कधीकधी बोललं जातं की, `धान्य, भाजीपाला, फळे यांचे भाव वाढले तर कोणी हरकत घेऊ नये. ती भाववाढ योग्यच असते. शेतकऱ्यांच्या पदरात थोडा अधिक पैसा जातो. हे अतिशय योग्य आहे.' अनेक राजकारणी, नेते, तसेच शेतकऱ्यांविषयी खरंखुरं प्रेम असणारे सुद्धा हा युक्तिवाद करतात. (भावाबद्दल घासाघीस करू नये असाही एक युक्तिवाद असतो. त्याविषयी बोलत नाही. एकूण भाववाढीबद्दल म्हणतो आहे.) या लोकांची कळकळ, अभ्यास यांचा आदर करुनही एक लक्षात आणून द्यावेसे वाटते की, हे समर्थन योग्य नाही. या लोकांना अर्थशास्त्र, शेती वगैरेही कदाचित अधिक कळतं, पण असा युक्तिवाद करताना त्यांच्या नजरेपुढे संपूर्ण समाज नसतो. खरे तर आजच्या एकूणच विचार पद्धतीत समग्र विचार, संपूर्ण समाजाचा विचार, सगळ्या अंगांचा विचार ही गोष्टच उरलेली नाही. त्याचाच हा परिणाम आहे. धान्य, भाजीपाला, फळे यांची भाववाढ पेट्रोल किंवा सोने किंवा मोबाईल किंवा गाड्या यासारखी का होऊ नये? याचे साधे कारण असे की; धान्य, भाजीपाला, फळे या सगळ्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत. घरोघरी काम करून पोट भरणाऱ्या लोकांनाही या गोष्टी लागतात. समाज म्हटला की त्यात वरपासून खालपर्यंत अनेक आर्थिक स्तर असतात. अन आर्थिक स्तर कोणताही असला तरीही धान्य, भाजीपाला, फळे लागतातच. ती सगळ्यांना परवडली पाहिजेत. मग काय शेतकऱ्यांनी दरिद्रीच राहायचे का? या प्रश्नाला स्पष्ट उत्तर `नाही' असेच आहे. पण त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्याला वाटते तितकी सोपी नाही. मुळातच धान्य, भाजीपाला, फळे यांचे भाव वाढावे किंवा वाढू नये; यासारखे अनेक प्रश्न आज अर्थकारणात आहेत. त्यासाठी मुळातून अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थव्यवस्था, अर्थमूल्ये, आर्थिक सवयी, आर्थिक धोरणे, आर्थिक दृष्टीकोन या सगळ्याचा मुळातून विचार हवा. त्यासाठी `अर्थ' ही स्वतंत्र वस्तू नसून `समग्र जीवनाच्या व्यापक संदर्भात' त्याचा विचार करायला हवा. आजच्या विचारातून अन ध्येय धोरणातून ही समग्रता पूर्ण संपुष्टात आली आहे. ती समग्रता पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत आंदोलने, नेतेगिरी, गोंधळ, राजकारण, कधी फायदा कधी तोटा, भांडाभांडी हे सगळे करता येईल. पण रोज निर्माण होणारी समस्यांची मालिका मात्र कमी करता येणार नाही.
- श्रीपाद कोठे
१२ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा