संघाची प्रचारक व्यवस्था ही संघातीलच नव्हे तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील अनोखी गोष्ट आहे. संघाच्या स्थापनेनंतर लगेचच २-३ वर्षातच प्रचारक पद्धतीची पायाभरणी झाली. त्याचा विकास नंतर हळूहळू झाला. सुरुवातीला संघात येणाऱ्या बाल-किशोर स्वयंसेवकांना संस्थापक डॉ. हेडगेवार शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी प्रोत्साहित करीत असत. या स्वयंसेवकांनी शिक्षणासोबतच तेथे संघाचे काम सुरू करावे असाही त्यांचा प्रयत्न असे. अशा प्रकारे सर्वप्रथम १९२८ साली काशीला बनारस हिंदू विश्वविद्यालयात स्वयंसेवक शिकायला गेले. त्यात नंतरच्या काळात संघाचे सरकार्यवाह राहिलेल्या भय्याजी दाणी यांचाही समावेश होता. हीच संघाची महाराष्ट्राबाहेरील मुहूर्तमेढ. हीच आजच्या प्रचारक पद्धतीची सुरुवात म्हणता येईल. त्यावेळी मात्र प्रचारक वगैरे शब्दावली रूढ़ नव्हती.
सुरुवातीला संघाचे काम वाढू लागले तसे अधिक वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज भासू लागली. परंतु असे कार्यकर्ते सहजासहजी मिळत नाहीत. शिवाय किमान गरजांची पूर्तता करण्याएवढीही संघाची शक्ती नव्हती. त्यामुळे कोणाला म्हणायचे तरी कसे? अशा स्थितीत उमाकांत केशव उपाख्य बाबासाहेब आपटे हे कार्यकर्ते स्वत:हून पुढे आले. त्यांनी पूर्ण वेळ संघाचे काम करण्याची तयारी दर्शवली आणि प्रत्यक्ष कामात स्वत:ला झोकून दिले. तेच संघाचे पहिले प्रचारक. संघाचे काम नव्हते, संघाचे नाव नव्हते, संघाची व्यवस्था नव्हती, कामाचे स्वरूप आणि चित्र स्पष्ट नव्हते, भविष्य तर कोणीच सांगू शकत नव्हते, शिवाय हे काम भविष्यातही कधी लोकप्रिय होण्याची शक्यता नव्हतीच. सतत समाजाला काही तरी देतच राहायचे, देण्याचाच विचार करायचा, तोच विचार लोकांना शिकवायचा, समाजात रुजवायचा. हे काम लोकप्रिय होणार कसे? तरीही बाबासाहेब आपटे घरदार सोडून संघाच्या कामासाठी बाहेर पडले आणि त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढली. अर्थात त्यालाही १०-१२ वर्षांचा काळ जावा लागला. १९३५ ते १९४० या पाच वर्षात सुमारे १०० प्रचारक देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारार्थ विविध प्रांतात गेले.
या प्रारंभीच्या काळातील प्रचारकांची मानसिकता काय असेल, त्यांचा कृतनिश्चय काय आणि कसा असेल, त्यांच्या श्रद्धा आणि निष्ठा कशा असतील, झोकून देण्याची, उधळून देण्याची त्यांची वृत्ती कशी असेल, त्यांचा कणखरपणा, स्वत:विषयीची उदासीन वृत्ती, त्यांच्या प्रेरणा, त्यांचा संघर्ष या साऱ्याची कल्पनाही करणे सामान्य कार्यकर्त्याला कठीण आहे. ज्या व्यक्तीला संघाच्या कामाचा गंधही नाही, तो तर हे सारे समजून सुद्धा घेऊ शकणार नाही. त्यांच्या संघर्षाचे स्वरूपही बहुपदरी होते. स्वत:शी, परिस्थितीशी, कुटुंबाशी, समाजाशी, विरोधकांशी असा तो संघर्ष होता. हा आर्थिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि प्रसंगी शारीरिकदेखील होता. सामान्य गरजा भागवण्यासाठी पैसा नव्हता हे त्या संघर्षाचे एक स्वरूप होते, तर संघाच्या कामाची गरज आणि महत्व पटवून देण्यासाठी आवश्यक असलेले बौद्धिक खाद्य सुद्धा उपलब्ध नसणे ही त्याची अन्य एक बाजू. राहण्याची सोय नाही, जिथे जशी परिस्थिती असेल तसे राहायचे. कधी एखादे परिचिताचे घर असेल तर ती चैन. हा परिचितसुद्धा किती काळ आसरा देईल माहीत नाही. अनेक अशा लोकांनी आयुष्यभर संघाला आणि प्रचारकांना आधारही दिलेला आहे. पण कुठे कुठे विपरीत अनुभव देखील आलेले आहेत. हे अनुभव विपरीत तरी कसे म्हणणार? स्वाभाविक आणि नैसर्गिकच म्हणावे लागतील. अपरिचित घरांमध्ये, काहीही न देता अनेक दिवस, महिने व वर्षे जेवताना या प्रचारकांना काही ऐकावेच लागले नसेल का? अनेकवार असे प्रसंग आले. पण संघाच्या कामासाठी, मनातील प्रखर ध्येयवादाच्या उर्मीने पाण्याच्या घोटाबरोबर कार्यकर्त्यांनी ते गिळून आणि पचवून टाकले.
त्याकाळी सगळीकडेच राष्ट्रीय विचारसरणीच्या अनेक लोकांनी विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृहे वगैरे काढलेली होती. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती होती, चांगली कामे उचलून धरण्याची प्रवृत्ती होती, स्वातंत्र्यासाठी संघर्षाचे वातावरण होते. त्याचीही मदत संघ प्रचारक म्हणून गेलेल्या विद्यार्थ्यांना झाली. आर्य समाजाचीही मंदिरे, धर्मशाळा असत. विशेषत: उत्तर आणि पश्चिम भागात. तेथेही प्रचारक राहत असत. रात्री दुकाने बंद झाल्यावर बाहेरच्या फळ्यांवर झोपणे, एखाद्या देवळात रात्रीची सतरंजी पसरून पाठ टेकवणे, सकाळी उठून सार्वजनिक नळावर, विहिरीवर, नदीवर आंघोळ वगैरे उरकून संघाचे काम सुरु. भेटीगाठी, आपला विषय समजावून सांगणे, बैठकी, शाखा, आजाऱ्यांना भेटणे, त्यांची सेवा, मुलांना शिकवणे, भजन मंडळे; असे लोकसंपर्क, लोकसंग्रह आणि लोकसंघटन यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. मध्ये कुठे पोटात काही गेले तर गेले. नाही तर चुरमुरे, फुटाणे फाकायचे, पाणी प्यायचे अन पुन्हा हसतमुखाने भ्रमंती सुरु. अशा प्रकारेही पुष्कळांना कामे करावी लागली.
अनेकांनी छोटी मोठी कामे करून पोटासाठी चार पैसे कमावणे आणि प्रचारक म्हणून काम करणे असेही केलेले आहे. अगदी वानगीदाखल दोन नावे सांगायची तर माधवराव मुळे व नानाजी देशमुख यांची सांगता येतील. जनसंघाचे ज्येष्ठ नेते व नंतर दीनदयाळ शोध संस्थानचे अध्वर्यू म्हणून नानाजी देशमुख समाजाला परिचित आहेत. माधवराव मुळे हे पंजाबमध्ये प्रचारक होते. भारताच्या दुर्दैवी फाळणीच्या वेळी त्यांनी अतुलनीय कार्य केले. रा.स्व. संघाचे सरकार्यवाह म्हणूनही त्यांनी नंतरच्या काळात जबाबदारी सांभाळली होती. नानाजींनी स्वैपाकी म्हणून काम केले, तर माधवराव मुळेंनी टायर ट्यूबचीही कामे केली. परंतु कुरकुर नाही, त्रागा नाही अन मागे फिरणेही नाही. वयही पोरासोरांचे!! अशा अतिशय विषम, प्रतिकूल परिस्थितीत शेकडो प्रचारकांनी अनाम राहून संघाच्या कार्याचा मजबूत पाया घातलेला आहे.
प्रचारक पद्धतीची खरी सुरुवात गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर झाली. १९४२ ते १९४७ हा काळ देशाच्या दृष्टीने अतिशय धावपळीचा आणि घटनांनी भरलेला होता. देशाची फाळणी होणार हे स्पष्ट होऊ लागले होते. अशा अस्थिर व हिंदूंच्या दृष्टीने भयावह स्थितीत संघाच्या कामाची मागणीही वाढत होती. समाजाची सुरक्षा आणि हिंमत कायम राखण्याचेही जिकीरीचे काम होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी संपूर्ण देशभर अखंड प्रवास करून यासाठी अथक प्रयत्न केले. `सध्याचा काळ हा असामान्य काळ आहे. त्यासाठी असामान्य त्याग हवा. घराबाहेर पडा आणि देशसेवेला वाहून घ्या,' असे त्यांचे तरुणांना आवाहन होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी देखील केली. संघाची प्रसिद्धी विन्मुखता आणि व्यक्तीनिरपेक्षता यामुळे त्याची फारशी माहिती कोणाला नाही. त्यातच सत्तेचा रोष संघाच्या पाचवीलाच पूजलेला असल्याने त्यावेळची प्रचारकांची कामगिरी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक मौन अध्याय बनून गेला आहे. अगदी संघात देखील याबद्दल फारशी माहिती नाही. तेव्हापासून सुरु झालेली ही प्रचारक पद्धती आजही सुरु आहे.
आजही दरवर्षी शेकडो प्रचारक संघाच्या कामासाठी घराबाहेर पडत असतात. आजवर अशा हजारो प्रचारकांनी संघाच्या कामाला खतपाणी घातले आहे. त्यांची नुसती सूची करायचे म्हटले तरी एखादा ग्रंथ तयार होईल. मुळातच संघाच्या कामाच्या अनोख्या स्वरुपामुळे तो विषय बाजूला पडला. परंतु १९८९ साली डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपुरात आजी-माजी प्रचारकांचे अखिल भारतीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा जुन्या प्रचारकांचा शोध घेतला गेला. त्यावेळी प्रचारक म्हणून काम केलेल्या शेकडो स्वयंसेवकांची माहिती समोर आली. त्यानंतर विविध निमित्ताने ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाला. इ.स. २००० साली संघ स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईच्या साप्ताहिक विवेकने विशेषांक काढले. त्यासाठी प्रयत्नपूर्वक काही माहिती गोळा करण्यात आली. `भारतीय उत्कर्ष मंडळ' या संघ परिवारातीलच संस्थेनेही जुन्या प्रचारकांची माहिती गोळा करण्याचा उपक्रम केला आहे. देशभर विविध प्रांतातही अशी प्रचारकांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न अलीकडे होऊ लागला आहे. परंतु कार्यकर्त्यांना ही माहिती व्हावी, प्रेरणा मिळावी एवढाच त्याचा हेतू आहे. या कार्यकर्त्यांबद्दल काही विशेष योजना वगैरे करणे हा त्याचा हेतू नाही. सत्कार, प्रमाणपत्र, थैली वगैरे तर संघाच्या कार्यपद्धतीत कुठेच बसत नाही.
सुरुवातीच्या काळात संघ कामासाठी प्रचारक गेलेल्या स्वयंसेवकांना घरचा विरोधही मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. अनेकदा घरच्यांच्या नकळत घरून निघून जाणे, असेही करावे लागले. मग स्थानिक कोणीतरी घरी जाऊन सांगत असत. अनेकांचे आईवडील पुष्कळदा संघावर नाराजही राहत असत. हा राग नंतर मुलाविषयीच्या अभिमानातही परिवर्तित होत असे. कुटुंबातील एकाहून अधिक मुले किंवा सगळीच मुले प्रचारक गेली, अशीही उदाहरणे आहेत. आता हा विरोध कमी झालेला आहे. एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून जातो त्यावेळी तो ज्या ठिकाणी राहतो, त्याने ज्या ठिकाणी काम केले आहे तेथे त्याला निरोप देण्याचे कार्यक्रमही आता होतात.
काय आहे हे `प्रचारक' प्रकरण? काय काम असते त्यांचे? कसे असते त्यांचे जीवन? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही एखादी व्यावसायिक संस्था, संघटना नाही. आजकाल असतात तशा सार्वजनिक कामे करणाऱ्या NGO सारखी गैरसरकारी संघटनाही नाही. स्वत:हून समाजासाठी काम करणाऱ्या लोकांचा तो एक विशाल समूह आहे. सगळे कार्यकर्ते स्वत:चे शिक्षण, घरदार, नोकरी, व्यवसाय, उद्योग, कुटुंब हे सारे सांभाळून संघाचे काम करतात. पण काही थोडे स्वयंसेवक संघाचे काम हेच आपल्या आयुष्यात करायचे एकमेव काम आहे असा संकल्प करून आपला पूर्ण वेळ संघाच्या कामासाठी देतात. २४ तास संघाचेच काम करायचे. त्यांनाच संघात प्रचारक म्हणतात. साधारणपणे शिक्षण पूर्ण झाले की स्वयंसेवक प्रचारक म्हणून बाहेर पडतात. समाजात मिसळताना संघाचा प्रचारक अशिक्षित आहे असे व्हायला नको. त्याने कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो, हा त्यामागील विचार. त्यासोबतच, काही काळानंतर प्रचारक जीवन थांबवून पुन्हा सामान्य गृहस्थी जीवन सुरु करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठीही शिक्षण झालेले केव्हाही चांगले, हा व्यावहारिक भाग सुद्धा आहेच.
एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून कामाची सुरुवात करतो तेव्हा साधारणपणे २ वर्षे, ३ वर्षे, ५ वर्षे प्रचारक म्हणून काम करायचे अशीच ती सुरुवात असते. काही जण ठरलेला काळ झाला की परत येऊन आपले खासगी आयुष्य सुरु करतात. काही जण मात्र हळूहळू करत आपले संपूर्ण आयुष्यच या कामासाठी देतात. एकदा प्रचारक जीवन स्वीकारून घराबाहेर पडल्यावर अखेरच्या श्वासापर्यंत संघाचेच काम करतात. संघाच्या कार्यालयातच राहतात. प्रचारक म्हणून काम करू लागल्यावर तो स्वयंसेवक घरी राहत नाही. संघाच्या कार्यालयात राहतो. सुरुवातीला संघाची कार्यालये वगैरे नव्हती. तेव्हा जशी सोय होईल तेथे प्रचारक राहत. आता मात्र बहुतेक सर्वत्र संघाची कार्यालये, इमारती असल्याने तेथेच त्यांची राहण्याची सोय असते. जेवणाची सोय मात्र आजही सगळ्या ठिकाणी आहेच असे नाही. शिवाय प्रचारक म्हटला की सतत फिरणे सुरु असते. त्यामुळे प्रचारकांचे जेवण सोय असेल तिथे कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरीच होते.
धोतर, पायजमा, कुडता असाच त्याचा साधा वेश असतो. त्याचे कपडेलत्ते, औषधपाणी, प्रवास याची सोय संघातर्फेच असते. सुरुवातीला वाहने वगैरे नव्हती तेव्हा पायीच फिरावे लागत असे. अगदी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांनीही भरपूर पायपीट केलेली आहे. विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही सायकलवरून नागपूरभर फिरताना अनेकांनी पाहिले आहे. अलीकडे थोड्या गाड्या वगैरे आल्या आहेत आणि कष्ट जरा कमी झाले आहेत.
प्रचारक जायचे आहे हा निर्णय करीपर्यंत स्वयंसेवकाला स्वातंत्र्य असते. नंतर मात्र संघ ठरवेल त्याप्रमाणे तो काम करतो. त्याने कोणत्या गावी जायचे, काय काम करायचे, कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे संघ ठरवित असतो. अर्थात हे फक्त कामाच्या संदर्भातच. बाकी तो मुक्तच असतो. प्रचारक म्हणून थांबायचे किंवा नाही याचा निर्णय तोच घेतो. प्रचारक म्हणून काम करतानाही सणावाराला, कार्यप्रसंगाला, आजारपणे, मृत्यू अशा वेळी तो मोकळेपणाने घरी जाऊ शकतो. अर्थार्जन न करणारा, घरी न राहणारा, साधे कपडे घालणारा, संघाच्या योजनेने २४ तास संघाचे काम करणारा स्वयंसेवक म्हणजे प्रचारक. अशा प्रचारकांना अधिकार मात्र काहीही नसतो. सरसंघचालक आणि सरकार्यवाह हे दोन अपवाद वगळता संघात कोणत्याही प्रचारकाला प्रणाम सुद्धा केला जात नाही. सर्व स्तरांवर संघचालक आणि कार्यवाह ही प्रणामाची पदे गृहस्थ कार्यकर्त्यांकडेच असतात. प्रचारकाला वेगळी विशेष वागणूक नसते. त्याच्यासाठी काही वेगळे code of conduct नसते. गृहस्थ कार्यकर्ता कितीही समर्पित असला तरीही त्याला मर्यादा येतात. तो नेहमीच उपलब्ध होऊ शकेल यातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ती कमतरता भरून काढावी हीच प्रचारकाकडून अपेक्षा असते. शिवाय संघकार्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला प्रचंड संपर्क हा प्रचारकांच्या कामाचा विशेष होय. प्रत्येक प्रचारकाचा आपापल्या कार्यक्षेत्रात शेकडो, हजारो लोकांशी, घरांशी प्रत्यक्ष संपर्क असतो. त्याच्या या अफाट संपर्कातूनच अनेक लोकांना कामाशी जोडता येते, सहभागी करून घेता येते. गृहस्थी कार्यकर्ते कामाला स्थिरता प्रदान करतात आणि प्रचारक कामाला गती देतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
परंतु एखादा स्वयंसेवक प्रचारक म्हणून काम करू लागला की तो सर्वगुणसंपन्न झाला असे नसते आणि संघही तसे मानीत नाही. त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येतात. कधी औपचारिक बैठकी वगैरे होतात, तर अनेकदा अनौपचारिक चर्चा, संवाद, मार्गदर्शन होते. ज्येष्ठ, अनुभवी प्रचारक, गृहस्थी कार्यकर्ते या साऱ्यांचे त्याला मार्गदर्शन लाभते, आधारही लाभतो. प्रचारक काही वेगळे आहेत असा भाव कधीही बाळगला जात नाही, उत्पन्न केला जात नाही. अन्य माणसांप्रमाणेच त्यालाही कामभावना असते. एक प्रकारे तो निसर्गाच्या विरूद्धच जगत असतो. मात्र त्यासाठी काही विशेष साधना वगैरे केली जात नाही. त्याला करायला सांगितली जात नाही. एक खूप मोठ्ठ असं विशिष्ट ध्येय संघाने आपल्या कार्यकर्त्यांपुढे ठेवलेलं आहे. तीच त्यांची पूजा नि साधना. या ध्येयमयतेनेच आणि तशा प्रकारच्या आजूबाजूच्या उदाहरणांनीच तो आपल्या निसर्गदत्त भावनांवर नियंत्रण ठेवतो. विपरीत काही घडतंच नाही असे नाही. पण ते अपवाद म्हणूनच. आणि संबंधित व्यक्ती वाईट आहे अशा दृष्टीने त्याकडे न पाहता ती त्याची मर्यादा आहे असेच त्याकडे पाहिले जाते. आवश्यक ती उपाययोजनाही केली जाते. गेल्या ८-९ दशकात अशा हजारो हजार प्रचारकांच्या द्वारे सामाजिक नेतृत्वाची एक आगळी शैली, एक अनोखे दालन संघाने यशस्वीपणे राबविले आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २८ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा