दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. अन आज दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर बातमी पाहिली की, तेलबीयांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या तेलबीयांचे उत्पादन होते. त्या त्या भागात बहुतेक तीच तेले वापरली जातात. तेल काढण्याचे तंत्रज्ञान आणि उद्योग फार जुने आहेत आणि सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या संदर्भात देश स्वयंपूर्ण होण्याला काहीच हरकत नाही. फक्त त्यासाठी मानसिकता आणि त्यानुसार व्यवस्था, नियम, कायदे इत्यादी हवेत. मोठे तेल उत्पादक, ब्रँडिंग, पॅकेजिंग, नव तंत्रज्ञान; या चक्रातून बाहेर पडण्याची गरज आहे. समाजाला आणि सरकारलाही. त्यासाठी प्रथम देश स्वयंपूर्ण याऐवजी, प्रत्येक जिल्हा खाद्यतेलात स्वयंपूर्ण व्हावा अशी शब्दावली वापरावी. जुन्या तंत्रज्ञानाने तेल उत्पादन केल्याने काहीही बिघडत नाही. पॅकेजिंग नसेल तरी लोक आपापल्या कंटेनरमध्ये तेल घेतील. मोठ्या कंपन्या रडल्या तरी त्याकडे लक्ष देऊ नये. एक कंपनी अजस्र होण्यापेक्षा तेल उत्पादनाच्या हजार स्थानिक कंपन्या झाल्याने काहीही फरक पडणार नाही. स्वयंपूर्णता येईल आणि देशाचे उत्पादन आणि गंगाजळीही वाढेलच. हे छोटे तेल उत्पादक जसजसे सशक्त होतील तसे नवीन तंत्रज्ञान इत्यादीकडे वळतील. विचार करण्याची आणि पाहण्याची दृष्टी मात्र राज्यकर्ते, प्रशासन, नीतीनिर्धारक यांना सुधारून घ्यावी लागेल एवढेच.
- श्रीपाद कोठे
१३ ऑगस्ट २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा