मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

बालुजी

काल बालुजी गेले. अन अनेक आठवणींनी मनात गर्दी केली. मन मागे गेलं अन एका शिशू शिबिरावर थांबलं. त्यावेळी नागपूरचं शिशू स्वयंसेवकांचं एक दिवसीय शीत शिबिर होत असे. सकाळी नागपूरजवळच्या खापरी गावच्या विस्तीर्ण शेतात जायचं. दिवसभर कार्यक्रम, भोजन इत्यादी. संध्याकाळी समारोप आटोपून घरी परत. अशाच एका शिबिरातले बालुजी आठवले. खापरीच्या विस्तीर्ण मैदानावरील मंडपात कथाकथनासाठी सगळे शिशू स्वयंसेवक जमले होते. त्यात मीही होतो आणि बालुजी ध्वनिक्षेपकावरून गीत सांगत होते - 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य मातरम'. त्या दिवसभरात केव्हा तरी ते माझ्याशी काहीतरी बोललेही होते एवढंच आठवतं.

त्यांची दुसरी प्रतिमा आठवली ती, आणीबाणी लागली त्या दिवशीची. सकाळी १० च्या सुमारास ते घरी आले होते. जूनचा महिना. पाऊस धो धो कोसळत होता. माझे लहान मामा प्रचारक. ते भूमिगत होणार हे सांगायला आणि त्या अनुषंगाने काही सूचना इत्यादी सांगायला, माहिती द्यायला ते आले होते. धो धो कोसळणाऱ्या पावसात डकबॅकचा रेनकोट घालून त्यांच्या व्हेस्पा स्कुटरवर ते आले. रेनकोट न काढताच दारातच ५-१० मिनिटे आईशी काही बोलले आणि गेले. नंतर एकदम घरी आले ते आणीबाणीनंतर घरी झालेल्या प्रचारकांच्या बैठकीसाठी. त्यावेळी वय लहान होते त्यामुळे फार आठवत नाही. पण त्या बैठकीला स्व. मोरोपंत पिंगळे आले होते आणि कोणाच्या तरी आग्रहावरून 'पेढ्याच्या पोळ्यांचा' बेत होता एवढे आठवते.

अधूनमधून घरी किंवा कार्यक्रम, उत्सवात बालुजी दिसत. बोलत. विचारपूस करत. साधारण १९८० च्या सुमारास ते नागपुरातून बंगालमध्ये गेले. त्यानंतर त्यांचे तेच कार्यक्षेत्र झाले. नंतर काही काळ अखिल भारतीय जबाबदारी असल्याने संपूर्ण भारत हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. त्यामुळे १९८० नंतर भेटी फार झाल्या नाहीत. माझ्यावर लहानमोठ्या जबाबदाऱ्या येण्याची सुरुवात त्याच वेळी झाली. त्यामुळे त्यांच्या सहवासात काम करण्याचा अनुभव मात्र मिळाला नाही.

त्यानंतर दीड दोन दशकांनी त्यांच्याकडे संस्कार भारतीचे मार्गदर्शक अशीही जबाबदारी देण्यात आली. माझ्याकडे त्यावेळी संस्कार भारतीची जबाबदारी होती. त्यामुळे वर्षातून किमान एकदा, अखिल भारतीय प्रबंधकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने दोन तीन दिवस भेट होत असे. एखादे वेळी नागपूरला आले तर भेट होई. त्यांना पाहिले होते. ओळखही होती. मात्र कधी त्यांचा बौद्धिक वर्ग ऐकण्याचा योग नव्हता. २००६ च्या प्रबंधकारिणी बैठकीत लखनौ येथे तो योग आला. २००६ हे गोळवलकर गुरुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्त बैठकीत एक दिवस सकाळच्या सत्रात त्यांचे भाषण ठेवले होते. विषय अर्थातच गोळवलकर गुरुजी हाच होता. तासभराहून थोडा अधिक वेळ बालुजी इतक्या रसाळपणे बोलले की सगळं सभागृह pin drop silence नी ऐकत होतं. एक तर त्यांनी गुरुजींना अतिशय जवळून पाहिलं, अनुभवलं होतं. नागपूर प्रांत प्रचारक म्हणून महाल संघ कार्यालयात त्यांचा निवास होता. त्यामुळे गुरुजींशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता. गुरुजींचं कार्य, प्रवास, स्वभाव, सवयी, सलगी, प्रेम, विद्वत्ता, समर्पण, आध्यात्मिकता, शेवटला आजार; या सगळ्याचे ते साक्षीदार होते. त्या भावसंबंधांचीही त्यांच्या भाषणाला किनार होती. भाषणानंतर त्यांना भेटलो आणि दोन्ही गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे, तुमचे भाषण पहिल्यांदा ऐकले आणि दुसरे म्हणजे, गुरुजींना साक्षात उभं केलंत. त्यावर पाठीवर थाप मारून मोकळं हसले होते. त्यांचं असं दिलखुलास हसणं हा एक अनुभव होता.

एक प्रसंग बंगलोरच्या प्रबंधकारिणी बैठकीच्या वेळचा. त्या दिवशी शनिवार होता. तेव्हा मी शनिवारचा उपवास करीत असे. सकाळी नाश्त्याची वेळ होती. उपवासाची सोय असण्याचे अर्थात काही कारण नव्हते. तशी काही सूचनाही दिली नव्हती. पण चहा घ्यावा म्हणून भोजन मंडपात गेलो. चहा घेत होतो तर समोर बालुजी आले. म्हणाले, 'नाश्ता झाला का?' म्हटले, 'नाही. आज शनिवारचा उपवास आहे.' चहा झाला. बैठकीला निघून गेलो. बैठकीनंतर बालुजी मला शोधत आले. म्हणाले, 'हे घे.' त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी गुळ दाणे आणले होते. म्हणाले, 'अरे, तुला शोधलं मघा. तू बैठकीत होता. तुझा उपवास आहे नं. नाश्ता केला नाही. हे खाऊन घे.' काय बोलावे मला कळेना. लोक संघाची खूप चर्चा करतात. तरीही त्यांना संघाचे रहस्य कळत नाही. संघाचे रहस्य बालुजींसारख्या कार्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा असा व्यवहार हे आहे.

गेली काही वर्षे ते नागपूर कार्यालयात मुक्कामी होते. दरवर्षी विजयादशमीला सोने द्यायला गेलं की भेट होत असेच. अन्य वेळेलाही कार्यालयात जाणे झाले की भेट होई. काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. त्यावेळी निवांत भेट झाली होती. ओळख कमजोर झाली होती. पण ओळख दिली की बोलत. त्या दिवशीही जवळपास तासभर भरपूर गप्पा झाल्या. जुन्या आठवणी, अनेकांची विचारपूस, अवांतर अशा गप्पा रंगल्या. पण थकले होते.  निसर्गक्रमाने खणखणीत आवाजाची ती कृष्णमूर्ती सार्थक आयुष्य पूर्ण करून पुढील प्रवासाला गेली. बालुजींना विनम्र नमस्कार.

- श्रीपाद कोठे

सोमवार, ३ ऑगस्ट २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा