उद्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. तसाच तो भारताची दुर्दैवी आणि शोकांत फाळणी झाली होती, याची आठवण देणारा दिवसही आहे. या घटनेनंतर दोन देश स्वतंत्रपणे चालू लागल्यावर सुद्धा आपले पाकिस्तानशी पाच वेळा युद्ध झाले. काश्मीर प्रश्न, दहशतवादी कारवाया यामुळेही पाकिस्तान आणि त्यासोबतचे संबंध नेहमीच चर्चेत असतात. या सगळ्या विषयांचे अनेक पैलू आहेत. त्यावर खूपदा लिहिले गेले आहे. यानंतरही खूपदा लिहिले जाईल. अन तरीही खूपसे लिहिता येऊ शकेल. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर `न्यूयॉर्क टाइम्स'चे प्रतिनिधी लुकस यांनी १६ मे १९६६ रोजी, रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची हैद्राबाद येथे भेट घेतली होती. सुमारे तासभर त्यांनी विविध विषयांवर चर्चाही केली होती. त्या मुलाखतीत भारतीय राजकारण आणि पाकिस्तान या दोन विषयांवर प्रामुख्याने बोलणे झाले. `संघ आणि राजकारण' या संदर्भातही ही मुलाखत मुळातून वाचून अन समजून घेण्यासारखी आहे.
`पाकिस्तान समस्येच्या सोडवणुकीसाठी आपल्या काय सूचना आहेत?' या लुकस यांच्या प्रश्नावर गुरुजी म्हणाले होते- `दोन्ही देश एकत्र करण्याशिवाय अन्य उपाय मला दिसत नाही. दोघांचे मिळून एक राज्य व्हावे हाच एकमेव उपाय आहे. यासाठीच कार्य केले पाहिजे.' यानंतरचा प्रश्न स्वाभाविकच होता, `हे कसे साध्य करता येईल? युद्ध हा उपाय आहे का?' त्यावर गुरुजींचे नि:संदिग्ध उत्तर होते- `युद्ध हाच एकमेव उपाय नाही. हा उदेश साध्य करण्याचे अनेक मार्ग असू शकतात.' मात्र हे उत्तर देतानाच गुरुजींनी त्या अमेरिकन पत्रकाराला ही आठवण देखील करून दिली की, अमेरिकेच्या अखंडतेसाठी अमेरिकेत गृहयुद्ध झाले होते आणि हे गृहयुद्ध समाप्त झाल्यावर विजेता आणि पराभूत अशी भावनाही न राहता अमेरिका एक देश म्हणून उभा राहिला होता. गुरुजींचे हे निरीक्षण अतिशय नेमके आणि मार्मिक आहे. यावर लुकस म्हणाले- `याचा अर्थ महत्व भावनेला आणि उद्दिष्टाला आहे, असे आपल्याला म्हणायचे आहे?' त्यावर गुरुजी म्हणाले- `होय.'
मात्र युद्धाशिवाय हे कसे साध्य होईल असा प्रश्न प्रतिनिधीने पुन्हा विचारताच, `जागतिक परिस्थिती सतत बदलत असते. एखादी संधी चालत सुद्धा येऊ शकेल,' असा विश्वास गुरुजींनी व्यक्त केला होता. पाकिस्तानात सुद्धा काही लोकांना विलीनीकरण व्हावे असे वाटते, पण त्यांची तोंडे बंद केली जातात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यानंतर लुकस यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले- `आपण म्हणता हा हिंदूंचा देश आहे. मग हिंदू-मुसलमान सद्भावनेने कसे राहतील? पाकिस्तानचे मुसलमान भारतात आले तर लोकसंख्येचा समतोल बिघडणार नाही का?' यावर गुरुजींनी दिलेले उत्तर अत्यंत मननीय आहे. गुरुजी म्हणाले- `सगळी अडचण ही आहे की, हिंदू आणि मुसलमान या दोघांकडे दोन परस्पर विरोधी गट याच दृष्टीने पाहिले जाते. ते दोघे एकत्र नांदू शकत नाहीत असाच सिद्धांत गेल्या ५०० वर्षात लादण्यात आला. पण ते दोघेही चांगल्या प्रकारे राहू शकतात यावर माझा विश्वास आहे. चुकीचा दृष्टीकोन सोडून आम्ही सर्व एकाच राज्याचे नागरिक आहोत, हा अगदी साधासुधा दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. कुणालाही विशेष सवलती दिल्या जाऊ नयेत. असा विचार जर स्वीकारण्यात आला तर सर्व काही ठीक होऊन जाईल.'
यावर प्रतिनिधीचा प्रश्न होता- `मुसलमान आपला इतिहास कसा सोडू शकतील?' या प्रश्नावर गुरुजी म्हणाले, त्यांचा व आमचा इतिहास एकच आहे. आजचे मुसलमान मूळ याच भूमीतील आहेत. बाहेरून आलेले नाहीत. हिंदू व मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आजचा मुसलमान स्वत:ला आपल्या पूर्वजांशी जोडू इच्छितो की, उपासना पद्धतीच्या आधारावर आक्रमकांशी जोडू इच्छितो? उपासना पद्धती एक असल्याने आक्रमक आपला होऊ शकत नाही. आजच्या मुसलमानांचे मूळ येथेच आहे. त्यांनी मुळाशी जोडून घ्यावे.'
पुन्हा एकदा प्रतिनिधीचा स्वाभाविक प्रश्न आला- `या सगळ्यांचे पुन्हा धर्मांतर करावे असे आपण म्हणता काय?' गुरुजींनी नि:संदिग्ध उत्तर दिले- `होय. मी असे म्हटले आहे. परंतु त्यांचे धर्मांतर जबरदस्तीने करावे असे मी म्हणत नाही. जे लोक जबरदस्तीने मुसलमान बनविले गेले, त्यांनी मातृधर्मात परत यावे हाच सर्वोत्तम मार्ग होय. परंतु ज्यांनी इस्लाम धर्माचे अध्ययन केल्यानंतर त्या धर्माविषयी ज्यांच्या मनात गोडी उत्पन्न झाली, तसेच इस्लाम धर्म हाच त्यांच्या मनाला अनुकूल आहे असा अनुभव ज्यांना येतो किंवा एवढ्या दीर्घ काळपर्यंत इस्लाम मतानुयायी राहिल्यामुळे ज्यांच्या ठिकाणी त्या धर्माविषयी ममत्व निर्माण झालेले आहे त्यांनी मुसलमान राहावे. पण त्यांनी आपली आनुवंशिकता का सोडावी? आणि आपापसात संघर्ष तरी का करावेत? आम्ही इस्लाम धर्माविरुद्ध नाही. हिंदू अतिशय उदार असतो. वैदिक आणि अवैदिक या सर्वांसाठी हिंदू धर्मात स्थान आहे. आम्ही येथील मुसलमानांच्या मनोवृत्तीच्या विरुद्ध आहोत. आम्हा दोघात तिसरा पक्ष नसता तर आम्ही ही समस्या फार चांगल्या रीतीने सोडवून घेतली असती. इतर मतांचे लोक ज्याप्रमाणे हिंदू धर्माच्या अंतरंगात राहतात त्याचप्रमाणे मुसलमानही राहू शकतात.'
गुरुजींच्या या मुलाखतीला सुमारे ५० वर्षे झाली आहेत. काही बदलही या काळात झालेला आहे. पण त्यातील मूळ भावना आजही सयुक्तिक आहे. या भूमिकेवर जे असहमत आहेत त्यांच्याच मनात खरे पाहता मुसलमानांविषयी विश्वास नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वासाचाही अभाव आहे, असेच म्हटले पाहिजे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ ऑगस्ट २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा