साम टीव्हीचे संजय आवटे सगळ्यांना परिचित आहेत. संघाने तिरंगा फडकावणे यावर आज त्यांनी चर्चा केली. त्यात संघाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीला त्यांनी प्रश्न केला- `१५ ऑगस्ट १९४७ रोजी हा देश जन्माला आला हे तुम्हाला मान्य आहे की नाही?' अन आपण अगदी आईनस्टाईनलाच कोंडीत पकडलं अशा थाटात स्मितहास्य करीत ते उत्तराची वाट पाहत बसले. पुढची चर्चा फारशी महत्वाची नाही. पण आवटेजी मी तुम्हाला विचारतो की, हा देश १५ ऑगस्ट १९४७ ला जन्माला आला हे तुम्हाला मान्य आहे? हे तुमचे अगदी ठाम मत आहे? ते तसे आहे असे मी गृहीत धरतो कारण त्याशिवाय तुम्ही तसा प्रश्नच विचारला नसता. आता मी तुम्हाला विचारतो- `जो देश जन्मालाच आलेला नव्हता त्यासाठी स्वातंत्र्य लढा कसा काय लढला गेला हो? इंग्रजांनी १५० वर्षे राज्य तरी कोणत्या देशावर केले? सगळेच्या सगळे नेते बुद्धू होते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? या देशात मुलभूत ऐक्य असल्याविना नेत्यांच्या आवाहनाला लोकांनी सामुहिक प्रतिसाद दिला का? हे ऐक्य कोणी अन कधी निर्माण केले? असे ऐक्य एका रात्रीतून निर्माण होते का? आपण परतंत्र आहोत असे कोणत्या देशाला वाटले?' श्रीयुत संजय आवटे, तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय?
अन या संघ विरोधकांचे ढोंग पाहा- याच चर्चेत रत्नाकर महाजन आणि राजन अन्वर हेही होते. महाजन उठसुठ गांधींचे नाव घेतातच आणि अन्वर हे तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त वगैरे. गांधीजींनी `हिंद स्वराज'मध्ये या देशाबद्दल काय लिहिले आहे हे काय या दोघांना माहीत नसेल? गांधी स्पष्ट म्हणतात- हा देश किमान पाच हजार वर्षे प्राचीन आहे. परंतु आवटे हा देश १९४७ साली जन्माला आल्याचे सांगत असताना हे दोघेही तथाकथित ढोंगी विद्वान तोंडात गोमूत्र धरल्यासारखे चूप बसले होते. तुम्हाला संघाचा विरोध करायचा आहे करा. पण म्हणून तुम्ही या देशाचा, या समाजाचा बुद्धिभेद आणि मानभंग करणार काय? लाजा बिजा विकून टाकल्या आहेत का? अन गांधींच्या रामराज्याचे काय? हा देशच जर १५ ऑगस्ट १९४७ ला जन्माला आला तर त्याच्यापुढे, त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या रामराज्याचा आदर्श गांधींनी का ठेवला? वेडे झाले होते का ते? पंडित नेहरूंनी कोणत्या जन्माला न आलेल्या भारताचा शोध घेतला होता? अन हो, भारताला त्याचे नाव तो जन्माला येण्यापुर्वीच ठेवले गेले होते का?
आवटे and company, तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हाला पटो न पटो, तुम्हाला त्रास होवो अगर मिरच्या झोंबो; भारत हिंदू राष्ट्र होते, आहे आणि राहील. अन ते हिंदू राष्ट्र असल्यामुळेच ते सहिष्णू होते, आहे आणि राहील. जेव्हा सगळ्या जगाने ज्यू लोकांना हाकलून दिले तेव्हा याच हिंदू राष्ट्राने त्यांना आश्रय दिला. याच हिंदू राष्ट्राने जगातले पहिले चर्च उभारले. या देशाची सहिष्णूता १९४७ ला जन्माला आली नाही. ती या देशाच्या हजारो वर्षांच्या वाटचालीत या देशाच्या रक्तातून वाहते आहे. १९४७ आणि त्यानंतरच्या राज्यघटनेने या देशाच्या वैशिष्ट्यांना जन्म दिला नाही, त्यांनी फक्त त्यांचा सशक्त पुनरुच्चार केला. या प्राचीन समाजाने ज्या काही चुकाबिका केल्या असतील त्या केल्या असतील. ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या राहिल्या असतील. कोणत्या देशात त्रुटी नसतात अन कोणता समाज चुका करीत नाही? अन भविष्यात कोणी चुका करणार नाही याची काय शाश्वती? एकूणच जग, जीवन, माणूस याबाबतचं आपलं अतिशय तोकडं अन पोरकट आकलन प्रदर्शनात मांडणं बंद करा. चुका, न्याय, अन्याय, त्यांचं परिमार्जन; वगैरे वगैरे सुरु राहील. तो जीवन प्रवाहाचा भाग असतो. पण भलती तर्कटे करून या समाजाचा, या देशाचा, या राष्ट्राचा मानभंग करणे; त्याच्यातील उत्तमता, उदात्तता, उर्जस्वलता, त्याचा त्याग, त्याची तपस्या, त्याची थोरवी, त्याची मूल्ये इत्यादींना नख लावण्याचा नतद्रष्टपणा बंद करा.
जाता जाता एक मुद्दा-
वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशभक्तीची प्रशस्तीपत्रे देणारे तुम्ही कोण? कोणाच्या देशभक्तीचा पुरावा मागण्याचा किंवा कोणाला देशभक्ती सिद्ध करायला सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा तुमचा रोकडा सवाल असतो ना? मग तिरंगा फडकवला नाही एवढ्यावरून संघाला देशभक्तीचे पुरावे मागणे तुमच्या कोणत्या तत्वात बसते? दुसऱ्याच्या नाकाचा शेंबूड पुसण्याचा उपद्व्याप करा. त्याला हरकत नाही पण आधी स्वत:चे नाक स्वच्छ करा. तुमची सगळी विद्वत्ता विनोद म्हणूनच पाहतो. पण त्यामुळे समाजात गोंधळ माजू नये म्हणून एवढे तिखट लिहिले आहे. लोभ कायम राहावा.
- श्रीपाद कोठे
१७ ऑगस्ट २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा