बुधवार, २४ एप्रिल, २०१३

अर्धवटांची झुंड

हा प्रसार माध्यमांचा काळ आहे. त्यातही दूरचित्रवाहिन्यांचा. त्यांच्यातील `टीआरपी’ची चढाओढ आणि स्पर्धेची बजबजपुरी आता लपून राहिलेली नाही. त्यावर विनोदी प्रहसने, चुटकुले वगैरेही आता सवयीचे झाले आहे. कधीकधी या बुद्धिवादी व्यवसायातील निर्बुद्धताही दृष्टीस पडते. काही महिन्यांपूर्वी या दूरचित्रवाहिन्यांमध्ये काम करणार्याच्या IQ वर चर्चा झाली होती. आज पुन्हा एकदा त्यावर चर्चा करण्याची पाळी आली आहे. काल (सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२ रोजी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विधानाची खूप चर्चा झाली. विवेकानंद आणि दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंधित विधानाने गदारोळ उठविला. एकीकडे हे वादग्रस्त विधान दाखविले जात होते आणि त्याच पडद्यावर, त्याच्याच शेजारी त्यावर टीका होत होती. पूर्ती प्रकरणाने आधीच जेरीस आलेले बिचारे गडकरी आणखीनच बिचारे झाले होते. मग त्यांनी खुलासा वगैरे केला. खरे तर त्या खुलाशाची गरज नव्हती.
असे काय होते त्यांच्या त्या विधानात? छोट्या पडद्यावर त्यांचे विधान आणि त्यावरील वाद शेजारीशेजारी पाहताना तर हा प्रश्न आणखीनच गडद होत होता.

गडकरींच्या विधानात एक शब्दही वावगा नव्हता. केवळ बुद्धी असून भागत नाही तर ती योग्य पद्धतीने वापरली जायला हवी, हेच त्यांनी म्हटले होते. स्वार्थी, दुष्ट, गुंड, समाजद्रोही, राष्ट्रद्रोही व्यक्तींकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते हे कोण नाकारील? पण सोबतच नि:स्वार्थी, संत प्रवृत्तीच्या, परहीतार्थ आयुष्य वेचणार्या, महान कर्तृत्व गाजवणार्या व्यक्तीकडेही प्रचंड बुद्धिमत्ता असते. विवेकानंद हे माणसाने कसं असावं याचं उदाहरण आहे, तर दाऊद हे माणसाने कसं नसावं याचं उदाहरण आहे. पण त्यांच्यातला फरक हा बुद्धिमत्तेचा नाही, तर तो मूळ प्रेरणेचा, मूळ प्रवृत्तीचा, अन हा पिंड घडवणार्या सत्वगुणी संस्कारांचा आहे. हे काही समजायला फार कठीण नाही. गडकरीही तेच म्हणाले. अगदी दूरचित्रवाहिनीवर जे आणि जेवढे दाखवले गेले, त्याचाही अर्थ तोच होतो.
पण अशा साध्यासाध्या गोष्टी समजायला केवळ बुद्धी असून चालत नाही, अक्कलही असावी लागते; ज्याची आज ध्वनिवर्धक हाती घेऊन फिरणार्यांकडे प्रचंड वानवा आहे. खरे तर भाषा, विचार, त्यातून व्यक्त होणारे भाव, संदर्भांचे महत्व, शब्दांच्या मधील आशय, नेमका संवाद, प्रभावी संवाद या सार्याचा डोके गरगरविणारा दुष्काळ सगळीकडे पाहायला मिळतो. संपर्क आणि संवादाचे प्रभावी माध्यम असलेल्या प्रसार माध्यमात तरी हा दुष्काळ नसावा अशी अपेक्षा असते. पण ही अपेक्षा किती भाबडी आहे, हे अशा घटनांमधून अधोरेखित होते.

आज वाचन ही गोष्ट अतिशय दुर्मिळ झाली आहे. भाषा आणि भाषेची समज घडविणारे श्रवण हे सुद्धा कमी झाले आहे. आपल्या आजूबाजूला किती चांगली व्याख्याने होतात? अन ती ऐकायला किती लोक जातात? व्याख्यानांना जाणारे ती व्याख्याने किती ऐकतात? संवादाचेही तेच. बोलणे खूप होते, पण भाषा, विषयांची विविधता, खोली या सार्याचा खडखडाटच!! विविध वाहिन्या, चित्रपट, लोकजीवन, लोकव्यवहार यांची स्थिती तर भीषण आहे. बरे त्यातील जे चांगले, सकस आहे ते ग्रहण करण्याची इच्छा नाही. माणूस बहुश्रुत होण्याची, समजूतदार होण्याची, भाषा- भावभावना- विचार- यांच्या छटा आणि अर्थ समजण्याची प्रक्रियाच समाजात खंडित झाली आहे. त्याबद्दल कोणाला फारशी काळजी नाही हे धोक्याचे आहे.

आम्ही ज्ञानाची दारे सार्यांसाठी खुली केली, पण ज्ञानलालसा मात्र निर्माण करू शकलो नाही. ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा संग्रह नाही किंवा शब्दांची ओळख नाही. तसे असते तर एका शब्दकोशाशिवाय अन्य कुठल्या पुस्तकाची गरज पडली नसती. ज्ञानार्जन, ज्ञानसाधना आणि त्या ज्ञानाच्या भरवशावर येणारी प्रगल्भता ही एक व्यामिश्र, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यासाठी वाचन, श्रवण यासारख्या गोष्टीबरोबरच विशिष्ट मानसिकता आवश्यक आहे. आपल्याला सारे कळते, जन्माला येतानाच आपण परिपूर्ण होऊन आलेलो आहोत, शाळा-महाविद्यालयात जे काही शिकलो त्यापुढे आणखी काही शिकण्याची, समजून घेण्याची गरज नाही, आमचे अनुभव आणि आमची समज हेच योग्य व अंतिम होय; अशा प्रकारची जी मानसिकता आज पाहायला मिळते ती खरा अडसर आहे. ती मानसिकता सोडून दिल्याशिवाय असले गोंधळ आणि त्याने समाजाचे होणारे नुकसान थांबणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, अवकाश लागतो. कशा ना कशामागे सतत धावत राहणार्या आणि तसे न धावणार्यांना निरुपयोगी समजणार्या समाजात गोंधळाशिवाय काय हाती लागणार?
वेग आणि विश्राम यांचा समतोल साधता आला तरच, माणसाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य संतुलित होऊ शकेल. ब्रेकिंग न्यूज मागे धावणार्या लोकांना वाचन, श्रवण, चिंतन, मनन, संभाषण यासाठी वेळ तरी आहे का? छोटा पडदा तर जाऊच द्या, मुद्रित माध्यमातही आज या सार्याचा आग्रह संपुष्टात आला आहे. कधी काळी, म्हणजे अगदी वीसेक वर्षापूर्वी वृत्तपत्रामध्ये अनेक गोष्टींचे आग्रह राहत असत. त्यातून नकळत एक जबाबदार पत्रकारिता आकारास येत असे. समाजात त्याची विश्वासार्हता होती, त्याचे परिणामही चांगले होत असत. आज मात्र विचारीपणा, प्रगल्भता यासाठी असलेले आग्रह पातळ झाले आहेत. यशवंतराव चव्हाणांची तुलना शरद पवारांशी करता येत नाही, अडवाणी- अटलजींची तुलना गडकरी- जेटलींशी करता येत नाही, बाबासाहेब आंबेडकरांची तुलना आजच्या दलित नेत्यांशी करता येत नाही आणि महात्मा गांधींची तुलना सोनिया- राहुल गांधींशी करता येत नाही.

पण एक बरे झाले, आजचे ध्वनिक्षेपक प्रतिनिधी अन त्यांचे वरिष्ठ वाचत नाहीत ते! कारण त्यांनी भरपूर वाचले असते तर कदाचित त्यांनी विवेकानंदही वाचले असते. आणि मग कदाचित त्यांनी गडकरी सोडून विवेकानंदांनाच वेठीस धरले असते. विवेकानंदांची बुद्धिमत्ता आणि त्याची प्रखरता समजणे हे काय नुडल्स खाण्याइतके सोपे आहे का?

श्रीपाद कोठे
नागपूर,
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा