रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कावेबाज

एका मोठ्या साहित्यिकाची एक पोस्ट थोड्या वेळापूर्वी वाचण्यात आली. नाव सांगितले की वाद होतो आणि विषय भरकटतो म्हणून सांगत नाही. पण आज मराठी जगात परिचित आणि प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी लिहिले आहे - 'सगळे धर्म आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा करतात. सगळे सारखे असं कोणीही म्हणत नाही.'

आपण किती चुकीचं लिहितो, किती दिशाभूल करतो आणि पर्यायाने मानवतेचा गुन्हा आणि मानत असेल तर पाप करतो, हे या महान लेखक महाशयांना कळत नसेल का? बरे सामान्य माणूस अशा लिखाणावरूनच आपले विचार, मते, भावना घडवत असतो. मग एवढा निर्लज्जपणा अशा साहित्यिकात का येतो? की हा माज असतो? की जाणीवपूर्वक घेतलेली धोरणी भूमिका असते ही?

साधं स्वामी विवेकानंद यांचं शिकागो परिषदेतील पहिलं छोटंसं भाषण वाचलं किंवा त्यांनी त्यात उद्धृत केलेला चार ओळींचा श्लोक वाचून समजून घेतला तरीही या महाशयांना आपली भूमिका बदलावी लागेल. बरं तर बरं हे भाषण इतक्या वेळा चर्चेत असतं की त्यासाठी वेगळे सायास करण्याची गरज नाहीच. पण या महाशयांनी त्याकडे लक्ष दिले नसेल किंवा दुर्लक्ष केले असेल. लक्ष दिले नसेल तर त्यांच्या एकूणच वकूबावर आणि integrity वर प्रश्नचिन्ह लागते आणि दुर्लक्ष केले असेल तर ते बदमाश ठरतात. वास्तविक तिसरी शंकाच सार्थ आहे. ती म्हणजे 'हिंदूंचा' मानभंग करण्याचा polished, refined धोरणी कावा.

समाजानेच अशा 'मान्यवरांना' (!!!) मोडीत काढले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२२ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा