर मागे राहणार्याला जखमी वा अपंग करून जातो; तसेच मर्यादेच्या पलीकडे गेला तर जाणार्याला अनाथ वा उपेक्षित करून जातो. सुचित्रा सेन या त्या अर्थाने भाग्यवान ठरल्या.

गेली सुमारे ४० वर्षं त्या जगापासून दूर होत्या. त्याचं कारण जे काही सांगितलं जातं ते विचार करायला लावणारं आहे. ज्या सुंदर चेहर्याने आपल्याला प्रसिद्धी आणि लोकांचं प्रेम मिळवून दिलं, तोच चेहरा लोकांच्या मनात राहावा. वयाप्रमाणे अपरिहार्यपणे होणारा बदल लोकांपुढे नको. आपली प्रतिमा लोकांपुढे तशीच सुंदर राहायला हवी, अशी त्यांची इच्छा होती. कुठेतरी हे खटकून जातं. एक तर लोक असा स्वाभाविक बदल सहज स्वीकारतात. याचाच अर्थ त्या स्वत:च स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडल्या, त्यात गुंतल्या आणि गुरफटल्या. त्यामुळेच तिथेच थांबल्या आणि एका अर्थी संपल्या. मृत्यूला सामोरे जातानाही तोच विचार त्यांना सतावत होता का? कुणास ठाऊक. एखाद्या व्यक्तीचं, विशेषत: कलाकाराचं हे हळवेपण असू शकेल, पण त्यामुळे त्या एका अर्थी रोज कणाकणाने मृत्यू पावत नव्हत्या का? एकाच जीवनात हजारो जीवने जगणारी आणि एकाच जीवनात हजारो मरणे मरणारी; अशी दोन्ही प्रकारची माणसं पाहायला मिळतात. याशिवाय दुसरं काय म्हणणार? `आंधी’ आणि म्हणूनच त्याची नायिका असलेल्या सुचित्रा सेन यांची स्मृती दीर्घकाळ राहणार आहे यात मात्र काही शंका नाही.

- श्रीपाद कोठे

१७ जानेवारी २०१४

चरखा

सध्या चरखा चरखा सुरु आहे. तो धागा पकडून मन सहज भूतकाळात गेलं. `गांधी विचारधारा' या विषयात आम्ही तेव्हा एम.ए. करत होतो. ते काही पदवी मिळवण्याचं वय नव्हतं अन त्याची गरजही नव्हती. पण गांधीजी समजून घेणे, त्यांचे विचार समजून घेणे यासाठी हा खटाटोप. तर त्यावेळी सुत काढणे हा आमच्या curriculum चा भाग होता. वर्षभर रोज तासभर सुत कातणे चालले होते. `गांधी विचारधारा'चे विभाग प्रमुख होते डॉ. गांधी. अजूनही आहेत. दक्षिणी माणूस. स्पष्ट सांगायचं तर लहरी आणि तुसडा. गांधीजींच्या संदर्भ चौकटीत न बसणारा. त्यांना कसं टाळता येईल एवढाच फक्त प्रश्न राहायचा. बाकी मजा यायची. निवांत campus मध्ये संध्याकाळी वर्ग राहत असत. त्यावेळी लोकसत्तेला असल्याने वेळ कशी जमवायची हा प्रश्न होता. पण निभले दोन वर्ष. मी पीएच.डी. करावं यासाठी डॉ. गांधी खूप मागे लागले होते. अर्थात त्यात मला डॉक्टरेट मिळावी यापेक्षा त्यांना गाईड म्हणून काही तरी करता येईल हा भाग अधिक होता. मी काही त्या भानगडीत पडलो नाही. हां, सुत मात्र मनापासून काढले. धागा तुटायचा वारंवार. तो पुन्हा जोडायचा. पुन्हा कातणे सुरु. भरपूर सुत कातलं होतं. त्याचं करायचं काय? त्याचा प्रश्नही विभाग प्रमुखांनी सोडवला होता. ते सुत देऊन खादीचं कापड घ्यायचं. ती व्यवस्था त्यांनीच केली होती. मग मी कातलेलं सुत देऊन खादीचं कापड घेतलं होतं. अन ते पिल्याला दिलं होतं सलवार कमीज साठी. पिल्याने त्या कापडाचा ड्रेस शिवून वापरला पण होता. आठवतं का पिल्या? त्यावेळी लिहिलेल्या `गांधीजींची पत्रकारिता' या लघु प्रबंधाचं पुस्तक करता येऊ शकेल. काही तरी विचार करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

१७ जानेवारी २०१७