रामदेव बाबांनी संसद सदस्यांवर हल्ला चढवला आणि सर्वपक्षीय संसद सदस्य
त्यांच्यावर तुटून पडले. एकाने तर विशेषाधिकार हनन प्रस्तावही दिलेला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत असलेली राजकीय नेते विरुद्ध जनता ही लढाई
गेल्या काही दिवसांपासून प्रकटपणे सुरु झाली आहे आणि आता ती रंगू लागली
आहे. रामदेव बाबा जे म्हणाले ते आधीही अनेकांनी म्हटले आहे. एवढेच कशाला,
संसदेवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हाही याच भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यावेळी एक
मेसेज प्रसारित होत होता- अतिरेक्यांनी संसदेला वेठीस धरले ते ठीक नाही;
पण संसदेच्या आत बसलेल्या शेकडो अतिरेक्यांनी हा देश वेठीस धरला आहे त्याचे
काय? आज या घटनेला १० वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळी रामदेव बाबा तर
कुठेच नव्हते. लोकांची भावना मात्र आजएवढीच तीव्र होती.
राजकीय नेते,
कार्यकर्ते, पक्ष, राजकीय संस्कृती याबद्दल प्रचंड भ्रमनिरास आणि चीड जनतेत
आहे. हे लपून राहिलेले नाही. पक्षांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मात्र
त्याची दखलही घेतल्याचे कधीही जाणवले नाही. मुख्य म्हणजे अजूनही या
गोष्टीची गंभीर दाखल घ्यावी असे त्यांना वाटत नाही. आपण आत्मचिंतन करावे,
आत्मपरीक्षण करावे असे त्यापैकी कोणी म्हणत देखील नाही. सभागृहात नाही
तेवढा गदारोळ अन चर्चा होत असतात, मात्र एकालाही असे वाटले नाही की, आपण
ज्या जनतेचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतो त्या जनतेत आपल्याबद्दल एवढा रोष
का आहे याचे मंथन करावे. `संसद व जनता', `संसद सदस्य व जनभावना' अशा
विषयावर दोन दिवस सभागृहात चर्चा घडवून आणावी, ती छोट्या पडद्यावर प्रसारित
करावी आणि काही ठोस कृती कार्यक्रम ठरवून त्याची कठोरपणे अंमलबजावणी
करावी; असे कोणालाही वाटले नाही.
आमच्यावर विश्वास ठेवा, आमचा अपमान करू
नका असा टाहो फोडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने विश्वास कमवावा असे एकाही
सदस्याला, पक्षाला वाटू नये? प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी का लागते?
प्रत्येक गोष्ट निदर्शनाला आणून देण्याची गरजच काय? तुम्ही काय डोळे, कान
बंद करून वावरता की काय? जे दिसते, ऐकू येते त्यावर स्वत:हून, पुढाकार घेऊन
काही करण्याची एक आरोग्यदायी शैली विकसित करण्याचे सुचू नये? तशी इच्छाही
होऊ नये? आम्ही करतो तेच बरोबर. आम्हाला कोणी काही म्हणायचे नाही. जणू काही
देवाने यांना सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तिमान करूनच पाठवले आहे.
काय केले
आहे यांनी आतापर्यंत? या देशातल्या आयाबहिणींना अंगभर कपडा मिळत नाही
म्हणून गांधी पंचावर राहिले. दीनदु:खितांच्या दारात स्वत: गेले. आपल्या
आलिशान बंगल्यात दरबार भरवले नाहीत. या देशासाठी लोकांनी त्याग करावा
यासाठी त्यांना जागे करायला, संघटित करायला लोकांच्या जवळ गेले. लोकांमध्ये
गेले. उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत. पोटे फुगवून व्याख्याने ठोकली
नाहीत.
माझ्यावर विश्वास ठेवा असे गळे काढावे लागले नाहीत. स्वत:च्या
जगण्यातून विश्वास कमावला; नव्हे तो विश्वास त्यांच्याकडे चालत आला. असे
व्हायला किंमत चुकवावी लागते. स्वार्थीपणा, ढोंगीपणा, दुबळेपणा,
निष्क्रियता अशा अनेक गोष्टींची आहुती द्यावी लागते. स्वत:च्या आयुष्याचं
तारण उभं करावं लागतं आपल्या शब्दांच्या पाठी तेव्हा ताकद येते शब्दात आणि
कृतीतही. अन ती ताकदच काही तरी चांगलं घडवून आणते. आज कोणाची तयारी आहे असं
सारं करण्याची. गांधींचा पुतळा उभारायचा आणि जनता मेली की जिवंत आहे याची
फिकीर करायची नाही. अन यांच्याबद्दल म्हणे साऱ्यांनी आदरानेच बोलले पाहिजे.
कोणता
एकच पक्ष असा आहे असे नाही. सारेच तसे. आपण कसे स्वच्छ अन आदर्श आहोत असा
टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने तरी; आम्ही भ्रष्टाचारी, अनाचारी,
अकार्यक्षम व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत तिकीट देणार नाही, असे जाहीर तरी
केले आहे का? आजच्या अवनत स्थितीचे दु:ख आज खरेच किती जणांना आहे?
कोणत्याही नेत्याने अगदी डोक्यावर हात ठेवून, आपल्या बायकापोरांची शपथ घेऊन
सांगावे की आपण जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न
करतो. कदाचित ते तसे करतीलही. कारण आज कोणी प्रामाणिक असतीलच तर ते- आपली
अकर्मण्यता लपवून, आपल्या सद्गुणांचा टेंभा मिरवित द्रौपदीलाही डावावर
लावायला मागेपुढे न पाहणाऱ्या युधिष्ठिराच्या जातकुळीचेच आहेत. किंवा मग
असहाय्य भीष्म, द्रोणांचा वारसा चालवणारे!!
आम्हाला इतकी नावे ठेवता मग तुम्हीच या ना राजकारणात असे म्हणताना यांच्या चेहऱ्यावर निर्लज्जतेची
एखादी रेषा तर दूरच, उलट तुम्ही आमचे काय वाकडे करून घेणार, असाच उद्दाम
भाव असतो. आमच्यात भरपूर दोष आहेत. या व्यवस्थेत खूप त्रुटी आहेत, कमतरता
आहेत आणि आम्ही त्या दूर करू. स्वत:ला सुधारू. प्रत्यक्ष जनतेला हे बदल
दिसतील, जाणवतील असे काही तरी आम्ही करू ही स्वत:च्या शिरावर जबाबदारी
घेण्याची भाषा एकही माईचा लाल करत सुद्धा नाही. रामदेव बाबा जे काही बोलले
त्याच्या मुळाशी ही वृत्ती आहे. रामदेव बाबा राहतील किंवा जातील, समाजाच्या
अंगोपांगात रुजलेला हा रोष दूर व्हायला हवा की नको?
- श्रीपाद कोठे, नागपूर
बुधवार, ३ मे २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा