सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

'होय, मी तुमचा तिरस्कार करतो...'

 फेसबुक स्मृतीतून repost.

(संदर्भ तात्कालिक आहेत, विषय सार्वकालिक.)

फेसबुकच्या कृपेने आजच्या लोकसत्तातील एक लेख डोळ्यांवर आदळला. शीर्षक आहे- `मी पोर्न पाहते, तुम्ही?' शीर्षक वाचताच त्यावर लिहिण्याचे ठरले. पण लिहायचे म्हणजे मूळ लेख पूर्ण वाचायला हवा. म्हणून तो लेख वाचला. संहिता जोशी आणि राजेश घासकडबी या दोघांनी तो लेख लिहिलेला आहे. लेख पूर्ण वाचून होताच दोनच प्रतिक्रिया मनात उमटल्या- एक म्हणजे अत्यंत टुकार लेख, अन दुसरी म्हणजे लोकसत्ताच्या लोकांना शीर्षकेसुद्धा धड देता येत नाहीत. शीर्षक वाचून जगातील कोणाचाही हा समज होईल की, लेख लिहिणारे दोघेही पोर्न पाहतात. संपूर्ण लेखात असे कुठेही म्हटलेले नाही आणि लेखाचे कितीही विश्लेषण केले तरीही, दोघे लेखक पोर्न पाहतात असा अर्थही काढता येत नाही. हे शीर्षक देणाऱ्याचा, खरे तर पत्रकारितेची सगळी पारितोषिके देऊन सत्कारच केला पाहिजे. असो. पण मी मात्र लेखकद्वय पोर्न पाहतात असा अर्थ घेऊनच माझी मीमांसा करणार आहे.

सर्वप्रथम मी हे जाहीर करतो की, मी या दोन्ही लेखकांचा तिरस्कार करतो. अन हे छापणाऱ्या अन असंबद्ध छापणाऱ्या दैनिकाचाही तिरस्कार करतो. एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो- जर पोर्न पाहण्याचा आणि आपल्या त्या कृतीला एखाद्या पुरुषार्थाप्रमाणे जाहीर करण्याचा जर कोणाला अधिकार आहे, तर मलाही कोणाचा तिरस्कार करण्याचा अन ते जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा यावर लेखकांनी, छापणाऱ्या वृत्तपत्रानी किंवा वाचकांपैकी कोणी खळखळ करण्याची गरज नाही.

लेखाचा जो इंट्रो आहे त्याची सुरुवातच आहे- `कामशास्त्राच्या देशात...' त्यामुळे प्रथम तोच मुद्दा घेऊया. अनेकदा हा उल्लेख ऐकायला मिळतो. अर्थात तो खराच आहे. रिचर्ड बर्टन नावाचा एक जगप्रसिद्ध सामाजिक विचारवंत, भटक्या असं म्हणतो की, १८७६ साली त्याने भारतीय कामशास्त्राचं भाषांतर करेपर्यंत पाश्चात्यांना या गोष्टीची `शास्त्र व कला' म्हणून जाण नव्हती. यात कोणाचेही दुमत नाही. खजुराहोच्या मंदिरांवरील कामशिल्पाचाही वारंवार उल्लेख होत असतो. पण बुद्धिवादी, आधुनिक म्हणवणाऱ्या कथित विचारकांची आणि त्यांची री ओढणाऱ्या मुर्खांची याही बाबतीत कीवच करावीशी वाटते. `काम' या गोष्टीचा भारताने सर्वप्रथम विचार केला एवढेच ते सांगतात अन तेवढेच त्यांना माहीतही असते; पण याचा सर्वप्रथम विचार करण्यासोबतच त्याचा सर्वांगांनी आणि सखोल विचारही भारताने केला आहे हे त्यांना ठावूकही नसते अन ते त्यात पडतही नाहीत. ज्यांच्या नावे `कामशास्त्र' प्रसिद्ध आहे ते वात्स्यायन हे ऋषी होते. अन त्यांनी या गोष्टीचा मानवी जीवन आणि समाज या अंगांनीही विचार केला आहे. एवढेच कशाला, अन्यही अनेकांनी याचा विचार केला आहे. हजारो वर्षांपासून एक सशक्त आणि उन्नत मानवी समाज उभा करणाऱ्या, टिकवून धरणाऱ्या अन प्रगतीपथावर नेणाऱ्या समाजाने, धर्माने या मुलभूत गोष्टीचा विचार केला नसेल असे होणेच शक्य नाही. अगदी भगवदगीतेतसुद्धा त्रोटक का होईना, पण याचा उल्लेख आहेच. स्वत: भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी श्लोक आहे- `धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ'. धर्माला अविरोधी (म्हणजे धर्माला विरोध न करणारा) काम मीच (परमेश्वर) आहे. परंतु कामशास्त्राचा विचार याचा अर्थ अंदाधुंद लैंगिकतेला मुक्त वाव असा होत नाही. विचारी वगैरे म्हणवणाऱ्यांना एवढी साधी बाब समजू नये? अन भारतीय ऋषींनी, समाज चिंतकांनी, तत्वज्ञांनी हा जो विचार केला तो, आजचे टिनपाट विद्वान म्हणतात म्हणून केला नाही. तर शुद्ध सत्याची चिकित्सा आणि त्याला असलेली संपूर्ण चराचराच्या कल्याणाची कळकळ यापोटी केला. ते जेवढे सत्यान्वेषी होते तेवढेच, स्वार्थरहित, क्षुद्रत्वरहित आणि उत्तमतेचे- उदात्ततेचे- उन्नततेचे पुजारीही होते. आपल्या वासना कशाही रीतीने पूर्ण करण्याची पाशवी धडपड हा त्यांच्या अभ्यासाचा, विश्लेषणाचा गाभा नव्हता. म्हणूनच त्यांनी याचा सखोल आणि सर्वांगानी विचार केला.

काय विचार केला त्यांनी? त्यांनी जेव्हा या संबंधात अभ्यास सुरु केला तेव्हा त्यांना लक्षात आले की, ही जीवनाची मुलभूत प्रेरणा आहे. स्थूल शारीर स्तरावर स्त्री व पुरुष यांना परस्पर शरीरांची ओढ आणि दोन शरीरांचे मिलन हे त्याचे स्वरूप. पण ओढीची हीच भावना जेवढी मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि त्याही वरच्या जाणिवांच्या स्तरावर पोहोचते तेव्हा ती विरळ होत जाते आणि त्यातील शारीर विचार कमी कमी होत जातो. सरतेशेवटी त्यातील दोन अस्तित्वांची जाणीवही लोप पावून कुठल्यातरी अनाम, अगम्य अशा एका भावनेत ती विलीन होऊन जाते. म्हणूनच आध्यात्मात सुद्धा याचा उल्लेख सापडतो. आध्यात्म चर्चा जेव्हा ज्ञानपातळीवर असते तेव्हा यालाच प्रकृती आणि पुरुष म्हणतात; आणि आध्यात्म चर्चा जेव्हा भक्ती पातळीवर असते तेव्हा याला मधुरा भक्ती म्हणतात. लौकिक, पार्थिव भावनांचा आधार घेऊन अलौकिक आध्यात्म समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

मात्र, असे असले तरीही आमचे विचारक भोंगळ, बुद्दू नव्हते. प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक वगैरे नसते याचे त्यांना भान होते. म्हणूनच `काम' या विषयाचा लौकिक विचारही त्यांनी केला. त्यांना लक्षात आले की, सगळ्या मानवांच्या ठायी ही भावना असते. मग दुसरा मुद्दा पुढे येतो की, त्याची पूर्तता व्हायला हवी. ही कशी होईल? यालाच पूरक प्रश्न म्हणजे समाज म्हणून या भावनेचे व्यवस्थापन कसे करता येईल? कोणत्याही गोष्टीप्रमाणेच काम भावनेचा प्रश्नही ज्याचा त्याच्यावर सोडला तर शक्यता ही आहे की काही जणांना त्यापासून विविध कारणांनी वंचितच राहावे लागेल. असे झाल्यास त्याचे व्यक्तीजीवनावर आणि समाजजीवनावर काय परिणाम होतील? या सगळ्या विचारमंथनातून विवाहसंस्था उत्पन्न झाली. यालाच गर्भसंभव आणि वंशसातत्य या अन्य दोन महत्वाच्या बाबींची जोड देण्यात आली. त्यातून कुटुंबसंस्था आकारास आली. मानवी भावभावना, गरजा, प्रेरणा यांचे उत्तम व्यवस्थापन याचा अर्थ `गृहस्थ जीवन'. (गृहस्थ जीवन म्हणजे कामभावना, गर्भसंभव, वंशसातत्य, परस्परावलंबन, जीवनाचा आधार... या सगळ्याचं उत्तम व्यवस्थापन आहे.) पण यातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्याच्याही अनेक अंगांचा अन पर्यायांचा विचार सुद्धा भारतीय विवाहशास्त्रात करण्यात आला. परंतु `काम' भावनेला मुक्त वाव मात्र देण्यात आला नाही.

इतका सगळा विचार करणाऱ्या भारतीय चिंतकांनी असे का केले? याची तीन कारणे असू शकतील. एक म्हणजे, `काम' भावनेची पूर्तता जवळपास अशक्य आहे. ती मानवी मनात वारंवार उद्भवते. `ययाती'चे आख्यान (ज्यावर वि.स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.) याचे प्रतीकात्मक उदाहरण आहे. दुसरीकडे मानवी इंद्रियांच्या उपभोगाला मर्यादा आहे. तिसरे म्हणजे, यासाठी मर्यादित वेळ आणि उर्जा खर्च करून मानवी जीवनातील अन्य उत्तम, उदात्त, उन्नत बाबींची साधना करणे. म्हणूनच भारतीय चिंतकांनी `काम' मुलभूत आणि आवश्यक मानूनही त्याची जागा आणि मर्यादा निश्चित केली. खजुराहोच्या कामशिल्पांचे उदाहरण देणारे लोक सोयीस्करपणे हे विसरतात की, ते मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर आहेत. आत नाहीत. `काम' ही मानवी अस्तित्वाची बाह्य बाजू आहे, ते बाहेरील आवरण आहे. तिथपर्यंतच त्याचे महत्व आणि तिथवरच त्याला प्रवेश. यापुढील वाटचाल करायची असेल तर ती भावना तेथेच उतरवून ठेवावी लागेल. हाच त्याचा आशय आणि संदेश आहे. आज पोर्नचे आणि लैंगिकतेचे समर्थन करणारे अट्टाहासाने `काम' गाभाऱ्यात नेण्याचा आग्रह धरतात. भगवान बुद्धांना एकदा एकाने विचारले- विष म्हणजे काय? त्यावर भगवान म्हणाले- कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर म्हणजे विष. वाद असेल तर फक्त एवढा आहे. भारताने/ हिंदू परंपरेने कधीच काहीही नाकारले नाही. त्यांनी फक्त जीवनाच्या व्यापक संदर्भात त्याचे प्रमाण आणि पद्धती निश्चित केल्या. आज `आधुनिकता' या नावाने जर काही सुरु असेल तर ते फक्त, हे प्रमाण आणि पद्धती मोडीत काढण्याचे प्रयत्न.

भारतीय मनिषींनी `काम' मर्यादित करून त्याचे प्रमाण जसे कमी केले तशीच त्याची पद्धतीही विकसित केली. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील निकोप कामजीवन आणि पोर्न वा मुक्त लैंगिकता यात; रांगोळ्या, आरास, सनई, उदबत्त्या यांच्यासहित पंगतीत आदराने- प्रेमाने- स्नेहाने केले जाणारे भोजन आणि भिकाऱ्याचे मांडवाबाहेरील भोजन असा फरक आहे. प्रेमादरातून कामभावनेचे शमन आणि वासनेची वखवख हा त्यातील फरक आहे. २ फेब्रुवारी १८३५ रोजी लॉर्ड मेकॉलेने ब्रिटीश संसदेत सांगितले होते, `मी संपूर्ण भारत उभाआडवा पालथा घातला. पण मला भिकारी आढळला नाही.' ब्रिटीशांचे आर्थिक धोरण पुढे चालवून आम्ही आज भारतात भिकाऱ्यांची फौज जन्माला घातली आहे. आता ब्रिटिशांनीच आंदण दिलेले विचार आणि आचार पुढे चालवून आम्ही नवीन प्रकारचे भिकारी जन्माला घालतो आहोत.

आणखीन एक गोष्ट ओघात सांगितली पाहिजे. अशा विषयांची प्रचलितपेक्षा दुसरी बाजू मांडली जाते तेव्हा `संस्कृतीरक्षक' हा शब्द शिवीसारखा वापरला जातो. अर्थात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अन तो शब्द शिवीऐवजी भूषण म्हणूनच मिरवायला हवा. पण `संस्कृतीरक्षक' असे एखाद्याबद्दल म्हटले की, त्याचा अर्थ तो माणूस वा वर्ग विचार बिचार करीत नाहीत असा लावला जातो. त्यांच्यासाठी ही माहिती देतो. आपल्या देशात आणीबाणी लागली होती. त्यावेळी संघाचे असंख्य नेते, कार्यकर्ते कारागृहात होते. सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर संघाच्या स्वयंसेवकांनी कारागृहातच काही कार्यक्रम, उपक्रम सुरु केले. (बाकीच्यांना हे सुचणे शक्यच नव्हते.) तसाच एक कार्यक्रम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होत असे. व्याख्यानांचा. कारागृहात असलेल्या अभ्यासू लोकांची व्याख्याने. नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत आणि संघाचे अनेक वर्षे अखिल भारतीय पदाधिकारी राहिलेले, श्री. मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य त्यावेळी नागपूर कारागृहात होते. बाबुरावजी जसे संघाचे कार्यकर्ते आणि भाष्यकार तसेच संस्कृतचे प्रकांड पंडित, भारतीय शास्त्रांचे अभ्यासक आणि भाष्यकार. त्यांचीही पुष्कळ भाषणे त्या उपक्रमात झाली. त्या भाषणांचे नंतर `हिंदुत्व- जुने संदर्भ, नवे अनुबंध' या शीर्षकाने एक पुस्तकही निघाले. त्यातील एका भाषणात त्यांनी `हिंदू जीवन पद्धतीतील कामभावनेचे स्थान आणि त्याचे व्यवस्थापन' हाच विषय श्रोत्यांपुढे मांडला होता. अनेक भ्रम बाळगून आपण चालत असतो. ते दूर करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हे उदाहरण दिले.

अत्यंत उथळ पद्धतीने समाजात गोंधळ निर्माण करण्याचे उद्योग आज सुरु आहेत. लोकसत्तातील आजचा संबंधित लेख त्याचेच उदाहरण आहे. म्हणूनच दोन्ही लेखक अन लोकसत्ता यांचा मी तिरस्कार करतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ९ ऑगस्ट २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा