बरोब्बर ७० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेचा `लिटील बॉय' कोसळला आणि काही क्षणात दीड लाख लोक यमसदनी पोहोचले. मृत्युचं त्या वेळेपर्यंत अपरिचित असलेलं रूप जगाने पाहिलं. पण तेवढ्याने भागलं नाही म्हणून की काय, तीनच दिवसांनी, ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर दुसरा बॉम्ब कोसळला आणि दुसरे ८० हजार लोक यमसदनी पोहोचले. सुदैवाने त्यानंतर असे घडलेले नाही. पण असे घडणारच नाही, असे मात्र म्हणता येत नाही. आज त्या `लिटील बॉय'ची शक्ती लाखो पटीने वाढली आहे आणि त्याची संख्याही.
अर्थात या घटनेचा सुटा विचार करून भागणार नाही. कारण या घटनेनंतर दोनच वर्षांनी याच ऑगस्ट महिन्यात, जगाने या दोन घटनांच्या पाच पटीने अधिक लोकांना यमसदनी जाताना पाहिले. कोणताही बॉम्ब न वापरताही दहा लाखांहून अधिक लोक १९४७ च्या याच ऑगस्ट महिन्यात जीव गमावून बसले होते. निमित्त होते भारताची फाळणी.
या दोन्हीच्या मुळाशी असलेले कारण मात्र एकच आहे. काय आहे ते कारण? हे जग कोणाचे? ही पृथ्वी कोणाची? ही जमीन कोणाची? या जमिनीवरील आणि जमिनीखालील (जागा, खनिजे, तेल, हवा, ग्रह... इत्यादी इत्यादी) सगळे कोणाचे? यासाठीचा संघर्ष हेच आहे मूळ कारण. हिरोशिमा, नागासाकी किंवा भारताची फाळणी; या दोनच नव्हे तुमच्या आमच्या जीवनातील असंख्य गोष्टींपासून बहुतेक साऱ्याच संघर्षाचे अन त्रासाचे हेच मूळ कारण आहे.
खरेच, कोणाची आहे ही जमीन? बाकी कोणी काय सांगितले माहीत नाही, पण ईशावास्य उपनिषद सांगते- `हे सगळे जगत ईश्वराचे आहे. जे जे आहे ते त्याचेच आहे.' पुढे ते सांगते- `याचा त्यागून (स्वामित्व, मालकी भावनेचा त्याग करून) उपभोग घ्या.' गांधीजी म्हणत असत, जगातील सगळे साहित्य लोप पावले तरीही हरकत नाही, पण एवढा एक मंत्र जिवंत आहे तोवर माणसाला आशा आहे. अर्थात हा मंत्र ही सुरुवात आहे, हे दिशादर्शन आहे. चालण्याचे काम आमचे आहे. मात्र केवळ शब्द माहीत असून भागणार नाही. पाठींबा आणि निषेध पुरे पडणार नाहीत. त्याचा अर्थ आणि आशय समजून घेण्याची, समजावून देण्याची अखंड प्रक्रिया सुरु राहावी लागेल. अणुबॉम्ब आणि फाळणी किंवा तत्सम गोष्टीच नव्हेत, तर पेटंट वा ट्रेडमार्क किंवा स्त्री-पुरुष श्रेष्ठता किंवा अगदी कोणत्या व्यवसायात कोणाची किती संख्या आहे किंवा एखाद्या गोष्टीत कोणाचा वाटा किती; या बाबी सुद्धा एकाच मूळ गोष्टीशी घेऊन जातात हे प्रथम समजून घ्यावे लागेल. ही एक साखळी आहे. स्वामित्वाच्या, सत्तेच्या वृत्तीची साखळी. साखळीची एकेक कडी ज्याप्रमाणे साखळीला मजबूत बनवते त्याचप्रमाणे एकेक कडी साखळीला दुबळेही करू शकते. ज्या स्तरावर, ज्या प्रमाणात ही साखळी तोडता येईल, दुबळी करता येईल तेवढी ती करणे आवश्यक आहे. तेच हिरोशिमा- नागासाकी किंवा भारताच्या फाळणी सारख्या प्रश्नांचे स्थायी अन चिरकालिक उत्तर राहील.
याचवेळी याहून अधिक महत्वाची एक गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे सावधपण. ही साखळी तोडायची म्हटली की तुटून जाईल, असे नाही. तसे समजण्याचा भाबडेपणा अन भंपकपणा कामाचा नाही. तसे झाल्यास उलट, `फट म्हणता ब्रम्हहत्या' अशी स्थिती व्हायची. त्यासाठी दोन स्तरांवर सावध राहून सतत प्रयत्न हवेत- १) विविध स्तरांवर ही साखळी तोडत राहणे, त्यामागची मानसिकता बदलत राहणे, तिचा आशय अधिकाधिक स्पष्ट करीत राहणे आणि २) ती कमकुवत होईपर्यंत असलेला धोका लक्षात ठेवून सुरक्षात्मक उपाय करीत राहणे.
मानव जातीपुढील हे वर्तमान आव्हान आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार. ६ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा