दलाई लामांच्या ताज्या वक्तव्याने एक निराळीच चर्चा सुरु झाली आहे. विषय कितीही चघळला तरीही चघळावासा वाटेल असाच आहे. मुख्य म्हणजे या चर्चा आता निष्कर्ष निघण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. अन निष्कर्ष निघाला तरीही उपयोग काय? खरं हे आहे की, साम्राज्यवादी शक्तींनी भारताची फाळणी त्यांच्या मनात पक्की केली होती. कोणतेही तर्क, कोणतेही डावपेच, कोणतीही धोरणे किंवा कोणतीही माणसे असती तरीही फाळणी अटळ होती. फाळणी केल्याशिवाय ब्रिटिशांनी भारत सोडलाच नसता. त्यामुळे या चर्चांचं एक बौद्धिक खाद्य याहून अधिक महत्व नाही. ७१ वर्षांनी आता `फाळणी का व कशी झाली' हा चर्चेचा विषय न राहता; पुन्हा एकत्र होण्याची गरज, शक्यता, पद्धती; हा चर्चेचा विषय हवा असे वाटते. पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणत असत - `एकात्मतेच्या अनुभूतीच्या अभावाने देशाची फाळणी झाली. त्यामुळे एकात्मतेच्या अनुभूतीनेच देश पुन्हा अखंड होईल. त्याचे पहिले पाउल म्हणजे, देशांतर्गत एकात्मतेची अनुभूती. संस्थानांच्या विलीनीकरणाच्या वेळी लोकांमध्ये संघर्ष झाले नाहीत. सरदार पटेल यांचे प्रशासकीय कौशल्य होतेच, पण सगळी संस्थाने एक झालीत याचे कारण येथील समाजात असलेली ऐक्यजाणीव. स्वातंत्र्यानंतर काहीच वर्षात आमची धोरणे, सिद्धांत, तत्वज्ञान यांनी अशी स्थिती आली की, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी लोक हिंसेवर उतरले. त्यानंतर स्थिती अधिकच चिघळली आहे. देशांतर्गत समाजाची ऐक्यअनुभूती हाच आजचा चर्चेचा मुख्य मुद्दा असायला हवा. बाकी गोष्टी आपोआप घडून येतील.
- श्रीपाद कोठे
९ ऑगस्ट २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा