जाती आधारित जनगणना या विषयाची चर्चा होत असते. पुन्हा सुरू झाली आहे. जी गोष्ट पुसूनच टाकली आहे तिचा आधार कसा घेतला जाऊ शकतो? पण आपण एकूणच इतके भोंगळ आहोत की, असले प्रश्न विचारायचे नसतातच. अन विचारलेच तर उत्तरेही तयार असतातच. कोणत्या जातींची प्रगती झाली, कोणत्या जातींची झाली नाही, कोणत्या नोकऱ्यांमध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत, कोणत्या व्यवसायांमध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत; हे समजून घेण्यासाठी अशी जनगणना हवी; हे छापील उत्तर तोंडावर फेकण्यासाठी तयारच असतं. पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात. या देशातील नोकऱ्या, व्यवसाय हे काय लोण्याचे गोळे आहेत आणि जातींचे गट हे काय बोके आहेत? कोणी कोणी काय काय बळकावलं याचे हिशेब का करायचे आहेत? या देशातील सगळी माणसे आपली आहेत आणि त्यांना चांगले जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक, रोजगाराच्या, वैद्यकीय, निवासाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात. प्रत्येकाने आपापल्या कष्टाने, मेहनतीने, कौशल्याने चांगले जीवन प्राप्त करावे. प्रत्येकाच्या क्षमता कमी अधिक असल्या तरीही, त्यांना प्राप्त होणाऱ्या चांगल्या जीवनात जास्त तफावत राहणार नाही, अशी व्यवस्था असावी. क्षमतांचा विकास वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या वेळी होत असल्याने; सगळे at par येईपर्यंत काही वेळ लागणारच. मात्र तोवर अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण हे नाकारले जाऊ नये; या सगळ्याची नुपूर जाऊ नये; हे शासन, प्रशासनाने पाहावे. यासाठी जातींची सांख्यिकी कशाला हवी? कोणाकडे काय आहे वा नाही; किंवा कोणाची काय गरज आहे; कुठे कशाची कमतरता आहे; हे समजून घेण्यासाठी जातींची सांख्यिकी कशाला हवी? मूळ बाब ही आहे की आम्हाला फक्त भांडत आणि वाद घालत बसायचे आहे अन गलिच्छ राजकारणाला याची गरज आहे. दुसरे काहीही कारण नाही. समाजगट आपापल्या मनातील द्वेष टाकून द्यायला तयार नाहीत आणि राजकारणाला हा द्वेष पोसणे सोडायचे नाही. समाजात असे असंख्य लोक असतील, ज्यांना हे तमाशे नको आहेत. पण ते खुलेपणाने आपले मत व्यक्त करणार नाहीत. जातीनिहाय जनगणना नको, ती चुकीची आहे, त्याची गरज नाही; हे स्वच्छपणे सांगणाऱ्या लाखो पोस्ट समाज माध्यमांवर का नसाव्यात? त्यानेही योग्य गोष्टीसाठी दबाव निर्माण होईल. हे अभियान नसावे. कारण अभियान सुरू झाले की गट तयार होतात आणि मूळ विषय बाजूला पडतो. Personal capacity त योग्य मत खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त व्हायला हवे. पण योग्य अयोग्य याचा विवेक असणारा बहुसंख्य समाज स्वतःला राजकारणापासून स्वतंत्र करू शकेल का? स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरू होत असतानाही समाजाला या स्वातंत्र्याची जाणीव आहे का? की आपले स्वातंत्र्य राजकारणाकडे गहाण ठेवायचे नसते, हा प्राथमिक पाठ ७५ व्या वर्षी पुन्हा शिकावा आणि शिकवावा लागणार आहे?
- श्रीपाद कोठे
गुरुवार, १२ ऑगस्ट २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा