शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

पैसा आणि प्रतिष्ठा

भाववाढ, महागाई, चलनवाढ इत्यादी बाबी कशाने होतात या प्रश्नाला, मागणी-पुरवठ्याचे तत्व, दुष्काळ, अतिवृष्टी, साठेबाजी अशी काही उत्तरे मिळू शकतात. पण या बाबी केवळ तेवढ्यावरच अवलंबून नसतात. पैशाची प्रतिष्ठेशी घालण्यात आलेली सांगड हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्यावर कधीही, कुठेही बोलले, लिहिले जात नाही. थोडी नजर इकडेतिकडे फिरवली तरीही ही गोष्ट स्पष्ट होते. रेल्वे स्थानक आणि विमानतळ येथील वाहनतळाच्या दरात मोठी तफावत असते. रस्त्याच्या कडेचा चहा, साध्या हॉटेलातील चहा अन पंचतारांकित हॉटेलातील चहा (तेथील maintainance लक्षात घेऊनही) यांच्या भावातही मोठी तफावत असते. हीच बाब खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, अन्य सामान, गाड्या अशा बहुतेक सगळ्या गोष्टींना लागू होते. वाहनतळाच्या दरातील तफावतीला जसे काहीही कारण नाही, तसेच ५-१० लाखाची गाडी आणि काही कोटींची गाडी यातील किमतीच्या फरकाला काही कारण नाही. एखादा चांगल्या कापडाचा आपल्या शिंप्याकडून शिवलेला शर्ट आणि पीटर इंग्लंडचा शर्ट याच्या किमतीत मोठा फरक का असावा? या सगळ्याचे कारण एकच- प्रतिष्ठा. मिळणारा पगार किंवा पगारवाढ यांचे तरी कारण काय असते? मिळणारा पगार न पुरणे की प्रतिष्ठा? याचे उत्तर प्रतिष्ठा हेच आहे. नाही तर आमदारांची नुकतीच झालेली पगारवाढ का झाली असती? मोठमोठ्या कंपन्यांच्या संचालकांचे, अधिकाऱ्यांचे कोटीत जाणारे पगार वा भत्ते जगण्यासाठी असतात की प्रतिष्ठेसाठी? यातूनच एक साखळी तयार होते. ही साखळी जपण्याचे प्रयत्न सतत केले जातात, करावे लागतात. एक तर खालच्यांची प्रतिष्ठा वाढू न देणे किंवा ती वाढली तर वरच्यांची आणखीन वाढवणे, असे चक्र सुरु राहते. याच्या मध्ये अनेक पायऱ्या गरजेपोटी तयार होतात. शिवाय आजचे status उद्या खाली यायला नको. म्हणजेच चल, अचल संपत्ती, गाड्या, घरे इत्यादी वाढतच राहिले पाहिजे. कमी होता कामा नये. या साऱ्याचा जगण्याशी संबंध नसतो. संबंध असतो प्रतिष्ठेशी. या दुष्टचक्रातूनच आर्थिक विषमता, शोषण, भ्रष्टाचार जन्माला येतात, वाढतात, फोफावतात. जागतिक स्तरावर देखील हेच चालते. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या गोष्टीदेखील याच साखळीचा भाग होत्या. याला अंत नाही आणि अनेक आर्थिक प्रश्नांनाही अंत नाही. कारण आर्थिक प्रश्न केवळ अर्थशास्त्राने सुटत नाहीत. तसे करणे अप्रगल्भता आहे. सेवेची अनेक कामे, गरिबांसाठीच्या योजना, रोटरी वा लॉयन्सच्या असंख्य शाखा आदींनी हे प्रश्न सुटत नाहीत. अर्थकारण हे अर्थशास्त्रासोबतच समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, विचार, भावना इत्यादी गोष्टींनी घडत वा बिघडत असते. त्यामुळेच पैसा आणि प्रतिष्ठा यांचा संबंध तोडणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय चिंतन, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदींनी यावर मुलभूत चिंतन मांडलेले आहे. यातूनच भारताची ऋषी कल्पनाही विकसित झालेली आहे. ही गोष्ट मुळातून नीट समजून घेतल्याशिवाय हिंदू संस्कृती/ भारतीय संस्कृती इत्यादी कळू शकत नाही. हिंदू वा भारतीय ही फक्त लेबले नाहीत.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा