कर किती असावेत यावर चाणक्याने सांगितलेला आदर्श आहे - मधमाशी फुलातून मध गोळा करते तसा.
आज मात्र मिळेल तिथून आणि मिळेल तेवढा खिसा कापावा, असे पाहायला मिळते. नागपूर मनपाने कचरा गोळा करण्यासाठी पैसे आकारणी सुरू केली आहे. याच क्षणी मनपाची वार्षिक मालमत्ता कराची पावती पण माझ्यासमोर आहे. त्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे कर आहेत. वीज, रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी. घराचा कर तर वेगळाच. मग पुन्हा कचरा संकलनासाठी शुल्क आकारणी का? वार्षिक करातून खर्च भगत नाही असा तर्क दिला तरी एक प्रश्न उरतो की, मालमत्ता कराचे काय करतात? तो तर सर्वाधिक आहे. वीज, रस्ते इत्यादींवरील कर घेतात तेव्हा त्या बदल्यात नागरिकांना काही तरी देतात. मालमत्ता कराच्या बदल्यात तर काहीच देत नाहीत. करोडो रुपये काहीही न देण्यासाठी कमवायचे अन तरीही कचरा संकलनासाठी शुल्क आकारायचे? बरे कचरा, सांडपाणी या नागरिकांकडून फुकट मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करूनही कमाई केली जातेच. मग असे का? आजची एकूणच व्यवस्था अशी आहे की, तिचे पोट कधीच भरत नाही. पण व्यवस्थेला झालेल्या भसम्या रोगाचा भुर्दंड नागरिकांवर कशासाठी? खूप काही चुकते आहे हे नक्की.
- श्रीपाद कोठे
१० ऑगस्ट २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा