शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद - १

स्वामी विवेकानंद यांच्या बहुमुखी प्रतिभेचे एक दर्शन त्यांच्या व्यवस्थापक, प्रशासक, संघटक या रूपातही होते. आध्यात्मिक व वैचारिक प्रबोधनाचे काम वाढावे, फोफावावे आणि निरंतर सुरु राहावे यासाठी संस्थात्मक कामाची उभारणीही स्वामीजींनी केली. त्यासोबतच समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि समाज शक्तिमान करण्यासाठी सेवाकार्ये वगैरेची सुरुवातही केली. प्रचंड प्रमाणात केलेली भटकंती, प्रबोधन हेदेखील लक्षणीय आहे. या सगळ्याच कामांमध्ये त्यांच्यातील व्यवस्थापक, संघटकाचे रूप पाहायला मिळते.

सत्ता, संपत्ती, संघटन यापैकी काहीही साथीला नसताना स्वामीजींनी अफाट कार्य केले हे विसरता येत नाही. उलट अक्षरश: शून्यातून सृष्टीची निर्मिती त्यांनी केली असेच म्हणावे लागेल. यासाठी माणसे, पैसा, जागा, कार्यपद्धती, वातावरण हे सारे त्यांनी उभारले. त्यासाठी आवश्यक त्या असंख्य लहानमोठ्या सूचना करण्यापासून जी अनेक व्यवधाने त्यांनी सांभाळली ती आश्चर्य करावी अशीच आहेत.

कोलकाता येथे मठाची स्थापना, त्याचा बेलूरच्या विस्तीर्ण जागेत विस्तार, चेन्नई मठाची स्थापना, हिमालयातील अलमोडा येथे अद्वैत आश्रमाची सुरुवात, प्लेग, दुष्काळ यासारख्या प्रसंगी केलेली सेवाकार्ये, वाराणशीचा सेवाश्रम, न्यूयॉर्क व बोस्टन या अमेरिकेतील आश्रमांची स्थापना, इंग्लंडमध्ये कामाची सुरुवात, विचार प्रसारासाठी मासिकांची सुरुवात, अशी एक ना अनेक कामे आणि त्याची सारी जुळवाजुळव त्यांनी केली.

हे सारे काम स्वामीजींनी उभे केले तेव्हा भारतात अशा प्रकारे एकत्र येउन काम करणे ही नवलाईच होती. अशी कामे फारशी प्रचलित नव्हती, अशी उदाहरणे नव्हती, लोकांना त्याची सवय नव्हती, मदत करण्यासाठी पैसा तर नव्हताच, साधनांचा अभावच होता, वीज- रस्ते- वाहने- दूरध्वनी- अशा सुविधांची कल्पनाच केलेली बरी. आपल्या समाजाची आजची मानसिकता आणि त्यावेळची मानसिकता, आजची आणि त्यावेळची विचारपद्धती, परिपक्वता अशा अनेक बाबींचे अडथळे होते. नवखेपण होते. कोणतीही मळलेली पायवाट नव्हती तर आपली वाट आपणच तयार करीत पुढे चालायचे होते. शिवाय स्वामीजी कधी हिमालयात, कधी कोलकात्यात, कधी राजस्थानात, तर कधी इंग्लंड- अमेरिकेत.

अशा परिस्थितीत स्वत:चे आणि आपल्यासोबत काम करणाऱ्यांचे मनोधैर्य कायम राखणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते. हे कामही विवेकानंदांनी समर्थपणे केले आहे. याच संबंधात याकोहामा येथून आपला मद्रासी शिष्य अळसिंगा पेरूमल याला १० जुलै १८९३ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `धीर, शांत आणि दृढ भावाने कार्य करावयास हवे. वर्तमानपत्रातील प्रसिद्धी किंवा नावलौकिक हे आपले उद्दिष्ट नाही हे नेहमी लक्षात असू द्या.'

अळसिंगा पेरूमल यांनाच २ नोव्हेंबर १८९३ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे. आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचीच इच्छा पूर्ण होवो. आपण जगासाठी मोठमोठी कार्ये करू. नामयशाच्या हपापाने नव्हे, तर पूर्ण नि:स्वार्थ भावनेने. का? असे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही.कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य होय. साहस बाळगा. भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडले आहे, असा विश्वास असू द्या आणि ती आपण करूच करू. तयार व्हा. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. कोणताही स्वार्थ राहू देऊ नका. गरीब, दु:खी व दलित यांच्यावर प्रेम करा. प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करील.' कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी ते करीत होते हे येथे पाहायला मिळते.

आपल्या गुरुबंधूंना न्यूयॉर्क येथून २५ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आपण खूप कार्य केलेच पाहिजे. चैतन्य निर्माण केलेच पाहिजे. त्याशिवाय चालणार नाही. कुछ परवाह नही. सारे जग तुम्ही हलवून सोडाल. वाह गुरु की फतेह! अरे बाबांनो, श्रेयांसि बहुविघ्नानी- चांगल्या कार्यात अनेक विघ्ने नेहमी येतच असतात. या विघ्नांच्या आघातांनीच थोर माणसाचे चरित्र घडत असते.'

परंतु चांगल्या संघटकाला नुसतेच मनोधैर्य वाढवून चालत नाही. छोट्या छोट्या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कार्यकर्त्याच्या लक्षात अशा गोष्टी आणून द्याव्या लागतात. कौतुकाची थापही पाठीवर मारावी लागते. अळसिंगा पेरूमल यांना अमेरिकेतून २९ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `कोलकाताशी नेहमी पत्रव्यवहार करीत असणे. वत्सा, आतापर्यंत साहस दाखवून तू खरोखर गौरवाचा वाटेकरी झाला आहेस. जी.जी.ने खूपच अद्भुत आणि सुंदर कार्य केले आहे. माझ्या साहसी व नि:स्वार्थी मुलांनो! तुम्ही सर्वांनी फार सुंदर कार्य केले आहे. मला तुमचे मोठे भूषण वाटते. भारताला तुमचे भूषण वाटत आहे. तुमचा जो नियतकालिक काढण्याचा संकल्प होता तो सोडू नका. खेतरीचे राजेसाहेब आणि काठीयावाडमधील लिमडीचे ठाकूरसाहेब यांना माझ्या कार्याची नेहमी माहिती मिळत राहील अशी व्यवस्था करावी.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `आपल्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आता आपल्याला चांगल्या शक्तिशाली केंद्राची आवश्यकता आहे. सध्या मद्रास आणि कोलकाता येथे अशी दोन केंद्रे झाली आहेत. लवकरच भारतात इतरत्रही आणखी शेकडो केंद्रे होतील. क्षणभरही विचलित होऊ नका. इच्छाशक्तीच जगाला चालवीत असते.'

अशा प्रकारच्या तात्त्विक भूमिकेसोबतच व्यवहाराची देखील त्यांना किती जाण होती हे स्वामी रामकृष्णानंद यांना २२ ऑक्टोबर १८९४ रोजी अमेरिकेतून लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. ते म्हणतात, `अहमहमिका, मत्सर यांना कायमची मूठमाती द्या. त्यांच्या मुळीच आहारी जाऊ नका. प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ करा. कुणाशीही कलह करू नका. सर्वांविषयी सहानुभूती बाळगून कार्य करा. जगाचे हित करणे हाच आपला उद्देश आहे. केवळ आपल्या नावाचा डांगोरा पिटणे नव्हे. स्वत:चा मोठेपणा मिरवण्याची वृत्ती, भांडकुदाळपणा आणि मत्सर या साऱ्यांचा तुम्ही कायमचा त्याग करावा हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता तुमच्या ठायी बाणली पाहिजे.'

संघटना, एकीची शक्ती, परस्परांवर विश्वास, सहकार्य व साहाय्य करण्याची तत्परता हे पाश्चात्यांचे गुणविशेष आहेत आणि त्यांच्या यशाचेही तेच कारण आहे. आपणही हे गुण अंगी बाणवले पाहिजेत, असे त्यांनी अनेकदा आग्रहाने सांगितले आहे. अमेरिकेतून ३० नोव्हेंबर १८९४ रोजी अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `लवकरच आणखी काही ठिकाणी मी समित्या स्थापन करू शकेन अशी आशा आहे. आपल्या सर्व शक्ती एकवटून आपण आपल्या धार्मिक संस्थेचा व्यावहारिक भाग संघटित केला पाहिजे. पण आध्यात्मिक बाबतीत त्यातून एखादा पंथ तर निर्माण होत नाही ना याचीही काळजी घ्यायला हवी. धडाक्याने प्रचार सुरु करावयास हवा.सर्व मिळून विचार करा आणि संघटीत व्हा.' किती गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आपण समित्या स्थापन करीत आहोत हे सांगून उत्साह वाढविला, आपल्याला धार्मिक कार्य करायचे आहे पण त्याच्या व्यावहारिक बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये, आपल्याला नवीन पंथ सुरु करायचा नाही याची काळजी घ्यावी, खूप प्रचार करायला हवा, सगळे मिळून विचार करा; या साऱ्याकडे त्यांचे दक्षतेने लक्ष आहे.

एखादे नवीन काम सुरु होते तेव्हा त्यावर टीकाटिप्पणी तर होतेच, पण कामाचे कौतुक करणारे; हे काम महत्वाचे आहे असे म्हणणारे अनेक असतात. गम्मत म्हणजे असे पाठीराखेच अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेक सूचना त्यांच्याकडून होत असतात, आपले म्हणणे ऐकाल तरच काम वाढेल असा त्यांचा पवित्रा असतो, ते कामावर हक्क सांगू लागतात, लुडबुड करतात. अशा गोष्टींचीही स्वामीजींना जाण होती. त्याविषयी याच पत्रात ते म्हणतात, `आपले कार्य करीत राहा. या लोकांच्या मनाने चालू नका. पण त्यांना दुखावूही नका. खुश ठेवा. अशाने त्यांच्यापैकी एखादा तरी पुढे चांगला निघण्याची आशा आहे. स्वतंत्रपणे आपल्या मार्गाने पुढे व्हा. आयत्या बिळावर रेघोट्या ओढायला सगळेच तयार असतात. खूप सावधगिरी बाळगा व काम करीत राहा.'

एखादे काम करताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. टीकाटिप्पणी करीत असतात. त्या सगळ्याची उपेक्षा करावी. ते फार मनावर घेऊ नये असे मार्गदर्शनही विवेकानंदांनी केले आहे. ख्रिश्चन मिशनरी अमेरिकेत व भारतातही आपल्याबद्दल काहीबाही बोलतात हे आपल्याला ठाऊक आहे, पण आपण त्यांना महत्व देत नाही. तुम्हीही त्यांना फार महत्व देऊ नका. सत्कर्म करणाऱ्याची कधीच दुर्दशा होत नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी पेरूमल यांना म्हटले आहे. आपल्या शिष्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्यावर अवलंबून राहू नये. स्वत:च्या मार्गावर धैर्याने चालावे, असा आत्मविश्वासाचा सल्लाही त्यांनी अनेकदा दिला आहे.

आपल्यापुढील काम काय आहे आणि त्यसाठी कशी माणसे आपल्याला हवीत हा तर उत्कृष्ट व्यवस्थापकाचा पहिला मुद्दा असतो. स्वामीजींनी त्यावरही भर दिला आहे. कल्पकता, चिकाटी, शिकलेसवरलेले, बुद्धिमान, साहसी तरुण हवेत. असे तरुण मिळवा आणि त्यांना आपल्यात सामील करून घ्या, असे स्वामीजींचे सांगणे होते. मृत्युच्या जबड्यात उडी घेण्याची तयारी असलेले तरुण ही कामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संघटना व एखादे काम म्हटले की त्याचे नेतृत्व हा मुद्दा महत्वाचा ठरतो. नेतृत्वासाठी चढाओढ पाहायला मिळते तसेच नेतृत्व टाळण्याची वृत्तीही पाहायला मिळते. नेत्याविषयी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ मध्ये लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `बाबा, नेता काय धरूनबांधून तयार करता येतो? नेतृत्वाचा गुण जन्मजातच असावा लागतो. आले ध्यानात मी काय म्हणतो ते? नेतेपण करणे फार अवघड गोष्ट आहे- दासस्य दास: - अनेकांची अंतरे राखण्याची कला अंगी असायला हवी. स्वार्थाचा, द्वेष मत्सरादिकांचा अगदी समूळ नाश झाल्यावरच खरे नेतेपण अंगी बाणते. प्रथमत: जन्मगुणाने, दुसरे म्हणजे संपूर्ण स्वार्थत्यागाने ते अंगी बाणते. अनेकांची अंतरे राखण्याबद्दल स्वामीजींनी जो निर्देश केला आहे तो तर साध्या कौटुंबिक व्यवस्थापनापासून तर संपूर्ण देशाच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वत्र लागू होणारा आहे.

स्वत: अमेरिकेत असतानाही येथील कामाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. १८९४ मधीलच एका पत्रात ते म्हणतात, `सध्या गरज आहे सेवा व प्रचार अशा दोन्ही प्रकारच्या कार्याची. जिथे तुम्ही दर आठवड्याला जमू शकाल अशी एखादी जागा निवडा. तेथे पूजा वगैरे आटोपून नंतर भाष्यासहित उपनिषदांचे वाचन करा. अशा तऱ्हेने अध्ययन व काम दोन्ही करीत राहा.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `जी.जी. हा भावनाप्रधान आहे. तुम्ही आहात शांत डोक्याचे. तेव्हा दोघे मिळून काम करा. अगदी मग्न व्हा कामात. एखादे मध्यवर्ती केंद्रस्थान आवश्यक आहे. सुरुवात करा अगदी लहान प्रमाणावर. कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास धरू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही, पण सत्याशी प्रतारणा करू नका. कामातील स्वाधीनता न गमावता वरिष्ठांविषयी आदरभाव असू द्या.' अशा प्रकारे संस्था उभारण्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतानाच, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आपण अमेरिकेच्या पैशावर अवलंबून राहता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. आकर्षक वक्ता बनण्याचा सल्लाही स्वामीजींनी शिष्यांना दिला आहे. तुम्ही प्रत्यक्ष काय काम केले हे पाहू तर द्या मला एकदा, असे आव्हान देऊन स्वामीजी म्हणतात, मंदिर, छापखाना, एखादे नियतकालिक आणि एखादे निवासस्थान हे करून तर दाखवा. कार्यकर्त्यांना कुठेतरी चेतवावे लागते. पौरुषाला थोडेसे आव्हान हवे असते. तेव्हा त्यातून भव्यदिव्य काही घडते. स्वामीजींनी तेदेखील जाणीवपूर्वक केले आहे.

एखादे काम करताना कौशल्यही हवे असते. स्वामीजींनी आपले सहकारी, शिष्य, कार्यकर्ते यांना हे कौशल्यही शिकवले आहे. अमेरिकेतून १८९४ साली स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `जग हे तत्वांची फिकीर करीत नाही. त्यांना हवी असते व्यक्ती. आपल्याला मान्य असलेल्या व्यक्तींचे मूर्खपणाचे बडबडणे ऐकणे लोकांना परवडते, पण नावडत्या माणसाचे काहीही ऐकून घेण्यास ते तयार नसतात. ही गोष्ट पक्की लक्षात बाळगूनच आपल्या वागणुकीला मुरड घाला. तुमचे शब्द जरी क्वचित कठोर असले तरी तुमच्या प्रेमाचाच खरा प्रभाव पडेल. प्रेमभावना कशाही शब्दात व्यक्त झाली असली तरीही ती ओळखण्याची सहजप्रवृत्ती लोकांच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच असते.' कार्याच्या यशाची खुबी अतिशय नेमक्या शब्दात स्वामीजींनी येथे सांगितली आहे. याचा अर्थ तत्व सोडून द्यायची, काहीही चालवून घ्यायचे, असा खचितच नाही. पण काम करणाऱ्यांमध्ये एक माणुसकीचा स्पर्श असला तर काम सहज होते. हा माणुसकीचा स्पर्श वंगणाचे काम करतो हे विवेकानंदांनी अधोरेखित केले आहे.

चांगल्या व्यवस्थापकाला फक्त कामाची फिकीर करून चालत नाही. काम करणाऱ्याचीही फिकीर त्याने करायला हवी. काम करणाऱ्यांमध्ये जो स्नेहाचा स्पर्श असायला हवा असे मार्गदर्शन स्वामीजींनी केले तो स्नेहस्पर्श त्यांच्या व्यवहारात देखील होता. हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या याच पत्रात कोलकाता भागातील मलेरियाविषयी काळजी व्यक्त करून स्वामीजी लिहितात, `मलेरियाचे मुख्य कारण असते दूषित पाणी. तुम्ही दोन तीन फिल्टर का नाही तयार करीत? आधी उकळून, नंतर फिल्टर करून घेतल्यास पाण्यातील सारे दोष निघून जातात. जंतूंपासून सुरक्षित असलेले पाश्चर कंपनीचे दोन मोठेथोरले फिल्टर विकत आणा. स्वयंपाकाला, प्यायला सारे तेच पाणी वापरा. पाहाल पुन्हा मलेरियाचे नावदेखील ऐकू येणार नाही कुठे.' मलेरियावर उपाय सांगता सांगता शेवटी स्वामीजी हिम्मत वाढवून जातात.

११ एप्रिल १८९५ रोजी अमेरिकेतूनच स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रातही हा स्नेहस्पर्श दिसून येतो. ते लिहितात, `तुम्ही आजारातून उठला असे तुम्ही लिहिलेत. तरी पण यापुढे तुम्हाला प्रकृतीबाबत खूपच खबरदारी घ्यावयास हवी. उशिरा जेवणे, कुपथ्य करणे व घाण असलेल्या जागी राहणे यामुळे आजार उलटण्याची भीती आहे. आणि मग मलेरियाच्या तावडीतून सुटणे कठीण आहे. पहिली गोष्ट ही करा की एखादे उद्यानगृह भाड्याने घ्या. ३०-४० रुपयात तुम्हाला ते सहज मिळेल. दुसरे म्हणजे पिण्याचे व स्वयंपाकाचे सारे पाणी फिल्टर करून घ्या. बांबूचे मोठे फिल्टर केले की काम भागेल. साऱ्या रोगांचे मूळ म्हणजे दूषित पाणी. पाण्यामुळे रोग होतात; ते पाणी घाण आहे की स्वच्छ आहे यामुळे नाही. रोग होतात ते पाण्यात असलेल्या रोगाच्या जंतूंमुळे. पाणी आधी उकळून मग फिल्टर करून घ्यावे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. सैपाकी, एखादा नोकर, स्वच्छ अंथरुणे, वेळच्या वेळी जेवणखाण या साऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. या साऱ्या सूचना तंतोतंत पाळा.' लाजळूपणाने कामे होणार नाहीत, अध्ययनाकडे लक्ष द्यावे इत्यादी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

काम पुढे जाते तेव्हा नेत्याचे नावही मोठे होते. ती स्वाभाविक प्रक्रिया असली तरीही त्याने अनेक दोष निर्माण होतात. स्वामीजींनी याकडेही लक्ष दिले आणि सहकाऱ्यांना स्पष्ट शब्दात त्याची कल्पना दिली. १२ जानेवारी १८९५ रोजी अमेरिकेतून अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या नावाला प्राधान्य देण्याची गरज नाही. माझ्या कल्पना, माझे विचार, प्रत्यक्षात उतरण्याशीच माझे काम. साऱ्या महापुरुषांच्या शिष्यांनी गुरुचे उपदेश व गुरु ही व्यक्ती यांची गल्लत केलेली आढळते. एवढेच नव्हे तर अखेर त्यांनी व्यक्तीसाठी तिचे उपदेश नष्ट करून टाकले. ही गोष्ट घडू नये म्हणून श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी खूप खबरदारी घ्यावयास हवी. विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा. कुणा व्यक्तीसाठी म्हणून नव्हे.' काम उभे करताना स्वामीजी अशा प्रकारे खूप खबरदारी घेत होते.

कामाच्या प्रारंभिक अवस्थेत प्रत्येकालाच लहान मोठी सारीच कामे करावी लागतात. याबद्दल श्रीमती ओली बुल यांना २५ एप्रिल १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी चर्चा केली आहे. ज्ञानयोगाच्या वर्गाला येणाऱ्या सगळ्यांची नावे नोंदवून घ्यायची आणि सगळ्यांना सूचना पाठवायच्या हे एक मोठेच काम आहे. आपण आळसामुळे ते केले नाही. पण आता स्वत: ते काम करीन अशी प्रांजळ कबुलीही स्वामीजींनी दिली. सोबतच वर्गाला येणाऱ्या १२० लोकांची नावे कुमारी हॅम्लिन यांनी उतरवून घेतल्याबद्दल आनंद आणि आभारही व्यक्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा