शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने...

श्रीमती मृणालिनी बोस यांना २३ डिसेंबर १९०० रोजी देवघर येथून लिहिलेल्या दीर्घ पत्रात स्वामीजींनी व्यक्ती व समाजाच्या संबंधांवर सखोल विचार मांडले आहेत. स्वामीजी म्हणतात- `व्यक्तीला व्यक्तिगत स्वाधीनता म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य आहे किंवा नाही; असेल तर ते किती प्रमाणात असणे उचित; व्यष्टीने समष्टीसाठी स्वत:च्या इच्छाशक्तीचा, स्वत:च्या सुखाचा अगदी संपूर्णपणे त्याग करावा किंवा नाही; हे प्रश्न प्रत्येक समाजापुढे अगदी अनादि काळापासून उभे आहेत. सर्वच समाज या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. आधुनिक पाश्चिमात्य समाजात हेच प्रश्न प्रचंड लाटांसारखे उसळून धुमाकूळ घालत आहेत. जे मत, व्यक्तिगत स्वाधीनतेचा वा व्यक्तीस्वातंत्र्याचा समाजाच्या सत्तेपुढे बळी देऊ इच्छिते त्या मताचे इंग्रजी नाव आहे `सोशॅलिझम' आणि व्यक्तित्वाची तरफदारी नि समर्थन करणाऱ्या मताला म्हणतात `इंडिव्हिज्युअॅलिझम'. पुढे स्वामीजी म्हणतात- `नियम आणि शिस्त यांच्या जोरावर व्यक्तीला समाजाचे गुलाम बनविण्याचे व तिला जबरदस्तीने आत्मसमर्पण करावयास भाग पाडण्याचे काय फळ आणि काय परिणाम होत असतात याचे आपली मातृभूमी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या आपल्या देशात माणसे शास्त्रोक्त विधीनुसार जन्मतात, खाणेपिणे वगैरे गोष्टीही जन्मभर शास्त्रीय नियमांनुसारच करतात, विवाह वगैरे तद्वतच शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करतात. फार काय पण प्राणदेखील शास्त्रातल्या साऱ्या विधींच्या अनुसारच सोडतात. या कठोर शिस्तीमध्ये फक्त एकच मोठा गुण आहे, बाकी सारे दोषच दोष आहेत. गुण हाच की, एखाददुसरे काम पिढ्यानपिढ्या रोज करीत गेल्याने अंगवळणी पडून लोक ते अगदी थोड्या श्रमात अतिशय चांगल्या रीतीने करू शकतात. चिखलाचे तीन पेंड आणि चारदोन लाकडे यांच्या मदतीने या देशातला आचारी जी चवदार भात भाजी बनवतो तशी आणखी कुठेही बनावयाची नाही. कुठल्या की जुन्या जमान्यातला एक रुपया किमतीचा माग अन पाय ठेवायला एक खळगा एवढ्या सामग्रीवर वीस रुपये वाराचा किनखाप फक्त या देशातच होणे संभवनीय आहे. एक फाटकी चटई, एक मातीची पणती अन तिच्यात एरंडीचे तेल - एवढ्या साहित्यावर दिग्गज पंडित या देशातच होतात. वेड्याबिद्र्या बायकोवर सर्वसहिष्णू प्रीती आणि फक्त कुंकवाला आधार अशा कुचकामाच्या, बदमाश नवरोजीवर आमरण भक्ती फक्त या देशातच शक्य आहे. हे झाले गुणाविषयी.'

`परंतु या साऱ्या गोष्टी माणसे अगदी निष्प्राण यंत्रांप्रमाणे करीत असतात. त्या साऱ्यात मनाचे स्फुरण नसते. हृदयाचा आविष्कार नसतो. प्राणाचे स्पंदन नसते. आशेचा आवेग नसतो. इच्छाशक्तीचा प्रबल आवेश नसतो. सुखाची उत्कट अनुभूती नसते. दु:खाचाही दाहक स्पर्श नसतो. कल्पक बुद्धीची लखलख नसते. नवलाईची आस नसते. नवीन गोष्टींची कदर नसते. असल्या मनावरचे मळभ कधीच विखरत नाही. उगवत्या सूर्याचे उज्वल दृश्य असल्या चित्ताला कधीच मोहवीत नाही. या अवस्थेपेक्षा काही चांगले असेल काय असे या असल्या मनात कधीही यावयाचे नाही. आले तरी त्याचा त्यावर विश्वास बसावयाचा नाही. विश्वास बसला तरी त्याच्याकडून उद्योग व्हावयाचा नाही आणि उद्योग झाला तरी उत्साहाच्या अभावी तो तसाच जिरून जाईल.'

या पत्रात पुढे ते म्हणतात- `तर मग काय आत्मत्याग हा धर्म नाही? आत्मसमर्पण हा गुण नाही? अनेकांप्रीत्यर्थ एकाच्या सुखाचा, एकाच्या कल्याणाचा होम करणे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म नव्हे? अगदी बरोबर. पण आपल्याकडे म्हणतात ना की, घासल्यापुसल्यानं का रूप येतं? मारूनमुटकून का प्रेम उद्भवतं? जो कायमचाच भिकारी आहे तो त्याग तरी कसला करणार अन त्याच्या त्यागाचे गोडवे तरी कसले गायचे? ज्याची इंद्रिये कुचकामाची आहेत, त्याच्या इंद्रियसंयमात काय पुण्य? भावभावना नाहीत, हृदय नाही, महत्वाकांक्षा नाही, समाज कशाशी खातात हेही माहीत नाही अशा इसमाचा कसला आला आहे परत समाजाप्रीत्यर्थ आत्मत्याग अन आत्मसमर्पण? जुलुमाने सती जाणे भाग पाडण्यात कसला आला आहे पातिव्रत्याचा आविष्कार? खुळचट समजुती अन अंधविश्वास लोकांच्या डोक्यात कोंबून त्यांना पुण्य करावयास लावण्यात काय स्वारस्य? माझे म्हणणे आहे की बंधने मोकळी करा. लोकांची बंधने मोकळी करा. जितकी शक्य आहेत तितकी बंधने मोकळी करा. समाजासाठी जेव्हा स्वत:ची समस्त सुखेच्छा बळी देऊ शकाल तेव्हा तर तुम्ही बुद्ध होऊन जाल. तुम्ही मुक्त होऊन जाल. पण ती फार दूरची गोष्ट आहे. मात्र ते सारे जुलूम जबरदस्तीने साधता येणे शक्य आहे असे का तुम्हाला वाटते? जो वीर आहे तोच आत्मत्याग करू शकतो. तोच आत्मसमर्पण करू शकतो. जो भ्याड असतो तो चाबकाच्या भयाने एका हाताने डोळे पुसतो नि दुसऱ्या हाताने दान देतो. काय उपयोग त्याच्या त्या दानाचा?'

शिकागो येथून २४ जानेवारी १८९४ रोजी आपल्या मद्रासी भक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात- `जातीभेद राहील अथवा नष्ट होईल या प्रश्नाशी मला काहीच कर्तव्य नाही. भारतात किंवा भारताबाहेर मानवजातीने ज्या उदात्त विचारांना जन्म दिला त्या साऱ्यांचा प्रचार अगदी खालच्या वर्गापर्यंत, अगदी गरीब लोकांपर्यंत करणे हेच माझे उद्दिष्ट होय. मग त्यांना जे काय करावयाचे असेल त्याचा विचार तेच करतील. जातीभेद राहावा की नष्ट व्हावा, स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे की नसावे याविषयी डोके शिणविण्याचे मला काहीच कारण नाही. जीवन, विकास व सुखशांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट होय आणि ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर मानव म्हणा, मानववंश म्हणा, की राष्ट्र म्हणा, त्यांचे पतन अटळ होय. जातीभेद राहो की न राहो, एखादी विशिष्ट मतप्रणाली प्रचलित असो की नसो, ; जी व्यक्ती, जो वर्ग, जी जात, जे राष्ट्र वा जी संस्था मनुष्याच्या स्वतंत्र आचारविचार शक्तीला वाव देत नाही ती अन्यायी आहे असे समजावे व तिचे अध:पतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात या स्वतंत्रतेमुळे दुसऱ्याचे अनिष्ट होता कामा नये हे ध्यानात ठेवले पाहिजे.'

मेरी हेल यांना १ नोव्हेंबर १८९६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी खूप मुलभूत आणि आधारभूत असा विचार मांडला आहे. हिंदू जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी आणि आज माणसाच्या जगण्यापुढे उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याची शक्ती त्या विचारात आहे. स्वामीजी म्हणतात- `सुवर्णाचे सुवर्णत्व, रजताचे रजतत्व, मनुष्याचे मनुष्यत्व, स्त्रीचे स्त्रीत्व, प्रत्येक वस्तूचे यथार्थ स्वरूप ब्रम्हच होय. या ब्रम्हाची अनुभूती बाह्य जगतात करून घेण्याचा प्रयत्न आपण अनादि काळापासून करीत आहोत. या प्रयत्नात आपले मन पुरुष, स्त्री, बालक, शरीर, मन, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, जगत, प्रेम, द्वेष, मालमत्ता, संपत्ती इत्यादी, तसेच भुते, सैतान, देवदूत, देवदेवता, ईश्वर इत्यादी अद्भुत गोष्टी निर्माण करीत आहे. सत्य असे आहे की, ब्रम्ह आपल्या आतच आहे. आपणच ब्रम्ह आहोत. तो शाश्वत द्रष्टा, तो यथार्थ `अहं' आपणच आहोत. तो कधीही विषय होऊ शकत नाही. त्याला विषयीभूत करण्याचा सगळा प्रयत्न म्हणजे काळ आणि बुद्धी यांचा अपव्यय होय. जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते तेव्हा तो ब्रम्हाला `विषयीभूत' करण्याचा (समजून घेण्याचा) नाद सोडून देतो आणि अंतर्जगताकडे वळून अंतरात्म्यात अधिष्ठित होण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. यात क्रमश: शरीराकडे कमी लक्ष दिले जाते व मनाकडे जास्त लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील `मनस'पासून बनला आहे. मनस म्हणजे विचार. मनुष्य म्हणजे मननशील म्हणजेच विचार करणारा प्राणी होय. केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारा प्राणी नव्हे. यालाच धर्माच्या शास्त्रात त्याग असे म्हणतात. समाजरचना, विवाहसंस्था, अपत्यप्रेम, सत्कृत्ये, सदाचरण, नीतिशास्त्र ही सर्व त्यागाची विविध रूपे होत. आपले सर्व प्रकारचे सामाजिक जीवन म्हणजे इच्छाशक्ती, तृष्णा व वासना यांचा संयम होय. या जगात जेवढे समाज किंवा सामाजिक संस्था आहेत त्या सर्व म्हणजे या जगातील एकाच गोष्टीची निरनिराळी रूपे वा स्तर होत. ती गोष्ट म्हणजे, इच्छाशक्तीचा वा भासमान `अहं'चा त्याग होय. स्वत:तून जणूकाही बाहेर उडी मारण्याची जी इच्छा आहे तिचा त्याग. जो नित्यज्ञाता आहे त्याला ज्ञेय बनविण्याचा जो प्रयत्न चालू असतो त्याचा त्याग. सर्व सामाजिक संस्था म्हणजे याच त्यागाची विभिन्न रूपे होत. या आत्मत्यागाचा, अर्थात इच्छाशक्तीच्या निरोधाचा सर्वात सोपा अथवा सरळ असा मार्ग म्हणजे प्रेम होय; द्वेष हा अगदी त्याविरुद्ध मार्ग होय.'

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा