आज दिव्यांची अमावास्या. आपल्या येथे एक प्रार्थना आहे-
असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय...
यातील `तमसो मा ज्योतिर्गमय' याचं चिंतन करण्याचा आजचा दिवस. अंधारातून प्रकाशाकडे असा त्याचा अर्थ सांगितला जातो, ऐकला जातो, समजला जातो. परंतु तो फार ढोबळ आहे. आपले ऋषी उथळ नव्हते, वरवर विचार करणारे किंवा सुविचार रचणारे नव्हते. ते जीवनाचं सत्य आकलन करून त्याची मूलगामी अन निर्भीड मांडणी करणारे होते. या प्रार्थनेत त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे जायला सांगितले नसून तमाकडून ज्योतीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातील सूक्ष्मता लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. तम म्हणजे अंधाराचा आदिपुरुष म्हणायला हरकत नाही. अंतर्बाह्य काजळी, अंतर्बाह्य शून्यता, अंतर्बाह्य अभाव म्हणजे तमस. हा तमस दूर करण्यासाठी ज्योत होण्याची आकांक्षा आहे. प्रकाश हा ज्योतीचा परिणाम आहे. प्रकाश ही ज्योतीची आभा आहे. प्रकाश परजीवी आहे. स्वत:चा अंधार दूर करण्याची ताकद प्रकाशात नाही. ती ताकद ज्योतीत आहे. उपदेश ज्योत होण्याचा आहे. तमस दूर करण्यासाठी स्वत: ज्योत होण्याचा, स्वत: जळण्याचा, जळून उजळण्याचा संदेश. ही आहे या प्रार्थनेची विशेषता. प्रकाशात जा. स्वत:चे काम उरकून घ्या. ज्योत विझली की पुन्हा दुसऱ्या ज्योतीची प्रकाशासाठी वाट पाहा; हे ऋषींना मान्य नाही. त्याचा उपयोगही नाही. अनादी तमस दूर करण्यासाठी ज्योत व्हावे लागेल. जळण्यासाठीची ऊर्जाही त्याच तमसातून प्राप्त करावी लागेल. प्रकाश देणारी ज्योत स्वत: उर्जावान, ज्योतिर्मय असते. थोडीसुद्धा झळ न लागता प्रकाशाकडे जाता येतं, प्रकाशात आपले हेतू, आपली कामं साधून घेता येतात. ऋषींना एवढी कृपणता अपेक्षित नाही, मान्य नाही. अंधार, उजेडाचा खेळ त्यांना कळतो पण हा अंधार उजेडाचा खेळ ज्यातून येतो अन ज्यात विलीन होतो; ती ज्योतिर्मयता ऋषींना हवी आहे. उर्जस्वल, ज्याच्या पलीकडे काही नाही ते प्राप्त करण्याची आकांक्षा आहे ही. थोड्याथोडक्याने समाधान पावणारी व्यवहारचतुरता नाही. आजची दीपपूजा ज्योतिर्मय होण्याची आकांक्षा जागी करो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
२ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा