साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकाश मेहता वादासंबंधात लिहिलेले पत्र वाचण्यात आले. त्या वादात माझी काहीही भूमिका नाही. प्रकाश मेहता वा भाजप सरकार यांचं काय होईल ते होवो. पण गंमत ही वाटली की, त्यांनी मांडलेला एक मुद्दा त्यांनाही लागू होतो. एका पक्षाचे लोक आपल्या पक्षातील दुसऱ्यांबाबत शक्यतो बोलत नाहीत. राजकारणी दुसऱ्या राजकारण्याबाबत बोलत नाही. पण पत्रकार तरी पत्रकारितेतील अनिष्ट गोष्टींवर किती बोलतात? आवटे तरी अनिष्ट पत्रकारितेवर किती बोलतात? प्रत्येकाला दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं. स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. तोच आजचा युगधर्म झाला आहे. त्याविरुद्ध उभं राहणारे- स्वत:च्या डोळ्यातील मुसळाची चिंता करणारे, अन दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळावरही लक्ष ठेवणारे हवेत. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी. मेहता चुकीचे वागलेच. पण आवटे यांनीही किमान आपल्या हाताखालील पत्रकार कधीही मर्यादा उल्लंघन करणार नाहीत, आपणच जगाचे तारणहार आहोत असा आव आणणार नाहीत, आगाऊपणा करणार नाहीत याची हमी घ्यावी. अर्थात आवटे यांचे नाव घेतले तरीही सगळ्याच संपादकांकडून ही अपेक्षा आहे.
- श्रीपाद कोठे
६ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा