शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

खूप जणांना न पटणारं :

- एखादा ब्राम्हण चुकीचं वागला तर सगळे ब्राम्हण वाईट.

- एखादा पुरुष चुकीचं वागला तर सगळे पुरुष वाईट,

- एखादी स्त्री चुकीचं वागली तर सगळ्या स्त्रिया वाईट,

- एखाद्या देशाच्या प्रमुखाने चुकीचं वक्तव्य केलं तर तो देशच वाईट,

- एखाद्या शीख व्यक्तीने इंदिराजींची हत्या केली तर सगळे शीख वाईट,

- एखाद्या मराठी माणसाने गांधीजींची हत्या केली तर सगळी मराठी माणसे वाईट,

- काही मुसलमान आतंकी असतात म्हणून सगळे मुसलमान अतिरेकी,

एखाद्या कृतीसाठी एखादी जात, एखादा पंथ, एखादा देश, एखादी भाषा, एखादी संघटना; यांना घाऊक दोषी ठरवणे... गुण किंवा अवगुण यांचं समूहिकरण हे मुळातच चुकीचं आणि अपक्व बुद्धीचं लक्षण. इंग्रजी आमदनी पासून आमची विचारपद्धती बिघडवण्यात आली अन आम्हीही त्याला प्रतिसाद दिला. अगदी मुस्लिम समस्येलाही हे लागू होते.

*********

सध्या अफगाणिस्थानच्या निमित्ताने बरीच चर्चा सुरू आहे. त्यातील discourse देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम असा आहे. हे चूक आहे. अफगाणिस्थानात आतंक निर्माण करणारे मुस्लिम आहेत आणि त्यात होरपळणारेही मुस्लिम आहेत. अनेक मुस्लिम देश तालिबानला साथ देण्याला तयार नाहीत. आपल्या देशातही हळूहळू तालिबान अमान्य करणारे मुस्लिम स्वर ऐकू येऊ लागले आहेत. मुस्लिमेतर लोकांसोबतच खुद्द मुसलमानांनाही विचार करायला लावणारी सध्याची परिस्थिती आहे. अशा वेळी चर्चा योग्य वळणावर जाईल याची दक्षता घ्यायला हवी.

कोणते असेल ते योग्य वळण? मुस्लिम समाजाचे परिवर्तन हे ते योग्य वळण असेल. तालिबान म्हणजे जागतिक मुस्लिम समुदाय असं समीकरण योग्य म्हणता येणार नाही. मुसलमान समाजाची कट्टरता, त्या कट्टरतेचा गैरफायदा घेणाऱ्या मुस्लिमांमधील आणि मुस्लिमांबाहेरील शक्ती; हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. मात्र सोबतच मुस्लिम समाजातील कट्टर नसलेल्या शक्तीही आहेत हेही नाकारून चालणार नाही.

मुस्लिम राष्ट्रीय मंच असो, मुस्लिम सत्यशोधक समाज असो, बिराजदार यांच्यासारखे मुस्लिम संस्कृत पंडित असो, हिंदू ग्रंथांचे भाषांतर करणारे पारेख असोत, स्व. ए. पी.जे. अब्दुल कलाम, शिवभक्त डागर बंधू असोत, संगीत क्षेत्रातील राशीद खान किंवा झाकीर हुसेन असोत... अशी थोडीबहुत मंडळी तर आहेतच. शिवाय मुस्लिम देशात कट्टरता बाजूस सारणाऱ्या थोड्याबहुत शक्तीही आहेतच. अनेक मुस्लिम देशांच्या महिला खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये मोकळेपणाने खेळत असतात.  पाक कॉफी हाऊस नावाच्या वेबसाईटवर पाकिस्तानातीलच अनेक लोक कट्टरतेच्या विरुद्ध लिहीत असतात. अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी किंवा तीन तलाक प्रकरणी समजूतदार भूमिका घेणारे मुस्लिम होतेच. हे सगळे मुस्लिमांचे प्रतिनिधी व्हायला हवेत. ते आपोआप होणार नाहीत. त्यासाठी मुस्लिम समुदायाने प्रयत्न करणे जसे आवश्यक आहे तसेच मुस्लिमेतर लोकांनीही या परिवर्तनशील मुस्लिम लोकांची चर्चा केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे, त्यांच्या प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. कोळसा उगाळून काय होणार? अन किती उगाळायचा? जे व्हायला हवे असे वाटते त्यालाही चालना द्यायला हवीच ना? मुस्लिमेतरांच्या बोलण्यातून मुस्लिमांनाही जाणीव व्हायला हवी की, कट्टर नसलेलेही मुसलमान आहेत/ असतात आणि त्यांना स्वीकार्यता असते. कट्टरतेला स्वीकार्यता नसते हे बहुसंख्य समाजाच्या लक्षात यायला हवे.

याचा अर्थ हिंदू, बौद्ध वा अन्य समुदायांनी भोळसट राहावे अस नाही. सावधगिरी, तत्परता, चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार करण्याची सिद्धता; हे सगळे हवेच. परंतु एकमेकांचा गळा घोटण्याच्या वृत्तीने काहीही साध्य होत नाही, याचं realization होण्यासाठी आवश्यक असा अवकाश आणि असा discourse याही आवश्यक बाबी. अन ही मुस्लिम आणि मुस्लिमेतर दोघांचीही जबाबदारी ठरते. घाऊक विचार न करता 'माझी जबाबदारी' असा विचार करायला हवा. शेवटी 'तू असा, तू तसा' असं करून साध्य तर काही होणार नाहीच ना?

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा