गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

भगवद्गीता

नुकतीच गीताजयंती साजरी करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या मोक्षदा एकादशीलाच श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, असे मानले जाते. म्हणून त्या दिवशी गीताजयंती साजरी करतात. हजारो वर्षांपासून हिंदूंच्या या धर्मग्रंथाने केवळ हिंदू व भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी लोकांना जगण्याचे प्रयोजन दिले, जगण्याची दिशा दिली, जगण्यासाठी आधार दिला, अनेकानेक प्रश्न समजून घेण्यासाठी मदत केली, अनेकानेक समस्यांचे विश्लेषण करून त्या सोडवण्यात मदत केली. धर्मचर्चा, तत्वचिंतन यातून तर गीता वगळताच येत नाही.

अनेकांना भगवद्गीतेने भुरळ घातली आहे. ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांचे अज्ञान दूर करून, विचारी सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी याच गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी रचली. शेकडो वर्षे झालीत तरीही ज्ञानेश्वरीचा गोडवा आणि तिचे आकर्षण उणावलेले नाही. उलट त्यातील तत्वविचार, चिंतन, गोडवा, माधुर्य, प्रतिभाविलास, प्रतिमा- प्रतिकांची रेलचेल, त्यातील सौंदर्य, साहित्यगुण, भावाभिव्यक्ती या सार्याची मोहिनी एवढी की, तिचे संस्कृतात सुद्धा भाषांतर झाले आहे. म्हणजे मूळ संस्कृत भाषेतील भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आली आणि पुन्हा तिचे संस्कृत भाषांतर झाले. नागपूरचे एक दिवंगत संस्कृत विद्वान प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी हा अनुवाद केला आहे.

ज्ञानेश्वरीशिवाय आदि शंकराचार्यांचे गीताभाष्य, लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य, आचार्य विनोबा भावेंची गीताई हे गीतेवरील ग्रंथ प्रसिद्ध आहेत. महात्मा गांधी, विवेकानंद, योगी अरविंद, स्वामी चिन्मयानंद या व अन्य असंख्य महानुभावांनी गीतामृतात बुडी मारली असून तिचा आसरा घेतलेला आहे. देशभरात असंख्य गीतामंदिरे आहेत. त्यातून भगवद्गीतेची उपासना, आराधना आणि गीतातत्वांचे चिंतन, मनन सुरु असते. इस्कॉन या देशविदेशातील धर्मचळवळीचा आधारही भगवद्गीता हाच आहे. शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गीता पाठांतराच्या स्पर्धाही सुरु असतात. गीता शिकवण्याचे असंख्य वर्गही जगभर पाहायला मिळतात. इंग्रजांविरुद्ध लढल्या गेलेल्या स्वातंत्र्ययुद्धात असंख्य वीरांना गीतेने प्रेरणा व आधार दिला. क्रांतिकारक तर फासावर चढताना भगवद्गीता हाती घेऊनच स्वर्गारूढ झाले.

असा अपार महिमा असलेली भगवद्गीता हा खरे तर स्वतंत्र ग्रंथ नाही. तो महाभारतातील एक भाग होय. परंतु कालौघात गीता हाच स्वतंत्र ग्रंथ झाला आहे. महाभारत युद्धापूर्वी युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या स्वजनांना पाहून भ्रमित व गर्भगळीत झालेल्या वीर धनुर्धर पार्थाला श्रीकृष्णाने केलेला तो उपदेश आहे. शस्त्रास्त्रांनी सज्ज, रणकुशल अर्जुनाची आंतरिक शक्ती वाढवण्याच्या हेतूने गीता सांगण्यात आली आहे. कोणत्याही कारणाने शंकित झालेले व भयग्रस्त झालेले मन जेव्हा तर्कवितर्क करू लागते त्यावेळी स्वाभाविकच तत्वचर्चा करू लागते. त्या शंकांचे समाधान होणे आवश्यक असते. त्याविना संभ्रमावस्था दूर होत नाही. श्रीकृष्णानेही हेच केले आहे. आणि मानवी मनाचे, मानवी जगण्याचे, या विश्वातील वृत्ती- प्रवृत्तींचे, या विश्वाच्या स्वरूपाचे, गुणावगुणांचे, प्रपंचाचे अन परमार्थाचे, लौकिकाचे अन अलौकिकाचे, जन्म-मृत्यूचे, सार-असाराचे; असे अनेक गोष्टींचे मार्गदर्शन, दिशादर्शन अर्जुनाच्या माध्यमातून सार्या मानवजातीसाठी केले आहे. भगवद्गीतेचा मूळ हेतू काय, हा प्रश्न विद्वानांसाठी सातत्याने चर्चेचा राहिला आहे.

भगवद्गीतेत एकूण १८ अध्याय आहेत. हा काव्यग्रंथ आहे. त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काय सुरु आहे, असा उत्सुक प्रश्न अंध धृतराष्ट्राला पडतो. हा प्रश्न तो संजयाला विचारतो. त्याने विचारलेला हा प्रश्न हीच गीतेची सुरुवात आहे. त्यानंतर संजय त्याला कुरुक्षेत्रावरील घडामोडी सांगू लागतो. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या तोंडीही काही श्लोक आहेत. श्रीकृष्णाचा मात्र एकही श्लोक पहिल्या अध्यायात नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे कथन दुसर्या अध्यायात सुरु होते. सगळे १८ अध्याय सारखे नाहीत. लहान-मोठे आहेत. प्रत्येक अध्यायाचा स्वतंत्र विषय आहे. त्यानुसार त्याला नावेही देण्यात आली आहेत. प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस या नावांचा उल्लेख येतो. प्रत्येक अध्यायाचा शेवट `इति श्रीमदभगवद्गीतासूपनिशत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे (अमुक) योगो नाम (अमुक) अध्याय:' अशी होते. या ठिकाणी अध्यायाचे नाव आणि अध्यायाचा क्रमांक असतो. भगवद्गीता हा श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद असून त्यात उपनिषदातील ज्ञान सांगण्यात आलेले आहे हे या समारोपातून स्पष्ट होते.

अध्यायांची नावे अशी- १) अर्जुनविषाद योग (४७ श्लोक), २) सांख्ययोग (७२ श्लोक), ३) कर्मयोग (४३ श्लोक), ४) ज्ञानकर्मसन्यासयोग (४२ श्लोक), ५) कर्मसन्यासयोग (२९ श्लोक), ६) आत्मसंयम योग ( ४७ श्लोक), ७) ज्ञानविज्ञान योग (३० श्लोक), ८) अक्षरब्रम्ह योग (२८ श्लोक), ९) राजविद्याराजगुह्य योग (३४ श्लोक), १०) विभूती योग (४२ श्लोक), ११) विश्वरूपदर्शन योग (५५ श्लोक), १२) भक्तियोग (२० श्लोक), १३) क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग (३४ श्लोक), १४) गुणत्रयविभाग योग (२७ श्लोक), १५) पुरुषोत्तम योग (२० श्लोक), १६) दैवासुरसंपदविभाग योग (२४ श्लोक), १७) श्रद्धात्रयविभाग योग (२८ श्लोक), १८) मोक्षसंन्यास योग (७८ श्लोक).
एकूण ७०० श्लोकातील ३८ श्लोक संजयाचे, १ श्लोक धृतराष्ट्राचा, ८५ श्लोक अर्जुनाचे आणि अन्य श्रीकृष्णाचे आहेत. गीतेचे अखेरचे ५ श्लोक संजयाचे आहेत. श्रीकृष्णाने केलेला उपदेश आणि त्याने घडवलेले विश्वरूप दर्शन यांनी भारावून गेलेल्या संजयाने `योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ ज्या बाजूला आहेत, त्यांचा विजय निश्चित आहे' असे धृतराष्ट्राला सांगितले आणि त्या श्लोकाने भगवद्गीतेचा समारोप होतो.
`म फलेषु कदाचन' (फळाची आशा न करता कर्म करत जा), `परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम' (सद्रक्षणाय, खल निग्रहणाय- महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य), `योगक्षेमं वहाम्यहम' (आयुर्विम्याचे घोषवाक्य) असे अनेक सुविचार गीतेने आपल्याला दिले आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर,
शुक्रवार, २८ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा