संसदेत आज एका खासदाराने बोलताना आवाहन केलं, `मै अपने बहनो से भी कहना चाहुंगा की वो भी ढंग के कपडे पहने.' त्यावरून महिला खासदार संतापल्या आणि त्यांनी त्या खासदार महोदयांना धारेवर धरले. त्यानंतर त्या खासदार महाशयांनी माफी मागितली आणि प्रकरण संपले.
ही बातमी पाहिली त्याच क्षणी मी ठरवले की आपण तमाम महिला वर्गाच्या पाठीशी उभे राहायचे आणि त्यांचा रोष ओढवून न घेता त्यांच्या कौतुकास पात्र व्हायचे. त्यामुळे मीही तमाम महिला वर्गाला आवाहन करतो की, `त्यांनी मुळीच चांगले आणि सभ्य समजले जाणारे कपडे घालू नये. त्यांना हवे तसे अंग प्रत्यंगांचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा लावल्यासारखेच कपडे घालावेत. खरे तर कपडे घालणे हाच मानवी सभ्यतेने केलेला महिलांवरील अन्याय आहे असे वाटत असेल तर त्यांनी त्यावर पुनर्विचार करायलाही हरकत नाही.'
माझे हे आवाहन तमाम महिला खासदार, सगळ्या महिला आयोगांना वगैरे पाठवून द्यावे असा विचार करतो आहे. आणि त्यांच्याकडून कौतुकाची थाप अन गेला बाजार `समस्त महिला हितकर्ता' वगैरे बिरूद असलेले प्रमाणपत्र मिळावे अशी किमान अपेक्षा करतो. मानवी इतिहासात मोलाची भर घालणाऱ्या माझ्या या कार्याची आपणही जाणीव ठेवाल ही अपेक्षा.
- श्रीपाद कोठे
७ ऑगस्ट २०१४
मानवी जीवनात सुविचारांचे, आदर्शांचे एक स्थान असते आणि दुसरीकडे व्यवहार असतो. लाखो वर्षांपासून हा झगडा सुरु आहे आणि माणूस हळूहळू आदर्शाकडे वाटचाल करतो आहे. कोणत्या तरी पुस्तकात, पोथीत, भाषणात, प्रवचनात, राज्यघटनेत एखादी गोष्ट लिहिली की ती प्रत्यक्षात येते असे नाही. मुळात हे विश्व, त्यातील माणूस, माणसातील स्त्री आणि पुरुष, त्यांचे गुण-दोष, जीवनाचा अर्थ अशा अनेक व्यापक परीघांचा विचार महत्वाचा असतो. म्हणूनच आपल्या परंपरेने जेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या अवगुणांची चर्चा केली तेव्हा ते पुरुषांचे किंवा स्त्रियांचे म्हणून केली नाही. खर तर अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे चांगले किंवा वाईट, गुण किंवा दोष यांची चर्चा स्वतंत्रपणे, समग्र मानवी जीवनाच्या संदर्भात व्हायला आणि करायला हवी. आज ती तशी होत नाही हे दुर्दैव आहे. पुरुषांनी काही म्हटलं की बायकांनी तलवारी काढायच्या आणि बायकांनी काही म्हटलं की पुरुषांनी तलवारी काढायच्या. (याखाली याच पोस्ट संबंधाने अन्यत्र झालेल्या चर्चेतील माझ्या प्रतिक्रिया देत आहे. त्यावरून विषय स्पष्ट होईल अशी आशा करतो.)
बलात्कार आणि पोषाख यांचा संबंध नाहीच. हे दोन्ही वेगळे विषय आहेत. म्हणूनच तो संबंध जोडणारे पुरुष जेवढे उथळ वा अविचारी तेवढ्याच पोषाख हे बलात्काराचे कारण नसल्याने आम्ही असंस्कृत पोषाख करायला स्वतंत्र आहोत असे म्हणणाऱ्या महिला किंवा पोशाखावर बोललं की लगेच ती चर्चा सुसंस्कृत सामाजिक जीवनाकडे नेण्याऐवजी बलात्काराकडे नेणे हे उथळपणा आणि अविचाराचे म्हणावे लागेल. एक मुद्दा सरळ संबंधित नसला तरीही विचारार्थ मांडतो. कारण म्हातारी मेल्याचं दु:ख नसलं तरीही काळ सोकावतो. मुद्दा हा की, आज महिलांच्या संबंधात बोललं की आगपाखड सुरु होते. are women above scrutiny? गुणांप्रमाणेच दोष आणि विकृतीही लिंगनिरपेक्ष असते. त्याचा तसाच विचार हवा. आज अभद्र पोषाख करणाऱ्या महिला, मुली तो तसा का करतात? त्यामागची भावना, वृत्ती अयोग्य आहे की नाही? खरे तर सभ्यता, समाज, सहअस्तित्व याविषयी आस्था असणाऱ्या महिलांनी स्वत:च याची सामाजिक चर्चा घडवायला आणि करायला हवी.
तुम्हाला काय माहीत मी मुग गिळून बसलो की नाही ते? का हो स्वत:ची अक्कल पाजळण्याची आणि उतरवून घेण्याची घाई झाली आहे तुम्हाला?
संस्कृती स्त्रियांच्या कपड्यांवर अवलंबून नाही. अगदी बरोबर पण म्हणून असलेले संस्कार, सीमा, आदर्श सोडून द्यावे असे नाही ना? असलेले टिकवून जे अनिर्बंध वागतात त्यांनी मर्यादा पाळाव्या यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याउलट असलेला चांगुलपणा सोडण्याची वृत्ती कितपत योग्य? काय चांगले काय वाईट याचा विचार निरपेक्षपणे करायला हवा. दुसरा चांगला वागत नाही म्हणून आम्हीही चांगले वागणार नाही हा तर्क योग्य राहील का? आज ज्या पद्धतीची वेषभूषा केली जाते त्यामागील तर्क काय? त्यामागचा विचार काय? कशासाठी केली जाते अशी वेषभूषा? आणि एखादी गोष्ट म्हटली की ती आपल्यालाच लागू होते असे जर समस्त स्त्री वर्ग समजत असेल तर कठीण आहे. आजही मर्यादाशील तरीही कर्तृत्ववान महिला आहेतच ना? ज्या ताळतंत्र सोडून वागतात त्यांचाच प्रश्न आहे. खरे तर ज्यांना समाज, चांगुलपणा, सहजीवन वगैरेबद्दल आस्था आहे त्या महिलांनीही अनिष्ट गोष्टींच्या विरोधात `आम्ही महिला' असा हेका न ठेवता उभे राहिले पाहिजे.
समाजातील सगळ्या पुरुषांना संपवून केवळ स्त्रियांचा समाज उभा करा आणि मग केवळ आम्ही ठरवू म्हणा. जोवर समाज म्हणजे स्त्री व पुरुष आहे तोवर आम्हीच ठरवू हे म्हणणे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. यानंतर मी तुमच्या मूर्ख कमेंटना उत्तरे देणार नाही कारण सार्थक चर्चा करण्याची तुमची तयारी व हेतू दोन्ही नाही आणि मला निरर्थकात स्वारस्य नाही. तुम्ही मला ओळखत नाही. पण नम्रपणे पण स्वाभिमानाने एकच नमूद करतो की माझ्या जवळ उभे राहण्याची सुद्धा तुमची लायकी नाही. आपण एखाद्याला वाट्टेल तसे बोललो की महान होतो असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे तुम्हाला लखलाभ असो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा