बुधवार, २४ एप्रिल, २०१३

तंत्रज्ञानाला तत्वज्ञानाची जोड हवी

(भारतीय शिक्षण मंडळाच्या अखिल भारतीय अधिवेशनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशित लेख.)

मानवी सभ्यतेच्या विकासाचा इतिहास हा तंत्रज्ञानाच्या विकासयात्रेशी अविच्छिन्नपणे जुळलेला आहे. चकमक एकमेकावर घासली की आग उत्पन्न होते हे मानवाला ज्या क्षणी कळले, त्या क्षणापासून मानवी सभ्यता आणि तंत्रज्ञान यांचा विकास सुरु झाला. शेकोटी पेटवून उब मिळवणे, कंदमुळे भाजून खाणे, मांस आदी भाजणे, शिजवणे असा प्रवास सुरु झाला. हळूहळू अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांसाठी उपयुक्त साहित्य शोधणे, जमवणे, त्यांच्या वस्तू तयार करणे हे सुरु झाले. Trial & error अशा पद्धतीने हे सुरु होते. एकाने दुसर्याला सांगणे, शिकवणे; यासोबतच निरीक्षणाचाही त्यात मोठा वाटा होता. यानंतरची पायरी होती आरोग्य, नंतर कला. औषधे, रंगरंगोटी, संगीत, वादन, शृंगार अशी भरारी मानवी सभ्यता घेत गेली. मानवी प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा विविधरंगी आणि विविधअंगी विलास मानवी सभ्यतेच्या इतिहासाने पाहिला आहे. जगभरात सर्वत्र ही प्रक्रिया सुरु होती. त्यात देवाणघेवाण फारशी नव्हती. त्यामुळे अनेक मानवी समूह आपापल्या मगदुराप्रमाणे जगत होते. जगण्याच्या या क्रियाप्रतिक्रियेतूनच मानवी समूहांना समाजरूप आले. व्यक्तीप्रमाणेच समाजाच्याही गरजा निर्माण झाल्या त्यासाठी समाजांतर्गत संस्था निर्माण झाल्या.

त्यातूनच समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य आदींचा विकास झाला. भाषांचा विकास झाला. या प्रक्रियेतून स्थिर मानवी समूह उदयाला आले. या समूहांमध्ये अमूर्त अशा `आपले’पणाचा व अन्य जाणीवांचाही विकास झाला. यात `स्वामीत्वा’चीही जाणीव होती. स्थिरता आल्यामुळे माणसाला अन्य गोष्टी खुणावू लागल्या. भूगोल, निसर्ग जाणून घेणे; नाविन्याचा शोध; गरजा; करुणा अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हिंडूफिरू लागला. आपल्या समूहाला सोडून बाहेर पडू लागला. यातूनच व्यक्तिगत आणि सामूहिक संरक्षणाची साधने, पद्धती व व्यवस्था विकास पावल्या. तंत्रज्ञानाचीही देवाणघेवाण होऊ लागली. विनिमय सुरु झाला. आपल्याकडे असलेली वस्तू, माहिती, ज्ञान, कला, कौशल्य देऊन त्याबदल्यात आपल्याकडे नसलेली गोष्ट प्राप्त करणे सुरु झाले. अधूनमधून लढाया, संघर्ष हेही होत असत. परंतु त्यांचे स्वरूप मर्यादित होते. मात्र जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर, त्यानंतर उदयास आलेले ख्रिश्चन व इस्लाम पंथ यांनी जग ढवळायला सुरुवात केली होती. मानवी सभ्यतेचा शांत प्रवाह ढवळून निघू लागला. आक्रमकता, स्वामित्व, अधिकार हे जगात परवलीचे शब्द बनू लागले. त्या तुलनेत पौर्वात्य- विशेषत: हिंदू व बौद्ध धर्मांचे प्रयत्न तोकडे पडले.

सुमारे सोळाव्या- सतराव्या शतकापासून मानवी प्रज्ञा आधुनिक भौतिकशास्त्रांकडे झेप घेऊ लागली. प्राचीन भारतात या भौतिकशास्त्रांचा उच्च विकास घडून आला होता. त्याला आधार बनवून समाजाची घडीही बसवण्यात आली होती. आजही त्याची चिन्हं पाहायला मिळतात. परंतु सुमारे हजार वर्षांच्या आक्रमणाला तोंड देता देता भारतीय समाजाची दमछाक झाली आणि ज्ञानविज्ञानाचा विकास, प्रचार- प्रसार लोपल्यागत झाले. परंतु इ.स. १७७५ मध्ये विकसित झालेले वाफेचे इंजिन हा मानवी सभ्यतेच्या विकासातील अतिशय महत्वाचा मैलाचा दगड ठरला. या वाफेच्या इंजिनामुळे उत्पादन आणि दळणवळण यात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. मायकेल फारादेने १८२१ मध्ये इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लावला, त्यानंतर त्याच शतकात electricity magnetism यात झालेल्या संशोधनाने मानवी जीवनपद्धतीत मोठे बदल तर घडवलेच पण त्याला गतीही प्रदान केली. इ.स. १८५९ मध्ये पहिली आधुनिक तेलविहीर अस्तित्वात आली. या सार्या घडामोडी मानवी सभ्यतेसाठी अकल्पनीय होत्या. त्यांनी जीवनशैलीसोबतच, विचार, संकल्पना आदींनाही धक्के देणे सुरु केले. मात्र मानवी सभ्यतेच्या बहिरंगासोबतच त्याचे अंतरंग मात्र बदलले नाही. जगावर, निसर्गावर, साधनांवर, संपत्तीवर, समाजांवर, देशांवर अधिकार गाजवण्याची लालसा मात्र नियंत्रित होऊ शकली नाही. सभ्यतेचा विकास झाला पण संस्कृतीचा विकास मात्र हवा तसा आणि हवा त्या प्रमाणात झाला नाही. १९ व्या शतकापासूनचा मानवी सभ्यतेचा अन म्हणूनच तंत्रज्ञानाचा विकास आज २१ व्या शतकात प्रश्नांकित झालेला आहे.

१८ व्या शतकात तंत्रज्ञान भरारी घेऊ लागले. त्याला उद्योगांची जोड मिळाली. त्यामुळे अर्थकारण बदलले. उत्पादन, वितरण, उपभोग यांच्या पद्धती तर बदलल्याच, सोबतच त्यांचे उद्देशही बदलले. गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन हे मागे पडत गेले आणि पैसा मिळवण्यासाठी उत्पादन सुरु झाले. अभावांची पूर्तता करण्यासाठी वितरण हे मागे पडत गेले आणि प्रभावाची लालसा प्रमुख झाली. आनंद आणि समाधान यासाठी उपभोग मागे पडत गेले आणि त्यांची जागा उन्माद आणि वखवख यांनी घेतली. याच काळात युरोपात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात संघर्ष सुरु झाला. त्यात धर्मसत्ता व राजसत्ता वेगवेगळे झाले. त्यांच्यात सहकाराऐवजी चढाओढ सुरु झाली. याचे कारण त्यांच्यापुढे स्वत:चे अस्तित्व टिकवणे हाच उद्देश होता. समाजाचे, मानवाचे कल्याण यासारखे मोठे ध्येय नव्हते. या संघर्षातूनच विविध लहानमोठ्या अस्मितांच्या आकांक्षा उद्दीपित झाल्या. प्रबोधनपर्वाला सुरुवात झाली. परंतु या प्रबोधनपर्वाच्या मुळाशीही `सर्वेपि सुखिन: सन्तु’ अशा प्रकारची विशाल, कालजयी, विश्वकल्याणी प्रेरणा नव्हती; तर छोट्याछोट्या भौतिक सुखसुविधा वा छोटेछोटे मनोभाव एवढेच होते. तंत्रज्ञानाची वाटचाल, धर्मसत्ता व राजकीय सत्ता यातील संघर्ष व आकांक्षांच्या लहानमोठ्या लाटा यांनी पुढच्या काळात जागतिक विकासाला घाट दिला.

१८ वे शतक संपतासंपता पूर्ण झालेली फ्रेंच राज्यक्रांती, तिने प्रतिपादित केलेली स्वातंत्र्य- समता- बंधुता- ही तत्वे, १९व्या शतकाच्या मध्यावर मार्क्सने मांडलेला communist manifesto, मार्क्स व त्याचा सहकारी एंजल्स यांनी १९ व्या शतकाच्या अखेरीस मांडलेले capital, १९१७ ची रशियन राज्यक्रांती, अर्ध्याहून अधिक भूभागावर असलेली इंग्रजी सत्ता, त्या सत्तेच्या साह्याने झालेला वस्तू- विचार-कल्पना- जीवन पद्धती- यांचा प्रचार प्रसार, इंग्रजी साम्राज्याविरुद्ध झालेले उठाव आणि संघर्ष, अमेरिकेचा उदय आणि वाटचाल अशा अनेक घटना व घडामोडींनी मानवी सभ्यता आकार घेत गेली. या सगळ्यातून वाहणारा अंतस्थ प्रवाह आणि त्याचे बाह्य दर्शन मात्र एकाच स्वरूपाचे होते. शारीर, भौतिक लाभहानी; मनाशी संबंधित भावभावना, सुखदु:ख; श्रेष्ठ- कनिष्ठतेच्या भावना व कल्पना; स्वामित्वाची प्रबळ लालसा एवढेच त्याचे मर्यादित स्वरूप होते. या सार्यात सामान्य माणसाची ओढाताण आणि होरपळ सुरूच होती. पहिल्या व दुसर्या महायुद्धाने ही ओढाताण व होरपळ खूप अधिक वाढवली. यातून व्यक्तिवाद व व्यक्तीकेन्द्रीतता वाढली. असुरक्षितता वाढली. ही असुरक्षितता अधिक काळ टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यावर उपाययोजना सुरु झाल्या. परंतु एक प्रदीर्घ काळ उलटला तरीही ही असुरक्षितता निकालात निघणे दूरच, उलट तिने भयग्रस्ततेचे विकराल रूप धारण केले आहे.

ही असुरक्षितता आता अस्तित्वाची असुरक्षितता, वित्तीय असुरक्षितता, कौटुंबिक असुरक्षितता, सामाजिक असुरक्षितता, देशांची असुरक्षितता अशा अनेक रूपांनी थैमान घालते आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. एक प्रश्न सुटला तरीही १० नवीन प्रश्न उभे होतात. परिणामी, भारतीय संसदेत एक विधेयक `अन्नसुरक्षा विधेयक’ म्हणूनच सादर केले गेले. व्यक्तीजीवनाच्या व समाजजीवनाच्या अंगोपांगात ही असुरक्षितता इतक्या मोठ्या प्रमाणात शिरली, की तिनेच मानवाला `आपले भवितव्य काय असेल?’ असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. यालाच काही विचारी आणि समजूतदार लोकांनी `शाश्वत विकास’ असे उत्तर दिले. `विकास’ आणि `शाश्वत विकास’ असा संघर्ष आज जगभरात सर्वत्र दिसतो. तो नीट समजून घ्यावा लागेल.

आज विकास याचा अर्थ- वेग, नवीनता, बदल, शारीर श्रमांना नकार, यंत्रांचा वापर, कृत्रिम उर्जेचा वापर, स्पर्धा, यशस्वीता, व्यक्तीची सर्वोच्चता, भौतिक विज्ञानाची सर्वोच्चता, निसर्गाला दुय्यम स्थान, गरजांमध्ये सतत वाढ करीत जाणे, वस्तूंचा संग्रह, भौतिक वा अभौतिक सार्याच गोष्टी मूल्याऐवजी किमतीत तोलणे, पैसा असा झालेला आहे. या सार्यांनी निर्माण केलेले प्रश्न आज मानवजात पाहत आहे, अनुभवत आहे. त्यावर सर्वत्र चर्चाही होत आहेत. या विकासाच्या पद्धतीने निर्माण केलेले प्रश्न समजून घेण्यासाठी पाणी हे एक चांगले उदाहरण होऊ शकेल.

पाण्याचा अतिरेकी वापर सर्वत्र होत असल्याने आज पाण्याची एकूण उपलब्धता घटली आहे. शुद्ध पिण्याचे पाणी तर त्याहूनही कमी झाले आहे. जमिनीतील पाणी आटत चालले आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाणी प्यायला द्यायचे, की सिंचनाला, की उद्योगांना हाच सगळ्यात प्रमुख मुद्दा बनला आहे. राजकीय पक्ष असोत वा जिल्ह्याजिल्ह्यातील लोकचळवळी यांच्यात सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. दुसरीकडे लवासासारखे प्रकल्प मात्र उभे होत आहेत. त्यांना पाणी दिले जात आहे. लवासा हे कोणाच्याही जगण्यासाठी उभारण्यात आलेले नाही. ते जगण्याचे प्रश्न संपलेल्या लोकांच्या ऐषोआरामासाठी उभारले आहे. अगदी ते उभारणारे वा त्याचा उपभोग घेणारेही हे नाकारणार नाहीत. त्यातून पैसा कदाचित उभा होत असेल पण तो कोणाचे तरी जगणे हिरावून उभा होतो हे वास्तव आहे. आजचा विकास हा विकास नसून विलास आहे, हे स्पष्ट होण्यास एवढे उदाहरण पुरेसे आहे.

मात्र पाण्याचे उदाहरण इथेच थांबत नाही. वापरल्या जाणार्या पाण्याची विल्हेवाट ही सुद्धा मानवापुढील मोठी समस्या आहे. वापरल्या गेलेल्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण इतके भीषण आहे की, आता उपलब्ध असलेले चांगले पाणीही त्यामुळे प्रदूषित होत आहे. अगदी ज्या पवित्र गंगा नदीचे पाणी कधीही खराब होत नव्हते, लोक जे पाणी अखेरच्या श्वासासाठी घरी जपून ठेवीत असत; ते गंगेचे पाणीही कर्करोग पसरवित असल्याचे निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढले आहेत. वीज प्रकल्पांसाठी त्यावर बांधण्यात येणाऱ्या धरणांमुळे नजीकच्या भविष्यातच गंगा नदीच आटून जाईल की काय असा संभ्रम उत्पन्न झाला आहे. गंगोत्रीची क्षमता आटत चालली आहे. सांडपाण्यामुळे शेतजमिनी निकामी होत आहेत. घरापुढे अगदी कोणीही अपरिचित उभा राहिला तरीही त्याला पाण्यासाठी नाही म्हणायचे नाही, असे मूल्य जपणार्या आपल्या समाजात पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. मूल्यात्मकतेचा याहून अधिक र्हास काय असू शकेल?

पाणी, जमीन, हवा या नैसर्गिक संसाधनांसोबतच ध्वनी, प्रकाश या स्वत: मानवाने विकसित केलेल्या गोष्टींचेही प्रदूषण सुरु झाले आहे. या विविध प्रदूषणाच्या परिणामी गायीच्या आचळातील दूध आणि जमिनीतून उगवणारे धान्यही प्रदूषित झाले आहे. विद्यमान विकासाने आरोग्याचे प्रश्नही आ वासून उभे राहिले आहेत. शारीरिक त्रास, रोग, व्याधी हे जगाच्या प्रारंभापासूनच आहेत. परंतु ताणतणाव, मानसिक असंतुलन, गुणसूत्रातील कृत्रिम बदल अशा अनेक गोष्टी आधुनिक विकासाची देण आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. प्रदूषण आणि आरोग्य याशिवाय निर्माण झालेले सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न तर असंख्य आहेत. आणि हे सारे इतके गुंतागुंतीचे आहे, की त्याची नीट मांडणी सुद्धा कठीण होऊन बसते. हा गुंता कसा सोडवावा आणि कुठून सुरुवात करावी हा आज जगभरात सार्याच्याच चिंतनाचा विषय झाला आहे. समाजवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, भांडवलशाही, लोकशाही अशा ठोकळेबाज पद्धतीने त्यावर तोडगा निघणे कठीण आहे हेही आजपर्यंत पुरेसे स्पष्ट झाले आहे. अर्थात पर्यायाच्या अभावी तेच ते वैचारिक आणि सैद्धांतिक राग आळवले जातात. पण त्यात फारसे काही उरलेले नाही हे सगळ्यांच्या ध्यानात येऊ लागले आहे.

गेल्या काही वर्षात सुरु झालेल्या शाश्वत विकासाचाही थोडा विचार करावा लागेल. अनिर्बंध विकासामुळे ही पृथ्वी व त्यावरील मानवजात नष्ट होऊ नये. मानवाच्या भावी पिढ्याही भविष्यात प्रदीर्घ काळपर्यंत या पृथ्वीवर सुखाने नांदू शकायला हव्यात, हा अतिशय चांगला, स्तुत्य आणि उदात्त विचार त्यामागे आहे. शाश्वत विकासाची सैद्धांतिक मांडणी आणि त्यानुसार काय जीवनशैली असू शकेल त्याचे प्रयोगही सुरु झाले आहेत. १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने प्रथम या विषयाला हात घातला त्यावेळी आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक अशा तीन स्तरांवर काम करण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली. त्यानंतर २००१ साली त्याला संस्कृती या चौथ्या बाबीची जोड देण्यात आली. शाश्वत विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना जगातील सामान्य माणसांच्या गरजांना प्राधान्य मिळावे, त्यासाठी योग्य अशा तंत्रज्ञानाचा विकास करायला हवा, निरनिराळ्या स्तरावर आर्थिक- सामाजिक संघटना स्थापन करण्यात याव्या, विद्यमान आर्थिक- राजकीय संस्थांचे त्यासाठी सहकार्य मिळवावे आणि स्थानिक लोकांचे यासाठी सहकार्य मिळवावे, असा एकूण आराखडा तयार करण्यात आला. यानुसार कामही सुरु झाले. शाश्वत विकासाच्या या भूमिकेविषयी किमान वैचारिक पातळीवर दुमत होण्यासारखे काहीही नाही. सामान्य माणूस, राजकीय नेतृत्व हे तर याच्या विरोधात भूमिका घेऊच शकत नाहीत. पण दाखवण्यापुरती का होईना उद्योगांनाही याच्या विरोधात वैचारिक भूमिका घेता येत नाही. अंमलबजावणीच्या स्तरावर मात्र कधी संघर्ष होताना, तर कधी भंपकपणा होताना पाहायला मिळतो.

विकासाच्या नावाखाली ५०-१०० वर्षांची झाडे कापली जातात, तर पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली छोटी छोटी झाडे लावली जातात. खरे तर जेवढी झाडे तोडायची आहेत तेवढी लावून ५०-१०० वर्षे त्यांचे संगोपन करायला हवे अन मग तोडणी करायला हवी. १०० वर्षांचे झाड तोडून छोटेसे रोपटे लावले तर ते होणारे नुकसान भरून काढू शकेल का? टेकड्या, डोंगर, पहाड यांची तर फक्त कत्तल सुरु आहे. त्यांचा एकूण निसर्ग साखळीतील सहभाग कोणी विचारात सुद्धा घ्यायला तयार नाही. माती झाकून टाकताना पाणी आतवर कसे झिरपेल याचा विचार मात्र होत नाही. या भंपकपणासोबतच संघर्षही पाहायला मिळतात. एखाद्या विकास प्रकल्पाला पर्यावरण खात्याची परवानगी मिळणे वा रद्द होणे याचे एखादे उदाहरण, हा संघर्ष स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. भारतात तर सध्याच्या केंद्र सरकारने एक मंत्र्यांचा गटच स्थापन केला जो पर्यावरण आदी कोणत्याही परवानग्या वगैरेची फिकीर न करता, किंबहुना ते बाजूस सारून एखाद्या उद्योगाला परवानगी देऊ शकेल. या गटाच्या विरुद्ध केंद्रातील पर्यावरण मंत्रीच भडकल्या. त्यामुळे तो मुद्दा सध्या शांत आहे. अर्थात याचा अर्थ तो प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही.

विचारांच्या स्तरावर एकमत होऊनही असे का होते? याच्या मुळाशी दोनच कारणे आहेत. एक आहे- हातून सत्ता न सुटणे; अन दुसरे आहे- हातून पैसा न सुटणे. पैसा, अधिक पैसा, त्याहून अधिक पैसा... त्यासाठी विस्तार... व्यवसायाचा विस्तार, उद्योगाचा विस्तार, व्यापाराचा विस्तार... तसे नसते तर wallmart ला काय पोटापुरते पैसे मिळत नाहीत का? की गेली हजारो वर्षे जगभरात कोणी किराणा विकलाच नाही? तेच रिलायंसचे. खनिज तेलाचे शुद्धीकरण करता करता भाजी विकण्याची काय गरज? गावोगावी भाजी विकणारे नाहीत की काय? बरे उत्पादन, वितरण, उपभोग या आर्थिक साखळीत काही तृटी असतील तर तेवढ्या दूर करण्यापुरती मदत करून, स्वत: दूर व्हायला काय हरकत आहे? त्यात पुन्हा आपला वाटा कशाला हवा? पैशाची हाव, लालसा हे एकमेव कारण आहे. जगण्यासाठी जेवढा पैसा लागतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा या लोकांकडे आहे. एवढेच नाही तर ऐषोआरामाचे star वाढत चालले आहेत. सत्तेच्या बाबतीतही हेच आहे. जमिनी असोत, पाणी असो, खनिजे असोत, किंवा निर्णयांचे अधिकार, कायदे- नियम तयार करण्याचे अधिकार- सत्तेला आपल्या हातून काहीही सोडायचे नाही. ठिकठिकाणी विकसित झालेल्या शेकडो, हजारो वर्षांच्या व्यवस्था मोडीत काढून आपल्या सोयीच्या व्यवस्था लादण्याचा प्रकार सुरु आहे. स्थानिक लोकांचा सहभाग वगैरे तोंडी लावण्यापुरते. लालसा फक्त सत्तेची. सारं काही आम्ही ठरवणार. प्रत्येकाला आमच्याकडेच यावं लागायला हवं. आमच्या विनंत्या करायला हव्यात. सारी सूत्रे आपल्या हाती आहेत याचं विकृत, आसुरी सुख हीच यामागची प्रेरणा आहे. सत्ता आणि संपत्ती या दोघांनाही एकमेकांची गरज असल्याने ते एकत्र आले आहेत आणि परस्पर सांगनमताने सारं काही सुरु आहे. आज जगभरात त्यासाठी crony capitalism असा शब्द वापरला जातो. स्पर्धा हे जीवनाचे सूत्र समजल्यामुळे ज्याची ताकद जास्त, ज्याच्याजवळ युक्त्या प्रयुक्त्या अधिक, चलाखी अधिक, अन बाजी मारणारे नशीब ज्याचे जोरावर तो यशस्वी ठरतो. सुखपूर्ण सहजीवनाची मुळात प्रेरणाच नाही. त्यामुळे सत्तेचे, संपत्तीचे, साधनांचे असमतोल निर्माण झाले आहेत. आणि जगात सारीकडेच संघर्ष सुरु झाले आहेत. या संघर्षात एक बाजू अस्तित्वासाठी लढत आहे, तर दुसरी अधिकारासाठी. एक बाजू जगण्यासाठी लढते आहे, तर दुसरी जय मिळवण्यासाठी.

शाश्वत विकासाचा विचार मांडताना संयुक्त राष्ट्रसंघाने सुयोग्य तंत्रज्ञानाचा विकास व वापर असेही एक सूत्र समोर ठेवले होते. तंत्रज्ञानाचा विकास, विस्तार, वापर, शिक्षण अन त्याकडे पाहण्याची दृष्टी याची आज काय स्थिती आहे? ही स्थिती निराशाजनक आहे. या स्थितीचे एका शब्दात वर्णन करायचे तर `पैसाधार्जिणी’ या शब्दात करता येईल. या मुद्याचा थोडा तपशीलवार विचार करणे आवश्यक आहे. इंधन हा आज जगातील कळीचा मुद्दा आहे. घरोघरी वापरला जाणारा स्वयंपाकाचा ग्यास तर आज स्फोटक बनला आहे. अनेकांनी यावर पुष्कळ तोडगेही काढले आहेत. गायीच्या शेणापासून गोबर ग्यास मिळवणारे बरेच आहेत. हा यशस्वी झालेला प्रयोग आहे. पण यातील गोम समजण्यासाठी एका गमतीकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. टाटा उद्योग घराण्याशी संबंधित टाटा समाज विज्ञान संस्थेने स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थांपासून यशस्वीपणे स्वयंपाकाचा ग्यास बनवला आहे. टाटाने त्या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन मात्र सुरु केले नाही. मोटारींचे कारखाने काढायला त्यांचे प्राधान्य आहे. गरज कशाची आहे- मोटारींची की स्वयंपाकाच्या ग्यासची? धोरणे कशी ठरवली जातात त्याचे हे उदाहरण आहे. मध्यंतरी शेणापासून विजेची निर्मिती करणार्या शेतकर्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील उदाहरण पाहायला मिळाले. मात्र अशा प्रकारच्या संशोधनांना प्राधान्य, प्रतिष्ठा, प्रचार- प्रसाराची संधी, प्रोत्साहन दिले जात नाही. कारण त्यात आपल्या हातातील सत्ता व संपत्तीची सूत्रे निसटून जाण्याची भीती असते. आज भारतासारख्या देशात मालवाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडीचा उपयोग करायला काय हरकत आहे? ती अधिक सोयीची कशी करता येईल याचा विचार होऊ शकतो. तसे प्रयोग करणारेही आहेत. पण तसे केले तर सत्ता व संपत्तीच्या नाड्या निसटून जातील ना?

याच्याच जोडीला patent नावाचा प्रकार आहे. एखादे patent मिळाले की आम्हीही खुश होतो, पण मुळात patent ही गोष्टच किती चुकीची वा घातक आहे हे समजून घ्यायला हवे. आर्थिक फायद्यासाठीच हे patent नावाचे खूळ अस्तित्वात आले आहे. एखादी वस्तू वा पद्धती एकाहून अधिक लोकांना सुचू शकत नाही का? आणि समजा ती एखाद्याला प्रथम सुचली तर त्यानंतर विशिष्ट काळापर्यंत कोणी त्यावर काहीही काम करू शकणार नाही वा त्याचा वापर करू शकणार नाही ही सरळ सरळ डाकुगिरी नाही का? `ईशावास्यमिदं सर्वम’ असे अनुभूतीच्या आधारे सांगणार्या आपल्या भारतीय संस्कृतीने तर हा प्रकार नाकारून सार्या जगाला नवीन दिशा देण्याची गरज आहे. व्यवहारात या patent प्रकाराचे रूप कसे आहे, हे औषधांच्या बाबतीत पाहायला मिळते. मूळ औषधांच्या patent वरून मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण चालले. त्यावेळी असे लक्षात आले की, महिनाभराचे जे औषध ८ ते १० हजार रुपयात मिळू शकते, ते patent च्या एकाधीकारामुळे २ लाख रुपयात पडत होते. तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने होतो याचे हे एक उदाहरण आहे. एकमात्र उदाहरण मात्र खासच नव्हे.

खरे तर आज तंत्रज्ञानाचा विचार माणसाच्या जगण्यासाठी होतो का हाच प्रश्न आहे. तंत्रज्ञान म्हटले की, संगणक, मोबाईल, गाड्या, फोटोग्राफी, विमाने, इंटरनेट अशाच गोष्टी प्राधान्याने- ठळकपणे पुढे येतात. दुचाकी वा चार चाकी गाड्यांमध्ये पुढील काही काळ काहीही संशोधन व विकास नाही झाला तर काय बिघडेल? आकार, लाईट, खुर्च्या, ब्रेक, वेग या व यासारख्या गोष्टींचे संशोधन नाही झाले तर काय बिघडते? मोबाईलने संपर्क क्रांती घडवली हे ठीक पण म्हणून 3-G, 4-G, 5-G अशी रांग लागण्याची काय गरज? क्षणार्धात एक माहिती दुसर्या ठिकाणी पोहोचली म्हणून जग वा संबंधित व्यक्ती सुखी झाली, असे होते का? अनेक संगणक कंपन्या आज अस्तित्वात आहेत. त्या हजारो संगणक कामगारांना कामावर ठेवत असतात. त्यांना लाखो रुपयांचे packages देण्यात येतात. घराण्यात कोणी कधी विचारही केला नसेल इतका पैसा त्यांना मिळतो. मुळात हे लोक करीत असलेले काम व त्याचा त्यांना मिळणारा मोबदला यांचा संबंध कधी तपासून पाहिला गेला आहे का? हे लोक जे काम करतात त्याचा समाजाला, सामान्य माणसाला, पर्यावरणाला, मानवाच्या बौद्धिक- भावनिक- सांस्कृतिक- आध्यात्मिक विकासाला किती व कसा उपयोग होतो वा होत नाही हे तपासले जायला हवे की नाही? त्यातून जे निरर्थक आहे ते वगळण्यात यावे की नाही? त्याचे मूल्य आणि त्याला देण्यात येणारी किंमत यांचा ताळमेळ बसायला हवा की नाही? हजारो तरुण- तरुणी मोबाईल वा संगणक game सारख्या निरर्थक आणि घातक गोष्टी विकसित करण्याचे काम करतात आणि लाखो, करोडो रुपये कमावतात. हा नैतिक अपराध नव्हे का? या सार्यामागील अर्थकारण, राजकारण उघड व्हायला हवे की नाही? मोबाईल tower मुळे चिमण्याच नव्हे तर मधमाशाही मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. मधमाशा कमी झाल्यामुळे परागीकरणाची प्रक्रिया संपत चालली आहे. त्याचा फटका पिकांना बसत आहे. या सार्या सूक्ष्म बदलांची नोंद गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध, आंधळ्या वाटचालीने कोणतेही क्षेत्र सोडलेले नाही.

घरबांधणीचे तंत्रज्ञानही बदलत चालले आहे. पूर्वी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा भरपूर यावी असा विचार केला जात असे. आता जणू काही सूर्यप्रकाश अन हवा यांची मुळीच गरज नाही असेच दिसते. ए.सी. ही जणू मुलभूत गरज बनली आहे. ती तशी आहे का? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. तरीही त्यावरच भर का? त्याचे कारण एकच- पैसा. म्हणजे स्वच्छ, आरोग्यदायी हवा ही गरज उरलेली नाही. तर माणसाची हवेची गरज पूर्ण करताना त्यातून पैसा निर्माण झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे. माणूस निसर्गापासून दूर जातो त्याचेही काही नाही. माणसाचे जगणे पैसा या गोष्टीशी बांधून टाकल्याने ही स्थिती उत्पन्न झाली आहे. मुक्त, मोकळं, सहज, साध्या जगण्याचा आधुनिक जीवनशैलीने व्यापार केला आहे. इमारतींना लावण्यात येणार्या काचांचाही प्रश्न असाच आहे. अलीकडेच `निरी’ व `आयआयटी’च्या अभ्यासकांनी त्याबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यात इमारतीला मोठमोठ्या काचा लावणे कसे हानिकारक आहे; त्यामुळे आतील व बाहेरील तापमानात कशी वाढ होते; इमारतीत वापरल्या जाणार्या विजेपैकी ४०-५० टक्के वीज केवळ तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कशी वापरली जाते इत्यादी दाखवून दिले आहे. अमेरिकेतील एका अभ्यासाने तर हे निदर्शनास आणून दिले आहे, की तेथील इमारतींच्या काचांवर धडकून पक्षी जखमी झाल्याच्या किमान एक अब्ज घटना एका वर्षात घडल्या आहेत. त्यात लाखो पक्षी प्राणास मुकले आहेत. काय म्हणायचे या तांत्रिक प्रगतीला? अगदी इमारतीच्या गच्चीवर helicopter उतरवणे आता शक्य आहे. कशासाठी? मानवी मनाच्या हावरटपणाला काहीही अंत नाही असे आपले आध्यात्म सांगते. हे सारे त्याचेच द्योतक नव्हे तर काय?

क्रिकेटसारख्या खेळात प्रचंड तांत्रिक प्रगती झाली. पण तो आता खेळ तरी राहिला आहे का? उलट सामने फिक्स करण्यासाठी त्याचा मोठा वापर होत आहे. किती वीज रात्रीच्या सामन्यांसाठी वाया घालवली जाते? क्रिकेट रात्रीही खेळले जाऊ शकते हे दाखवणे आणि एक झिंग निर्माण करणे यापेक्षा अधिक त्यातून काय साध्य होते? तंत्रज्ञानाने मानवाच्या वेळेवर, खासगी व सार्वजनिक जीवनावर केलेले अतिक्रमण, वाढवलेली anxiety, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. संगीत क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाने धुडगूस घातला असून त्यावर अनेक मोठमोठ्या गायक, संगीत तज्ञांनी चिंताही व्यक्त केली आहे. बरे क्षणभर त्यातील नाविन्य स्वीकारले तरीही, किमान आवाज आणि होणारा गोंधळ नियंत्रणात ठेवावा याचे भान तंत्रज्ञान निर्माण करू शकत नाही हे तर मान्य करावेच लागेल. मुलांना मोबाईल देणे, लहानपणापासून संगणक शिक्षण देणे, निवडणुकीत मोफत संगणक वाटणे यासारख्या घोषणा तंत्रज्ञानातील दांभिकपणा आणि भंपकपणाच दाखवून देतात. ज्या ठिकाणी धड अक्षरओळख नाही तेथे संगणक वापरा असे सांगणे, अन तो मोफत देण्याच्या घोषणा किती हास्यास्पद आहेत हे वेगळे सांगायला नको. आमच्या जीवन व्यवहारालाच नव्हे तर आमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाही तंत्रज्ञानाने किती प्रभावित केले आहे याचेच हे निदर्शक आहे.

१८ व्या शतकात युरोपात सुरु झालेल्या प्रबोधनपर्वाचे तोकडेपण आता जाणवू लागले आहे. त्यापूर्वी उदयास आलेल्या ख्रिश्चन व इस्लाम पंथामध्ये विचारवंतांनी विज्ञान- तंत्रज्ञान पंथाची भर घातली. यात प्रत्यक्ष वैज्ञानिकांपेक्षाही विज्ञानाने बदललेल्या जगण्याची चिकित्सा व मांडणी करणार्या विचारकांची भूमिका अधिक होती. ख्रिश्चन व इस्लाम यांच्याप्रमाणेच एकांगीपणा विज्ञान- तंत्रज्ञान पंथाने धारण केला. याच मार्गाने तुमचे भले होईल आणि तुम्ही जर याच्या बाहेर गेलात तर तुम्ही बुरसटलेले, मागास, प्रतिगामी ठराल असा एक दबाव त्याने उत्पन्न केला. आज विचारवंत, धोरणकर्ते, निर्णयप्रक्रिया, सामाजिक मान्यता या सार्यांवर असलेला विज्ञान- तंत्रज्ञानाचा हा दबाव स्पष्ट होऊ लागला आहे. हा किती खोल रुतला आहे, तर एखादा अभियंता हा एखाद्या साहित्यिक व साहित्याच्या अभ्यासकापेक्षा अधिक हुशार, अधिक लायक, अधिक क्षमतावान. का? याला काहीही उत्तर नाही. ही साखळी अगदी तुमच्या आमच्या घरी येऊन पोहोचते. नळ, संगणक व दूरचित्रवाणी संच दुरुस्त करणाराही मग भावही खातो अन किंमतही वसूल करतो. लहान मूल मोबाईलशी चाळा करते अन खेळते त्याचेही मग कौतुक होऊ लागते. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या पदरात अवास्तव माप टाकण्यात आले आहे हे मान्य करावेच लागेल.

एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवी जीवन अधिक सुखमय बनवले आहे. अधिक सोपे बनवले आहे. अधिक सहज बनवले आहे. विचारी अन संवेदनशील माणसांनी त्याचा खूप चांगला उपयोगही करून घेतला आहे. फक्त दोन प्रश्न मात्र तातडीने ध्यानात घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे अशी संवेदनशील, विचारी माणसे खात्रीने निर्माण करता येत नाहीत; आणि तंत्रज्ञान अविचारी माणसांच्या हाती जाणार नाही याची खात्री देता येत नाही. या तिढ्यातून कसा मार्ग काढायचा? दुसरे म्हणजे विचारी माणसे तंत्रज्ञानाचा वापर करीत असली तरीही त्याचा वेग, अन त्याची मर्यादा काय असावी? एखादी व्यक्ती चांगली आहे. स्वार्थी, मतलबी, दुष्प्रवृत्त नाही एवढेच पुरेसे नाही. तंत्रज्ञानाचा सर्वंकष वेध घेण्याची क्षमताही आवश्यक आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाला तत्वज्ञानाची जोड देण्याची नितांत गरज आहे. हे तत्वज्ञान विश्वकल्याणकारी आणि समग्र विचार करणारे असणे आवश्यक आहे. यासोबतच सर्वसमावेशक विचार करणारे वातावरण, `मी’च्या पलीकडे जाऊन विचार करण्याच्या जीवनपद्धतीविषयी आस्था; ध्येयवाद, आदर्शवाद यांची ओढ असणारे वातावरण निर्माण करणे याचे प्रयत्न आवश्यक आहेत.

आज एखादा अभियंता व तंत्रज्ञ हा अभियंता व तंत्रज्ञ एवढाच असतो. तो माणूस आहे का, विचारी, संवेदनशील आहे का, इत्यादी विचार फारसा होत नाही. शिक्षण व्यवस्थेतही तो विचार अंतर्भूत नाही. तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम यासारखा एखादा विषय अभ्यासक्रमात लावून काम भागणारे नाही. विद्यार्थी विचारी अन संवेदनशील व्हावा यासाठी अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. या गोष्टी परीक्षा आणि गुण यापासून जेवढ्या दूर ठेवता येतील तेवढे फायद्याचे ठरेल. उपक्रमांच्या स्वरुपात त्या असाव्यात. विद्यार्थ्यांना विचारी अन संवेदनशील बनवण्यासबतच त्यांच्या मनात उच्च प्रेरणा जागवण्याचे प्रयत्न व्हावेत. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला हे लक्षात ठेवण्यापेक्षा, त्यांच्या जीवनातून प्रकट होणारा मूल्यभाव जागा होईल हे पाहणे महत्वाचे ठरावे. आपल्या देशाला एक विशिष्ट इतिहास आहे. परंपरा आहे. संस्कृती आहे. त्यात अनेक ठिकाणी विरोधाभास व संघर्षही आहेत. ते स्वाभाविकही आहे. पण ते दूर ठेवायला हवेत. इतिहास व समाजशास्त्र यांचा अभ्यास करणार्यांना ते नक्कीच शिकवावे. पण इतिहास, महापुरुषांची जीवने, तत्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला हे सारे अन्यत्र सांगताना, शिकवताना चांगला माणूस घडवण्यासाठी, त्याच्या मनातील सुप्त प्रेरणा जागवण्यासाठी आपण हे करीत आहोत, याचे भान तज्ञांनी ठेवायला हवे. आपला समाज, त्याच्या समस्या, त्याचं जीवन, त्याचे बरेवाईट पैलू, त्याचा जीवनसंघर्ष, आशेचे किरण हे सारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. माहितीपट, वृत्तपट, चित्रपट दाखवणे हा महाविद्यालयाचा एक भाग व्हायला हवा. महापुरुषांची जीवन चरित्रे आदर्श आणि प्रेरणा उत्पन्न करतील अशा पद्धतीने त्यांना सांगितली जावीत. वृत्तपत्रे वाचण्याची आवड वाढेल हे पाहावे. प्रत्यक्ष गावखेड्यात जाणे, राहणे; रुग्णालयात जाऊन मानवी दु:खकष्टांची ओळख करून देणे असे उपक्रम व्हावेत. आपण समाजाचा एक घटक आहोत, पैसा महत्वाचा असला तरीही सर्वस्व नाही, भौतिक आणि लौकिक जीवनासोबतच त्याच्या पलीकडेही जीवन असते अशा प्रकारची मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवली जावीत. कथाकथन, व्याख्याने, परिसंवाद व्हावेत. विविध कलांचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढेल याचा प्रयत्न व्हावा. थोडक्यात म्हणजे अभियंता वा तंत्रज्ञ हा आदर्श माणूस व्हावा, त्याचा सर्वांगाने विकास व्हावा ही प्रयत्नांची अन शिक्षणाची दिशा असावी.

हे सारे प्रयत्न करताना त्याचे आधारभूत तत्वज्ञान हे भारतीय, हिंदू तत्वज्ञान राहील हे पाहणे सगळ्यात महत्वाचे आहे. ख्रिश्चन, इस्लाम, मार्क्स, समाजवाद, विज्ञानवाद, भांडवलशाही हे सारे अपयशी ठरले आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यवस्था, प्रेरणा, दिशा, ध्येय या सार्याच बाबतीत त्यांचा अपुरेपणा ठळकपणे अधोरेखित झाला आहे. त्यामुळेच यापुढील वाटचाल स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी, डॉ. राधाकृष्णन यांच्या आधाराने करावी लागेल याचे भान ठेवणेही गरजेचे आहे. आम्हाला या देशात हिंदुत्व आणायचे आहे म्हणजे काय? याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक कु सी. सुदर्शनजी म्हणत असत- `आम्हाला या देशात अशी सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था आणायची आहे, जी व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी यांच्यात सामंजस्य निर्माण करून, प्रत्येक व्यक्तीला शरीर- मन- बुद्धी- आत्म्याचे सुख प्रदान करू शकेल.’ संयुक्त राष्ट्रसंघाने जगापुढे ठेवलेल्या शाश्वत विकासाच्याही पलीकडे जाणारा हा विचार आहे. या दिशेने वाटचाल केली तर शाश्वत विकासही आपोआपच साध्य होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे, नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा