आजचा दिवस आयुष्यात आलाच नसता तर फार बरं झालं असतं. घरच्या दोन वृक्षांचा
आज बळी गेला आणि तो उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काहीही मी करू शकलो
नाही. निराश, हतबल वगैरे सारं काही वाटते आहे आज. एक वृक्ष शेवग्याचा आणि
दुसरा कडूलिंबाचा. अनेक दशके जुने हे वृक्ष. त्यांची खोडंच प्रत्येकी
२००-३०० किलोची असतील. फेसबुकवर शेअर केलेली एक माहिती आठवली, एक झाडं किती
प्राणवायू तयार करतं वगैरे. लाज वाटली स्वत:ची.
असं होतं तर का
तोडली ही झाडं? मुळात शेवग्याच्या झाडाने जमीन सोडली होती. त्याचा स्वत:चाच
भार त्याला सावरत नव्हता. ते पडण्याची भीती होती. आजूबाजूला दोन घरे होती.
विजेच्या तारा होत्या. त्यामुळे ते तोडावं लागणारंच होतं. कडूलिंबाच्या
झाडाचं मात्र तसं काहीही नव्हतं. ते मध्ये येत नव्हतं आणि वाकलं वगैरे तर
मुळीच नव्हतं. नागपूरच्या जगप्रसिद्ध उन्हाळ्यात आजूबाजूची चार घरं थंड
ठेवत होतं. उपकारच होते त्याचे. कडूलिंबाचे उपयोग वगैरे सगळं पाठ होतं. पण
काहीही इलाज नव्हता.
कडूलिंबाचं झाड तोडावं लागलं त्यामागे दोन
कारणे होती. एक म्हणजे शेजाऱ्याचं त्याच्याशी असलेलं शत्रुत्व. मागे काही
वर्षांपूर्वी तर न सांगता सवरता चक्क आमच्या हद्दीतील ते झाड तोडून
टाकण्याचा प्रयत्न शेजाऱ्याने केला होता. तो सतर्कतेने टाळता आला. पण
त्याच्या मनात ते सलत होतंच. तो उघडपणे हे करत होता तरीही अन्य
शेजाऱ्याचाही तोच ताल होता. दुसरे कारण होते, झाड तोडणारी माणसे. एवढे मोठे
झाड आपण तोडणे शक्यच नव्हते. त्यासाठी माणसे बोलावली. त्यांची अट एकच.
आम्ही शेवग्याचे झाड तोडतो, पण आम्हाला कडूलिंबाचेही झाड द्या. ते देणार
नसाल तर शेवग्याचे झाड तोडण्याचे सहा हजार रुपये द्या. ज्यावेळी
त्यांच्याशी बोलणी झाली तेव्हा त्यांचा सारा भर काही हजार रुपये
घेण्यापेक्षा कडूलिंबाच्या झाडावरच होता. शेजाऱ्याला तर काय संधी आयतीच
चालून आली. झाले. सौदा ठरला आणि दोन्ही वृक्ष पाहता पाहता नामशेष झालेत.
दोन
झाडे गेलीत आणि असंख्य पक्षांची वसती उजाड झाली. खारूताईचं क्रीडास्थान
धुळीस मिळालं. घराची सावली गेली. शुद्ध प्राणवायु युक्त हवा गेली.
मनीम्याऊचं पाठ खाजवण्याचं साधन गेलं. आता पाखरं येतील आणि भिरभिर पाहत
निघून जातील. जन्माला आल्यापासून एका जागी उभं राहण्याचं प्राक्तन नशिबी
घेऊन आलेल्या या झाडांच्या बुंध्याला टेकून उभं राहिलं की, आपले भोग शीतल
होत असत. आता ती शीतलता गेली.
काही गोष्टींना इलाज नसतो. इथे तर
गरज, अपरिहार्यता, परिस्थितीची कोंडी; अशा पुष्कळ गोष्टी एकत्र झाल्या
होत्या. त्यांनी बाजी मारली. इथपर्यंत ठीक आहे. म्हणूनच मनाची समजूतही
घालता येईल. पण ही झाडे तोडल्यानंतर शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि स्वरातून
जो आनंद ओसंडून वाहताना पाहिला त्याचं काय करायचं? झाडे गेली त्याचं दु:ख
आहेच, आपण काही करू शकलो नाही याचं त्याहून अधिक दु:ख आहे. पण
शेजाऱ्यांच्या या आनंदाचं दु:ख नाही, घृणा वाटते. आणि थोडीथोडकी नाही अपार
घृणा वाटते. चांगले शिकले सवरलेले. पूजापाठ, भागवत सप्ताह करणारे, गणपती
अथर्वशीर्षाची आवर्तने करणारे ब्राम्हण, (मी जातीचा उल्लेखही करण्याचे
टाळतो पण माझ्या मनातील चीड इतकी आहे की मी तो उल्लेख मुद्दाम केला.)
वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या या साऱ्याशी परिचय, माणुसकी- पर्यावरण
वगैरे शब्द माहीत नाही असे नाही... पण केवळ आणि केवळ मनाचा आणि बुद्धीचा
कोतेपणा आणि क्षुद्रता, आळस आणि वृत्तीची दरिद्रता यासाठी वृक्षांचा राग
आणि ते तोडल्यानंतरचा घृणास्पद आनंद.
आयुष्यातील एक दुर्दैवी घटना
म्हणून मनाची समजूत घालेनही, दुसरं छानसं झाड लावून पुन्हा पाखरांना अंगणात
बोलावीनही. पण शेजाऱ्यांच्या या छद्मी आनंदाचं काय करू सुचत नाही. काही
तरी जोरदार ठेच लागावी अशी मनोमन इच्छा आहे. कधी कधी एखादी गोष्ट अयोग्य
आहे हे माहिती असूनही मनाविरुद्ध ती करावी लागते. पण त्याचा आनंद होणे ही
राक्षसी वृत्तीच आहे. म्हणूनच मला शेजारी राहणाऱ्या राक्षसांबद्दल मन मोठे
वगैरे करायचेच नाही. पाहू या प्रभूच्या मनात काय आहे ते...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३१ मार्च २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा