१२ जानेवारी हा विश्वविख्यात स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. १९८४ साली 
भारत सरकारने १२ जानेवारी हा `राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून जाहीर केला आणि 
त्या वर्षीपासूनच देशभर  `राष्ट्रीय युवा दिवस' साजरा करण्यात येतो. 
`स्वामी विवेकानंदांचे विचार आणि ज्या ध्येयासाठी ते जगले आणि त्यांनी 
कार्य केले, ते भारतीय युवकांना महान प्रेरणादायी ठरतील असे वाटल्याने भारत
 सरकार १२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित 
करीत आहे,' असे भारत सरकारने याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले होते. ११ 
जानेवारी २०१३ रोजी स्वामीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली असून १२ 
जानेवारी २०१३ पासून १५१ वे वर्ष सुरु होत आहे. जगभरातील आणि विशेषत: 
भारतीय युवकांसाठी हा आनंददायी योगायोग आहे.
स्वामीजींच्या जीवनात 
आणि विचारात युवकांना खूपच महत्वाचे स्थान आहे. योगायोग म्हणजे आज १५० 
वर्षांनंतरही जगभरातील लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती आणि ऊर्जा असलेल्या 
स्वामीजींची इहलोकीची यात्रा मात्र युवावस्थेतच पूर्ण झाली. वयाचे ४० वे 
वर्ष उलटले की प्रौढावस्था सुरु होते असे समजले जाते. साधारणपणे डोळ्यांवर 
चाळीशी (चष्मा) चढते. स्वामीजींनी ४० वर्षेही पूर्ण केली नाहीत. ३९ वर्षे, ५
 महिने आणि २२ दिवस एवढेच लहानसे त्यांचे आयुष्य; पण पराक्रम एवढा उत्तुंग 
की, पुढची शेकडो वर्षे त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा आधार घेतला जावा.
लहानपणापासून
 आध्यात्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्वामीजींची वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी 
त्यांच्या गुरुदेवांशी, रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. स्वामीजींच्या
 वयाच्या २३ व्या वर्षी परमहंसांनी आपली इह्लीला संपवली. म्हणजे गुरूंचा 
सहवास त्यांना अवघा ५ वर्षे लाभला. ही ५ वर्षेही अगदी तारुण्याच्या 
उंबरठ्यावरील अबोध अशी. परंतु या ५ वर्षातच त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील
 सर्वोच्च अशी ब्रम्हावस्था तर प्राप्त करून घेतलीच, पण त्यासोबतच जे 
ज्ञान, विचार आणि जीवनाची दिशा प्राप्त करून घेतली त्या बळावर अगदी 
अल्पावधीतच त्यांनी सारे जग हलवून टाकले.
उत्साह, चैतन्य, परिश्रम, 
संघर्ष, आशावाद, आदर्शवाद, काव्य, संभ्रम, विश्वास- अविश्वासाचे हेलकावे, 
जग बदलून टाकण्याची आकांक्षा, जग हलवण्याचा महत्प्रयास ही काही जर 
युवावस्थेची लक्षणं मानली; तर ती सारीच्या सारी अत्यंत प्रखरतेने आणि 
तीव्रतेने स्वामीजींच्या जीवनात पाहायला मिळतात. लौकिक आणि अलौकिक अशा 
दोन्ही स्तरांवर शून्यातून सुरु होऊन पूर्णत्वाचा उत्कर्षबिंदू या एकाच 
छोट्याशा जीवनात गाठल्याचे स्वामीजींच्या आयुष्यात पाहायला मिळते. देव जर 
असेलच तर त्याच्या या जगात एवढी विषमता आणि विरोधाभास का? देव जर खरेच असेल
 तर तो दिसत का नाही? अशाच तुम्हा आम्हाला पडणाऱ्या प्रश्नांपासून 
त्यांच्या अस्वस्थतेची सुरुवात झाली. हेच प्रश्न त्यांनी अनेकांना विचारले 
पण त्यांचे समाधान झाले नाही आणि युवकांना साजेशा अशा पद्धतीनेच; जिथे 
समाधान झाले नाही तिथून ते माघारी वळले. त्यांना पडणाऱ्या प्रश्नांकडे 
त्यांनी दुर्लक्ष मात्र केले नाही. त्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. 
अखेर रामकृष्ण परमहंस यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यांनाही त्यांनी तेच 
प्रश्न विचारले. त्यावर रामकृष्णांनी त्यांना उत्तर दिले, `होय. मी देवाला 
पाहिले आहे. अगदी तुला पाहतो आहे तसे. त्याच्याशी बोललोही आहे. आणि तुझी 
इच्छा असेल तर मी तुलाही त्याचे दर्शन घडवू शकेन.' तोवर त्यांना कोणीही असे
 अद्भुत उत्तर दिले नव्हते. मात्र रामकृष्णांच्या या आत्मविश्वासपूर्ण 
उत्तराने त्यांचे समाधान झाले. रामकृष्णांच्या अलौकिक व्यक्तीत्वानेही ते 
भारावून गेले आणि त्यांनी परिश्रमपूर्वक, अल्पावधीतच आध्यात्मिक सत्याचा 
साक्षात्कार प्राप्त केला.
त्यांच्या कौटुंबिक जीवनातील एक प्रसंगही
 त्यांच्या युवा मानसिकतेवर प्रकाश टाकणारा आहे. त्यांचे वडील कोलकाताचे 
प्रसिद्ध वकील होते. त्यावेळचे कोलकाता आजच्याएवढे मोठे नव्हते तरीही ते 
देशाच्या राजधानीचे शहर होते. रेल्वे, डाक इत्यादी सेवा तिथे सुरु झाल्या 
होत्या. इंग्रजांनी सुरु केलेले दक्षिण आशियातील पहिले विद्यापीठ कोलकाता 
येथे १८५७ साली सुरु झाले होते. न्यायालये होती. स्वामीजींचे वडील अशा 
राजधानीच्या शहरातील प्रख्यात वकील होते. दोन मजली घरातील वरच्या मजल्यावर 
वडिलांची कामकाजाची खोली होती. त्या खोलीत पक्षकार त्यांना भेटायला येत 
असत. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे तेथे पक्षकारांसाठी हुक्के ठेवलेले असत. पण 
असे वेगवेगळे हुक्के का असा प्रश्न युवा नरेंद्राला (विवेकानंद) पडला. 
परंतु त्यावेळच्या पद्धतीत विचारायची सोय नव्हती. म्हणून त्यात काय वेगळेपण
 आहे हे आपणच पाहावे असे नरेंद्राने ठरवले आणि एक दिवस वडील नाहीत असे 
पाहून त्यांच्या खोलीत जाऊन त्याने सगळे हुक्के पिऊन पाहिले. तेवढ्यात 
त्याचे वडील तेथे आले. त्यांनी विचारले काय करतो आहेस? नरेंद्राने 
नेहमीप्रमाणेच सत्य काय ते सांगितले आणि म्हणाला, `हे सारे हुक्के तर 
सारखेच आहेत. मग इतके सारे वेगवेगळे कशाला?' त्यावर वडिलांनी उत्तर दिले 
की, `हे वेगवेगळ्या जातींसाठी आहेत. एका जातीचा हुक्का दुसऱ्या जातीचे लोक 
ओढत नाहीत.' त्यावर नरेंद्र अस्वस्थ झाला. त्याने या भेदभावाबद्दल 
वडिलांजवळ आपले मत स्पष्टपणे मांडले. नरेंद्राच्या वडिलांचेही डोळे 
पाणावले. त्याला जवळ घेऊन ते एवढेच म्हणाले, `बेटा, जन्मभर असेच मोठे मन 
ठेव.' त्यांचा हा आशीर्वाद पुढे कितीतरी पटींनी फळाला आल्याचे 
स्वामीजींच्या जीवनात पाहायला मिळते.
गुरुदेव रामकृष्ण परमहंस 
निजधामी गेले तेव्हा स्वामीजी केवळ २३ वर्षांचे होते. सोबतीला आणखीन ११ 
गुरुबंधू. बहुतेक त्यांच्याच वयाचे. एक दोघे अपवाद. पुढे काय हा प्रचंड 
मोठा यक्षप्रश्न. संन्यास घेतला असल्याने घर- संसार नाही हे निश्चित झाले 
होते. गुरुदेवांनी शिकविलेली सत्ये लोकांपर्यंत पोहोचवायची हेही ठरले होते.
 नरेंद्र फार मोठे काम करणार हे देखील रामकृष्णांनी सांगून ठेवले होते. पण 
प्रत्यक्षात तर सारा अंधारच होता. काय करायचे, कसे करायचे काही समजत 
नव्हते. पैसा नव्हता, माणसे नव्हती, संस्था नव्हती, राहायला जागा नव्हती, 
दिशा नव्हती, खाण्यापिण्याची सोय नव्हती,  रामकृष्णांभोवती जे काही लोक 
जमले होते ते विखरून गेले होते. या मुलांची कोणी दखल घेत नव्हते, कोणी 
विचारपूस करीत नव्हते. अशा स्थितीत विवेकानंदांनी त्या सगळ्यांना धरून 
ठेवले. विखरू दिले नाही. एकत्र ठेवले. एवढेच नव्हे तर त्यांचा उत्साह 
टिकवला, त्यांच्यातील चैतन्य जागे ठेवले. लोक हेटाळणी करीत, दूषणे देत, बोल
 लावत. पण सारे काही त्यांनी सांभाळून घेतले. पुढे संन्यास धर्मानुसार ते 
मुक्त संचार करण्यासाठी बाहेर पडले. एकाकी, अनवाणी, अकिंचन असे स्वामीजी 
फिरू लागले. कधी झाडाखाली राहायचे, कधी कुणाच्या झोपडीत, तर एखादे वेळी 
राजाच्या महालात सुद्धा. कधी सुग्रास भोजन, तर कधी नदीचे निर्मल जल पिऊन 
दिवस काढायचे. थंडी, वारा, पाऊस, ऊन या सगळ्याला तोंड देत ते फिरत होते. 
जशी संधी मिळेल तसे आपल्याजवळील ज्ञान लोकांना देत होते. मोबदल्याची 
अपेक्षा कधीच नव्हती. फिरताना समाजाची स्थिती, समाजाचे वास्तव, अज्ञान, 
दारिद्र्य, अनाचार, अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींचे निरीक्षण सुरूच होते.
 मनाशी नोंद होत होती. इतिहास, भूगोल, लोकजीवन, संस्कृती, कला, धर्म, 
विज्ञान या साऱ्याचे ज्ञान संग्रहित होत होते. कष्ट, सायास आणि संकल्प 
यांचे विराट दर्शन स्वामीजींच्या यावेळच्या जीवनातून होते. युवा युवा 
म्हणजे आणखीन काय असते? या सगळ्या कालखंडाबद्दल नंतरच्या काळात स्वामीजी 
बोलले आहेत, आपल्या पत्रातून त्यांनी यावर प्रकाश टाकला आहे. ते सारे 
मुळातून समजून घेण्यासारखे आहे.
याच दरम्यान त्यांना आपल्या 
जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला. कन्याकुमारीच्या शिलाखंडावर त्यांना नेमकी 
दिशा गवसली, काय व कसे करायचे याचे चिंतन पूर्ण झाले. आणि त्यांनी कामाला 
प्रारंभ केला. त्यानंतर शिकागोची सर्वधर्म परिषद, त्यानंतर चार वर्षे 
युरोप, अमेरिकेत आध्यात्माचा प्रसार- प्रचार, मठांची स्थापना, अनेक वर्ग, 
व्याख्याने; तिथून भारतात परतल्यावर कोलंबो ते अलमोडा अशी भारतयात्रा, या 
भारतयात्रेत या देशाला आणि समाजाला जागे करण्यासाठी केलेली अखंड धडपड, 
रामकृष्ण मिशनची स्थापना, मिशनचा पाया मजबूत करण्याचे काम, हे कार्य 
भविष्यात जोमाने चालावे याची पायाभरणी, दुसरा विदेश प्रवास; या साऱ्यावर एक
 नजर टाकली तरीही त्यातील कर्मविरता स्तिमित करून जाते. प्रचंड कर्मयोग, 
अखंड ज्ञानयोग, जीवनातील नाट्य, संघर्ष, अद्भुतता, त्यातील ईश्वरी लीला, 
संपूर्ण मानवमात्राविषयीची अपार करुणा, न आटणारे निखळ प्रेम, त्यांच्या 
भल्याची कळकळ हे सारेच रोमहर्षक आहे. एकाच छोट्याशा आयुष्यात एवढे अथांग 
आयुष्य एखादी व्यक्ती जगू शकते आणि असे आयुष्य ती व्यक्ती केवळ जगते असे 
नाही, तर या जगाचा निरोप घेतल्यावरही भविष्यातील अनेक पिढ्यांना 
दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहते, हे सारे रोमहर्षक आहे.
स्वामीजी
 जसे संपूर्ण जीवन युवा वृत्तीने जगले, तशीच अपेक्षा त्यांनी युवकांकडून 
केली. शक्तिमय, सश्रद्ध, कर्ममय, त्यागी, समर्पित जीवन युवकांनी जगावे अशी 
प्रेरणा ते आयुष्यभर देत राहिले. त्यांच्या पहिल्या भारत परिक्रमेतील एक 
प्रसंग उद्बोधक आहे. एकदा एके ठिकाणी ते काही तरुणांशी बोलत बसले होते. 
त्याच वेळी त्यांना भेटायला त्या गावातील काही विद्वान लोक आले. त्यांना 
काही शास्त्रचर्चा करायची होती. स्वामीजींना तसा निरोप देण्यात आला. 
स्वामीजींनी येतो असे सांगितले व ते तरुणांशी बोलण्यात पुन्हा रमून गेले. 
पुन्हा निरोप आला. पुन्हा पहिलाच प्रकार घडला. तिसऱ्यांदा जेव्हा निरोप आला
 तेव्हा स्वामीजी जरा रागावूनच बोलले. म्हणाले, `तुम्हाला दिसत नाही का मी 
या युवकांशी बोलतो आहे. त्या विद्वानांना वेळ नसेल तर जाऊ द्या. पण या 
मुलांशी बोलणे झाल्याशिवाय, त्यांचे समाधान झाल्याशिवाय मी येथून उठणार 
नाही. युवक माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत. उद्याचे जग तेच घडवणार 
आहेत.' स्वामीजींचा भर सतत युवकांवर, तरुणांवर होता. त्यांची बहुतांश 
आवाहने तरुणांना उद्देशून वा तरुणांना डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहेत. 
त्यांचा सारा भर तरुणांच्या क्रियाशीलतेवर होता. तरुण वर्ग सक्रिय आणि 
सदाचारी झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. आपल्या अखेरच्या दिवशी आपल्या 
एका गुरुबंधूला ते म्हणाले देखील, `मला १०० विवेकानंद द्या, मी सारे जग 
बदलून दाखवीन.' केवढा प्रचंड आत्मविश्वास !!!
अमेरिका आणि युरोपचा 
पहिला प्रवास संपवून स्वामी विवेकानंद १५ जानेवारी १८९७ रोजी कोलंबोला 
पोहोचले. त्यांचे विदेशातील कर्तृत्व त्याआधीच स्वदेशात पोहोचले होते. 
त्यामुळे कोलंबो येथे त्यांचे उत्स्फूर्त आणि प्रचंड स्वागत करण्यात आले. 
कोलंबो येथून सुरु झालेली ही विजययात्रा हिमालयातील अलमोडा येथे संपली. या 
प्रदीर्घ भारत प्रवासात ठिकठिकाणी त्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. अनेक
 ठिकाणी त्यांना मानपत्रे अर्पण करण्यात आली. सगळीचकडे स्वामीजींची ओजस्वी,
 आवेशपूर्ण भाषणे झाली. या भाषणांमधून त्यांनी आपल्या मातृभूमीची दयनीय 
परिस्थिती, येथील समाजाची निष्क्रियता, अंधश्रद्धा, ढोंग, अज्ञान, 
दारिद्र्य या साऱ्याचे वर्णन- विश्लेषण करतानाच अयोग्य गोष्टींवर कडक 
प्रहार तर केलेच; परंतु हे सारे कसे बदलता येईल याचीही विस्तृत चर्चा केली.
 आपला देश व देशबांधव यांचे जीवन सुखशांतीपूर्ण करण्याची व्यापक आणि मुलभूत
 योजनाही त्यांनी सगळ्यांसमोर ठेवली. त्यांच्या या योजनेच्या केंद्रस्थानी 
होते या देशातील कोट्यवधी युवक. त्यांच्या सगळ्या भाषणांचा, विचारांचा रोख 
होता युवकांकडे. कोणतीही खोटी आशा आणि आमिषे त्यांनी दाखवली नाहीत. उलट 
मनामनातील उच्च ईश्वरी भावनांना आवाहन करून त्यांनी युवकांना सर्वोच्च 
त्यागाचे आवाहन केले. त्याग आणि सेवा हेच आपले खरे राष्ट्रीय आदर्श आहेत 
आणि त्याचाच तरुणांनी अंगीकार करावा असे परखड परंतु भावपूर्ण आवाहन त्यांनी
 युवकांना केले. त्यानंतर देशभर झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, सामाजिक- 
राजकीय- सांस्कृतिक- धार्मिक आंदोलने आणि त्या साऱ्यांना देशवासीयांनी 
दिलेला उत्कट प्रतिसाद यामागे विवेकानंदांचे कार्यच प्रेरणा म्हणून उभे 
होते.
आजही देशातील परिस्थितीवर एक नजर टाकली तर फारशी सुखावह 
स्थिती नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती तर भयंकर म्हणावी अशीच 
आहे. माणसाची आत्मकेंद्रित आणि अहंकारी वृत्ती अधिकच वाढलेली आहे. `मला काय
 त्याचे?' ही भावना नसानसात भिनलेली आहे. आपुलकी, स्नेह, कळकळ हे तर 
सूक्ष्मदर्शकातून शोधावे लागतात. आदर, श्रद्धा, सहानुभूती, चांगल्या आणि 
पवित्र गोष्टींची आस्था यांची वानवाच दिसते. कर्तव्याच्या नावाने ठणठणाट. 
अंमली पदार्थांचे व्यसन, जुगार, दारू, अनिर्बंध आणि विकृत कामवासना, 
बेशिस्त, संवेदनहीनता हे सारे युवकांचे अविच्छिन्न गुण झालेले दिसतात. 
सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण त्यात सगळ्यांचा विचार नसून, 
स्वार्थाचाच विचार प्रमुख आहे. मनोरंजनाच्या नावाखाली चालणारी थेरं ही तर 
प्रचंड मोठी डोकेदुखी आणि समस्या झालेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात 
कर्तृत्व दिसून येत असले तरीही ते दिशाहीन आणि विचारहीन असल्याचे दिसून 
येते. याचे परिणामही दिसून येऊ लागले आहेत. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत 
घडलेले आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे सामूहिक बलात्कार कांड, हे 
त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. रोजची वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या,
 अन्य प्रसार माध्यमे, social media यातून सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर आहे.
 या साऱ्यातून ज्यांनी मार्ग काढायला हवा ते भांबावलेले दिसत आहेत. अशा 
परिस्थितीत पुन्हा एकदा स्वामीजींनी युवकांना केलेल्या आवाहनाकडे वळण्याची 
गरज आहे.
मद्रास येथे बोलताना स्वामीजी म्हणाले होते-
`परिस्थिती
 बदलण्यासाठी माझी एक योजना आहे. ती प्रचंड वाटते, पण ती आवश्यक आहे. 
तुम्ही विचाराल की यासाठी द्रव्य कोठे आहे? यासाठी द्रव्य अत्यावश्यक नाही.
 द्रव्य खरोखर काहीच नाही. आयुष्याची गेली १२ वर्षे, मला माझे पुढचे भोजन 
कोठून मिळेल हे माहीत नसे. पण मी जाणून होतो की पैसे व आवश्यक वस्तू मला 
प्राप्त होतीलच. कारण त्या माझ्या दास आहेत. मी त्यांचा दास नाही. पण माणसे
 कोठे आहेत? हाच खरा प्रश्न आहे. मद्रासमधील तरुणांनो, तुमच्यापासून मला 
आशा आहे. स्वत:वर प्रचंड विश्वास असू द्या. प्रत्येक आत्म्यात अनंत 
सामर्थ्य वसत असते, अशी दृढ श्रद्धा बाळगाल तरच तुम्ही भारताचे पुनरुत्थान 
करू शकाल. जे तरुण बलशाली, निरोगी व तीक्ष्ण बुद्धीचे असतील तेच ईश्वराला 
प्राप्त करून घेतील. तारुण्यातील उत्साह आणि जोम कायम आहे तोवरच तुम्हाला 
भविष्य घडविण्याची संधी आहे.'
कोलकात्याच्या तरुणांपुढे बोलताना ते म्हणाले-
`कोलकात्यातील
 तरुणांनो उठा, जागे व्हा. भिऊ नका. आपल्याला अभी: - म्हणजे निर्भय झाले 
पाहिजे. आपल्या देशाला आज मोठ्या त्यागाची गरज आहे. तरुण लोकच तो करू 
शकतील. तरुण, उत्साही, शक्तिमान, बुद्धिमान, सुदृढ अशांचेच हे कार्य आहे. 
हे लक्षात असू द्या की, कोलकात्यातील रस्त्यात खेळणारा मी एक अगदी सामान्य 
असा मुलगा होतो. मी जर फार मोठे कार्य केले असेल तर तुम्ही त्याहून कितीतरी
 अधिक कार्य करू शकाल. हृदयातील उत्साह जागवून उठा. आपण गरीब आहोत. 
आपल्याला मित्र नाहीत असे समजू नका. पैशाने मनुष्य घडविलेला कोणी पाहिला 
आहे का? मनुष्यच पैसा निर्माण करीत असतो. मनुष्याच्या शक्तीने, उत्साहाच्या
 बळाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे जग बनलेले आहे.'
१२ नोव्हेंबर १८९७ रोजी लाहोर येथे बोलताना स्वामीजी म्हणाले-
`लाहोरच्या
 तरुणांनो, तुम्ही शेकडो प्रकारचे समाज स्थापन करा, हजारो राजकीय सभा भरवा,
 वा लाखो संस्था काढा; पण जोवर ती सहानुभूती, ते प्रेम व सर्वांचा विचार 
करणारी ती सहृदयता तुमच्या ठायी निर्माण होत नाही, तोवर या गोष्टींचा 
काहीही उपयोग नाही. बुद्धदेवांची सहृदयता जोवर भारतात परत येत नाही, 
जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांची वचने प्रत्यक्ष व्यवहारात उतरविली जात नाहीत 
तोपर्यंत आपल्याला कशाचीही आशा नाही. म्हणूनच लाहोरच्या तरुणांनो, 
अद्वैताचा शक्तिशाली ध्वज पुन: एकवार उंच उचला. कारण अन्य कोणत्याच आधारावर
 ते अद्भुत प्रेम तुमच्या ठायी उत्पन्न होऊ शकणार नाही. जोवर सर्वत्र 
समभावे विद्यमान असणाऱ्या ईश्वराला तुम्ही पाहात नाही तोवर ते अद्भुत प्रेम
 तुमच्या ठायी निर्माण होणार नाही. उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती 
झाल्याविना थांबू नका. त्यागाविना काहीच साध्य होणार नाही. दुसऱ्याला मदत 
करावयाची असेल तर क्षुद्र स्वार्थाचा त्याग करावाच लागेल. तुम्ही आपल्या 
सर्वस्वाचा त्याग करा. आपल्या मोक्षाचाही विचार न करता इतरांचे कल्याण करा.
 आपले राष्ट्र जिवंत राहावे म्हणून तुम्ही उपाशी मरण पावलात- तुमच्या, 
माझ्यासारखे हजारो लोक मरण पावलेत- तरी बिघडले कोठे? सज्जन असो वा पतित, 
गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकास मृत्यू हा येणारच. कोणाचेही शरीर चिरकाल 
टिकत नाही. मगरमिठीप्रमाणे एखाद्या वस्तूस चिकटून राहण्याची दृढता व 
चारित्र्याचे बल आज आपणास हवे आहे.'
स्वामीजी म्हणत असत, तुम्हाला 
भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर फुटबॉल खेळा. तुमच्या शरीरात बळ असेल तरच 
तुम्हाला मोठमोठी तत्वज्ञाने समजू शकतील. तरुणांना जीवनात काही साध्य 
करावयाचे असेल तर पोलादी बाहू व सिंहसदृश पराक्रमाची गरज आहे असे ते नेहमी 
म्हणत असत. नि:स्वार्थता आणि मानवमात्राबद्दल निरपेक्ष प्रेम याच आवश्यक 
गोष्टी होत यावर त्यांचा भर होता.
न्यूयॉर्क येथून १९ नोव्हेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात-
`माझ्या
 शूर युवकांनो, आपण सफल होणारच. प्रेम, सच्चेपणा आणि धैर्य यांचीच आवश्यकता
 आहे. जीवन म्हणजेच विकास, म्हणजेच विस्तार, म्हणजेच प्रेम; म्हणून प्रेम 
म्हणजेच जीवन. स्वार्थपरायणता म्हणजेच मृत्यू. कारण ज्याचे हृदय प्रेमाने 
ओथंबलेले नसते असा माणूस मृतच समजावयाचा नाही तर काय? वत्सांनो, दु:खी, 
अज्ञानी, गरीब यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतके व्याकूळ होऊ 
द्या, तन-प्राण इतके पिळवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ 
येईल आणि डोके असे गरगरायला लागेल की वेड लागते की काय असे तुम्हाला वाटू 
लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंताच्या पादपद्मी निवेदन करा. 
तेव्हाच ते तुम्हाला शक्ती, साहाय्य व अदम्य उत्साह देतील. गेली १० वर्षे 
सतत माझा एकच मूलमंत्र होता- झुंजा, झुंजत पुढे व्हा. आजही मी पुन्हा तेच 
म्हणतो- झुंजा, झुंजत पुढे व्हा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंध:काराने भरून
 गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो- झुंजत पुढे चला. आज आशेच्या 
प्रकाशाने दशदिशा किंचित उजळल्या असताना देखील माझा तोच मंत्र आहे- चला. 
झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो भिऊ नका. नक्षत्रतारकाखचित आकाश तुमच्यावर 
कोसळून तुमचे चूर्ण करून टाकील अशा भयाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू नका.
 थांबा, थोड्याच वेळात ते तुमच्या पायाखाली आल्याचे तुम्हाला दिसून येईल. 
जरा धीर धरा. तुम्हाला दिसून येईल की- पैशाने, नावलौकिकाने, विद्येने 
कशानेही काही साधता येत नाही. एकमात्र प्रेमानेच सारे साधता येते; 
संकटाच्या अभेद्य भिंती चारित्र्याच्या बळाने पाडून टाकता येतात व मार्ग 
मोकळा करता येतो. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने 
टाळा; सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशाने उशिरा का होईना, 
पण यश आपले आहे हे निश्चित समजा. भावी ५० शतके तुमच्या कार्याकडे डोळे 
लावून बसली आहेत. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे.'
स्वामीजींच्या
 अशा विचारांचे सामर्थ्य वेगळे सांगण्याची गरज नाही. आजच्या संभ्रमित 
वातावरणातही दिशादर्शन करण्याची त्यांच्या विचाराची आणि जीवनाची ताकद कायम 
आहे. आवश्यकता आहे त्यांचे जीवन आणि विचार समजून घेण्याची. आपण सारेच 
त्यांच्या जीवनाचे आणि विचारांचे परिशीलन करू या.
-श्रीपाद कोठे
नागपूर                 
                            
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा