सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

स्वत:ची आणि घराची साफसफाई

सध्या महाराष्ट्रात जो एक वैचारिक आरडाओरडा सुरु आहे त्याचे अनेक पैलू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन फक्त हिंदूपुरतेच का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यावर असे उत्तर देण्यात आले की `आम्ही स्वत:च्या घराची, स्वत:ची साफसफाई करतो असे डॉ. दाभोळकर म्हणत असत. आमचेही तेच मत आहे.' फार चांगली गोष्ट. पण या युक्तिवादाच्या संबंधाने काही गोष्टी स्पष्ट करण्याची गरज आहे.

अशा आशयाचा युक्तिवाद प्रथम रा.स्व.संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केला होता. सुमारे ४० वर्षांपूर्वी, त्यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण झाले होते. त्यात त्यांनी नि:संदिग्धपणे संघाचा सामाजिक विचार मांडला होता. तो विचार नवीन नव्हता, पण संघाबाहेरील जगात ज्या भाषेचा उपयोग केला जातो तशा स्वरुपात तो मांडण्यात आला होता. संघाच्या स्वयंसेवकांना ती भाषा नवीन होती. शब्दावली नवीन होती. तो विषयही एवढ्या विस्ताराने आणि तपशिलाने प्रथमच मांडण्यात आला होता. स्वाभाविकच त्यावर स्वयंसेवकांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यावेळी, फुले- आंबेडकर- शाहू महाराज यांच्याकडे कसे पाहिले पाहिजे आणि त्यांना कसे समजून घेतले पाहिजे हे सांगण्यासाठी, बाळासाहेब देवरस यांनी वरील आशयाचा तर्क दिला होता. त्यांचे म्हणणे असे की, आपल्या घराची साफसफाई व्हावी या कळकळीतून या सुधारकांनी प्रयत्न केले. कदाचित त्यांची भाषा कठोर असेल, पण त्यांचा त्यामागचा विचार आपला समाज निरोगी व्हावा हाच होता.

डॉ. दाभोळकर यांनी बाळासाहेब देवरस यांचा युक्तिवाद स्वीकारला होता, की त्यांना स्वतंत्रपणे तो सुचला होता यावर कितीही वाद घालता येईल, पण एक गोष्ट मात्र डॉ. दाभोळकर यांनी अनायास व अभावितपणे स्वीकारली की, आपले घर/ आपला समाज/ आपण म्हणजे हिंदू समाज. आपल्या समाजाची, आपल्या शरीराची साफसफाई करायची म्हणजे हिंदू समाजाची साफसफाई करायची. थोडक्यात काय तर हिंदू हीच या समाजाची, देशाची ओळख आहे. मग हिंदू राष्ट्र म्हणताना जीभ का लुळी पडते. हा देश सगळ्यांचा आहे, येथे मिश्र संस्कृती आहे वगैरे बुद्धिवादी थोतांड कशासाठी? हिंदू राष्ट्र या सत्याचाच स्वीकार का नाही?

दुसरा मुद्दा- माणसाला निरोगी राहायचे असेल तर केवळ स्वत:ची वा घराची स्वच्छता पुरेशी असते का? मी घर स्वच्छ ठेवलं, स्वत: रोज स्वच्छ आंघोळ केली; पण माझ्या दाराशी रस्त्यावर कचऱ्याचा ढीग असेल, त्यावर माशा- डास- किडे याचं साम्राज्य असेल तर? ते स्वच्छ करायला नको का? शिवाय मी स्वच्छ राहिलो आणि दुसरा मात्र माझ्यावर चिखलफेक करीत असेल तर त्याचा बंदोबस्त करायला नको का? आज आम्ही पाकिस्तानच्या किंवा चीनच्या बाबतीत काय भोगतो आहोत? आम्ही आमची स्वच्छता, आमचा चांगुलपणा पाळणार, त्याचीच काळजी करणार; पण आमचे शांत, सुरक्षित, सुखी जगणे फक्त आमच्यावर अवलंबून नसते. बाकीच्यांवरही अवलंबून असतेच. आम्ही स्वत:बद्दल काय विचार करतो, कसा व्यवहार करतो यासोबतच; अन्य लोक आमच्याबद्दल काय विचार करतात आणि कसा व्यवहार करतात हेही महत्वाचे आहे.

अन किमान समाज प्रबोधन, समाज सुधारणा, सामाजिक कल्याण आणि वैश्विक व्यक्तित्वाचा दावा करणाऱ्यांनी तरी असले भ्रामक युक्तिवाद करू नयेत. त्यांना यच्चयावत सगळ्यांबद्दल कळकळ आणि कणव असायला हवी ना !!

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा