शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

भाव+ राग+ ताल= भारत

२६ जानेवारीला मित्र-मैत्रिणींना एक मेसेज पाठवला होता की, इंडिया ऐवजी `भारत'चा वापर करा. अगदी इंग्रजीत संभाषण, लेखन करताना सुद्धा `भारत'च वापरा. त्यावर एका मित्राचा रिप्लाय आला की, असे करणे घटनाबाह्य आहे आणि मी भावनाशील होऊ नये. यातील एका मुद्याशी मी सहमत आहे तर एकाशी नाही. भारत या नावाचा वापर करणे घटनाबाह्य नाही. घटनेने `india that is bharat ' असे म्हटलेले आहे. म्हणजे दोन्हीही नावे घटनेने मान्य केली आहेत. त्यामुळे भारत या नावाचा वापर घटनाबाह्य होऊच शकत नाही. मी फक्त घटनेनेच मान्य केलेल्या एका नावाचा आग्रह धरला होता. पण हां, असा आग्रह करण्यात मी भावनांना महत्व देत आहे हे त्या मित्राचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. नव्हे ही भावना सर्वत्र पोहोचावी, सगळ्यांनी ती उचलून धरावी असेही माझे मत आहे.

कोणतीही गोष्ट विशेषत: भाषा समजून घेताना ती `letter and spirit' अशा दोन्ही अंगांनी समजून घेणे आवश्यक असते. नुसतेच शब्द उपयोगाचे नसतात. त्यातील भाव अतिशय महत्वाचा असतो. भावासहित वापरले जाणारे शब्द अर्थवाही असतात एवढेच नाही तर त्यातून प्रवाहित होणारा अर्थ प्रेरक शक्तीसह परिणाम घडवून आणतो. आम्ही या `भाव' अंगाकडे अक्षम्य दुर्लक्ष तर केलेच आहे, उलट आता आम्ही ते नाकारू लागलो आहोत. आज दिसणारे अराजक त्याचाच परिणाम आहे.

आपल्या देशाचे नाव हाच मुद्दा घेऊ. `भारत' म्हटले की स्वाभाविकच `भारत माता की जय' मनात उमटते. इंडिया म्हटल्यावर कितीही प्रयत्न केला तरी `इंडिया माता की जय' येईल का? `भारतमाता' म्हटल्यानंतर जे जिवंत नाते, त्यापोटी येणारी समर्पणाची भावना, बांधिलकी, हजारो वर्षांचे व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे संचित, असे सारे काही प्रकट होते. पाहण्याची दृष्टीच बदलते. `i love my india' असे कितीही प्रेमाने म्हटले तरीही `भारत माता की जय'ची स्पंदने निर्माण नाही होऊ शकत. एखाद्या भाषेचा दुस्वास वा प्रेम हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या-त्या भाषेचे आणि शब्दांचे सहचरी भाव असतात. त्यांचा हा परिणाम असतो. म्हणूनच कुंभमेळ्यात सहभागी होणारे विदेशी भक्त त्यांच्या उच्चारात, त्यांना शक्य होईल तसे `गंगामैय्या की जय' असेच म्हणतात. त्याचे भाषांतर करीत नाहीत किंवा त्यांच्या भाषेत `गंगामैय्या की जय'चा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.

आपण कितीही काही म्हटले तरीही इंडिया म्हटले की, या भूमीशी असलेले नाते; आपला सांस्कृतिक अनुबंध, आपले सामाजिक वातावरण उत्पन्न होत नाही, हे वास्तव आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, हिमालय, कन्याकुमारी, राम-कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंदसिंग, शिवाजी, जगन्नाथ रथयात्रा, श्रावणबाळ, जोरावरसिंह- फतेहसिंह, कुंभमेळा, दसरा, दिवाळी, होळी, पुरणपोळी, वडाभात, झुणका-भाकर, नागपंचमी, तुळशीचे लग्न, मंगळागौर, वेद, उपनिषदे, आर्यभट्ट, कणाद, सुश्रुत, अशोक, विक्रमादित्य, कालिदास, शाकुंतल, शेजारधर्म, तुळशी वृंदावन, मरणाला आणि तोरणाला जाण्याचा आग्रह वगैरे वगैरे त्यातील काहीही आशयासह मनात उमटत नाही. असे अनेक दृश्य- अदृश्य धागे असतात ज्यामुळे समाजाच्या मनात `आम्ही' भावाचा उदय होतो.

आम्ही भावनांचा ओलावा काढून टाकून प्रत्येक माणसाचा एकेक ठोकळा करून टाकला आहे. माणूस म्हणजे फारतर एक मत. वास्तविक मत ही एक राजकीय व्यवस्था आहे. माणूस त्या मतापेक्षा खूप अधिक असतो. एक मत टाकले की झाले, असे होत नाही. तो काही राजकीय यंत्राचा एक नट-बोल्ट नाही. केवळ कायदे, नियम, शिक्षेची तरतूद हे सारे; त्याचे विचार आणि व्यवहार यांचे नियमन करू शकत नाही. माणसाचे विचार आणि व्यवहार त्याच्या स्वत:चे मन आणि बुद्धी यांनीच चालत असतात आणि नियंत्रित होत असतात. अन भावनांचे आवाहन त्याचा विवेकबोध जागृत ठेवीत असते. त्यामुळेच आजकाल बुद्ध्यांक लक्षात घेतात तसेच भावनांक देखील मोजू लागले आहेत. आता तर spiritual quotient देखील पाहू लागले आहेत. माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम त्याचा सर्वांगीण विचार करायला हवा.

व्यवहारात सुद्धा ही बाब पाहायला मिळते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही करतो तेव्हा त्याच्याविषयी मनात असलेल्या भावना याच निर्णायक ठरतात. `आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे' असे म्हणणारे तानाजी मालुसरे किंवा `तोफांचे आवाज येईतो गनिमास खिंड ओलांडू देणार नाही' असे महाराजांना आश्वस्त करणारे बाजीप्रभू देशपांडे भावनांच्या आवेगानेच कार्यप्रवण होत असतात. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा जे झुंजले, त्यांच्याकडे भावनांशिवाय दुसरे काय होते? अगदी १९६५ च्या भारत- पाक युद्धाच्या वेळी देखील लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसान ही घोषणा केली आणि लोकांना बचत करण्याचे, शक्य असल्यास एक वेळ जेवण्याचे आवाहन केले आणि लोकांनी या भावनांना प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक जण तर त्यानंतर जन्मभर एकदाच जेवत असत. भावनांमध्ये माणसाला त्याच्या अंगभूत मर्यादांच्या वर उचलण्याची शक्ती असते. भावनांचे आवाहन माणसाला हिमालयाएवढे कर्तृत्व गाजवण्याचे बळ देते. भावनांचा आधारच माणसाला अनेक संकटातून तारून नेते.

आज मात्र आम्ही सगळीकडूनच या भावनांची हकालपट्टी करण्याच्या मागे लागलो आहोत. सध्या हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण सुरु आहे. अन्यत्रही बॉम्बस्फोट होत असतात. सुरक्षा यंत्रणांचे अपयश, यावरही चर्चा सुरु आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे खबरे असतात. त्यांना काही थोडीबहुत रक्कमही दिली जाते, त्यांनी माहिती द्यावी म्हणून. हा सगळा व्यवहार झाला. तो योग्यही आहे, पण आपण त्यात भावना ओतल्या नाहीत. ओतत नाही. आपण तो फक्त पैशाचा व्यवहार म्हणून करतो. त्यामुळे मग कोणी अधिक पैसे दिले की खबऱ्या त्याला माहिती देणार. किंवा `एवढ्या कमी पैशात माहिती कशी देणार' म्हणून बहाणेबाजी करणार. मात्र, आपण जे माहिती देण्याचे काम करीत आहोत ते देशभक्तीचे काम आहे अशी भावना त्याच्या मनात जागवली तर? मग त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतील.

सरकारी कार्यालयात वा अन्यत्रही लोक काम करताना आढळत नाहीत. किंवा जे काम करतात ते परिणामकारक नसते. टाळाटाळ, चालढकल हे सारे का पाहायला मिळते? कारण काम करण्याची प्रेरणाच मुळी, पैसा कमावणे ही आहे. आपण आपल्याच समाज बांधवांचे काम करतो आहोत, त्यांच्या सुख-सुविधांसाठी काम करीत आहोत. या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो, मिळायलाही हवा. त्यातून आपला चरितार्थ चालतो. पण कामाचा उद्देश पैसा कमावणे हा नाही, तर समाजाचे, लोकांचे हित हा उद्देश आहे ही भावना असली तर माणसे मनापासून आणि चांगले काम करू शकतील. आज मात्र आम्ही कामाची प्रेरणाच खुजी करून टाकली आहे. सारा समाजच निरर्थक, निरुद्देश जगतो आहे. त्याला उद्देश आणि सार्थकता प्रदान करण्यासाठी त्याच्या व्यक्तित्वाच्या भावनिक पैलूकडे लक्ष देण्याची अन तो अधिक समृद्ध आणि सकस बनवण्याची गरज आहे.

सगळ्या जगभरच आज हा पोकळपणा जाणवू लागला आहे. त्यामुळेच इतक्या बैठकी होतात, अहवाल होतात, सर्वेक्षणे होतात, अभ्यास होतात, नियोजन होते, ठराव होतात; त्यातून हाती मात्र काहीच लागत नाही. ज्या माणसांसाठी हे सारे सुरु असते, त्या माणसाला सुटे सुटे करून काही साध्य होणार नाही. माणसाला माणसाशी, समाजाशी, निसर्गाशी, भावनांशी, संवेदनांशी जोडण्याची गरज आहे. `मी आणि माझे' विरुद्ध `सर्वेपि सुखिन: सन्तु' असा हा मूल्यसंघर्ष आहे. `इंडिया' `मी आणि माझे'चा निर्देश करतो; तर `भारत' `सर्वेपि सुखिन: सन्तु'चा निर्देश करतो. म्हणून `भारत' म्हणण्याचा भावनिक आग्रह मी सगळ्या मित्रांना गणराज्य दिनानिमित्त केला होता. दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा तोच आग्रह करावासा वाटला.

आमच्या देशाचे नाव भारत आहे. अतिशय अन्वर्थक असे ते नाव आहे. त्यात भा=भाव, र=राग, त=ताल आहेत. याच आशयपूर्ण नावाचा आग्रही वापर करीत त्याला गमावलेला ताल परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला तरच भारताची भावसरगम संपूर्ण जगात माधुर्यसंगीत निर्माण करेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २३ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा