बुधवार, २४ एप्रिल, २०१३

वावदूक विद्वानांचा गोरखधंदा

आपल्या देशाची खरंच सगळी गंमतच आहे. राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्षता यावर घसरली. काहीही कारण नसताना राष्ट्रपती धर्मनिरपेक्ष असावा अशी प्रतिक्रिया, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली. तिही इकॉनॉमिक टाईम्ससारख्या वृत्तपत्राला मुलाखत देऊन. सहज जातायेता दिलेली ती प्रतिक्रिया नव्हती. यातील राजकारण सार्यांनाच समजते. वर्हाडी भाषेत याला `खुटीउपाड'पणा म्हणतात. राजकीय आकांक्षांचा जो नंगा नाच आज देशात सुरु आहे त्याचाच हा नमुना आहे. त्यांच्या या मताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे मत व्यक्त केले. पंतप्रधान हिंदुत्ववादी असावा हे त्यांनी व्यक्त केलेले मत, लातूर येथे संघ स्वयंसेवकांच्या एकत्रीकरणात व्यक्त केले होते. पत्रक काढून वा पत्रकार परिषद घेऊन किंवा प्रसार माध्यमांनी विचारल्यावर वगैरे ते व्यक्त केले नव्हते. म्हणजेच ते एक प्रकारे खासगी वक्तव्य होते. तरीही त्याचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. त्यावर चर्चाही झडल्या. अन मी-मी म्हणणार्या विचारवंतांनी, बुद्धिवाद्यांनी, विद्वानांनी, पत्रकारांनी, संपादकांनी हिंदुत्वाला झोडपण्याची मिळालेली आयती संधी पुरेपूर वापरून घेतली. मराठी वाचकांशी संबंधित असल्याने त्यातील दोन नावांचा उल्लेख अस्थानी ठरू नये. एक होते `दिव्य मराठी'चे संपादक कुमार केतकर आणि दुसरे होते `लोकमत'चे संपादक सुरेश द्वादशीवार.

`हिंदुत्व' हा शब्द उच्चारल्यावर इतका पोटशूळ का उठावा हे खरेच अनाकलनीय आहे. हिंदू समाजाच्या इतिहासात आत्मग्लानीचा, आत्मनिषेधाचा एक कालखंड असा होता की स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याचीही लोकांना लाज वाटत असे. परंतु अगणित संतांनी, धार्मिक नेत्यांनी, विचारकांनी, कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन हिंदुत्वाला पुन:प्रतिष्ठा मिळवून दिली. अपमान, अवहेलना, उपेक्षा, उपहास, मस्करी हे सारे सहन केले. प्रसंगी जीवघेणा संघर्षही त्यांच्या वाट्याला आला. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगात मान्यता आहे अशा अनेक महानुभावांनी देखील `हिंदुत्वा'विषयी गौरवोद्गारच काढले आहेत.

स्वा. सावरकर वा डॉ. हेडगेवारच नव्हे तर स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या सार्यांनीच हिंदुत्वाचा गौरव केलेला आहे. हिंदुत्वाबद्दल महात्मा गांधींचे उद्गार तर अतिशय प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, `हिंदुत्व सत्याच्या सातत्यपूर्ण शोधयात्रेचे एक नाव आहे. आज ही यात्रा निर्जीव वाटत असली तर त्याचे कारण तिला आलेला थकवा हे आहे. ज्यावेळी हा थकवा दूर होईल, हिंदुत्व आपल्या पूर्ण शक्तीनिशी जगात पुन्हा यापूर्वी कोणीही पाहिले नव्हते एवढ्या तेजाने प्रकट होईल.' आपले पहिले दोन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे दोघेही हिंदुत्ववादीच होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तर पुनर्निर्माणानंतर सोमनाथाची पूजा बांधली होती. अगदी डॉ. अब्दुल कलाम यांनासुद्धा हिंदुत्ववादी म्हणणे गैर ठरू नये. हिंदुत्व विचारांचा गाभा त्यांनी आत्मसात केला असून त्यांच्या जगण्यातून हिंदुत्व प्रकट होते. हिंदुत्वाबद्दल त्यांचे मतही स्पष्ट आहे. त्याविषयी त्यांचे मन कलुषित नाही. काही वर्षांपूर्वी रामकृष्ण मिशनने प्रकाशित केलेल्या `encyclopedia of hinduism' या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत दिवंगत नरहर कुरुंदकर स्वत: मार्क्सवादी होते. त्यांनीही हिंदुत्वाबद्दल गौरवोद्गारच काढले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हिंदुत्वाविषयी काय म्हटले आहे ते पाहण्यासारखे आहे. १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा देताना म्हटले होते, "Ordinarily, Hindutva is understood as a way of life or a state of mind and is not to be equated with or understood as religious Hindu fundamentalism... it is a fallacy and an error of law to proceed on the assumption... that the use of words Hindutva or Hinduism per se depicts an attitude hostile to all persons practising any religion other than the Hindu religion... It may well be that these words are used in a speech to promote secularism or to emphasise the way of life of the Indian people and the Indian culture or ethos, or to criticise the policy of any political party as discriminatory or intolerant." यावर खरे तर काहीही भाष्य करण्याची गरज नाही.

एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी. ती म्हणजे, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू १९९२ साली धराशायी झाली होती. त्यासाठीचे आंदोलन आणि त्यामुळे उफाळून आलेल्या भावना शांत झाल्या होत्या. तत्कालीन उन्माद घडून गेला होता. त्या सार्याचीही चिरफाड सर्वोच्च न्यायालयापुढे झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. हिंदुत्व secularism ला बाधा आणते असा कंठशोष केला जात असताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र नेमके त्याविरुद्ध मत व्यक्त केले आहे. वावदुकगिरी करणार्या आमच्या विद्वानांना मात्र ते समजूनच घ्यायचे नाही. कारण त्यामुळे त्यांची व्यावहारिक गणिते बिघडतात.

हिंदुत्वाला झोडपण्याचा हा जो उद्योग चालतो त्यामागे विकृती, राजकारण आणि स्वार्थ याशिवाय अन्य काहीही नाही हे स्पष्ट आहे. अगदी मोठमोठे लोकही याला अपवाद नाहीत. काही साध्या गोष्टी विचारात घेतल्या तरी ते लक्षात येईल. या देशाचा इतिहास किती वर्षे जुना आहे. किमान ५ ते १० हजार वर्षे असे त्याचे सर्वमान्य उत्तर आहे. जगातील पहिले साहित्य कोणते याचे उत्तर, निर्विवादपणे ऋग्वेद असे आहे. इस्लामचा जन्म कधी झाला याचे उत्तर सुमारे १५०० वर्षांपूर्वी असे आहे. ख्रिश्चन कालगणना (जी आज प्रचलित आहे) २ हजार वर्षांची आहे. या देशाचे भारत हे नाव पौराणिक काळापासूनचे आहे. या सार्या गोष्टी सूर्यप्रकाशाएवढ्या स्पष्ट असताना पुन्हा हे राष्ट्र कोणाचे, हा प्रश्न खरे तर उपस्थितच व्हावयास नको. पण आमच्या मट्ठ डोक्यात इतक्या साधेपणाने काही शिरतच नाही.

बरे या देशातील मुसलमानांचे आगमन अतिशय बंधुभावाचे आणि सभ्यतेचे होते असा जो तर्क धर्मनिरपेक्ष मंडळी देतात तो मानायचा तर छत्रपती शिवाजी, बंदा बैरागी, राणा प्रताप, खालसा पंथ, हरिहर, बुक्कराय वगैरे लोकांना काय वेड लागले होते रणांगणात उतरायला? खरे तर मुसलमान काय अथवा इंग्रजांच्या रूपाने ख्रिश्चन काय यांनी भारताचे लचके तोडले, प्रचंड शोषण केले आणि भारताच्या जीवावर ऐषोआराम केले हेच वास्तव आहे. त्याची कारणे काहीही असोत, त्यासाठी येथील समाज स्वत: कितीही जबाबदार असो तरीही त्यांच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीचा वा समाजाचा दुबळेपणा व विस्कळीतपणा हा आक्रमकपणा आणि शोषण यांचे समर्थन तर नाही ना ठरू शकत? इंग्रजांनी आमच्या शिक्षणाची कशी दैना केली आणि किती खोटेनाटेपणा केला हे आता लपून राहिलेले नाही. प्रसिद्ध गांधीवादी प्रो. धरमपाल यांच्या ७० व ८० च्या दशकातील संशोधनपूर्ण लिखाणाने तर त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण स्वत:ला गांधींचे अभ्यासक म्हणवून घेणार्यांनाही त्याकडे लक्ष द्यायचेच नाही. बाकीक्यांचे तर सोडूनच द्या. कारण? कारण एकच, ते त्यांच्या सोयीचे नाही.

हिंदुत्व हा या देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा अनमोल ठेवा आहे. हिंदुत्व हे एका विश्वकल्याणी चिंतनाचे नाव आहे. हिंदुत्व हे सनातन जीवनप्रवाहाचे नाव आहे. त्याला चिकटलेले अथवा त्या प्रवाहात स्वयंभूपणे निर्माण झालेले सारे दोष आणि विकृती यानंतर सुद्धा त्याचा जोम, चैतन्य आणि वैश्विक कल्याणाची शक्ती कायम आहे. हिंदुत्व हे बावनकशी सोने आहे आणि सोने शेणात पडले तरीही त्याचे मूल्य कमी होत नाही. कोणीही शहाणा माणूस ते टाकून देणार नाही. साफसूफ करून तिजोरीत ठेवेल. हिंदुत्वाला चिकटलेली जळमटे साफसूफ करण्याची खरे तर गरज आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने बोंबा मारल्या जातात तो संघच वास्तविक ही जळमटे साफ करण्याचे काम करीत आहे.

अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील कलंक आहे हे मान्य करून तो दूर करण्यासाठी संघाने केलेले काम दृष्टीआड का केले जाते? सवर्णांच्या मनात अवर्णाविषयी ममत्व निर्माण करण्याचे काम संघाने अखंडपणे केले आहे. सामान्य माणसाची मानसिकता लक्षात घेऊन सर्व शंकराचार्य आणि धर्माचार्य यांना एकत्र आणून `अस्पृश्यतेला धर्मात काहीही स्थान नाही' हे त्यांच्या मुखाने वदवून घेण्याचे एक महाकठीण काम संघानेच विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केले आहे. केवळ मठ स्थापन कारणे म्हणजे धर्मकार्य नाही, ज्या समाजासाठी हा धर्म आहे, त्याच्या सुखदु:खाची चिंता आम्ही वाहिली पाहिजे हा विचार सर्वदूर पसरवून धर्मपिठांना सामाजिक दृष्टीने सक्रिय करण्याचे काम संघानेच केले आहे. धर्म ही केवळ नागर समाजाचा विचार करणारी बाब नाही तर सगळ्या चराचर सृष्टीचे कल्याण आणि त्यात मेळ घालणे हे धर्माचे काम आहे, असा भाव जागवून वनात राहणाऱ्या लोकांसाठी मोठमोठाली कामे संघानेच उभी केली आहेत.

सरकार आणि सत्ता यांच्या तोंडाकडे पाहून संघाने हे केलेले नाही. उलट सतत अपमान, अवहेलना, उपेक्षा सोसून हे केले आहे. हाच हिंदुत्वाचा आशय आहे. म्हणूनच कोणी काहीही कावकाव केली तरीही संघाच्या हिंदुत्वाला लोकमान्यता मिळाली आहे. या मतावर लगेच, `मग तुमचे किती खासदार निवडून येतात?' असा गाढव प्रश्न करायला विद्वान डोमकावळे तयार असतातच. राजकारण आणि सत्ता याशिवाय समाजाचे जे स्वयंभू अस्तित्व असते, ते समजण्याची त्यांची कुवतदेखील नाही. खासदार निवडून न येताही समाजाचे भले करता येते ही साधी गोष्ट समजण्याची सुद्धा त्यांची पात्रता नाही.

संघाशिवायही अनेक हिंदुत्व मानणारे गट, संस्था, संघटना देशात व विदेशात आहेत. त्या सार्याच हिंदुत्वाचा गौरव आणि सार्थकता वाढवित आहेत. त्यातील जे हिणकस आणि गालबोट लावणारे आहे त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. पण अशा अपवादांकडे बोट दाखवून मूळ प्रवाहालाच बदनाम करणे हा कोतेपणा आहे.

सगळ्यात महत्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे हिंदू-मुसलमान संबंधांचा. खरे तर या बाबतीत मुसलमान व ख्रिश्चन यांच्यापेक्षा हे दीड शहाणेच जास्त चिंतित दिसतात. या समस्येचा विचार त्याच्या ऐतिहासिक पृष्ठभूमीसह व्हायला हवा. सुमारे ७०० ते ८०० वर्षे या देशात हिंदू व मुस्लिम यांच्यात संघर्ष सुरु होता. इंग्रजी राज्य आल्यानंतर त्याचे स्वरूप बदलले तरीही तो संपला मात्र नाही. दोन्ही समाजात पूर्ण सौहार्द, समजूतदारपणा, प्रेम उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही. मुसलमान समाजाच्या धार्मिक, सामाजिक मान्यता, दारूल-इस्लामचे त्यांचे जागतिक ध्येय; अशा काही गोष्टींमुळे समन्वयात बाधा येते. हिंदूंच्या बाजूने हा संघर्ष अस्तित्वाचा आहे, तर मुसलमानांच्या बाजूने हा संघर्ष वर्चस्वाचा आहे. जगाच्या बदललेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था आणि संगणक युग यामुळे हा संघर्षही वेगळे रूप घेतो आहे. परंतु कोणतीही समस्या सुटण्यासाठी आवश्यक असलेल्या परस्पर विश्वासाचा अभाव मात्र कायमच आहे.

हा परस्पर विश्वास निर्माण व्हावा यासाठी आणि संवाद वाढावा यासाठीही खरे तर संघानेच प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला सकारात्मक फळही येते आहे. दोन वर्षांपूर्वी संघातर्फे विश्वमंगल गो-ग्राम यात्रा काढण्यात आली होती. या देशव्यापी यात्रेला प्रतिसादही चांगला मिळाला. या यात्रेचा समारोप नागपूरला रेशीमबाग मैदानावर झाला. या समारोप कार्यक्रमात शंकराचार्य आणि सरसंघचालकांच्या मांडीला मांडी लावून तीन मुस्लिम विचारक बसले होते. अन त्यांनी गोरक्षेच्या बाजूने आपले मनोगत खुलेपणाने व्यक्त केले. संघाच्याच प्रयत्नाने राष्ट्रवादी मुस्लिम मंच ही देशव्यापी संघटना तयार झाली आहे. हजारो मुसलमान या संघटनेचे सभासद आहेत. हिंदू व मुसलमान यांच्यात सार्थक संवाद घडवण्याचे काम ही संघटना करते. धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांना हे दिसत नाही? एक तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे वा ते आंधळे तरी आहेत. त्यांना मनापासून या समाजाची आणि देशाची कळकळ आहे तर दुरावलेल्या समुदायांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी करायला हवे होते. ते त्यांनी का केले नाही? नुसती वटवट करून काय फायदा?

राहिला प्रश्न रामजन्मभूमीचा आणि गुजरात दंगलींचा. वास्तविक या ढोंगी दलालांनी या विषयांवर बोलूच नये. त्यांना तो नैतिक अधिकारही नाही आणि बोलू लागलेच तर त्यांचेच दात त्यांच्या घशात घातले जातात. रामजन्मभूमीचा प्रश्न हा भावनेचा तर आहेच पण तो दोन्ही समुदायातील समन्वयासाठीचा प्रतिकात्मक प्रश्न आहे. प्रतिकात्मक रीतीने मुसलमान समाजाने रामजन्मभूमी हिंदूंच्या स्वाधीन केली तरी खूप मोठा फरक पडेल. न्यायालयीन आणि ऐतिहासिक दृष्टीने तर ती हिंदूंची आहेच पण त्यातील प्रतिकात्मता अधिक महत्वाची आहे. आता तर न्यायालयानेच हे मान्य केले आहे. पण सर्व धर्मांबद्दल समान भाव बाळगणार्या या वावदुकांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. का नाही निघत त्यांच्या तोंडून की, रामजन्मभूमी हिंदूंना देण्यात यावी. तसेच गुजरात दंगलींचे. मुळात गोध्रा कांड घडले म्हणून दंगली उसळल्या. पण हे विद्वान गोध्रा हा शब्दही तोंडातून काढत नाहीत. का? हिंदूंचा जीव, जीव नाही? गुजरात दंगली चूकच आहेत, पण गोध्रा चूक नाही का? उलट हे हिंदुद्वेष्टे गोध्रा कांड हा कारसेवकांनीच रचलेला बनाव होता हे सिद्ध करण्याची धडपड करतात. अन म्हणूनच यांच्या विरोधात उभे राहावे लागते.

वास्तविक हिंदू, हिंदुत्व यांचा इतका आग्रह धरला नाही तरीही चालण्यासारखे आहे. पण भारतीय व मानवतावादी या शब्दांच्या आडून जी शिखंडी चाल हिंदू समाजाविरुद्ध खेळली जाते त्यामुळे `हिंदू'चा आग्रह धरावा लागतो. काहीही कर्तृत्व नसताना, केवळ हाती लेखणी आहे आणि कोणाला तरी दलाल हवे आहेत म्हणून खुर्च्या मिळाल्या आहेत. त्याचा पुरेपूर गैरवापर करून घ्यायचा आणि स्वार्थ साधून घ्यायचा हाच या विद्वानांचा धंदा आहे. त्यांना ना हिंदुत्वाशी देणेघेणे आहे ना secularism शी, ना देशाशी ना मानवतेशी. एक सडका आंबाही पूर्ण गाडीभर आंबे सडवून टाकू शकतो. म्हणूनच नाईलाजाने वेळोवेळी या ढोंगी लोकांचा समाचार घेणे भाग पडते.

- श्रीपाद कोठे, नागपूर
रविवार, २४ जून २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा